मराठी नाटकांना इंग्रजी शीर्षके देण्याचे क्रेझ आजकाल वाढतच चाललय. मराठी नाव बदलून इंग्रजी बारसे करण्याचेही प्रकार सर्रास घडतात. हे नामांतर नाटकाची गरज म्हणून नेहमी असतेच असे नाही. निर्मात्यांचा हा व्यावसायिक बुकिंगचा प्रश्न असला तरी मराठमोळ्या शब्दांना त्यामुळे बाजूला ठेवले जात आहे. शब्दभान सुटत चालले आहे. असो. शेक्सपीअरनेच म्हटलंय की नावात काय आहे? हे कबूल पण तरीही इंग्रजी टायटलचा अतिरेक ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल! आज रंगभूमीवर सुरू असलेल्या काही नाटकांची नावे पाहा. ‘ऑल द बेस्ट’, ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘राजू बन गया जंटलमन’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘डबल लाईफ’, ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘यू मस्ट डाय’, ‘मर्डरवाले कुलकर्णी’, ‘ब्रॅन्ड अॅम्बेसेडर’, ‘फ्रेंड रिक्वेस्ट’, ‘अमेरिकन अल्बम’ आणि ‘मास्टर माईंड’! अशी किमान डझनभर नाटके आहेत. त्यात कळस म्हणजे, सस्पेन्स, थ्रिलर नाटकांचे शीर्षक प्रामुख्याने इंग्रजीतच दिसून येते. हे देखील नोंद घेण्याजोगे. ‘मास्टर माइंड’ नाटकाचं मूळ नाव ‘खेळ खेळूया दोघं!’
पडदा उघडतो आणि वर्सोवा इथल्या जुनाट, भयाण बंगल्यातले नाट्य सुरू होते. वातावरण हादरून सोडणारे, एखाद्या चित्रपटातला थरार असावा अशा हालचाली. त्याला पूरक संगीत, नेपथ्य आणि प्रकाशयोजना. ऋषभ हा तीसएक वर्षाचा पॉश गेटअपमधला माणूस संशयास्पदरित्या प्रवेश करतो. त्याच्या पाठोपाठ करारी तरुणी मोनिकाही येते. दरवाजा उघडण्यासाठी फुटलेल्या काचेतून ऋषभ आत हात घालून कडी उघडतो आणि इथपासूनच शंका कुशंकांमधून रसिकांना विचार करायला भाग पाडले जाते. त्यातून सुरू होतो दिवाणखान्यातला दोघांचा संवाद, जो एकेका वळणावरून गोष्ट थरारनाट्यापर्यंत पोहचवतो.
एका मॉलमध्ये या दोघांची योगायोगाने भेट होते. तशी दोघांची ओळख नाही पण तरीही गप्पांच्या ओघात आकर्षण, प्रेम वाटू लागतं आणि तिच्यासाठी तो कुठल्याही मदतीसाठी एका पायावर तयार होतो. अगदी एखाद्याचा खून करण्यापर्यंतची त्याची तयारी असते. वैयक्तिक जीवन आणि त्यातले प्रश्न ती खुलेपणानं मांडते आणि त्यातून सुटकेचे पर्याय पुढे येतात. ऋषभ मोनिकासाठी वाट्टेल ते करण्यासाठी का कशाला तयार होतो? हा प्रश्न आहेच. त्याचं उत्तर शेवटी मिळतं.
मोनिका विवाहिता. तिचा नवरा शंतनू. प्रॉपर्टी डेव्हलपर्सचा त्यांचा बडा उद्योग. कंपनीचे पेपर्स मोनिकाच्या नावावर आहेत. नवर्याच्या वर्तनाला ती पुरती कंटाळलेली. तिला एक मुलगी आहे. क्षुल्लक कारणांमुळे शंतनू सतत चिडतोय. नवर्याच्या हुकूमशाहीपुढे तिला जगणं कठीण झालंय. दरम्यान तिच्या कंपनीत दोन घटना झाल्यात. एक तर कंपनीतला मॅनेजर रवींद्र बल्लाळ याला संशयामुळे तडकाफडकी काढून टाकलंय. त्यानंतर शंतनूला धमकीचे फोन, गाडी फोडणे, आगी लावणे, असे प्रकार सुरू झालेत. त्यामुळे मोनिका आणि तिची मुलगी यांना घरात राहाणे मुश्कील बनलंय. दुसरी घटना, कंपनीत नोकरीवर असलेली सुंदर रिसेप्शनिस्ट रुही, जी मोनिकाची पूर्वी मैत्रीण होती, तिची अचानक हत्या झालीय. ती कुणी केलीय हे अंधारात आहे. शंतनूचे रुहीशी शारीरिक संबंध असल्याची माहिती मोनिकाला आहे. तिची हत्या करणारा कोण हे देखील एक कोडं आहे.
बलात्कार, फसवणूक, अफरातफर, खून, कैद, बँकलूट, बदला, हत्येची सुपारी… इथपर्यंतचे प्रसंग संवादातून पुढे येतात. पण शेवटपर्यंत खरं काय, खोटं काय याचा उलगडा होत नाही किंवा त्याचा संदर्भ किंवा थांगपत्ताही लागत नाही. उलट या दोघांत एक विलक्षण खेळ रंगतो. संशयाची सुई सतत फिरत राहते. यातला ‘मास्टर माईंड’ कोण हा प्रश्न सुन्न करतो. ऋषभ की शंतनू की मोनिका की चौथाच माणूस? प्रश्न आणि प्रश्न. त्याच्या उत्तरासाठी नाटक बघावं लागेल. सगळंच सांगितलं तर उत्कंठा संपेल!
या नाट्याचे मूळ लेखक प्रकाश बोर्डवेकर आणि रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केलीय. उत्कंठा वाढवत रहस्याभोवती फिरणारी ही संहिता. दोनच पात्रे असूनही नाटक चांगले रंगतदार केलंय. संहितेतली ताकद लक्षवेधी. या नाटकाचे मूळ नाव हे ‘खेळ, खेळूया दोघं’ असं होतं, पण व्यावसायिक रंगभूमीवर ‘मास्टर माईंड’ झालंय. खरं तर हा विषय व जीव एखाद्या एकांकिकेचा असला, तरी दोन अंकात आकार देताना त्यात कुठेही खटकत नाही किंवा कंटाळवाणाही होत नाही. रंगावृत्तीकार सुरेश जयराम यांना लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने हा खेळ चांगला रंगलाय. या गोष्टीला एक मनोवैज्ञानिक आधारही आहे. जो अभ्यासकांना निश्चितच विचार करायला लावणारा आहे.
या संहितेला ताकदीचा दिग्दर्शक लाभला ही जमेची बाजू. चाळीस एक वर्षे विविध शैलीतल्या नाटकांचे दिग्दर्शन करणारे विजय केंकरे यांची ही १०६वी दिग्दर्शित नाट्यकृती! महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक व्यावसायिक नाटके करणारे विजय केंकरे एकमेव आहेत, ही प्रत्येक मराठी रसिकाला अभिमान वाटावी अशी घटना आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक दामू केंकरे यांचा वसा आणि वारसा तो प्रामाणिकपणे चालवितांना दिसतो. दोनच पात्रे पूर्ण वेळ रंगभूमीवर आणि संवादातलं नाट्य, या दोन्ही आव्हानात्मक बाबी असूनही ‘दिग्दर्शक’ म्हणून हे नाटक कमालीचे पकड घेते. संवादातल्या गाळलेल्या जागा चांगल्या भरल्या आहेत. तांत्रिक बाजूही पूरक ठरतात.
अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे हे दोघे कसलेले रंगकर्मी आता रंगभूमीवर स्थिरावले आहेत. दोघांचं ट्युनिंग मस्त जुळून येतं. हेमंत एदलाबादकर यांच्या ‘चर्चा तर होणारच’ या नाटकात विनोदी अंगाने सामाजिक विषय मांडला होता. त्यातही हे दोघे होते. ‘प्रपोजल’ या राजन ताम्हाणे यांच्या नाटकात चक्क स्टेजवर लोकल ट्रेनमधला विषय दोघांनी रंगतदार केला होता आणि आता या जोडगोळीचं हे तिसरं नाटक. एकमेकांशी जुळवून घेणारी ही जोडी या नाटकातून हॅटट्रिक साधत आहे. बिनधास्त, बेधडक, मोनिका आणि टॅलेंट हंटर ऋषभ या दोन्ही भूमिका वैशिष्ट्यपूर्ण. त्यांच्या एकूणच वर्तनात तसेच देहबोलीत कंगोरे आहेत. ऋषभच्या हाताची जखम, तिचं दुखणं डोक्यात जाणं, हे अस्वस्थ करणारं तर मोनिकाची घबराट विलक्षणच. दोघांचे दोन मुखवटे आहेत. ते परस्परविरुद्ध असले तरीही सच्चे वाटतात, एवढे त्यात रंग भरले आहेत. दोघांची संवादफेक अप्रतिमच. हे द्विपात्री नाटक असलं तरी दोघांनीही बाजी मारली आहे. यातील सादरीकरणात काहीदा हे दोघे हडबडून टाकतात, तर काहीदा विचार करायला भाग पाडतात. काहीदा तर अस्वस्थ करून टरही उडवितात माणसाचा पशू होण्यापर्यंतचा आलेख थक्क करून सोडणारा.
ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेलं नेपथ्य नाटकाला जिवंत करणारं असतं. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा यातील नेपथ्यरचनेतून आलाय. एकाकी असलेला काहीसा पडीक अवस्थेतला बंगला शोभून दिसतोय. हा दिवाणखाना जुन्या वस्तूंनी भरलेला. मागली पडकी भिंत, कपाट, फोटो फ्रेम्स आणि दोन भल्यामोठ्या लाकडी खुर्च्या, हे सारं काही वेगळेपणा दाखविणारे तसेच कथानकाच्या आवश्यकतेनुसार आहे. रंगमंच सामुग्रीच्या हाताळणीत खुर्च्या आणि हातकड्या महत्वाची कामगिरी पार पाडतात. समुद्राजवळचा जुनाट बंगला अप्रतिमच. तो कथेला अनुरूप वातावरणनिर्मिती करतो. नेपथ्य अभ्यासकांनी प्रदीप मुळ्ये यांचा हा बंगला आवर्जून बघावा. संगीतकार अशोक पत्की यांचे संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना यांनी रसिकांना हादरविण्याचे अनेक क्षण नेमके भरले आहेत. दोघांची वेशभूषा, त्यातील रंगसंगती ही यथायोग्य. जी मंगल केंकरे यांनी विचारपूर्वक केलीय. निर्मितीमूल्यात कुठेही तडजोड केलेली नाही. त्यामूळे तांत्रिक बाजू भक्कम.
किचनमधल्या धारदार सुर्याने पोटावर सपासप वार करून चिंधड्या करणं अन् घरभर पसरलेल्या रक्ताच्या थारोळ्यात तडफणारा देह बघून आनंदी होणं. दोन्ही हातांना आरपार खिळे ठोकून बंदिस्त करणं, हातातून उडणारे रक्त आणि वेदनांमुळे आक्रोश, हा सुखद क्षण समजणं, याची नुसती कल्पनाही हादरून सोडते. याचा समावेश कथानकात चक्रावून सोडतो.
कोरोनाकाळानंतर मनोरंजन दुनियेत बदल झालाय. ‘ओटीटी’च्या कथानकांचाही परिणाम रसिकांच्या मनावर आणि सादरीकरणावर झालाय. त्यामुळेच असे विषय-आशय येताना दिसतात. काहीतरी वेगळे, भन्नाट, हादरून सोडणारे असावे, याकडे आज कल वाढला आहे. मराठीतही अशा थरारक विषयांवरल्या नाट्यकृतींना चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘२१७ पद्मिनी धाम’, ‘परफेक्ट मर्डर’, ‘प्रâेंड रिक्वेस्ट’ ही नाटके चर्चेत आहेत, रसिकांच्या पसंतीला उतरत आहेत. अर्थात असा बदल हा अपरिहार्य असतो. त्यातून नव्या वाटांचा शोध मिळतो. त्याच वाटेवरलं हे नाट्य! दोन अंकातली ही क्रूर जुगलबंदी वेगळ्या नातेसंबंधांनी लक्षवेधी आहे झाली आहे.
गतआयुष्यातले धागेदोरे मांडणारं असं एक ‘मास्टर माईंड’, ज्यात सावलीसारखा पाठलाग करणारा संशय तसेच रक्त गोठविणारी भीती आणि अंगावर शहारे आणणारा शेवट असा होतो की जो सुन्न करून सोडतो. भय वाटत नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. त्या भीतीपोटी ओरडणे, रागवणे, मारणे, पळणे, किंकाळी… असे प्रतिसादही उमटतात. कपट, संशय, क्रूरता यातून यातून सुरू झालेला खेळ मानासिक तसेच शारिरीक दुर्बलतेकडे घेऊन जातो. ‘कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी बघू नये!’ असा इशारा काहीदा चित्रपट, मालिकांत देण्यात येतो. त्याच प्रकारात बसणारी ही गोष्ट! पण थरारक कथा, कादंबर्या वाचणार्या सुजाण मराठी रसिकांनी हे नाटक बघण्यास हरकत नाही.
मास्टरमाईंड
लेखन : प्रकाश बोर्डवेकर
रंगावृत्ती : सुरेश जयराम
दिग्दर्शन : विजय केंकरे
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
संगीत : अशोक पत्की
प्रकाश : शीतल तळपदे
वेशभूषा : मंगल केंकरे
सूत्रधार : श्रीकांत तटकरे
निर्माता : अजय विचारे (अस्मय थिएटर्स)