उद्योगपती विक्रम भोसले… वय वर्षे ४०… इंजीनिअरिंग क्षेत्रात त्याच्या कंपनीचे चांगले नाव होते. सोशल मीडियावर तो कायम अॅक्टिव्ह असायचा. कामातून कधी फावला वेळ मिळाला की मित्रमंडळींबरोबर गप्पा मारणे, माहिती शेअर करणे असे उपक्रम कायम सुरू असायचे.
रविवारची सुटी होती, विक्रम फेसबुकवर पोस्ट तपासत होता, इतक्यात नेहा वर्मा नावाच्या एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याला आली. सुरूवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण कोण आहे, ही मुलगी कोण आहे हे तपासत असताना त्याला तिच्या संपर्कात आपल्या संपर्कातले तिघेजण असल्याचे त्याला दिसले. स्क्रीनवर दिसणारा तिचा फोटो देखील भलताच सुंदर होता, त्यामुळे विक्रमने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती.
सोमवारपासून पुन्हा काम सुरू झाले. त्यामुळे त्या नादात तो ते विसरून गेला. चार-पाच दिवसांनी त्या नेहा शर्माचा विक्रमला मेसेज आला, तुझा मोबाईल नंबर कळव, तुला एक माहिती द्यायची आहे, ज्याचा तुला तुझा व्यवसाय वाढवण्यासाठी नक्की उपयोग होईल. त्यावर आंधळा विश्वास ठेवून विक्रमने तिला मोबाईल नंबर शेअर केला. पण त्यावर कामाची काही माहिती आलीच नाही, त्या ऐवजी तुमने मुझे पहेचाना क्या, विक्रम… त्यावर तो नाही म्हणाला. आप जैसे बडे लोग मुझे कैसे पहचानेंगे, असे म्हणत नेहाने संवाद वाढवण्यास सुरूवात केली. तेव्हा, विक्रम तिला म्हणाला, ‘अरे काम की बात बताव’, ‘अरे वो तो बोलूंगी मैं, पहली बार थोडी गपशप तो हो जाये,’ असे म्हणत तिने विक्रमला मैत्रीच्या जाळ्यात ओढण्यास सुरूवात केली.
इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असतानाच मधेच नेहाने आपले मादक फोटो विक्रमच्या व्हॉट्सअपवर पाठवत आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यास सुरूवात केली. काही क्षणात हा विषय आपली सेक्सची आवडनिवड यावर सुरू झाला. विक्रम हे सारे पाहून थोडा अवाक् झाला होता, पण आपला टाईमपास होतोय, चमचमीत विषयावर गप्पा सुरू आहेत, त्यामुळे त्याचा देखील या चर्चेमधला रस वाढताना दिसत होता.
नेहाने त्याला विचारले, ‘विक्रम तुम तुम्हारे रूम में कब अकेले राहते हो?’ त्यावर विक्रम म्हणाला, ‘क्यों?’ नेहा म्हणाली, ‘मैं तुम्हें व्हिडिओ कॉल करना चाहती हूं,’ त्यावर विक्रमने होय-नाही असे काहीच उत्तर दिले नाही. तिथे या दोघांमधला संवाद थांबला होता.
रात्री दहा वाजता नेहाने विक्रमच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला, विक्रमने तो फोन घेतला. नेहा त्याला म्हणाली, ‘तुम बाथरूम में जाओ, मैं तुम्हें खुश करना चाहती हूं’ विक्रमसाठी हा सगळा प्रकार नवा होता, त्यामुळे तो देखील बाथरूममध्ये गेला. संवाद सुरू होण्याच्या अगोदर तिने आपले कपडे काढून मैं कैसी दिखती हूं?’ असे त्याला विचारत त्याला कपडे उतरवण्याची विनंती केली. भावनेच्या भरात त्याने देखील कपडे उतरवले. अवघ्या पाच ते सहा सेकंदामध्ये या दोघांमध्ये सुरू असणारा व्हिडिओ अचानकपणे बंद झाला आणि दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू झाला. या सगळ्याचे रेकार्डिंग सुरू होते, याची विक्रमला माहिती नव्हती.
१५ ते २० मिनिटांनी सगळे बंद झाले आणि विक्रमच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील व्यक्ती त्याला सांगत होती, तुझा आणि नेहाचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो मी फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर टाकणार आहे. त्यावर विक्रम घाबरून गेला, ते व्हिडिओ टाकायचे नसतील तर तू एक लाख रूपये बँक खात्यामध्ये ट्रान्सफर कर, त्यावर विक्रमने घाबरून ५० हजार रू. त्या व्यक्तीने दिलेल्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले.
पुन्हा काही वेळाने फोन आला, हा व्हिडिओ तुझ्या घरची मंडळी, मित्र, नातेवाईक यांना पाठवतो, तेव्हा गोंधळून गेलेल्या विक्रमने पुन्हा एकदा आपण एक लाख रूपये देतो, असे सांगून परत एकदा पैसे ट्रान्सफर केले. आपण धमकी दिली की, विक्रम लगेच पैसे देतो, हे हेरून त्या व्यक्तीने त्याचे व्हिडिओ त्याला पाठवले आणि एवढ्या पैशात काही होत नाही, तू पाच लाख रूपये दे अशी मागणी त्याच्याकडे केली.
या सगळ्या प्रकारात विक्रम पूर्णपणे गोंधळून गेला होता. माझे व्हिडिओ टाकू नका, तुम्हाला विनवणी करतो, अशी विनंती सातत्याने करत होता, पण ती व्यक्ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे विक्रम देखील पूर्णपणे घाबरून गेला होता. हे व्हिडिओ समाज माध्यमात गेले तर आपल्या प्रतिमेला कलंक लागेल, अशी त्याची भावना झाली होती.
अखेर आपल्या बाबतीत घडलेला प्रकार त्याने जवळच्या मित्राच्या कानावर घातला, तेव्हा त्याने तुला ब्लॅकमेल करण्यात येत आहे, हे सांगून तू ताबडतोब पोलिसात तक्रार कर असे सांगितले, विक्रमनेही पोलीस स्टेशन गाठत झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तुम्ही कोणाला पैसे देऊ नका, आलेले मेसेज पाहू नका, तुमचा फोन बंद ठेवा, असा सल्ला विक्रमला दिला. पोलिसांनी दिलेल्या सूचना त्याने पाळल्या.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून उदयपूरमधल्या भरतपूरमधून मुश्ताक नावाच्या २५ वर्षीय तरूणाला अटक केली. हा तरूण सुंदर मुलीचे बनावट फोटो वापरून हा फसवणुकीचा धंदा करत होता. या सगळ्या उद्योगासाठी त्याने एका मुलीचा २० सेकंदाचा व्हिडिओ तयार केला होता, त्याच्या आधारे समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढून तो पैसे उकळण्य्ााचा धंदा करत होता.
हे लक्षात ठेवा…
– अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल घेण्याचे टाळा.
– अनोळखी व्यक्तींबरोबर बोलताना मोबाईलच्या कॅमेर्यावर बोट ठेवून बोला.
– विशेष म्हणजे कधी कधी विदेशातून व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून फोन येतात, चुकून ते उचलले जातात. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष द्या.
– फेसबुकवर आलेली अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, त्यामधून देखील अशा प्रकाराला निमंत्रण मिळू शकते.
– अनोळखी नंबर ब्लॉक करा.