देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँकेला 85 वर्षे पूर्ण झाली आहेत. वयाच्या पंच्याऐशीत बँकेने एक आगळा विक्रम केला आहे. जगातील सर्वच प्रमुख बँका आपल्या खातेदार आणि चाहत्यांसाठी ट्विटर या प्रमुख सोशल साईट्सचा भाग बनल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने यंदा आपल्या ट्विटर हॅण्डलवरील फॉलोवर्सची संख्या 10 लाखांवर नेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे जगातील टॉपची ट्विटरफ्रेंडली केंद्रीय बँक बनण्याचा बहुमान रिझर्व्ह बँकेने पटकावला आहे.
हिंदुस्थानच्या रिझर्व्ह बँकेने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईट्सवर आपली लोकप्रियता वाढवत 10 लाख फॉलोवर्स मिळवत यू एस फेडरल बँक आणि युरोपिअन सेंट्रल बँक या आर्थिकदृष्टय़ा बलदंड बँकांना मागे टाकले आहे. नव्या माहितीनुसार हिंदुस्थानी रिझर्व्ह बँकेचे 27 सप्टेंबरला ट्विटरवर 9.66 लाख फॉलोवर्स होते त्यांची संख्या आता 10 लाखांवर गेली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलवरही त्यांना 1.35 लाख फॉलोवर्स लाभले आहेत.
आठ वर्षांत मिळवले 10 लाख फॉलोअर्स
- हिंदुस्थानी रिझर्व्ह बँकेने जानेवारी 2012 मध्ये आपले ट्विटर खाते उघडले. गेल्या आठ वर्षांत बँकेने टॉपची ट्विटरफ्रेंड्ली केंद्रीय बँक बनण्याचा विक्रम साकारला आहे. या काळात बँकेने 10 लाखांवर ट्विटर फॉलोवर्स मिळवण्याचा पराक्रम केला.
- यू एस फेडरल बँकेने ऑक्टोबर 2009 मध्ये आपले ट्विटर खाते उघडले त्यांना आतापर्यंत ट्विटर हँडलवर 6.67 लाख फॉलोवर्स मिळाले आहेत.
- फ्रँकफर्ट, जर्मनी येथे मुख्यालय असलेल्या युरोपिअन सेंट्रल बँकेचे आतापर्यंत 5.91 लाख ट्विटर फॉलोवर्स झाले आहेत. आर्थिक शक्तीत या बँका अनुक्रमे जगात पहिल्या आणि दुसऱया स्थानावर आहेत.
- मार्च 2019 ते मार्च 2020 या वर्षात रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर फॉलोवर्समध्ये दुपटीने वाढ होत त्यांची संख्या 7 लाख 50 हजारावर गेली होती. 25 मार्च 2019 पासून कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत बँकेच्या फॉलोवर्सची संख्या 1.5 लाखांनी वाढली आहे
सौजन्य: दैनिक सामना