बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेले हे अप्रतिम आणि अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्र पाहिल्यावर अनेकांची समजूत होईल की हे आणीबाणीच्या काळातील व्यंगचित्र आहे… त्या काळातल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना क्रूरकर्मा हुकूमशहा चित्रित करून ज्या टोळक्याने तेव्हा सत्तेत शिरकाव केला होता, त्या टोळक्याचे म्होरके आज सगळा देश बळकावून बसले आहेत आणि आणीबाणी लादूनही इंदिराजींनी जो अतिरेक केला नव्हता, तो अघोषित आणीबाणी लादून करून दाखवत आहेत… इंदिराजींचं हे व्यंगचित्र आहे १९७० सालातलं. त्यांनी संस्थानिकांचे तनखे बंद करून मालमत्ता काढून घेण्याचा हुकूम जारी केला होता, तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. तेव्हा त्यांच्या मनात काय विचार आला असेल, याची कल्पना बाळासाहेबांनी केली आहे आणि इंदिराजींचा सगळा संताप ठळक, ठसठशीत रेषांमधून मांडला आहे. एखादा मुद्दा ठाशीवपणे मांडण्यासाठी शब्द बोल्ड केले जातात, तो ठाशीव फणकारा बाळासाहेबांनी जणू चित्र बोल्ड करून पकडला आहे. आजच्या सत्ताधीशांनाही सर्वोच्च न्यायालयाकडून रोज तडाखे बसत आहेत… त्यांच्याही मनात हाच विचार येत असेल. देशाच्या सुदैवाने अजून तरी तेवढी ताकद त्यांना लाभलेली नाही. दुर्दैवाने जनतेने तेवढे बळ दिले तर लोकशाहीचा हा शेवटचा स्तंभही ढासळून जाईल, यात शंका नाही.