□ मोदी सरकार घाबरले! शेतकर्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली…
■ इथलं झाकायला गेले आणि बाहेर सगळं उघडं पडलं. या कारवाईशी आम्ही सहमत नाही, भारत सरकारच्या दबावामुळे हे करावं लागतंय, असं निवेदन एक्स म्हणजे ट्विटरने जारी केल्यामुळे परदेशांत सरकारची अब्रू गेलीच.
□ पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ निशाणी.
■ आता मशालीच्या उजेडात, हाताच्या पंजात धरून मराठी माणसाने अशी तुतारी फुंकायची की तिने दिल्लीच्या कानात दडे बसवले पाहिजेत!
□ मोदींवर टीका केली म्हणून सत्यपाल मलिक यांच्या घरावर सीबीआयचे छापे.
■ इतके दिवस ते कसे पडले नव्हते, याचं आश्चर्य वाटत होतं. आता कसं प्रथेनुसार झालं.
□ मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आदेश अखेर मागे.
■ २०० निरपराधांचे बळी गेल्यावर, अनेक आयाबायांवर अत्याचार झाल्यानंतर राक्षसी सरकारला जाग आली? राजीनामा देण्याची बुद्धी मात्र झाली नाही. सत्तेला चिकटलेल्या जळवा आहेत या.
□ झोपडी रिकामी करण्याची नोटीस शनिवारी देऊ नका – हायकोर्टाने एसआरएला बजावले.
■ हे न्यायालयाने बजावण्याची वेळ का यावी? माणुसकीचा विसर सरकारी यंत्रणांना का पडावा?
□ निवासी डॉक्टर पुन्हा संपाच्या तयारीत.
■ अवघड परिस्थिती आहे त्यांची. आंदोलन कितीही न्याय्य असलं तरी त्यात रुग्णांचे हाल होतात आणि पब्लिकचे शिव्याशाप खावे लागतात.
□ आरोग्य खात्यावर नोकरीसाठी डॉक्टरांच्या अर्जांचा पाऊस.
■ शिक्षणासाठी एवढा पैसा, एवढा वेळ खर्च केल्यावर त्यांच्याकडे स्वतंत्र प्रॅक्टिससाठी भांडवल कुठून उरणार? त्यापेक्षा नोकरी बरी, असा विचार करण्याची वेळ त्यांच्यावर यावी ना!
□ रिकाम्या खुर्च्यांमध्ये मिंधे सरकारच्या महासंस्कृतीचे उद्घाटन.
■ आता खोकीही रिकामी होत आली आणि कायमचे घरी बसण्याची वेळही जवळ आली… कशाला कोण जाईल वेळ वाया घालवायला?
□ शिक्षण पवित्र, पण परवडणारे राहिलेले नाही – हायकोर्टाचे परखड मत.
■ ते परवडणारे ठेवायचे नाही, हाच तर बहुजनांच्या विरोधात रचला गेलेला कट आहे, पण अस्मितांची अफू चढलेल्या बहुजनांना याची जाणीव होईल तोवर सनातनी वेढा आणखी घट्ट झाला असेल.
□ मराठ्यांची एकी दाखवा, आंदोलनात सहभागी व्हा! – मनोज जरांगे यांचे आवाहन.
■ तुमच्याच आसपासचे किती लोक फुटले ते पाहा जरांगे भाऊ! कुणावरही विश्वास ठेवलात, अशाने तुमची विश्वासार्हता संपवून टाकतील हे लोक!
□ नवीन शालेय गणवेश धोरणाचा फटका; ५० हजार कारागीरांवर बेकारीची कुर्हाड.
■ मतदानाच्या वेळी हे कारागीर काय लक्षात ठेवतील, त्यावर त्यांच्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे, ते ठरणार आहे.
□ केंद्राकडून मुंबई विद्यापीठाला मिळालेले अनुदान तुटपुंजे.
■ विद्यापीठाला त्या पक्षात सामील करण्याची आयडिया लढवा कुणीतरी… मग सोन्याने तुला होईल संपूर्ण विद्यापीठाची.
□ राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करा – हायकोर्टात जनहित याचिका.
■ राज्यात आहेत ते कायदे आपलं संरक्षण करायला पुरेसे नाहीत, अशी कायद्याच्या इतक्या जवळच्या समुदायाची समजूत होत असेल, तर आपण भयंकराच्या दारात पोहोचलो आहोत.
□ मोदी सरकारची संकल्पयात्रा शिरवणे गावकर्यांनी अडवली.
■ शेवटी लोकांना थापेबाजीचा कंटाळा येतोच ना, कितीही मनोरंजक असली तरी!
□ शौचालय सुविधेमध्येही राजकारण कसे करता? – हायकोर्टाने मिंधे सरकारचे कान उपटले.
■ मयताच्या टाळूवरचं लोणी खाणार्यांकडून ही फारच मोठी अपेक्षा झाली न्यायालयाची.
□ वाढवण बंदराला कडाडून विरोध; डहाणूत शिवसैनिकांचे अटकसत्र.
■ देशचालकांच्या मालकांच्या हिताआड आलेल्या प्रत्येकाच्या भाळी हेच लिहिलं आहे… चालक बदलेपर्यंत…
□ नितेश राणे ‘वेडा आमदार’ – प्रकाश आंबेडकर.
■ बाळासाहेब, कुठे नगण्य माणसांवर वेळ घालवताय?
□ मोदी सुना रहे हैं नानी को ननिहाल का हाल – राहुल गांधी.
■ नानीला धर्माची अफू चाटवली गेलेली असल्याने ती आपणच सांगितलेल्या गोष्टी नव्याने अगदी रस घेऊन ऐकते आहे, त्याचं काय करायचं राहुलजी!
□ गावागावात छोटे पक्ष शिल्लक ठेवू नका, सगळे फोडा, नेत्यांना आपल्याकडे ओढा : चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला.
■ आणि यांचे सर्वोच्च नेते समोर छप्पन्न खुळे बसले असावेत, अशा आविर्भावात भारतातल्या लोकशाहीच्या मोठमोठ्या बाता मारत असतात.