□ मोदी लक्ष विचलित करतात आणि अदानी खिसे कापण्याचं काम करताहेत – नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्ला.
■ आणि ज्यांचे खिसे कापले जातात ते सफाईदारपणा पाहून टाळ्या वाजवतात! गेल्या ७० वर्षांत इतक्या सफाईने खिसे कापले गेले नव्हते म्हणे यांचे.
□ इलेक्टोरल बॉण्डचे बिंग फुटले; चौकशीच्या फेर्यातील ३० कंपन्यांकडून भाजपला ३३५ कोटी.
■ म्हणून तर सगळी झाकपाक चालली होती… सर्वोच्च न्यायालयाने कान पिरगळले नसते तर निलाजर्यांनी तपशील दिलेच नसते…
□ स्वत:ची ओळख निर्माण करा; शरद पवारांचे फोटो का वापरता? – सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले.
■ पवार ही पॉवर तेव्हाच असते, जेव्हा त्यामागे शरद हे नाव असतं… दादा बिदा गल्लीत असतात!
□ निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने केले रेल्वे स्थानकांचे नामांतर – मुंबईकरांचे मत.
■ ज्यांना स्वत:चं काही उभारता येत नाही त्यांना काहीतरी करून दाखवलं हे दाखवण्यासाठी हाच एक मार्ग असतो.
□ दहा थकबाकीदारांनी मुंबई महापालिकेचे १४७ कोटी थकवले.
■ सत्तेतल्या कोणत्या साहेबांशी कोणाचं काय गॅटमॅट आहे, ते तपासून पाहायला हवे.
□ लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधार्यांवर ७५९ कोटींच्या निधीची खैरात.
■ सगळ्या नाड्या त्यांच्या हातात असल्यामुळे इलाज काय?
□ मिंध्यांची शरणागती; अखेर ‘महानंद’ गुजरातच्या घशात.
■ महाराष्ट्राचं नुकसान करून गुजरातचं भलं करत सुटलेली ही सगळी पार्सलं आता निवडणुकीत जनतेने पाठवून द्यायला हवीत कायमची सुरतला!
□ दोन महिन्यांनंतरही शेतकर्यांना भातविक्रीचे पैसे मिळेनात.
■ निवडणुकीच्या वेळी हे हाल विसरून एवढा मोठा धर्म खतर्यात आहे म्हणून मतदान करा आणखी!
□ वाह रे मिंधे सरकार… डोंबिवलीची मतदार यादी गुजराती भाषेत.
■ अख्खी बृहन्मुंबईच जोडणार बहुतेक हे गुजरातला!
□ निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये बनावट दारूचे ‘खोके’
■ जिथे बोके, तिथे खोके, वरून किती बंदी असली तरी आतून सगळं असतं ओके!
□ ‘रोहयो’च्या ६० हजार मजुरांची मजुरी थकवली; हीच का मोदी गॅरंटी?
■ हो, गेली १० वर्षं हीच गॅरंटी आहे आणि एवढीच होती- डोळे असून आंधळ्यांना आता तरी ती दिसू लागली आहे का?
□ फडणवीसांचा एकही उमेदवार लोकसभेत जाऊ देणार नाही – मनोज जरांगे-पाटील.
■ मतदानाच्या वेळी तुमचा समाज भलत्याच अंमलाखाली येणार नाही, याची काय गॅरंटी पाटील?
□ इलेक्टोरल बॉण्डच्या खंडणीतून भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली – राहुल गांधी बरसले.
■ कोणी ना कोणी खोके भरल्याशिवाय गद्दारांनी त्या गलिच्छ डबक्यात उड्या मारल्या असत्या का?
□ शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांची पाठराखण करत ईडीची पलटी.
■ बातमी सांगा. यात बातमी काय? ईडीने निष्पक्ष कारवाई केली तर ती बातमी! हे सत्ताधार्यांची धुणी धुण्याचं काम रोजचंच आहे.
□ कोणत्या पक्षाला कुणाकडून किती पैसा मिळाला ते सांगा – स्टेट बँकेला सर्वोच्च न्यायालयाने झापले.
■ आणि हे स्विस बँकेतून हिशोब आणून देणार होते, या फेकाफेकीला लोक भुलले… आता कसं गारगार वाटत असेल ना यांना निवडून देणार्यांना!
□ पुण्यात ‘वॉशिंग मशीन’ नकोच – मनसेतून बाहेर पडल्यानंतर वसंत मोरे यांनी ठणकावले.
■ सगळे एकत्र आलात आणि राहिलात तर वॉशिंग मशीन पुण्याच्या काय, महाराष्ट्रातून पार ढकलून देता येईल.
□ महानगरपालिकेची यांत्रिक सफाईसाठी दहापट अधिक रकमेची उधळपट्टी; मर्जीतील कंपन्यासाठी इतरांना डावलले.
■ इथे पण काही बाँडची देवाणघेवाण होते आहे का ते तपासायला हवं.
□ बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी भाजपच्या मुरजी पटेलांविरोधात गुन्हा.
■ खोट्याच्या कपाळी गोटा बसल्याशिवाय राहात नाही मुरजी भाई.
□ धारावीकरांच्या विरोधाच्या धास्तीने अदानींची पत्रकबाजी.
■ अशी किती पत्रकं काढली तरी धारावीकरांचा आवाज दाबता येणार नाही.
□ महिलांच्या टीएमटीतील अर्ध्या तिकिटावरून मिंधे गटाचे म्हस्के तोंडावर आपटले.
■ योजनांची व्यवहार्यता तपासायची नाही, नुसती चमकोगिरी करायची, ही लागण दिल्लीतून मुंबईत झाली आहे आणि तिथून ठाण्यात!
□ मंत्रालयातील अडगळ हटवण्याचे आदेशच ‘अडगळीत’.
■ आता निवडणुका लावा, जनता महाराष्ट्रातलीच अडगळ हटवून टाकेल सगळी.
□ जीडीपीच्या आकडेवारीत गोलमाल – माजी मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचा दावा.
■ नवल काय? गोलमाल आणि झोलझाल हा या सरकारचा स्थायीभावच आहे.
□ भाजप नेते येडीयुरप्पांवर बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा.
■ या वयात इतका भयंकर आरोप! काय बोलणार!!