स्थळ : खेडेगावातल्या मामाचे गाव.
वेळ : वामकुक्षीची.
काळ : भाजीवालीच्या जागेचे ‘व्हेजिटेबल मार्ट’ होण्याआधीचे!
दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुटीत आम्हा भावंडांचा व मावशीच्या मुलांचा आमच्या आजोळी मुक्काम असे. एवढी सारी पोरं व शाळेला सुटी असल्यामुळे घरात रोज धिंगाणा असायचा. आमचा त्र्यंबक मामा मोठा हरहुन्नरी होता. तो आपण केलेल्या व न केलेल्या गोष्टी आम्हा मुलांना अगदी तिखटमीठ लावून सांगत असे. कामाच्या निमित्ताने त्याने देशभर बरीच भटकंती केलेली असल्यामुळे त्याच्याकडे सांगण्यासारख्या बर्याच सुरस आणि चमत्कारिक गोष्टी असायच्या. दुपारी आमरस-मांडे आणि त्यासोबत कुरकुरीत तळलेले सांडगे-पापड असा जंगी बेत असायचा. भरपेट भोजन झाल्यावर दुपारी असं अंगावर आलेले जेवण जेऊन वामकुक्षी घेत मामा पडलेला असायचा. दुपारचा मंद वारा सुटलेला असायचा. अंगणाच्या कोपर्यावरच्या पिंपळाच्या झाडाच्या पानांची सळसळ कानाला किती गोड वाटायची. मध्येच एखाद्या पक्षाची लकेर ऐकू यायची. बाकी सर्व अगदी शांतता पसरलेली असायची. मामा आम्हाला एकेक गोष्ट चांगली तिखट-मीठ लावून सांगायचा. आम्ही मुले तोंडाचा चंबू करून अगदी देहभान विसरून त्या खर्या खोट्या कहाण्या ऐकत असू.
मामाची काम करण्याची एक वेगळीच तर्हा असायची. अशाच एके दुपारी मामी पान-सुपारीचा डबा मामाच्या हातात ठेवत म्हणायची, ‘आहो, पाव्हण्यांनी देवाची तसबीर आणलीय… देवघरात लावायची म्हणते.’
मामा : त्यात काय? एक खिळा ठोकला की झाले काम! झोपा तुमी निवांत!
मामा लगेचच कामाला लागत. म्हणजे आम्हा पोरांना हुकूम सोडत. ‘बबन्या, जा रे… वाण्याकडून चार आण्याचे खिळे घेऊन ये.’ बबन्या हातात पैसे येताच घसरणारी चड्डी एका हाताने सावरत बाहेर धूम ठोकत असे. बबन्या गेल्यावर मामा चिंगीला त्याच्या मागे खिळ्यांची साईज सांगायला पाठवायचे!
‘महादू, हातोडी कुठे आहे बघ जरा…’
आणि मामांची नजर माझ्यावर पडताच, ‘आणि पिंट्या, तू देशपांड्यांकडून घोडा घेऊन ये!’
देशपांडे काकाकडे घोडा कधी आणला असावा हे न आठवून मी ‘पण मामा, देशपांडे काकाकडे घोडाच नाय! दोन म्हशी आहेत फक्त!’ अशी रास्त शंका बोलून दाखवे.
‘अरे गाढवा! तो घोडा नाही… शिडीचा घोडा… वरती चढतो ना आपण तो!’ माझा कान पिरगाळत मामा समजावत.
कान सोडताच मी धावत जाई व थोड्या वेळात धापा टाकत पळत माघारी येऊन ‘देशपांड्यांचा घोडा पाटलांनी नेला’ अशी सुवार्ता सांगत असे. हे ऐकून देशपांडीण घोडा असूनही मुद्दाम देत नसावी अशी शंका मामी सादर करीत. ‘साखर मागायला येऊ दे तिला, मग बरोबर करते’ असे काहीसे तोंडातल्या तोंडात पुटपुटत घरात जात असे.
‘अरे जाऊदे. असे घोडे छप्पन बघितलेत… आपण स्टूल वापरू,’ असे म्हणत मामा मला माळ्यावरचे स्टूल काढायला सांगत. तेवढ्यात खिळे आणलेले असायचे. हातोडी, पक्कड अशी हत्यारे इकडून तिकडून शोधून जमा केली जायची.
सर्व सामान जमा झाले की ‘घट्ट पकडा रे… नाहीतर लेकांनो पाडाल मला…’ म्हणत मामा त्या डुगडुगणार्या स्टुलावर चढत. भिंतीवर बरोबर मध्यावर खिळा ठोकायचा असल्यामुळे सर्वप्रथम मामा फूटपट्टीने भिंतीची रुंदी मोजत. कितीतरी फूट व पावणेतीन इंच असे काहीसे ते माप भरे! त्याचे मग निम्मे किती? याचे गणित सर्व सोडवत असत. आम्ही प्रत्येकजण दरवेळी वेगवेगळ्या संख्या सांगायचो… त्या गोंधळात मामा मूळचं मापच विसरायचे व पुन्हा एकदा भिंत मोजायला घ्यायचे!
‘एवढं साधं गणित तुम्हाला येत नाही लेको…!’ म्हणत अंदाजाने भिंतीवर एक खूण करायचे.
मग ते खिळा शोधायला सांगायचे.
‘अरे आता इथे स्टुलावर मी पाहिला होता… कुठे गेला?’ असे संवाद चालत. थोड्या वेळाने त्यांच्या खिशात ठेवलेला खिळा त्यांना सापडे! त्यांनी स्वत:च्या खिशात खिळा ठेवताना आम्ही कुणी त्यांच्यावर लक्ष न ठेवल्याबद्दल ते आम्हालाच दम देत! एवढ्यात हातोडी सापडेनाशी होई! परत सर्वांची शोधाशोध. सर्व घर धुंडाळल्यावर मामांनी मघाशी खिळा शोधताना शेजारच्या कपाटावर ठेवलेली हातोडी सापडे. परत एकदा आमच्या अंगावर खेकसून झाल्यावर दोघांना तसबीर खाली दोन कोपर्यात धरून बाकीच्या मुलांना ती सरळ आहे की तिरपी आहे हे पाहायला सांगत. कुणी डावीकडे तर कुणी थोडे उजवीकडे असे सांगत. शेवटी फ्रेमची जागा ठरे व मामा खिळा ठोकायला सज्ज होत.
पहिल्याच दणक्यात हातोडी मामांच्या बोटावर बसून हातातून सुटे व खाली कुणाच्या तरी पायावर आपटे! दोघेही मग तारस्वरात ओरडून सारे घर डोक्यावर घेत! गोंधळ ऐकून मामी येत व प्रथमोपचाराची पेटी आमच्या हवाली करत. त्यात नेमकी आम्हाला हवी असलेली पट्टी व मलम संपलेले असे. मग एक दोघे मलमाचे नाव लिहिलेली चिट्ठी घेऊन फार्मसीत जात.
मलमपट्टी झाल्यावर परत एकदा आमच्या मुख्य कामाला सुरुवात होई. तोपर्यंत मामा आम्हाला एक काम धड जमत नाही असे म्हणून खडसावत. त्यांनी स्वत: मोठमोठी कामे कशी चुटकीसरशी केली होती त्याचे किस्से सांगत. आम्हा मुलांच्या धांदरटपणामुळेच त्यांना हे छोटेसे काम तडीस नेता येत नाही, असा त्यांचा एकंदर सूर असे. मग परत नव्या दमाने मामा कामाला लागत. कधी हातोडी खिळ्यावर बसे तर कधी भिंतीवर… भिंतीवर बसली की रंगाचा एक टवका उडे… कधी खिळा वाकडा होऊन नांगी टाके… सात-आठ खिळे असे बाद झाल्यावर एक सरळ भिंतीत जाई. आजूबाजूच्या फूटभर भागातील रंग उडून गेलेला असे. खाली तसवीर धरलेल्या आमच्या केसांमध्ये भिंतीची धूळ जमा होई. बाकीची मुले कोंडाळे करून हा नयनरम्य प्रकार पाहत उभे असायचे. शेवटी दोघेतिघे जणांना जायबंदी करून, कपडे धुळीने माखून घेऊन, बराच आरडाओरडा तसेच धांदरटपणा करून झाल्यावर हे सत्कार्य सुफळसंपन्न व्हायचे.
एवढे करूनही तसबीर पिसाच्या मनोर्यासारखी एका बाजूला झुके.
‘मान थोडी तिरकी केली की बरोबर दिसते!’ ज्याने तसबिरीच्या सरळपणाबद्दल शंका घेतली त्याला मामा असा निर्वाणीचा इशारा देत व हे कार्य यशस्वी झाल्याचे घोषित करत असत! चार-पाच तासाच्या या मेहनतीनंतर मामीने बनवलेल्या साजुक तुपातल्या शिर्यावर आम्ही सर्वजण तुटून पडत असू!
तोपर्यंत दिवेलागणीची वेळ होत आलेली असे. आकाशात तांबडे पिवळे ढग किरणांची रंगपंचमी खेळत असत. पक्षी आपापल्या घरट्यांच्या ओढीने परत चाललेले दिसत. दिवसभर कुरणातून चरून आलेल्या गाई-म्हशी गोठ्यात हंबरत असत. अंगणातल्या तुळशीच्या वृंदावनात दिवा लावलेला असे. खेड्यातला व आमच्या जीवनातला एक दिवस आमच्या नकळत पुढे सरकलेला असे.