(मनसबदार दरबारीचे आमदार भूषेन्द्र गायकर यांचा संपर्क अड्डा. एक बाजूला टेबलखुर्ची, त्यावर एक कॉम्प्युटर, तर समोर सोफा ठेवलेला. भिंतीवर नौरंगजेबाची मोठ्ठी तसबीर लावलेली. चकचकीत खोलीत एसीच्या हवेत सोफ्यावर बसलेली दोन कार्यकर्ते दिवसभराचे ‘कलेक्शन’ मोजताहेत. एकजण कॉम्प्युटरच्या पलीकडला आलेल्याचा हिशेब नि उर्वरित वसुलीचा ताळेबंद लावतोय. तोच सदा शंके आत प्रवेशतात.)
सदा : (टेबलासमोर उभा राहत) नमस्कार, भूषेन्द्र गायकर साहेबांचा अड्डा हाच का?
लाचारेंद्र : (कीपॅडवरून नजर वर घेत) अँ? हो हाच तो अड्डा! बसा ना, साहेब!
सदा : (पुढं सरकवलेल्या स्टुलावर बसत) नाही, एवढं बसायसाठी नाही आलोय मी! कामं छोटंसं अन् पटकन होईल असंय! तेवढं झालं का, सांजच्या गाडीनं परत जाता येईल मला!
लाचारेंद्र : (तोंडातली लाळ सावरत) लवकर आवरायलाच बसलोय आम्ही! (हिशेब करणार्या दोघांकडे बघत) ये, चिल्ड बिअर सांग रे साहेबांना! साहेब अगदी महिन्याच्या स्टार्टिंगलाच आले म्हणजे त्यांची बडदास्त ठेवलीच पाहिजे! (दोघं ढिम्म हलत नाहीत.)
सदा : (आतिथ्याने भारावून) नको, नको! मी इथं कोपर्यावरच खास सेंद्रीय भांग पिलीय! तिथं मस्त गांजा, चरस, एमडी, हुक्का वगैरे पाहिजे ते मिळतं! छान सोय झालीय अलीकडं ही! कोपर्याकोपर्यावर अशी जनहित केंद्र सुरू झालीत ती!
लाचारेंद्र : म्हणजे काय? उगाच का जंतेच्या मनातली मोगलाई आणली ती? ह्याचसाठी साहेबांनी खस्ता खाल्या, गौहत्ती ते गोंयकरापर्यंत पायी हवाई दिंडी काढलेली त्यांनी!
सदा : (बसल्या जागी तसबीरीला हात जोडत) खरंय! साहेब म्हणजे ‘देव’माणूस!
लाचारेंद्र : (मूळ विषयावर येत) बोला मग! किती आणलेत तुम्ही?
सदा : (आश्चर्याने) काय आणायचं होतं तुम्हाला? मी तर खाली हात आलोय!
लाचारेंद्र : (आवाज वाढवत) रिकाम्या हाती आलात तुम्ही? लाज नाही वाटत? ह्या भाषेत उत्तरं देताय तुम्ही ते?
सदा : (गोंधळून जात) तुम्ही नेमकं समजताय कोण मला?
लाचारेंद्र : (आवाज धारदार करत) तुम्ही तेच ना? ऐदिराम, सीभॉय, एसीबॉस वगैरेंच्या भीतीने प्रोटेक्शन मनी जमा करायला आलेले?
सदा : (शक्य तितक्या विनम्रतेने) नाही हो! तुम्ही वेगळंच समजताय मला! मी तुमची वसुली जमा करायला आलेलो नाहीय! मी भूषेन्द्र गायकर यांना भेटायला आलोय! तातडीने त्यांची भेट घ्यायची होती मला!
लाचारेंद्र : (चूक लक्षात येऊन दोन्ही कान पकडत) अरेरे! सॉरी बरं का! मी वेगळंच समजलो तुम्हाला!
सदा : (निर्विकार चेहर्याने) त्यात काय? ती सवय झालीय मला अलीकडे! कधी कधी आमच्या बिल्डिंगचा वॉचमनसुद्धा माझ्याकडे टोकण मागतो ते! आहात कुठं?
लाचारेंद्र : (अंदाज लावत) तर तुम्ही सामान्य पब्लिक दिसताय…
सदा : हां, आता तुम्ही मानलं तर…
लाचारेंद्र : बोला काय काम आहे?
सदा : आता मी आलोय की नाही, तर येताना…
लाचारेंद्र : (अंगात राष्ट्रवीर संचारल्यागत) येताना काय रस्ते चांगले लागले का? बोला कुठला रस्ता होता तो? आताच खणून काढायला लावतो!
सदा : छे, हो!! आमच्याकडचे रस्ते छान गुडघाभर खड्डेयुक्त आहेत. ठिकठिकाणी ते एमएसईबी, पाणी पुरवठा वा दूरसंचार वा गेला बाजार कुठल्याही सटरफटर व्यक्तीने खोदून ठेवलेलेच आहेत. अगदी आठवड्याला किमान एकास मुक्ती मिळावी इतके ‘समृद्ध.’
लाचारेंद्र : म्हणजे रस्त्याची समस्या नाहीच आहे तर? मग पाणी पुरवठा…?
सदा : दैव आणि आखिरी मोगलकृपेने दर पंधरवड्याला चिखलमिश्रित पाणी येतं की! तोवर आम्ही सोसायटीवाले टँकर बोलावतो! आणि सोसायटीच्या चेअरमनला अर्धा टँकर फुकट वापरायला देतो.
लाचारेंद्र : मग पाणी वगैरे घेताना स्वस्ताई?
सदा : स्वस्ताईची समस्या आम्ही केव्हाच दूर केलीय! मी तर स्पष्टच बोललेलो एक दोघांना, ‘अरे डॉलर, जॉकीच्या अंडरविअरसाठी पन्नासेक रुपडे जास्त देणार्यांनो सिलेंडर, तेल वगैरेसाठी शंभर-दोनशे आपण जास्त देऊ शकत नाही का? आपल्याला हा हिंदुस्तान नौरंगजेबाच्या नेतृत्वात महासत्ता बनवायचा असेल तर ही स्वस्ताई दूर लोटलीच पाहिजे!’
लाचारेंद्र : ऐकलं त्यांनी?
सदा : (अतिशय अभिमानाने) मी ग्रुप अॅरडमिन आहे, माझं ऐकावंच लागतं सार्यांना! नाहीतर मी ब्लॉक करतो सरळ!
लाचारेंद्र : मग नोकरी वगैरे…?
सदा : काही काय? असले प्रश्न मोगलाईत मी विचारू नये, आणि कुणी बोलू नये! मला एक फर्ममध्ये होती नोकरी! पण कोरोना काळात मी स्वत:च तिला लाथ हाणली! आता चिपाडकरच्या प्रेरणेने कोपर्यावर स्टार्टअप म्हणून होकिओ बिस्किटच्या वड्यांचा गाडा लावलाय.
लाचारेंद्र : (हसत) व्वा! छान चाललंय म्हणजे?
सदा : अगदीच! मागच्याच महिन्यात वडिलोपार्जित मालमत्तेवर पाच लाखाचा बोजा चढवला, याहून छान काय असेल?
लाचारेंद्र : मग लव्ह जिहाद वगैरे समस्या?
सदा : अरे हाड!! असल्या समस्या मी माझ्या मुलीच्या आसपाससुद्धा फिरकू देत नाही! आणि आमच्या नगरातील नटरंग दलाची कार्टी असताना हे असले प्रकार घडणं शक्यच नाही! बिचारी तीच नटरंग दलाची मुलं बैलसेवा करून दमल्यावर फावल्या वेळेत माझ्या मुलीला छेडायला येतात. पूर्वी शाळेच्या गेटवरच असायची, पण एक दिवस ती सभामंडप लोकार्पण सोहळ्यासाठी वसुली करायला आल्यावर मीच त्यांना समजावलं. तेव्हापासून ती माझ्या मुलीला छेडत घरापर्यंत येतात.
लाचारेंद्र : थोडक्यात मोगलाईची महिलांसाठीची कमजोरीची गॅरंटी जोरात चालूय तर…?
सदा : (बसल्या जागेवरून चहापन्हा नौरंगजेबाच्या फोटोला हात जोडत) अर्थात! नौरंगजेब कृपेने हे भुलेबिसरे दिन पहायला मिळाले, हे काय थोडकं आहे का?
लाचारेंद्र : (कॅलेंडरवरच्या तीन तोंडांकडे बोट दाखवत) तो वर बसलाय म्हणून तर आपल्या सुभ्यात ह्या अडीच शहाण्यांचं काम बरं चाललंय!
सदा : (मान हलवत) हो ना! हो ना!
लाचारेंद्र : (पुन्हा मूळ विषयावर येत) तुम्हाला शेती नसेलच त्याबाबत समस्या असायला? काय?
सदा : नाही, शेती होती! ती भाऊ कसायचा!
लाचारेंद्र : मग त्यात अतिउत्पन्नाची समस्या…?
सदा : नाही. ते मात्र कधी झालं नाही! म्हणजे पीक केलं की वरुणराजा प्रसन्न व्हायचा, नि बेमोसमी पडायचा. त्यात ब्यादश्या योग्य वेळी निर्यातबंदी लावायचे. खतं, औषधं अपेक्षेनुसार वाढीव दरात मिळायची. दिवसभर मोटर ढळवायला वीज नसायची. मजुरी, अवजारे वगैरे गोष्टी खर्च आकडा फुग्यागत वाढवायच्या. असं सगळं छान चाललं होतं! त्यात मी भावाला सांगितलेलं होतं, आत्महत्या केल्यावर शासन बक्षीस देतं म्हणून! पण भाऊ डरपोक निघाला. त्यानं जमीन सावकाराला गहाण ठेवलेली, त्यालाच उरलेली विकली. आता सफाई कामगार म्हणून जातो कुठल्यातरी सोसायटीत.
लाचारेंद्र : (समजावणीच्या सुरात) पण ठीक आहे की! शेवट तोही तुमच्यागत धंद्याला लागला तर…!
सदा : (होकार भरत) हो, ते मात्र खरंय! मी त्यानंतर त्याला माझ्या ‘नौरंगजेब द वर्ल्ड लीडर’ ग्रुपला जॉईन केलेलं, आता त्याला नौरंगजेब ब्यादश्याच्या करामती कळतायत!
लाचारेंद्र : हे छान झालं की! तुम्ही तुमच्या पूर्ण परिवाराला उद्धाराच्या मार्गावर आणलंय ते! पण तुम्ही तुमची समस्या काय आहे ते सांगितलंच नाही मला? (काही ध्यानी आल्यागत) भाऊ…? सफाई कामगार…? म्हणजे तुमची समस्या जातीची आहे तर…?
सदा : (तोंड वेंगाडत) आम्ही जात वगैरे काही मानत नाही! आम्ही धर्म मानतो फक्त! आता आमचा धर्मच सांगतो की आम्ही शूद्र आहोत, म्हणून आम्ही मंदिराच्या पायर्यांवरून दर्शन घेतो, मागे एकाने लग्नात घोडा आणि डीजे बोलावला तर साहजिक वरल्या जातीच्या माड्या दणाणल्या असत्या म्हणून त्या पोरांनी नटरंग दलाच्या पोरांसोबत आमच्या पोरांना पट्ट्याच्या भाषेत समजावलं. हा एकदोन कमी बुद्धीच्या पोरांना कळालं नाही, त्यांना कोमात गेल्यावर समजलं…! परवा आमच्या सोसायटीत आम्ही एक ठराव केला, आम्ही सगळे एकत्र जेवण जेऊ शकतो, म्हणजे जातीप्रथा संपलीय. आता आरक्षण उठवावं, अशा आशयाचा!
लाचारेंद्र : तुम्ही फार समजूतदार आहात हो! तुमच्यासारखी माणसं फार विरळ झालीत हल्ली!
सदा : (लाजत) काही काय? चहापन्हाने दिल्ली तख्त काबीज केल्यानंतर अख्खी पब्लिक माझ्यासारखीच झालीय की…? समजूतदार!
लाचारेंद्र : (पुन्हा मूळ विषय आठवत) पण तुम्ही भूषेन्द्र गायकर साहेबांना का भेटायचं आहे, तेच सांगितलं नाही बघा!
सदा : अहो, आपले मनसबदार साहेब उर्फ आमदार चौकात लाठी खेळताय, पोलीस ठाण्यात नेमबाजी तर दरबारात कुस्ती खेळताय, तर त्यांच्या प्रेरणेने आम्ही गावाच्या कोपर्यावरल्या काही वस्त्या पेटवण्यासाठी मार्गदर्शन मागायला आलो होतो! त्यांनी त्यांची बंदूक, दंडुका वगैरे काही दिलं तर चहापन्हा नौरंगजेबांच्या स्वप्नातला मुल्क आम्ही घडवायला घेतलाच म्हणून समजा!
लाचारेंद्र : द्यायला हरकत नाही काही! पण भूषेन्द्र गायकर साहेब पुढला मुकाबला सुभेदार इकमाल सिद्दीक यांच्यासोबत करतील अशी शक्यता आहे… निदान तोवर तरी… थांबावं लागेल!