कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी यात्रा प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दोन दिवस संचारबंदीचा आदेश देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बससेवादेखील बंद करण्यात आली होती. मात्र, स्थानिक प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या सेवेकरिता 25 व 26 रोजी बससेवा सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, या बसमध्ये भाविकांना प्रवेश करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
सध्या कोरोनाचे सावट जास्त गडद होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पालख्या, दिंडय़ांना पंढरपूर तालुक्यात प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने पालख्या, दिंडय़ांना पंढरपुरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच पंढरपूर शहरात भाविकांनी गर्दी करू नये, यासाठी दोन दिवस संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर रविवारपासून पंढरपूरकडे येणारी व पंढरपूरहून होणारी बससेवाही बंद करण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने यात बदल करून प्रवाशांसाठी बससेवा पूर्ववत सुरू ठेवली आहे.
यात्राकालावधीत बससेवा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना शहराबाहेर ये-जा करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने 25 ते 26 नोव्हेंबर रोजी बससेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या बसमधून भाविकांना पंढरपूर येथे उतरता येणार नाही. भाविकांनी बसने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. दरम्यान, पंढरपूरकडे होणारी इतर खासगी वाहतूकदेखील 30 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. इतर पर्यायी मार्गांनी अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यात्राकालावधीत नेहमी बंद राहणारी बस वाहतूक या वेळेस मात्र सुरू राहणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून त्रिस्तरीय नाकाबंदी
कार्तिक वारीत बाहेरील भाविक व नागरिक पंढरपुरात येऊ नयेत, यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आलेली आहे. संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण फिरू नये. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर थांबवून प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. बाहेरील नागरिकांना अथवा भाविकांना तेथूनच परत पाठविण्यात येणार आहे. यासाठी वारीकालावधीत बाहेरील नागरिकांनी व भाविकांनी शहरात येऊ नये. नदीस्नानासाठी बंदी असल्याने चंद्रभागा घाटावर, तसेच नदीपात्रात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, भाविकांनी पंढरपूरकडे येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
गर्दी टाळण्यासाठी शहरासह 11 गावांत संचारबंदी
वारीकालावधीत चंद्रभागास्नान करून कळसाचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक पंढरपुरात येतात. सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 1 डिसेंबरपर्यंत चंद्रभागास्नान करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. खासगीवाले यांच्या
रथोत्सवाची मिरवणूक नगरप्रदक्षिणामार्गावरून
साध्या पद्धतीने व सामाजिक अंतराचे पालन करून काढण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. शहरात भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी मंगळवारपासून पंढरपूर शहरासह लगतच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. मठामध्ये बाहेरील भाविक राहणार नाहीत, यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सौजन्य : दैनिक सामना