बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून उतरलेल्या अप्रतिम व्यंगचित्रांचा संग्रह असलेलं ‘फटकारे’ हे पुस्तक निव्वळ त्यांच्या राजकीय अनुयायांच्या संग्रही नसतं; ते व्यंगचित्रकलेचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करू पाहणार्या प्रत्येकाच्या संग्रही असतं… एखादा प्राणी, माणूस, वस्तू यांचं रेखाटन कसं करावं, याचं जिवंत मार्गदर्शन त्यातून मिळतंच, शिवाय त्यांतल्या अनेक कल्पना पुढच्या अनेक व्यंगचित्रकारांनी वापरलेल्या आहेत… या अंकाचे, ‘मार्मिक’चे गौरव सर्जेराव यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ पाहिल्यावर अनेक जुन्या वाचकांना १९७७ सालात जन्माला येऊन लगेच विसर्जन पावलेल्या महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस या पक्षावर बाळासाहेबांनी रेखाटलेल्या मुखपृष्ठचित्राची आठवण झाली असेल… मसकाँ या नावाने शंकरराव चव्हाण या काँग्रेस निष्ठावंताने ही वेगळी चूल मांडली होती. जनता पक्ष आणि इंदिरा काँग्रेस यांच्यात सगळ्यात मोठी लढाई होती, या फुटकळांना कोणी विचारतही नव्हते… तरीही ते आपली लाट येण्याची वाट पाहात होते, याची थट्टा बाळासाहेबांनी केली आहे… आज देशात ज्यांच्याकडे सत्ता आणि सर्व प्रकारची शक्ती एकवटली आहे, त्या भारतीय जनता पक्षालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा करिष्माच मागच्या दोन वेळी आलेल्या, आणवलेल्या लाटांसारखा आपल्याला तारून नेईल, अशी आशा वाटते आहे. पण सर्व प्रकारच्या अनीतीचे, अधर्माचे, दडपशाहीचे थैमान पाहून जनसमर्थनाचा सागर आटत चालला आहे, भाट, चापलूस आणि कणाहीनांच्या पाठबळावर लाटा येत नसतात, हे त्यांना कळून जाईलच निवडणुकीत!