पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सरस्वती आणि गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करून, नोकरी करीत, `कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणारा आणि त्याच महापालिकेच्या महापौरपदी विराजमान झालेला तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा `चाणक्य’ राजकारणी अशी ओळख महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा राजकारणी म्हणजेच डॉ. मनोहर जोशी!
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेबांच्या वक्तृत्वाने प्रभावित झालेल्या मनोहर जोशी यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात झोकून दिले. २ डिसेंबर १९३७ रोजी नांदवीत जन्माला आलेल्या मनोहर यांनी वडिलांबरोबर भिक्षुकी केली. लहानपणापासून संघर्ष केला. इयत्ता चौथीपर्यंत नांदवी, पाचवीला महाड, सहावीनंतर मामाकडे पनवेलला, मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करीत मित्राबरोबर भाड्याच्या घरात राहिले. महाजन बाईंकडे वारावर भोजन केले. मग मुंबईत बहिणीच्या घरी अकरावीच्या शिक्षणासाठी आले. सहस्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण पूर्ण केले.
कला शाखेची पदवी कीर्ती महाविद्यालयातून मिळविली. वयाच्या २७व्या वर्षी एमए एलएलबी झाले. मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी करता करता १९६४ साली चि. सौ. कां. मंगल हिंगवे यांच्याशी विवाहबद्ध झाले. विवाहानंतर मंगल यांचे नांव सौ. अनघा असे करण्यात आले. मनोहर जोशी यांना उन्मेष हे सुपुत्र तर अस्मिता आणि नम्रता या दोन सुकन्या आहेत. अर्थात, ही मुले राजकारणापासून कोसो मैल दूर आहेत. चिरंजीव उन्मेष हे प्रथितयश `कोहिनूर’ उद्योजक आहेत.
मनोहर जोशी यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काही व्यवसाय केले, पण दूध, फटाके, हस्तिदंती वस्तूंच्या विक्रीमध्ये अपयश आले. पण म्हणतात ना `अपयश हीच यशाची पायरी असते’, त्याप्रमाणे मनोहर जोशी यांनी २ डिसेंबर १९६१ रोजी कोहिनूर क्लास सुरू केला. या क्लासचे रूपांतर प्रिन्सिपॉल मनोहर जोशी यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. स्वतः गरीबीची झळ सोसली असल्याने गरीब विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची दिशा त्यांनी दिली. `नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायला हवे’, हा मूलमंत्र मनोहर जोशी यांनी दिला.
१९६७ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि मग हां हां म्हणता त्यांनी संसदीय लोकशाहीच्या एकेक पायर्या पादाक्रांत करायला सुरुवात केली. ज्या मुंबई महापालिकेच्या इमारतीमध्ये लिपिकाची नोकरी केली, त्याच महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पाऊल टाकले. १९७६ ते १९७७ या वर्षी मनोहर जोशी हे महापौर झाले. या एका वर्षात त्यांनी `सुंदर मुंबई, हरित मुंबई’ ही संकल्पना राबवतांना `एक पाऊल पुढे’ हा स्वच्छतेचा मंत्र दिला. सर्वसाधारणपणे माणूस कचराकुंडीत, कचरा टाकण्यासाठी जातांना लांबूनच कचरा फेकतो आणि मग तो कचरा त्या कुंडीच्या आजूबाजूला पडतो. `एक पाऊल’ पुढे टाकले तर तो कचरा बरोबर कुंडीत पडेल, ही संकल्पना यशस्वी झाली.
मुंबई महापालिकेकडून मनोहर जोशी यांनी विधानभवनाकडे मोर्चा वळविला आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून तीन वेळा निवडून गेले. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमूर्ती इथून पुढे महाराष्ट्रात गाजू लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना-भाजप ही हिंदुत्वाच्या आधारावरची युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली.
याच दरम्यान, दादर मतदारसंघात मनोहर जोशी यांच्याकडून पराभूत झालेल्या काँग्रेसच्या भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली. गिरगाव चौपाटीवर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचारासाठी जाहीर सभेत भाषण करतांना, `महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नव्हे!’ असे ठणकावून सांगितले होते. हाच आधार घेऊन भाऊराव पाटील यांनी मनोहर जोशी यांनी हिंदू म्हणून धर्माच्या नावाखाली निवडणूक लढविल्याचा आणि तो निवडणूक भ्रष्टाचार असल्याचा मुद्दा मनोहर जोशी यांच्या विरोधात मांडला.
१९९१ साली छगन भुजबळ यांच्यासमवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले. १९९०-९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या मनोहर जोशी यांना मुंबई उच्च न्यायालयातील निकाल विरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली. १९९५ साली पुन्हा शिवसेना आणि भाजप युती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अरबी समुद्राच्या आणि विराट जनसागराच्या साक्षीने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळ्यात शपथ घेतली. महाराष्ट्रात १९७८नंतर पुन्हा एकदा बिगरकाँग्रेसचे शिवशाही सरकार आले.
संयुक्त महाराष्ट्र १ मे १९६० रोजी स्थापन झाला असला तरी महाराष्ट्रातील प्रशासन चालविणार्या मंत्रालयात कामकाजाची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळाले नव्हते. राज्याचा प्रत्येक मुख्य सचिव मराठीत कामकाज करण्यासाठी मुदतवाढ मागत होते आणि दरवेळी ती मिळत होती. परंतु अशीच एक नस्ती (फाईल) मनोहर जोशी यांच्यासमोर येताच ती त्यांनी भिरकावून देत १ मे १९९५पासून मराठी भाषेत कामकाज सुरू झालेच पाहिजे, असा सुस्पष्ट आदेश दिला. युती सरकारने `बॉम्बे’चे `मुंबई’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर केला. १९७४ साली कृष्णा खोर्याचे ५४० टीएमसी पाणी अडविण्यासाठी करार होऊनही १९९५पर्यंत हा करार प्रत्यक्षपणे पुढे सरकू शकला नव्हता. पण युती सरकारने पाच हजार कोटी रुपयांचे रोखे काढून स्वतंत्र कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करून पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले.
मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू असे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प युती सरकारने मार्गी लावताना मुंबईतील पायाभूत सुविधांचा पाया रचला. `महापौर परिषद’संबंधी निर्णय घेऊन राज्यातील महानगरपालिकेच्या महापौरांच्या अधिकाराचा एक चांगला निर्णय घेतला. गोरगरिबांच्या भुकेची काळजी घेतली आणि एक रुपयात झुणका भाकर ही योजना अंमलात आणली. तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनाही या झुणका-भाकरीचा स्वाद मनोहर जोशी यांनी चाखायला लावला होता आणि त्यांनाही तो आवडला होता. दुर्दैवाने राजकीय परिपक्वतेअभावी नंतर या दोन योजना अपयशी ठरल्या.
मनोहर जोशी हे हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत `वर्षा’ या निवासस्थानी प्रौढ साक्षरतेचे वर्गही भरविले, इतकेच नव्हे तर शाळा/ महाविद्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी चक्क विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले. मुख्यमंत्रीपदावर असताना मनोहर जोशी यांच्या दृष्टीने आणखी एक महत्वपूर्ण घटना घडली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन. वरियावा यांनी त्यांची निवड रद्दबातल केली होती. भाऊराव पाटील यांचे देहावसान झाल्यामुळे त्यांचे चिरंजीव, कामगार नेते नितीन भाऊराव पाटील यांनी खटला पुढे चालविला. मुंबई उच्च न्यायालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या डॉ. मनोहर जोशी यांचे वकील जय चिनॉय यांनी माझ्याकडून न्यायमूर्ती एस. एन. वरियावा यांच्यासमोर रेकॉर्डवर आणली. `महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू’ ही संपूर्ण व्याख्या मी सादर करून त्याची सत्यता पडताळण्यासाठी दै. ‘सामना’चे वेगवेगळे तेरा अंक न्यायमूर्तींसमोर सादर केले. मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तो सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सारे युक्तिवाद, कागदपत्रे, पुरावे पाहिल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी मी सादर केलेली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची व्याख्या ग्राह्य मानून ११ डिसेंबर १९९५ रोजी निकाल दिला आणि डॉ. मनोहर जोशी यांची हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते आणि नागपूर येथे विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार माधवराव गडकरी यांनी दूरध्वनीवरून मनोहर जोशी यांना हा निकाल कळविला. मनोहर जोशी सरांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुद्दाम नागपुरात दाखल झाले होते.
१९९५ साली मनोहर जोशी दादर मतदारसंघात काँग्रेसच्या शरयू ठाकूर यांचा पराभव करून निवडून आले होते. १९९९पर्यंत त्यांनी तारेवरची कसरत करीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, स्मिता ठाकरे, प्रमोद महाजन, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, शिवशाही सरकारला समर्थन देणारे ४५ अपक्ष आमदार आणि महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे सर्व आमदार या सर्वांना सांभाळून चार वर्षे कारकीर्द यशस्वी करून दाखविली.
क्रिकेटवरील प्रेमामुळे मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे १९९२-९३च्या मुंबईतील दंगल आणि बॉम्बस्फोट याची चौकशी करणार्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांचा अहवाल विधिमंडळाच्या सभागृहात त्यांनी फाडून टाकीत फेटाळून लावला. अयोध्येतील राम म्ांदिर प्रकरणातही मनोहर जोशी उत्तर प्रदेशात पोहोचले होते. महाराष्ट्रातील राजकीय चौकट या प्रभावशाली नेत्याला अपुरी पडू लागली आणि राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण त्यांना खुणावू लागले. त्याला कारणही तसेच घडले.
वाईटातून चांगले निघते म्हणतात ना? त्याप्रमाणे १९९९ साली मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारले की, शिवसेनाप्रमुखांना कारण विचारणार नाही का? त्यावर मनोहर जोशी पटकन म्हणाले, मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले तेव्हा मी त्यांना, `साहेब, मला मुख्यमंत्री का करीत आहात? असे विचारले नव्हते. तेव्हा त्यांनी पद दिले आणि त्यांनी काढून घेतले, यात विशेष काय? इतकेच नव्हे तर राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर ते तात्काळ वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून सौ. अनघा वहिनींसमवेत टॅक्सीने दादरच्या ओशियाना या निवासस्थानी निघून आले.
मनोहर जोशी यांना १९९९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आधी अवजड उद्योग मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली. त्यांनी या खात्याला वेगळे महत्त्व प्राप्त करून देतानाच हे खाते दुय्यम, कमी महत्त्वाचे नाही, हे दाखवून दिले. दुर्दैवाने लोकसभेचे अध्यक्ष जी.एम.सी. बालयोगी यांचे निधन झाले. इथेही वाईटातून चांगले घडले. चाणाक्ष प्रमोद महाजन यांनी चकल्लस चतुराई दाखवत वाजपेयी आणि बाळासाहेबांशी सल्ला मसलत करून मनोहर जोशी यांना थेट लोकसभेच्या अध्यक्षपदी, संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानी बिनविरोध विराजमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दादासाहेब मावळणकर, शिवराज पाटील यांच्या रांगेत मनोहर जोशी यांना स्थान मिळाले.
अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मनोहर जोशी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे चंद्रकला कदम यांनी तयार केलेले तैलचित्र लावून एक ऐतिहासिक भूमिका पार पाडली. राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित होते. संसदीय लोकशाहीमधील राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यानंतरचे पद मनोहर जोशी यांना प्राप्त झाले. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात मनोहर जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तेव्हा मनोहर जोशी यांचे राजकीय विरोधक छगन चंद्रकांत भुजबळ यांनी मनोहर जोशी यांचा गौरव करताना, `नशीब नशीब नशीब काय म्हणतात ना ते नशीब म्हणजेच मनोहर जोशी! ते उद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जरी झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही,’ असे उद्गार काढले होते.
शिवसेना या एकचालकानुवर्ती समजण्यात येणार्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेल्या संघटनेच्या `शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी मुंबई विद्यापीठाकडे प्रबंध दिला, पीएचडी पूर्ण केली आणि प्रिन्सिपॉल मनोहर जोशीचे डॉ. मनोहर जोशी झाले.
राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात मनोहर जोशी यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न असो की शिवसेनेचे कोणतेही आंदोलन, त्यात मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे आदी पहिल्या फळीतील नेत्यांच्या समवेत हिरीरीने भाग घेतला. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर तुरूंगवाससुद्धा भोगला. मितभाषी स्वभावामुळे मनोहर जोशी यांनी सर्व पक्षांमधले नेते मित्रत्वाने जोडले. म्हणूनच लोकसभेच्या अध्यक्षपदी असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. रघुवंश प्रसाद यांनी उद्गार काढले होते की, `श्रीमान मनोहर जोशी सर को निर्विरोध चुनकर देने की जरूरत है.’
बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मनोहर जोशी हे शिवसेनेतील `चाणक्य’ म्हणूनच ओळखण्यात येत होते. संघर्षाच्या भट्टीत तावूनसुलाखून निघालेले हे हिंदुस्थानातील सच्चे निष्ठावंत राजकीय नेते म्हणून त्यांनी आपला ठसा निश्चितच उमटविला आहे.