लवकरच अडगळीत पडणार्या धनुष्यबाणाच्या शिंदे गटाचे स्वयंभू नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांविरोधात केलेल्या बंडाची तलवार म्यान केल्यानंतर त्यांची बिनपाण्याने हजामत करणारे एक निनावी पत्र इतकं व्हायरल झालं की या पत्राने गिनिज बुकात रेकॉर्डब्रेक निनावी पत्राचा मान मिळवल्याची सनसनाटी बातमी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने मला ताबडतोब दिली. चार आठवड्यांपूर्वी अजितदादांकडून वारंवार झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवतारे यांनी महायुतीचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. एवढंच नव्हे, तर गावोगावी बैठका घेऊन तयारी देखील सुरू केली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सचिवांच्या विनंतीवरून त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आणि अजितदादांचा जीव भांड्यात नव्हे तर विहिरीत पडला. मात्र यामुळे शिवतारेंच्या समर्थकांना तोंडघशी पडावं लागलं. त्यांची घोर निराशा झाली. त्यापैकी एकाने निनावी पत्र लिहून त्यांना सर्व बाजूंनी अशा सणसणीत शाब्दिक थपडा लगावल्या की प्रत्यक्ष शारीरिक मार देणार्या बांबू, लाठ्या आणि तलवारीपेक्षा या शाब्दिक माराने झालेल्या खोलवर जखमा कधीच भरून येण्यासारख्या नाहीत. पण काही राजकारण्यांची कातडी गेंड्यासारखी असते. त्यांना अशा वारांनी, गुद्द्यांनी काहीच फरक पडत नाही. शिवतारेंच्या बाबतीतही तेच झालं. ते घायाळ तर झाले नाहीतच, पण अजितदादांच्या चोरून भेटीगाठी घेत त्यांनी अजितदादांविषयी आपल्या मनात किती ‘किंमती’ आदरभाव आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा शोध घेण्यासाठी मी पोक्याला त्यांच्याकडे पिटाळला. तीच ही मुलाखत. बारामतीकरांचे डोळे उघडणारी.
– नमस्कार शिवतारे बापू.
– नमस्कार. जय घड्याळ, जय अजितदादा. जय जय शिंदेशाही.
– असा अचानक साक्षात्कार कसा काय झाला तुम्हाला? मग आधी अजितदादांविरोधात एवढी बोंबाबोंब कशाला केलीत?
– ते एक ट्रेड सिक्रेट आहे.
– म्हणजे?
– कोंबडीचे पंजे. च्यायला तुम्हाला एवढंबी कसं कळत नाय.
– अहो, पण त्या निनावी पत्रात तुम्हाला नको नको ती दूषणं दिलीयत त्या निनाव्याने.
– आता तुला खरं सांगतो. ते पत्र दुसर्या तिसर्या कोणीही लिहिलं नसून तो निनाव्या मीच आहे.
– काय सांगता!! तुम्ही?
– हो. मी मी मी. माझी भाषा माहिताय ना तुम्हाला! तलवारीची धार असते तिला. हे सर्व सिक्रेट आहे. कुणालाही सांगू नको.
– पण, स्वत:च स्वत:ला एवढ्या शिव्या द्यायच्या! बापरे! काय काय भयानक लिहिलं होतं त्या पत्रात. संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा, पोटात एक आणि ओठात एक असणारा, महाराष्ट्राचा पलटूराम, पुरंदरचा मांडवली सम्राट, पाकीट घेणारा, शिवतारे जमींपर, चिऊतारे, ५० खोके शिवतारे ओके, फाडा पोस्टर निकला चूहा… असं लिहून वर अजितदादांपुढे माघार घेतल्यानंतर या माघारीला पुरंदरचा तह म्हणून अजितदादाविरोधी पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी आता काय करायचं? असा प्रश्नही विचारलाय.
– त्यावरून तुला कळलं असंल की माझ्या मागे किती मतदार आहेत ते. अजितदादांना ते कळावं म्हणून हा सारा उपद्व्याप केला. शिवाय अजितदादांच्या पत्नी म्हणून आम्ही सुनेत्राताईंना मतदान करायचंय का, त्याचं क्वालिफिकेशन काय असाही प्रश्न त्या पत्रात विचारला होता. अजितदादांना जास्तीतजास्त उघडं कसं पाडता येईल या हेतूनेच त्यांच्या वजेच्या बाजू त्या पत्रात मी प्रकर्षाने अधोरेखित केल्या होत्या.
– याचा नेमका अर्थ काय?
– अर्थ अगदी सरळ आहे. सुनेत्राबाई पाच लाख मतांनी पडणार यावर ते शिक्कामोर्तब होतं. हे अजितदादा मला दगाबाज, उर्मट, भ्रष्टाचारी म्हणाले होते. ते मी सहजासहजी विसरणारा नाही. माझ्या अपमानाचं पुरेपूर उट्टं काढणाराय मी. आज मला लोकांच्या शिव्या पडतील, पण उद्या या सुनेत्राबाईंचा दारुण पराभव झाल्यावर अजितदादांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तेच मला ‘याचि देही याचि डोळा’ बघायचंय. त्यासाठी मला रणांगणातून पळकाढू, लाचार किंवा आणखी काहीही म्हटलं तरी चालेल. पण निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजितदादांची काय अवस्था होईल, त्याचं चित्र फक्त डोळ्यांसमोर आणून बघा. तेव्हा माझ्या या निनावी पत्राचं चीज झालेलं दिसेल.
– कमाल आहे तुमची. तरीही मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येऊ नये, म्हणून माघार घेतल्याचंही जाहीर केलंय तुम्ही.
– ते सगळं नाटक होतं. सुनेत्राताईच काय अजित पवारांच्या चोरलेल्या राष्ट्रवादी पक्षाचा आणि धरून बांधून मुख्यमंत्रीपदाच्या घोड्यावर बसवलेल्या शिंदेंच्या चोरलेल्या पक्षाचा महाराष्ट्रातून एकही उमेदवार निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ नाही, तर गुप्तचरांचा आणि भाजपाच्या महाराष्ट्रातील सर्व्हेचा गुप्त रिपोर्ट आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादा आणि शिंदे यांचे पक्ष केराच्या टोपलीत जाणार आहेत. मला ज्यावेळी हा सर्व्हेचा अंदाज कळला, तेव्हाच मी अजितदादांविरुद्ध उठाव केला. तुम्हाला मी निवडून आणतो असं खोटंच सांगितलं. मी तुमच्या बाजूने आहे, असं आश्वासन दिलं आणि विश्वास बसावा म्हणून त्यांच्या रात्री भेटीगाठी घेऊन, दर दिवशी त्यांना फोन करून धीर देण्याचा ड्रामा केला. ज्या काकांनी त्यांना वर आण्ालं, राजकारणात मोठं केलं त्यांनाच संपवायला हा पुतण्या निघाला आणि घोटाळ्यात अडकलेल्या या पुतण्याने भाजपाशी हातमिळवणी करून आपली सुटका करून घेतली हे सत्य बारामतीकरांनाच काय, सार्या जगाला कळून चुकलंय. पण कृतघ्नतेला माफी नाही हे जनता या अजितदादांना आणि शिंदेंना किती जबरदस्तपणे दाखवून देईल हे निकालानंतर कळेलच. लक्षात ठेव, कृतघ्नतेला हा महाराष्ट्र कधीच क्षमा करत नाही.