मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्याण शाखेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हे सारं झाल्यावर थोडाच गप्प बसणार होता! त्यातच गणपत गायकवाडने गोळीबाराचं समर्थन केल्याने आणि त्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचं विधान करताच एकच खळबळ उडाली. त्याशिवाय आपण वेळोवेळी दिलेले ५० कोटी रूपये शिंदेंकडे आहेत, असा आरोप गणपत गायकवाडने केल्यामुळे तर त्या घटनेत आणखीनच संशयाची भर पडली. त्यामुळे पोक्या तडक संबंधितांच्या मुलाखती घेण्यास निघाला. त्याच या मुलाखती…
– नमस्कार मुख्यमंत्री साहेब.
– हे बघ, मी बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. तू मला वाटेल ते प्रश्न विचारू नकोस. माझ्या डोळ्यातील मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय.
– हो. ऐकलं मी ते. वीस डॉक्टरांची फौज होती म्हणे त्यासाठी.
– त्यामुळेच तर ते वीस मिनिटांत झालं.
– पण कोणीतरी म्हणालं की ते मोदीबिंदूचं ऑपरेशन होतं म्हणून..
– एक लक्षात घे. मोदींशिवाय मला आणि या देशाला दुसरा पर्याय नाही. आता माझे, तुम्ही ज्यांना गद्दार म्हणता ते यापुढे ‘नमोसैनिक’ म्हणून ओळखले जातील. तशी घोषणाच मी केली आहे.
– ते जाऊं दे. पण त्या भाजपच्या आमदाराने तुमच्यासारख्या सभ्य मुख्यमंत्र्यावर तुमचं चारित्र्यहनन करणारे जे आरोप केले त्याचं काय?
– तो काय वाटेल ते बडबडेल. त्याला पुरावा काय?
– पुरावा की जाळावा ते तुम्ही ठरवा. पण मी तुमच्यामुळे गुंड बनलो हे त्याचं स्टेटमेंट चुकीचं आहे, असं कसं म्हणता येईल?
– हे बघ, ते जमिनीच्या वादाचं लफडं आहे. ती वैयक्तिक भानगड आहे. आमच्या गटाचा आणि भाजपचा यात काहीही संबंध नाही.
– मग भाजपवाले त्या आमदाराला वाचवायचा आणि तुमचे ‘नमो सैनिक’ त्याला कायमचा लटकवण्याचा का प्रयत्न करताहेत? त्याने गोळीबार करावा म्हणूनच तुम्ही त्याला, त्याच्या पुत्राला भडकावलंत, असं त्यावेळी जमलेले बघे म्हणतायत. तुम्ही त्या आमदाराला पाण्यात बघत होतात आणि पितापुत्र मिळून त्याची शक्य तेवढी गळचेपी कशी करत होता याची उदाहरणं त्यांनी दिलीत. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातलं भाजपचं वर्चस्व सहन होत नव्हतं म्हणून तुम्ही हा शेवटचा डाव टाकलात, असं तो आमदार आणि त्याचे पाठीराखे म्हणताहेत. ते खोटं आहे का? त्याचं सीसीटीव्ही फुटेज ताबडतोब मीडियाला कसं मिळालं? कुटील खेळी खेळण्यात आली असं भाजपवाले म्हणतात. स्वत:च्या पुत्राला जीवघेणी मारहाण होत असताना कुठला बाप ते उघड्या डोळ्याने बघत बसेल. हा माझा नाही तर त्या भाजप आमदाराचा सवाल आहे. आता भाजपवाले त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
– ते काय हवं ते करू देत. भाजप आमचा मित्रपक्ष आहे आणि मोदी आमचा श्वास आहे. आमचे नमो सैनिक…
– पाठीमागून वार करण्यात हुशार आहेत, असंच ना?
– तू तर फारच बोलायला लागलास. मी खपवून नाही हां घेणार.
– ठीकाय. पण तुमचे मंत्रिमंडळातील आणि इतर नमोसैनिक फडणवीसांकडे त्या आमदाराला भाजपमधून बडतर्फ करा आणि धडा शिकवा असा आग्रह करण्यासाठी का गेले होते?
– ते त्या फडणवीसांनाच विचार…
– नमस्कार फडणवीस साहेब.
– नमो नम: विचार काय विचारायचं ते.
– मला सांगा साहेब. एखाद्या शिवसैनिकाने पोलीस ठाण्यात आपल्यावर होणार्या नाहक अन्यायाविरूद्ध पोलीस अधिकार्याला केवळ जाब विचारला, म्हणून तुम्ही त्याला अंदर करता, मग एखादा भाजप आमदार पोलीस ठाण्यात रक्ताचा सडा पाडतो, त्याची तुम्ही पक्षातून ताबडतोब हकालपट्टीही करत नाही, याला काय म्हणावं?
– पुराव्याशिवाय तसंच त्या आमदाराचीही सत्य बाजू ऐकल्याशिवाय मी गृहमंत्री म्हणून कायदा हातात घेणार नाही.
– पण आपण नि:पक्षपातीपणे न्याय देतो हे दाखवण्यासाठी तरी त्या तुमच्या आमदाराला तात्पुरतं निलंबित करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही, असं मला वाटतं.
– तुला काहीही वाटेल. आमच्या पक्षाची काही इमेज आहे की नाही?
– ते खरंच आहे म्हणा. विरोधकांची गळचेपी करायला तुम्हाला पुराव्यांची गरज नसते. त्यांना ताबडतोब ईडी चौकशीला आणि तुरूंगवासाला सामोरं जावं लागतं आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले तुमच्या पक्षात आले की पवित्र होतात. ते अजितदादा…
– त्यांनाच काय ते विचार.
– नमस्कार अजितदादा. काय चाललंय हे सगळं. आज तुमच्या त्रिमूर्तीची तीन तोंडं तीन दिशेला आहेत. त्या पोलीस ठाण्यातील गँगवॉरनंतर. याचा अर्थ काय?
– ते मला विचारू नकोस.
– तुम्हाला काय वाटतं? त्या भाजप आमदाराने शिंदेंच्या माणसांवर केलेला गोळीबार योग्य होता?
– मी कुणाचीही बाजू घेणार नाही. किंवा कुणालाही दोषी ठरवणार नाही. मी म्हणजे काही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट आहे काय?
– तसं नव्हे अजितदादा. पण यात शिंदे साहेबांसारख्या सभ्य माणसाला धारेवर धरलं जातंय ते योग्य आहे का?
– कोण सभ्य? जाऊं दे. मला या वादात पडायचं नाही. जो तो आपल्या कर्माची फळं भोगेल. मी सध्या भोगतोच आहे ना. माझ्या सरळसोट बोलण्यातून काय वाटेल ते वाईट अर्थ काढतो तो. त्याचं नावही मी घेत नाही. पण एक सांगतो, कोणीही कितीही सभ्यपणा दाखवला तरी कधीतरी त्याचं भांडं फुटतंच. मी कुणाचं नाव घेणार नाही. पण माझ्या मार्गात आड येणार्या कोणत्याही दुक्कलीला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कसलीही किंमत मोजण्याची माझी तयारी आहे.
– आलं लक्षात. जे समजायचं ते समजलो मी. आता पळतो…