झुनून नावाचा एक सूफी फकीर होता.
एक तरुण त्याच्याकडे गेला. म्हणाला, मला सत्य काय आहे ते जाणून
घ्यायचं आहे. परमेश्वरस्वरूप समजून घ्यायचं आहे. तुम्ही मला त्याचं
दर्शन घडवा.
झुनूनने खिशातून एक चमकदार दगड काढला आणि म्हणाला, सत्यबित्य
नंतर बघू. आधी तू हा दगड घेऊन भाजीमंडईत जा. कोणी तो खरेदी करतोय
का पाहा. विकायचा नाही बरं का, फक्त किंमत काढून यायची.
तो तरुण दिवसभर मंडई फिरून आला. झुनूनला म्हणाला, एक विक्रेता दोन
पैसे द्यायला तयार झाला होता. छोटं वजन म्हणून वापरता येईल म्हणाला.
झुनूनने दगड पुन्हा खिशात ठेवला. म्हणाला, उद्या सकाळी परत
तो माझ्याकडून घ्यायचा आणि सोनारांकडे जायचं. फक्त किंमत
काढून यायची.
दुसऱ्या दिवशी तो तरुण आला आणि म्हणाला, काय वेडपट लोक आहेत
त्या सोनारांच्या दुकानांत. दहा हजार रुपये द्यायला तयार झाले या
दोन पैशांच्या दगडाचे.
झुनून म्हणाला, आता उद्या जवाहिऱ्यांच्या बाजारात जायचं आणि
त्यांच्याकडून किंमत काढून यायची.
तो तरुण संध्याकाळी आला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले होते. तो म्हणाला,
एक जवाहिऱ्या मला दहा लाख रुपये द्यायला तयार झाला या दगडाचे.
त्याचं डोकं फिरलंय की काय!
झुनून म्हणाला, तो वेडा नाही. करोडो रुपये किंमतीचा दगड त्याला दहा
लाखांत मिळणार म्हणजे त्याचा फायदाच फायदा आहे. तू त्याचं सोड,
तुझं पाहा. आता मी तुला खिशातून या दगडासारखंच काढून सत्य दिलं,
परमेश्वर दिला, तर तुला त्याची किंमत कळेल का? तू अजून
भाजीमंडईतच आहेस… रत्नपारखी बनलास, तरच रत्न मिळून फायदा.
हो की नाही?