मुंबईत ग्रँट रोड स्टेशनसमोर मेरवान आहे. तिथले मावा केक खायला लोक रांग लावतात. मेरवान हा मुळात इराणी आहे.
लाकडी खुर्च्या, दगडी फरशीचं टॉप असलेलं गोल टेबल, भिंतींवर आरसे, फडका खांद्यावर टाकून हाफ चड्डीत फिरणारा, दुरूनच कोणी काय खाल्लंय आणि त्याचे किती पैसे झालेत ते ओरडून सांगणारा वेटर, पाणी कम चहा आणि बनपाव मस्का, आमलेट आणि खिमा, मोठ्या बशीत ठेवलेले केक, हे सारं जिथं असतं त्याला इराणी हॉटेल म्हणतात.फिरदोस, दारयुश, स्टार ऑफ एशिया अशी या हॉटेलांची नावं.
टेबला टेबलांवर गर्दी करून गप्पा मारणारी माणसं. एका चहावर तासनतास गप्पा मारलेल्या चालत.
मुंबईची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, विविध आंदोलनं याच इराण्याच्या हॉटेलमधे आकार घेत असत. लेखक, कवी, पत्रकार यांचे अड्डे इराण्याकडं जमत असत. त्या काळात बारमधे बसण्याची प्रथा नव्हती, बार नव्हते, लोकांकडं पैसेही नव्हते.
इराण्यांच्या हॉटेलात एक मेझनिन माळा असे. तिथं आतबाहेर उघडणारे दरवाजे असलेल्या खोल्या असत. तरुणांना प्रणयाराधन करण्यासाठी मुंबईत तेवढीच जागा असे. वेटरला पैसे देऊन सांगितलेलं असे की त्यानं अर्धा तास आत डोकावायचं नाही.
मुंबई वाढली, मुंबईच्या एकेक चौरस फुटाची किंमत लाखोत पोचली. इराण्याच्या हॉटेलच्या जागी दुसरा व्यवसाय केला की प्रचंड पैसा मिळतो म्हटल्यावर इराणी गेले. आज मुंबईत इराणी उरलेले नाहीत.
इराणी हे केवळ हॉटेल नव्हतं, ती एक सांस्कृतिक खूण होती. ती नाहीशी झालीय. मुंबई शहरात संस्कृती वगैरे फालतू गोष्टींना वाव उरलेला नाही.
इंग्लंडमधे जरा वेगळं आहे.
इंग्लंडमधे पब नावाचं एक पवित्र स्थळ असतं. तिथं ‘एल’ नावाचं एक प्राचीन पवित्र तीर्थ परवडेल अशा दरात दिलं जातं. या तीर्थाला भारतात बियर असं म्हणतात. इंग्लंडमधलं ‘एल’ हे तीर्थ बियरपेक्षा जास्त घट्ट असतं, त्याची चवही काहीशी कडवट असते. कित्येक शतकांपासून पब ही मंदिरं-तीर्थस्थळं इंग्रजांनी उभारली आहेत. ही तीर्थस्थळं टिकवली पाहिजेत असं इंग्रजांना वाटतं.
पब म्हणजे पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाण. पबमधे लोक बियर किंवा इतर पेय पिण्यासाठी एकत्र जमतात. खरं म्हणजे बियर किंवा मद्य हे एक निमित्त असतं. शिळोप्याच्या गप्पा, टवाळक्या, राजकीय चर्चा आणि भांडणं, किंवा दोन घोट घेत निवांत वेळ काढणं अशा नाना उद्देशांनी माणसं पबमधे जमतात. कित्येक शतकं.
पत्रकार, लेखक वगैरे मंडळींना माहिती मिळवण्यासाठीचं एक महत्वाचं ठिकाण. बीबीसी असो की टाइम्स असो, पत्रकार आधी पबमधे जाणार आणि नंतर वर ऑफिसात जाणार.
पब ही जुनी घरं असतात. विटांचं बांधकाम असतं. लाकडी दरवाजे असतात. उंच, रुंद काचेच्या खिडक्या असतात. आतमधे लाकडी फर्निचर असतं. आतमधे काऊंटरवर बियर ग्लासात ओतणारे हातपंप असतात. लाकडी तक्तपोशी असते. म्हातार्या माणसांसाठी आरामखुर्च्या असतात. काऊंटरभोवती उंच खुर्च्या असतात.
पब ही एक संस्था आहे. लंडनमधे जागोजागी पब असतात. प्रत्येक गावात पब असतो.
– – –
अगदी रहावत नाही म्हणून सांगतो. मी एका विषयावर संशोधन करत होतो, माहिती गोळा करत होतो. मँचेस्टरपासून पन्नासेक मैलावरच्या एका छोट्या गावात माझा मुक्काम होता. दररोज सकाळी उठायचं. चालत एका बस स्टॉपवर जायचं. बस घेऊन स्टेशनवर जायचं. तिथं ट्रेन पकडायची आणि मँचेस्टरला जायचं. मँचेस्टरमधे उतरलं की पुन्हा बस घ्यायची आणि इच्छित ठिकाणी जायचं.
दिवसभर मुलाखती, वाचन, लिखाण झालं की संध्याकाळी घरी परत.
परतताना मँचेस्टर स्टेशनच्या बाहेरच्या एका पबमधे काही वेळ, एक स्कॉच. नंतर मँचेस्टरवरून माझ्या स्टेशनवर गेल्यावर तिथं एका पबमधे जायचं. तिथं एक छोटी स्कॉच. तिथून बस घेऊन माझ्या गावाकडं कूच. बसमधून उतरल्यावर समोरच पब. इलाजच नाही. तिथं एक स्कॉच. नंतर शेवटी मजल दरमजल करत घरी पोचायचं.
सर्व पबमधे लोक मला ओळखू लागले होते. मँचेस्टर, बोल्टन, लिवरपूल इत्यादी शहरांच्या शे दोनशे वर्षांच्या कहाण्या मला त्या गावातल्या पबमधे ऐकायला मिळायच्या. मला हवी असलेली माहिती, मजकूर तिथं मिळत असे.
पबसारखी मजा नाही.
– – –
तर मुख्य मुद्दाच राहून गेला.
इंग्लंडमधे पब टिकवून ठेवणारी चळवळ सुरू झालीय.
लंडनमधे किलबर्न टॅव्हर्न नावाचा एक पब होता. तेल अविवमधल्या एका कंपनीनं २०१५ साली तो पब आणि प्लॉट विकत घेतला. पब पाडून तिथं फ्लॅट्स आणि ऑफिसं बांधायचा त्या कंपनीचा प्लॅन होता.
लंडनमधे तशी साथच आलीय. पब्ज पाडायचे. नव्या इमारतीत केवळ दाखवण्यासाठी एक जागा पबसाठी ठेवायची. बाकीच्या जागी अधिक पैसे मिळतील असा जागेचा वापर.
किलबर्न टॅव्हर्न १८२० सालाच्या सुमारास बांधला गेला होता.
टॅव्हर्न म्हणजे खरं म्हणजे पबच. तळमजल्यावर पब आणि वर दोन तीन खोल्या प्रवाशांना रात्रीच्या मुक्कामासाठी ठेवलेल्या असत. त्या काळात माणसं बग्गीनं प्रवास करत. किंवा स्टेज कोच म्हणजे जणू आजच्या बसेस. दूरवरचा प्रवास असे. वाटेत विश्रांतीसाठी थांबावं लागे. पब ही जागा योग्य. तिथं दोन खोल्या. १९१८ साली पहिल्या महायुद्धात जर्मनीनं लंडनवर बाँब टाकले होते, त्यात किलबर्न टॅव्हर्न उद्ध्वस्त झाला. १९२१ साली त्याच जागेवर पुन्हा नव्यानं टॅव्हर्न सुरू करण्यात आलं. दुसर्या महायुद्धात लंडनवर खूप बाँबिंग झालं, पण त्यातही टॅव्हर्न वाचली.
पबच्या आसपासच्या लंडनवासियांनी चळवळ उभारली. एक फेसबुक गट उभा केला. त्यावर ३५०० नागरिक गोळा झाले. त्यांनी मोर्चे काढले, वेस्टमिन्स्टर या पालिकेसमोर निदर्शनं केली.
पालिकेनं कंपनीला नोटीस देऊन बांधकाम करू नये असा आदेश दिला. कंपनीवाल्यांनी आदेश धुडकावला, पब पाडला. पेपर आणि लोकांनी बोंब उठवली. शेवटी पालिकेनं आणि सरकारनं बिल्डरला दंड ठोकला आणि पब पूर्वी होता तसाच बांधायला लावला. फ्लॅट्स नाहीत, ऑफिसं नाही, पब.
इंग्लंडमधले पेपर जागरूक आहेत. ते अशा बातम्या देतात, त्या बातम्यांचा पाठपुरावा करतात. त्यामुळं लंडनमधे घटना घडली की ते देशभर पोचते. देशभर माणसं जागृत होतात, सक्रीय होतात.
स्टॅफर्डशायर या परगण्यात हिमले या गावात एक पब होता.
१७६० साली गावात एका माणसानं फार्म हाऊस म्हणून इमारत बांधली आणि यथावकाश तिचं रुपांतर पबमधे केलं. १८३० साली मार्स्टर्न या ब्रुअरीजनं तो पब विकत घेतला. पंचक्रोशीतला मोठ्ठा पब. १९३०च्या सुमारास या विभागात खाण उद्योग सुरू झाला. आसपास जागोजागी सुरुंग लावले जात. सुरुंगांच्या दणक्यानं पबची इमारत ढासळली, कलली. १९४० साली मालकानं इमारतीची डागडुजी केली, पण इमारत कललेल्या स्थितीतच ठेवली. परिणामी ही कललेली इमारत पाहायला पर्यटक येऊ लागले, इमारत पाहायचे, पबमधे बियर घ्यायचे. हा पब परिसरात फेमस झाला होता.
एटीएफ फार्म्स या कंपनीनं पब आणि आसपासची जमीन विकत घेतली. ही जागा डेवलप करून तिथं काही व्यवसाय सुरू करण्याचा कंपनीचा इरादा होता. जागा विकत घेतल्यावर ९ दिवसांनी पबला आग लागली. आग लागली नव्हती, लावण्यात आली होती.
आगीनंतर ही इमारत पाडण्यात आली. गावकर्यांना आणि आसपासच्या लोकांना राग आला. त्यांनी मोहीम उभारली. फेसबुक गट तयार केला. ३५ हजार लोक त्या गटात सामील झाले. प्राचीन पब, सांस्कृतिक वारसा, स्थानिक संस्कृतीचा भाग. सरकारनं कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली. मोर्चे काढले, पालिकेसमोर निदर्शनं केली.
सरकारला दखल घ्यावी लागली. चौकशीत आढळून आलं की पबच्या इमारतीला आग लावण्यात आली होती. पोलिसांनी चार व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर खटला भरला. पालिकेनं नव्या मालकाला नोटिस दिली. क्रूकेड पबची इमारत जशी कललेल्या स्थितीत होती, तशीच उभारण्याचा आदेश दिला. कंपनी कोर्टात गेली. सरकारनं पटकन केस निकाली काढली. क्रूकेड पब आता पुन्हा उभा रहातोय.