(बरखाऽस्त महल. पुन्हा कुठल्या अडबंगी मुलानं बरखा महलच्या नावात ‘स्त’ जोडलेला दिसतोय. पण आज त्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाहीय. जनानखान्यातून बारीक हुंदक्यांचा आवाज येतोय. दरबार हॉलमध्ये धब्बेदार इकमाल सिद्दीक सिंहासनावरून उतरून जमिनीवर बसलेला. शिरस्त्राण सिंहासनावर आडवं पडलेलं. सिंहासन म्हणजे काय? एक जुनी भव्य लाकडी खुर्ची, तिला मोजकी हिरे-माणकं लावलेली. त्यावर रेशमी वस्त्राचं काम. शिरस्त्राण म्हणजे तरी काय? एक सोन्याचं हेल्मेट, ज्याला मोरपंखी तुरा लावलेला. इकमाल हातातल्या रेशमी कापडाने निगुतीने शिरस्त्राण पुसतोय. कौतुकाने शिरस्त्राण आणि सिंहासन न्याहाळतोय. तोच कुठलंसं बाहुलं घेऊन शिकस्त उड्या मारत आत येतो.)
शिकस्त : (बापाच्या गळ्यात पडत) बाबा, आज किनई मी गुलशनाबादची किल्लेदारी घोषित केली. बेबंद मोडसे यांना राजवस्त्र देणार आहे. त्याचा ‘हाबी’ फॉर्म कुठल्या कपाटातून देऊ?
इकमाल : (सिंहासनावरच्या हिर्याचे पाडलेले पैलू बघण्यात गर्क) हं!?
शिकस्त : (गळ्याला घट्ट मिठी मारत) आणि किनई? मी पण कळ्याणचा किल्लेदार होणारे! होऊ ना? मला तरवार आणि निशाण द्याल ना? मी फडकून येतो. मला ना तुम्ही सिपह सालार नाहीतर दिवाण कराल का? मी अशी फाईट करीन ना? दुश्मन असाऽऽ जंग सोडून पळून जाईल! (स्वगत) तुगडुक तुगडुक! चाल रे माझ्या सर्जा! (घोड्यावर स्वार झाल्याच्या आविर्भात एक दौड लावतो. गोल फेरी मारून आल्यावर) आणि मला ना? तो पागेतला तुमचा सफेद घोडा द्याल? मी काल खेचरावर बसून बघितलं होतं. मी आता मोठ्ठा झालो ना? पण आताशा पहार्यावरले शिपाई मला मुजरा घालतच नाही. तुम्ही त्यांना रागवाल का? ऐकताय ना तुम्ही?
इकमाल : (स्वतःच्याच तंद्रीत हिर्याला बघून सुटलेली लाळ पुसत) अँ?
शिकस्त : (लाडीक हट्टाने) आबासाहेब, तुम्ही मी मागेन ते देणार बोलला होता ना? बोला ना कायतरी? बोला ना! (इकमालला दोन्ही हातांनी गदगदा हलवतो.)
इकमाल : (शिकस्तच्या हलवण्याने तंद्री भंगते.) बेटा, आ गये तुम? आखिर कहाँ कहाँ घूमते रहते हो?
शिकस्त : (छाती फुगवत अभिमानाने) मी किनई मोहिमांच्या तयारीला लागलोय.
इकमाल : (शिकस्तला जवळ ओढत) बेटा, ऐसा नहीं करते! बिन बताये कही नहीं जाते. सामनेवाली सेना बहुत ताकदवर है। आणि म्हणून आपण महलच्या बाहेर नको जायला! काय? तशीही तुमची उमर आहेच कसली?
शिकस्त : (अतिशय लाडाने) बाबा..!
इकमाल : (मध्येच बोलणं थांबवत) बेटा, हमने बगावत-ऐ-गद्दारी की थी। उसके बाद हमने मजहब बदला है, अब तुम अब्बाजान कहने की आदत डाल लो। अगर किसी ने सुन लिया तो ब्यादश्या नौरंगजेब हमे पदसे हटा देंगे। आणि म्हणोन इथून पुढे बोलताना काळजीपूर्वक बोलत जा. समजलं?
शिकस्त : (मान हलवत) जी। अब्बाजान। पण मी मोर्चेबांधणीला जाऊ ना? येत्या इलेक्शनमधी हातघाईच्या निर्णायक लढाया आपण जिंकू. तुम्ही मला ‘शेणा’ द्या. मी तुम्हाला लोणा… सॉरी! लोणी देईन!
इकमाल : (कवतिकाने पोराला बघत) बेटा, तेरे बापने नौरंगजेबके नामपर एक ऐतिहासिक गद्दारी की थी। जो ३३ मुल्कों में पहचानी गयी। उस वक्त खूप लोणी मिळा था। वो तेरे लिए सब संभाळ के रख्खा मैंने! आणि म्हणोन आता आपल्याला आणखी लोण्याची गरज नाहीये! (दीर्घ श्वास घेत) आपण ह्यांच्या… त्यांच्या… कुणाच्याही विचारांवर… सॉरी, इशार्यावर चालणारी लोकं आहोत. आपण नुसती गद्दारी केलेली नाहीय तर छीः थूँ! करण्यासारखी मक्कारी केलीय! और बेटा, जो तुम शेणा मांग रहे हो, लेकिन मैं तो सिर्फ निशाण लेके भागा हूँ। जो चालीस-पचास लोग मेरे साथ आ मिले, वो तो सिर्फ लोण्याके गोळे को देखकर आये हुए हैं। तो जो मेरे पास है ही नही, वो शेणा मैं दूँगा कैसे बेटा?
शिकस्त : (डोकं खाजवत) तो अब्बाजान वो कोई केरसूळ समरावती से लढना चाहते है, वो खुद लढ लेंगे। फक्त त्यांना आपलं निशाण पाहिजेल. देऊ या का?
इकमाल : (किंचित हसत) बेटा, उस के लिए हमे शामेनी से बोलना पडेगा। वो कोई कावड़े, धावड़े, भावड़े नाम का कोई वॉररूम में बैठा मनसबदार है, उनसे बोलने के लिए कहते है। और फिर वो कोई कागज दिखाकर बोलता हैं, ये यहाँ से नहीं लड़ सकता। हार जाएगा। आणि म्हणोन आमचा नाईलाज होतो.
शिकस्त : (शंकाग्रस्त) का ते भविष्य बघतात?
इकमाल : (अतीव चिंतेने) बेटा, ते कसलंतरी सर्व्हे बुक बघतात नि स्वतःच निर्णय देऊन टाकतात. त्यानंतर कोण कुठून लढणार, हे विचारायचं नाही. आणि बेटा आपल्याला लोणी मिळालंय ना? ते खाताना का बोलायचं?
शिकस्त : पण अब्बु आपण त्यांना मोहिमेवर लढाईला पाठवावं, म्हणून ते माझ्याकडं येतात. मी खेळायला लागलो की लढाईला जाऊया, म्हणून बोलतात…
इकमाल : (काळजीने) बेटा, तू ह्यात वाहवत जाऊ नको! गप्प आपल्या कक्षात लोणी खावं.
शिकस्त : (कमरेला लटकणार्या म्यानातून तलवार काढत) पण मला किनई लढायचं होतं. ते म्हणतात, छोटे हुजूर आप लढिए। मग मी पण चहापन्हा नौरंगजेबांसारखी स्पीच लिहून घेतलीय, हे बघा (दुसर्या हातात कागद पकडत) आम्ही चहापन्हा नौरंगजेबांच्या इशार्यावर नाचणारी गद्दार, गद्दळ लोकं आहोत. आमची धाव केवळ ताटापर्यंत…
इकमाल : (त्रासिक चेहर्याने) बाळ ते तटापर्यंत असेल रे!
शिकस्त : (लटक्या रागाने) हे बघा, तुम्ही असंच करता दरवेळी! जाऊ दे मी नाही खेळणार! (तणफणत इकमाल शेजारी बसतो.)
इकमाल : (सुटकेचा निःश्वास टाकत) नकोच खेळू बाळा! फुलचंदांनी म्हंटलेलंचं आहे, आम्ही कोण म्हणुनी काय पुससी? आम्ही असू पिसवा…
शिकस्त : अब्बु! फुलचंद आणि तुम्ही यांत धब्बेदार गद्दारे वतन कोण?
इकमाल : अर्थात आम्हीच! त्यात काय विचारायचं? ते ३३ मुल्कों…
शिकस्त : मग जर तुम्ही सुभेदार आहात! ह्या प्रांताचे तुम्ही मुख्य आहात मग कोण कुठून लढणार, कोण कुठे मोर्चे बांधणार, कुणाला चौथाई, कुणाला देशमुखी, कोण खास, कोण आम, हे तुम्ही ठरवायला पाहिजे ना?
इकमाल : बेटा, किसीने खूब कहाँ हैं। (भसाडया आवाजात गाऊ लागतो.) ये दुनिया… दुनिया पित्तल दी। और ये सल्तनत फुलचंद की!
शिकस्त : अब्बु मग मला तलवार, घोडा, निशाण काही मिळणार नाही?
इकमाल : (शिकस्तच्या चेहर्यावरून हात फिरवत) बेटा, निशाण जरूर मिलेगा। चहापन्हा नौरंगजेब और वजीर अमानतुल्ला शामेनीने वो हमें दिया है, लेकिन इस्तेमाल करनेसे पहले फूलचंदसे पूँछना पडेगा। और आपल्याकडे सैन्य नाहीच त्यामुळे पागा नाही. त्यामुळे मिरवायला आणि उडवायला घोडा फुलचंद डबीरांकडूनच आणावा लागेल. नव्या जिम्मेदारीची राजवस्त्र-तरवार देखील तेच देतील.
(एकाएक जनानखान्यातून हुंदक्यांचा आवाज वाढतो.)
शिकस्त : (कान टवकारून ऐकत) अब्बाजान कहीसे आवाज आ रेली हे।
इकमाल : हां, आज फिर कोई बिना लढ़ेही शहीद हो गया होगा। आणि म्हणोन हा आवाज येतोय.
शिकस्त : थोडक्यात आपला गुट कोंबड्यांचं खुराडं झालाय का? खुडूक म्हणूनही कापा आणि तब्येतशीर म्हणूनही कापा.
इकमाल : अश्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यायला नको बेटा!
शिकस्त : पण जनानखान्यात जाऊन तुम्ही त्या बेवाँना शांत करत का नाही?
इकमाल : (कठोर मनाने) जाऊँगा बेटे! और कहूँगा उनसे! तुम्हाला यापेक्षा मोठा सन्मान आणि मोठं सन्मानाचं पद आम्ही लवकरच देऊ! आम्ही त्यांच्यामागे खंबीरपणे उभे आहोत, आणि म्हणोन सोबत सुद्धा आहोत.
शिकस्त : अब्बाजान पण तुम्ही आज हे शिरस्त्राण का साफ करत बसलात? आणि सिंहासनाच्या खाली बसण्याचं कारण काय आहे?
इकमाल : त्याचं असंय! आपण फुलचंद डबीरांच्या त्यागामुळे बरखा महालात आहोत. आणि म्हणोन एक कृतज्ञता आहेच, परंतु एक त्यांच्याप्रति आदर ठेऊन आपण राहिलं पाहिजे…
शिकस्त : पण का अब्बु?
इकमाल : आपल्यालाही जर ऐकायचं नसेल की तुम्हाला यापेक्षा मोठं सन्मानपद देऊ तर..?
(तोच शिपाई पळत येतो, कुर्निसात घालतो.)
शिकस्त : (चमकून त्याच्याकडे बघत) बोला शिपाई. काय सांगायला आलात?
शिपाई : कळ्याण जितने के लिए आपकी अगुवाई में लढाई लढी जायेगी। आपकी उम्मीदवारी फूलचंदजी ने डिक्लेयर कर दी है।
इकमाल : (अत्यानंदाने) या खुदा नौरंग! तेरी मेहरबानी!
(त्या बातमीसरशी तोफ डागल्या जाते, पण त्याने बरखा महलचा बुरुज ढासळतो. ते बघून इकमाल डोक्याला हात लावून बसतो.)