□ भाईंदरमध्ये मिंध्यांच्या विरोधात भाजपचा मोर्चा.
■ और लडो, खत्म कर दो एक दूसरे को!
□ ईव्हीएम हॅकिंगचा हा घ्या पुरावा – वंचित आघाडीने माध्यमांसमोर केले सादरीकरण.
■ त्याहून मोठा पुरावा लोकांचे मेंदू हॅक झाल्याचा आहे, ते धर्मांधळे होऊन सरकारच्या सगळ्या चुका पोटात घालत आहेत, त्यावर मात कशी करणार?
□ महाराष्ट्रात ऑनलाइन लॉटरीवर तातडीने बंदी घाला – संजय राऊत यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.
■ असले उद्योग बंद केले तर रिकामटेकडे लोक विचार करू लागतील, त्यातून त्यांना समाजातल्या चुकीच्या गोष्टी दिसू लागतील. ते परवडेल का सरकारला?
□ खरा पक्ष कोणता हे विधानसभेतील बहुमतावर ठरवता, हे न्यायालयाच्या निकालाविरोधात नाही का? नार्वेकरांच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट संतापले.
■ नुसता संताप संताप करून उपयोग काय? हा निकाल कचर्याच्या पेटीत टाकून हे बेकायदा सरकार बरखास्त केलं तर काही अर्थ.
□ दमदाटी कराल तर याद राखा, मला शरद पवार म्हणतात.
■ ज्येष्ठांबद्दल कसं बोलावं याचा पाचपोच नाही आणि हे लोक सगळ्यांना संस्कृती शिकवत फिरत असतात.
□ मुंबई महाभ्रष्टाचार : रस्ते विकासाच्या नावाखाली ७०० कोटींवर डल्ला.
■ आयती कोंबडी हाताशी लागली आहे, आता अंडी कोण गिनतो, कापूनच खाल्लेली बरी.
□ दिव्यांगांच्या नावावर मिंधे सरकारचा भ्रष्टाचार; सव्वा लाखाच्या फिरत्या वाहनाची खरेदी पावणेचार लाखांना.
■ काही दिव्य यंत्रणा असणार त्या वाहनात, त्याशिवाय का इतकी किंमत वाढवून दिली आहे!
□ पात्रता नसतानाही सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळावर वर्णी.
■ गद्दारी हीच पात्रता!
□ अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेचे नमो नमो…
■ नमो नमो न करतील तर काय करतील? खाविंदांच्या कृपेवरच तर इकडच्या सगळ्या उड्या आहेत.
□ भातसा प्रकल्पग्रस्तांच्या नोकर्यांच्या फायली अधिकार्यांनी दाबल्या.
■ काहीही केलं तरी यांच्या नोकर्यांवर आंच येत नाही, मालमत्तांवर टांच येत नाही, मग सोकाजीनाना शिरजोर होऊन बसणारच!
□ ३७० कलम काढण्यावर टीका करणे गैर नाही – सर्वोच्च न्यायालयाने खडसावले.
■ सर्वोच्च न्यायालयावर देशद्रोहाच्या कलमाखाली कारवाई करता येईल का, ते पाहात असतील आता तपासून.
□ भाजपला आता महागाई ‘डार्लिंग’ वाटते का? – काँग्रेसचा मोदी सरकारला खोचक सवाल.
■ पब्लिकलाही महागाईचं काही पडलेलं नाही, जय श्रीराम म्हणून बेटकुळ्या फुगवल्या की पोट भरतंय… भाजपने भांगच तशी पाजली आहे.
□ लोकसभेच्या दोन जागा द्या – मिंध्यांच्या मित्रपक्षाने महायुतीचे टेन्शन वाढवले.
■ आधी यांना तर मिळू द्यात, तुमची कुठे मध्येच घाई!
□ भाजप महाराष्ट्रातील डझनभर खासदारांना घरी बसवणार.
■ बाकीच्यांना जनता घरी बसवेल, चिंता नको!
□ ‘मोदी की गारंटी’ची काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.
■ निवडणूक आयोगाची काय गॅरंटी आहे पण?
□ तुम्ही सुरुवात करा, मग कोणत्या कुंडल्या बाहेर काढायच्या ते मी ठरवतो – नाना पटोलेंचा प्रफुल्ल पटेलांना इशारा.
■ जैसे को तैसा मिला!
□ सरकारने मर्यादा तोडल्या, तर करेक्ट कार्यक्रम करणार – मनोज जरांगे-पाटलांचा इशारा.
■ किती वेळा करेक्ट कार्यक्रम कराल जरांगे पाटील! त्या एका पहाटे तुम्ही भलत्या लोकांच्या आश्वासनांवर विसंबलात आणि तुमचाच करेक्ट कार्यक्रम झाला ना हो!
□ ईश्वरपुरात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे महिलांची पाठ; ‘शासन आपल्या दारी’चा पचका.
■ आणि म्हणोन शहाण्या माणसाने आपल्याला जे जमत नाही, ते करण्याच्या फंदात पडू नये.
□ महाराष्ट्रात सूडचक्र सुरूच; रोहित पवारांवर ईडीची कारवाई.
■ चक्र आहे, गोल फिरतं, आज जे खाली आहे, ते उद्या वर येतं. रोहित पवार डरणार्यातले नाहीत.
□ शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास मोदी सरकारने लटकवला.
■ द्या आणखी मतं!
□ मराठा आरक्षण भरती पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून – हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले.
■ ती पहिल्यापासून तशीच होती, हे पहिल्यापासून दिशाभूल करण्यात पटाईत आहेत आणि लोक फसवणूक करून घेण्यात.
□ नगरमध्ये ‘कोंबडी चोर’ म्हणत मराठा आंदोलकांनी नारायण राणेंना दाखवले काळे झेंडे.
■ नगरकर काय साधा माणूस समजले काय त्यांना?
□ लोकसभेला गळ्यात गळे घालणारे भाजप-मिंधे विधानसभेला एकमेकांची डोकी फोडतील – मनसे आमदार राजू पाटील यांचा तडाखा.
■ झाली कधीच सुरुवात… आता फक्त लांबून तमाशा बघायचा आणि टाळ्या पिटायच्या.
□ पालघरमध्ये नोकरभरतीत भूमिपुत्रांना डावलले; शिवसेना आंदोलन करणार.
■ पुन्हा मराठी मुंबई आणि मराठी महाराष्ट्रासाठी एल्गार करायची वेळ आलीच आहे.