तुम्ही आजवर कॉम्प्युटर रिपेअरिंग, लॅपटॉप दुरूस्ती, इन्स्टॉलेशन, चिप लेव्हल वर्क करताना अनेकांना पाहिले असेल. त्यात बहुसंख्येने पुरूषच असतात, असे निरीक्षण असेल. आपण बरेचसे मुलगे, पुरूषच अशा प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करताना पाहत असतो. शिवाय शहरात वाढलेली, आधीपासून कॉम्प्युटरशी संबंध आलेली मुले ह्या व्यवसायात येतात. त्यांना त्यात रसही असतो, त्यामुळे व्यवसायात टिकून राहतात. ह्या क्षेत्रात मुली महिला संख्येने अत्यंत कमी आहेत.
या पार्श्वभूमीवर निशा सोनावणे फारच वेगळ्या ठरतात.
मुळात त्या धुळ्यासारख्या तितकेसे शहरीकरण न झालेल्या शहरातून आलेल्या आहेत. त्या कॉम्प्युटर रिपेअरिंग, लॅपटॉप रिपेअरिंग, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन्स, मदरबोर्ड रिपेअरिंग आणि अगदी चिप लेव्हल वर्कही स्वतः करतात. शिवाय त्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची विक्रीसुद्ध करतात. त्यांनी हा व्यवसाय उत्तम पद्धतीने विकसित केला आहे आणि आपल्या कामाच्या तत्परतेतून, उत्तम दर्जाची सेवा देत ग्राहकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ठाण्यातल्या कळवा परिसरात ‘निशा कॉम्प्युटर्स’ या नावाची मोठी ओळख आहे.
निशा सोनावणे यांचे आईवडील शेतकरी. खरेतर शेतकरी नव्हे, तर शेतमजूरच. कारण, आईवडिलांच्या मालकीची स्वतःची म्हणून शेतीसुद्धा नव्हती. इतर शेतकर्यांच्या शेतात मजुरी करत त्यांचे कुटुंब गुजराण करत असे. ग्रामीण भागात आणि अशा बिकट आर्थिक परिस्थितीतही निशा यांच्या आईवडिलांनी त्यांना बारावीपर्यंत शिक्षण दिले.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शेखर सोनावणे यांच्याशी लग्न होऊन त्या कळवा येथे नांदायला आल्या. त्यांचे पती एका प्रथितयश आयटी कंपनीत हार्डवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. आता सध्या तेही त्यांचा स्वतंत्र व्यवसाय करत आहेत.
माणसाचे आयुष्य कसे बदलते, जीवनाला कशी कलाटणी मिळते, याचे निशा सोनावणे ह्या उत्तम उदाहरण आहेत. त्यांचा संसार टिपिकल गृहिणी म्हणून नीट सुरू होता. पती स्वभावाने प्रेमळ आणि शांत आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणी कामाचा अधिकचा व्याप होता, त्यामुळे ते कधी कधी कॉम्प्युटर्स दुरूस्त करण्यासाठी घरी घेऊन येत असत. ते कॉम्प्युटर घरी दुरूस्त करत असत. निशा हे कॉम्प्युटर दुरूस्तीचे काम पाहत असत आणि निरीक्षण करत असत. हळुहळू शेखर त्यांना दुरूस्ती करताना लहान सहान, सोपी सोपी कामे शिकवू लागले, सांगू लागले, निशा यांना हे काम पाहणे, करणे आवडू लागले. लहान-लहान दुरूस्तीची कामे त्या शिकू लागल्या. त्यांना त्यात रस निर्माण झाल्यामुळे शिकणे फारसे जड गेले नाही. शेखर यांनी सोपवलेले काम त्या सहजी पार पाडू लागल्या. शेखर यांनी त्यांचा इंटरेस्ट ओळखून रीतसर कॉम्प्युटर दुरूस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे ‘कोरा खादी केंद्र’ ह्या शासकीय प्रशिक्षण संस्थेत कॉम्प्युटर दुरूस्तीचे शिक्षण घेण्यासाठी अॅडमिशन करवून घेतले. तिथे निशाताईंना अनेक गोष्टी समजल्या. विषयाच्या अधिक खोलात जाता आले, लॅपटॉप रिपेअरिंग, चिप लेव्हल वर्क समजले. रॅमच्या रिपेअरिंगचा पुरेसा अंदाज आला. तिथून प्रशिक्षणाचे रीतसर प्रमाणपत्र घेऊन त्या बाहेर पडल्या. त्यामुळे त्यांना ह्या कामाचा पुरेसा आत्मविश्वास आला. घरी सराव चालूच होता, त्यामुळे कामावर छान हात बसला. निरनिराळे प्रॉब्लेम आणि त्यावरचे सोल्युशन याचा अंदाज बांधता येऊ लागला होता.
सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, मदरबोर्ड रिपेअरिंग करण्यापासून इन्स्टॉलेशन्स करण्यापर्यंत सगळे काम त्यांना जमू लागले.
यातली बरीचशी कामे करण्याकरता मार्केटमध्ये अनेक लोक आहेत, मात्र मदरबोर्ड रिपेअरिंगला सहसा कुणी हात घालत नाही. त्यासाठी थेट कंपनीलाच मदरबोर्ड पाठवले जातात. कारण ते काम अतिशय टेक्निकल अन बारीक आहे. अगदी कलाकुसरीच्या कामासारखा त्या कामात जीव ओतावा लागतो. कलाकुसरीच्या कामाला पट्टीचा कारागीरच लागतो. तर निशाताई मदरबोर्डच्या संबंधाने अशाच पट्टीच्या कारागीर झाल्या आहेत. बारीक सारीक फॉल्ट ओळखून त्याचे उपाय शोधण्याकडे त्यांचा कल असतो. त्यात आतापर्यंत झालेल्या सरावाने त्यांना यशही मिळते. त्यांना कामातील सार्या खाचाखोचा कळू लागल्या. आऊट ऑफ वॉरंटी असलेले म्हणजे वॉरंटी संपलेले मदरबोर्ड दुरूस्त करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. हे अवघड काम करणारी माणसे मार्केटमध्ये सहजी उपलब्ध नसतात, त्यामुळे कॉम्प्युटर, लॅपटॉपसारखी इतकी मोलामहागाची वस्तू फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे मदरबोर्ड निशाताई दुरूस्त करून देतात. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे काही तरी असे कौशल्य हवे, जे सहज इतरांना आत्मसात करता येणार नाही. ते करण्यात निशा सोनावणे निष्णात झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे कामाचा ओघ सुरूच असतो. कॉम्प्युटर सेल्स आणि रिपेअर व्यवसायात असलेले अनेक लोकही निशा सोनावणे यांच्याकडे मदरबोर्ड आणि रॅम रिपेअरसाठी काम घेऊन येतात.
एक गृहिणी ते कॉम्प्युटर सेल्स आणि रिपेअरिंगचा व्यवसाय करणार्या बिझनेस पर्सन असा त्यांचा विलक्षण आणि प्रेरणादायी प्रवास आहे, जो त्यांनी साल २०१२मध्ये सुरू केला. त्या शेवटच्या ग्राहकांना सेवा देत आहेत, सोबत व्यवसाय करणार्या व्यवसायबंधूंनासुद्धा सेवा देत आहेत.
कॉम्प्युटर दुरूस्तीसंबंधी कोणत्याही अडचणी त्या सहजी सोडवतात. मशीनमधील प्रॉब्लेम अगदीच डिटेक्ट होत नसेल तर त्या पतीची मदत घेतात. मोठमोठ्या व्हेंडर्स आणि इंजीनियर्सना न जमणारी कामे त्या करतात, यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही, मात्र हे तंतोतंत खरे आहे. मोठ्या कंपनीतील प्रशिक्षित इंजीनियर्स जेव्हा एखादी मशीन खूप डोकेफोड करूनही दुरूस्त होत नाही तेव्हा ते निशाताईंकडे घेऊन येतात, अन त्या अडचणीवर तोडगा काढत त्यांना मशीन दुरूस्त करून देतात.
माणूस संधीवाचून बेरोजगार असतो, संधी मिळाली तर निशाताईंसारखी माणसं खूप पुढे जाऊ शकतात. संधी माणसांचे आयुष्य समृद्ध करत असतात. हुशारी बहुतेक लोकांत असते, मात्र संधी, योग्य मार्गदर्शन मिळाले तरच त्या हुशारीचा उपयोग होतो, अन्यथा नाही. ह्याबाबत निशा सोनावणे सुदैवी ठरल्या आहेत.
सध्या त्यांना कळवा, ठाणे, मुलुंड, ऐरोली, कल्याण, डोंबिवली येथून बरेच ग्राहक मिळतात, शिवाय मुंबईतूनही लॅपटॉप दुरूस्तीसाठी त्यांचेकडे येतात. उत्तम कामामुळे त्यांचे ग्राहक इतरांना त्यांच्या कामाबाबत माहिती देत असतात, त्यांना अशा सुचवण्यामुळेही अनेक ग्राहक मिळतात. त्यांचे पती शेखर, तसेच मुलगा वरूण आणि ऋषभही आता आईकडून बरेच काम शिकला आहे. ह्या कामातून त्या उत्तम अर्थार्जन करत आहेत, उत्कृष्ट व्यवसाय करत प्रगती करत आहेत.
व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरूवातीला स्वकमाईने अॅक्टिवा बाईक घेतली तेव्हा त्यांना विशेष आनंद झाला होता. शेवटी स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेल्या कोणत्याही वस्तूचे विशेष मोल असते. या व्यवसायाने त्यांना आर्थिक बाबतीत बर्यापैकी उन्नत केले, असे त्या सांगतात. निशाताईंनी हा व्यवसाय करत करत नाशिकला फ्लॅट घेतला आहे. ह्या व्यवसायाने त्यांना बरीच आर्थिक स्थिरता दिली.
निशाताई, त्यांच्या यशाचे श्रेय पती आणि मुलांच्या सहकार्याला देतात. शिवाय पती प्रोत्साहन देणारे आहेत, त्यांना मदत करणारे आहेत. तसेच ग्राहकांनी दाखवलेला विश्वास त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो. ह्या विश्वासामुळेच हा व्यवसाय करणे त्यांना शक्य झाले, काम करताना दिलेल्या उत्तम अनुभवामुळे ग्राहकही जोडले गेले आहेत, जोडले जात आहेत.
खेड्यातून, शेतकरी कुटुंबातून लग्नानंतर शहरात आलेली एक महिला संसार करते, पुढे दोन मुलांचा सांभाळ करत त्यांना वाढवते आणि त्यांची काळजी घेता घेता पतीचे कामही शिकून घेते, समजून घेते… घरातील वातावरणाचा माणसाच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, याचे निशा ह्या जिवंत उदाहरण आहेत. त्या शिक्षणातून त्यांनी आज व्यवसाय उभा केला आहे. आपले उदरनिर्वाहाचे साधन विकसित केले आहे. शिवाय सोबत काम करणार्या इंजीनियर मुलांना नोकरी देत त्यांच्या रोजगारासाठीही योगदान देत आहेत. त्यांच्या व्यवसायिक प्रवासातून निश्चितच अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.