२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या लढाईचे रणशिंग फुंकले गेले होते. भाजपाचे नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ३० मार्च २०१४ रोजी नांदेड येथील जाहीर सभेत काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यावर चौफेर टीका केली होती. ‘ज्यांनी लुटले, आज मी नांदेड आणि गुरू गोविंदसिंग यांच्या पवित्र भूमीत शपथ घेऊन जात आहे की नवीन सरकार भारतमातेचे रक्षण करणार्या कारगिलमधील शहिदांच्या विधवांना लुटणार्यांना सोडणार नाही,’ अशी वल्गना मोदींनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘आदर्श’ घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाणांना सोडणार नाही अशी दर्पोक्ती केली होती. त्याच फडणवीस यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चव्हाणांच्या हाती कमळ दिले आहे, शिवाय त्यांना राज्यसभेवरही पाठवले आहे. भाजपचा कथनी आणि करनीमधला फरक हा आहे.
अशोक चव्हाण हे आत्ताचे उदाहरण आहे. पण गेल्या दहा वर्षांत भाजपने भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या इतर पक्षांतील अनेक नेत्यांना आपल्यात घेऊन पावन करून घेतले आहे. असे देशभरातील एकूण ७४० खासदार-आमदार आहेत. काही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या शासकीय यंत्रणा मागे लावून पक्ष व नेते फोडले आहेत, तर काही पक्ष एनडीएमध्ये दाखल करून घेतले आहेत. केंद्रात दहा वर्षे सत्तेत असतानाही स्वत:च्या कामगिरीवर विश्वास नसलेला भाजप आणि त्यांच्या नेत्यांना सत्ता हस्तगत करण्यासाठी अशा विरोधी पक्षांच्या कुबड्या लागतात. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपामध्ये गेले की त्यांच्यावरच्या गैरव्यवहाराचे आरोप थांबले. त्यामुळे केसेस निघून जातात, तपास थांबतो. त्यांना क्लीन चिटही मिळते. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे २०१९ साली भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप थांबले. त्यामुळे त्यांना रात्री चांगली झोप लागते हे ते नेहमी आनंदाने सांगतात.
गेल्या दहा वर्षात देशातील विरोधी पक्षातील अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपाने स्वीकारले आहे. राज्यातील त्या पक्षाची ताकद व नेत्याची उपयुक्तता याचा विचार करून त्यांना भाजपामध्ये दाखल करून घेण्याचा सपाटाच लावला आहे. त्यापैकी काहींना मुख्यमंत्री तर काहींना मंत्री तसेच खासदार-आमदार केले आहे. त्याचवेळी मात्र भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ म्हणत या आयारामांना नाराजीने पायघड्या घालण्याचे काम करीत आहेत.
भाजपकडून ‘शत-प्रतिशत भाजप’ असा नारा दिला गेला. पण तो हवेतच विरला. कारण गेल्या दहा वर्षात देशात आणि राज्यात भाजपाचे ४०-४५ टक्के खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी विरोधी पक्षातील आहेत. महाराष्ट्राचे चित्र असे आहे. महाराष्ट्रात ४८ लोकसभेचे खासदार आहेत. २०१९ साली भारतीय जनता पक्षाचे २३ खासदार निवडून आले होते. त्यापैकी १० इतर पक्षांमधून आयात केलेले आहेत. जवळजवळ ४५ टक्के खासदार भाजपाच्या मूळ विचारधारेला पूर्वी ठासून विरोध करणारे होते. नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावीत या महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावीत यांच्या कन्या आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. यासुद्धा राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या आहेत. दुसरे केंद्रीय मंत्री भिवंडीचे खासदार कपिल पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचे, पण ते २०१४ सालापासून भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील हे मूळचे काँग्रेसचे. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि विधान परिषदेचे आमदार झाले. तर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करून सांगलीचे खासदार झाले. माढा येथील खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर हे काँग्रेसचे पदाधिकारी होते. नाईक यांचे घराणे मूळचे काँग्रेसचे. त्यांचे वडील हिंदुराव नाईक हे शिवसेनेचे खासदार होते. २०१९ साली भाजपामधून माढाचे खासदार म्हणून ते निवडून आले आहेत.
अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव. तत्कालीन भाजपाचे खासदार गांधी यांचे तिकीट कापून भाजपाने या आयारामाला तिकीट दिले आणि २०१९ साली ते भाजपाचे खासदार झाले. नांदेडचे भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर हे शिवसेनेचे आमदार होते. त्यापूर्वी ते काँगे्रसमध्ये होते. अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेले चिखलीकर काँग्रेसमधून शिवसेनेत आले. नंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या हाती भाजपाने कमळ दिले. धुळ्याचे भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे हे आधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. २०१४ साली भाजपाने त्यांना तिकिट दिले आणि केंद्रीय राज्यमंत्रीही केले. सोलापूरचे सिद्धेश्वर स्वामी हे कुठल्याही पक्षाचे सदस्य नव्हते. लिंगायत समाजाचे गुरू आणि अक्कलकोट मठासमोर केलेल्या आंदोलनामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यामुळे भाजपाने त्यांना लगेच गळाला लावले आणि २०१९ साली सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली ते निवडून आले.
महाराष्ट्रातील १९ राज्यसभा सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे आठ खासदार आहेत. त्यापैकी मूळ भाजपाचे चार आहेत. तर उर्वरित चार इतर पक्षांमधून घेतले आहेत. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे, उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे, डॉ. अनिल बोंडे हे िशवसेनेचे, तर धनंजय महाडिक हे आधी राष्ट्रवादीचे होते.
आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा आकडा ४०० पार करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या ४ ते ५ विद्यमान खासदारांना कमळ या चिन्हावर लढण्यास सांगितले जात आहे. हेमंत गोडसे (नाशिक), राजेंद्र गावीत (पालघर), कृपाल तुमने (रामटेक), भावना गवळी (वाशिम), हेमंत पाटील (हिंगोली), सदाशिव लोखंडे (शिर्डी) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
भाजपाच्या १०५ विधानसभा आमदारांपैकी ४२ आमदार विविध पक्षामधून आलेले आहेत. काहींची भ्रष्टाचाराची, गैरव्यवहाराची आणि बलात्कारांची प्रकरणे होती. भाजपात घेतल्यानंतर ते स्वच्छ झाले आहेत, पावन झाले आहेत.
राष्ट्रवादी आमदारांच्या भ्रष्टाचाराविरोधात दोन हात करणार्या भाजपाने २०१४च्या निवडणुकीपूर्वी ईडी व सीबीआयचा धाक दाखवून त्यांच्या हातात भाजपाचे कमळ दिले आहे. त्यात विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावीत (नंदुरबार), किसन कथोरे (मुरबाड), कुमार आयलानी (उल्हासनगर), गणेश नाईक (ऐरोली), मंदा म्हात्रे (बेलापूर), राहुल नार्वेकर (कुलाबा), महेश लांडगे (भोसरी), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा) शिवेंद्रसिंह भोसले (सातारा), संजय सावकारे (भुसावळ), समीर मेघे (हिंगणा), सीमा हिरे (नाशिक-पश्चिम), नमिता मुंदडा (केज) हे सर्व पूर्वी राष्ट्रवादीचे होते. त्याचप्रमाणे छोटे पक्ष आणि काही अपक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या आमदारांनाही भाजपाने पावन करून घेतले. प्रशांत बंब (गंगापूर), गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), डॉ. भारती लव्हेकर (वर्सोवा), महेश बालदी (उरण), अॅड. राहुल कुल (दौंड), राजेंद्र राऊत (बार्शी), विनोद अग्रवाल (गोंदिया), गीता जैन (मिरा-भाईंदर) आणि मनसेचे राम कदम (घाटकोपर-पश्चिम) हे सर्व गैरव्यवहार व भ्रष्टाचार करून उथळ माथ्याने भाजपामध्ये सामील झाले आहेत.
काँग्रेसमुक्त देश करण्याचा विडा उचलणार्या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचे पालन करून राज्य भाजप नेतृत्त्वाने काँग्रेसच्या आमदारांना सहारा दिला. काँग्रेसमधून आयात केलेले प्रकाश भडसावळे (आकोट) हे आधी शिवसेनेचे आमदार होते. मेघना बोर्डीकर (जिंतूर-परभणी), प्रशांत रामशेठ ठाकूर (पनवेल), रवीशेठ पाटील (पेण), राधाकृष्ण पाटील (शिर्डी), मोनिका राजळे (शेगाव), नितेश राणे (कणकवली), कालिदास कोळंबकर (वडाळा) हे काँग्रेसचे काही आमदार आहेत. शिवसेनेमधून घेतलेले डॉ. राजेंद्र पटणी (कारंजा), डॉ. राहुल ढिकले (नाशिक पूर्व) हे भाजपचे आमदार झाले आहेत.
विधान परिषदेतील एकूण २२ भाजप आमदारांपैकी १० आमदार इतर पक्षातून आयात केलेले आहे. निरजंन डावखरे, सुरेश धस, निलय नाईक, रणजीतसिंह मोहिते पाटील आणि प्रसाद लाड हे राष्ट्रवादीतून आलेले आहेत, तर प्रवीण दरेकर हे मनसेतून भाजपामध्ये गेले आणि महाविकास आघाडीच्या काळात भाजपाने त्यांना विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद बहाल केले. अमरीश पटेल आणि राजहंस सिंह हे ३५-४० वर्ष काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हाती घेतले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे प्रवक्ते असलेले गोपीचंद पडळकर यांनाही भाजपाने पदरात घेऊन आमदार केले. या सर्व आमदारांवर कुठले ना कुठले भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप होते. त्यांच्यावर केसेस चालू होत्या. त्या आता थांबल्या आहेत. त्यामुळे हे आमदार त्याच्या मोबदल्यात भाजपा विरोधकांवर तुटून पडतात. निष्ठावंतापेक्षाही जास्त कडवटपणे विरोधकांवर बोलतात. भाजपाला अशी उपरी माणसे भुंकण्यासाठी हवीच असतात.
आज भाजप कार्यालयातील निष्ठावंतांची असून परिस्थिती दयनीय झाली आहे. तो घरचा मालक असूनही आता तो घरगडी झाला आहे. ‘तुम्ही कुठून आलात? कुठूनही नाही, आम्ही भाजपामधलेच आहोत. कुठेही गेलेलो नव्हतो. मग नुसते तोंडाकडे का बघत बसला आहात? लोक येत आहेत. सतरंजी आंथरा, चपला नीट सांभाळा, चहापाण्याची व्यवस्था बघा. चला निघा इथून, का घालू कंबरड्यात लाथ?’ अशी निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांची, संघाच्या स्वयंसेवकांची दयनीय परिस्थिती भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी करून ठेवली आहे.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आताच्या भाजप नेत्यांनी नीतीमत्ता विसरून, सुसंस्कृपणा, सभ्यता यांना फाटा दिला आहे. कधीतरी महत्त्वाचे असलेले चालचलन, चारित्र्य यांना तिलांजली दिली आहे. स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, पंजाब केसरी यज्ञदत्त शर्मा, दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक, नानाजी देशमुख, कर्नाटक सिंह वसंतराव भागवत आदी सर्वोच्च नेत्यांनी घालून दिलेले आदर्श पायाखाली तुडवून वाटचाल करीत आहेत. इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांच्या कुबड्या घेऊन ४००चा टप्पा पार करण्यासाठी धावत आहेत. ही शर्यत कदाचित भाजपा जिंकेलही. पण तेव्हा या देशातील संविधान हरले असेल. लोकशाही संपली असेल.
संख्याबळ आणि सत्तेसाठी भाजपाला ‘आदर्श’ घोटाळ्यातील अशोक चव्हाण, बेनामी मालमत्तेचा आरोप असलेले नारायण राणे, शिवसेना फोडणारे ‘समृद्धी’फेम एकनाथ शिंदे, सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार, सहकार क्षेत्रात गैरव्यवहार करणारे राधाकृष्ण विखे-पाटील व हर्षवर्धन पाटील, दाऊद हस्तक व इक्बाल मिर्ची यांच्याशी संधान साधण्याचा आरोप असलेले प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांना भाजपाने वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतले आहे. देशातील अशा मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद, खासदारकी देऊन पावन करून घेतलेल्यांची यादी लांबलचक आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भंडारी, केशव उपाध्ये, अतुल भातखळकर, संजय केळकर, मधु चव्हाण अशा शेकडो पदाधिकार्यांवर अन्याय करून बाहेरील व्यक्तींना मंत्री व आमदार-खासदारकीची जहागिरी दिली जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे इमाने-इतबारे, नि:स्वार्थीपणाने काम करणार्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची, नाराजीची भावना दिसत आहे. काहींनी खंत देखील व्यक्त केली आहे.
‘गेली २०-२५ वर्षे भाजपची बाजू प्रसिद्धीमाध्यमांसमोर उत्कृष्टपणे मांडणारे, विरोधी प्रवक्त्यांना अभ्यासूपणाने नामोहरम करणारे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी यांचे नाव गेल्या १२ वर्षात १२ वेळा खासदार-आमदारकीच्या पदासाठी चर्चेत आले होते. पण अंतिम यादीत आयारामांना संधी देऊन त्यांच्यासारख्या निष्ठावंताला डावलले गेल्याची खंत माधव भंडारी यांचे चिरंजीव चिन्मय भंडारी यांनी एक्सवर व्यक्त केली आहे. ही खंत खूपच बोलकी आहे. भाजपाच्या सर्वच निष्ठावंतांच्या मनातील ती खदखद आहे. भाजपाने सत्तेसाठी केलेल्या अनैतिक तडजोडीवर भाष्य करणारी आहे. भाजपा हा ‘जय श्रीरामा’चा नव्हे तर आता ‘आयारामां’चा पक्ष झाला आहे, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, ते अधोरेखित करणारी आहे.
२५ वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अवघ्या ‘एका’ मताने केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव झाला होता. तेव्हा वाजपेयींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यावेळीच ते म्हणाले होते की, ‘सत्तेच्या खुर्चीसाठी मी कुणाचा पक्ष फोडणार नाही आणि जोडतोडचे राजकारण करणार नाही. अशी अनैतिक कृत्यातून मिळवलेली सत्ता मला नको आहे. त्यापेक्षा मी पंतप्रधानपदावरून पायउतार होणे पसंत करेन.’ वाजपेयी यांनी ताठ मानेने राजीनामा दिला होता. तेव्हाची भाजप संस्कृती, सभ्यता आणि शिस्त पाळणारी होती. आत्तासारखी राजकीय व्यभिचार करणारी नव्हती.
कुठे श्रद्धेय वाजपेयी आणि कुठे आत्ताचे विश्वगुरू मोदी. हा फरक सर्वसामान्यांना आणि भाजपाच्या निष्ठावंतांना देखील कळतो आहे.
अब की बार ४०० पारच्या घोषणा कार्यकर्त्यांसमोर द्यायच्या, टाळ्या घ्यायच्या, नसलेली छाती ५६ इंचाची म्हणून सांगायची. ठायी-ठायी अहंकार, मस्ती, मिजास दाखवायची. अशा भाजपाच्या या शीर्षस्थ नेत्यांच्या ना मनगटात बळ, ना त्यांच्या तलवारीला धार. त्यांची सारी मदार गद्दारांवरच आहे!