डोळ्यादेखतची ही कथा
नव्हं भूलथापांची
ही गोष्ट मानसातल्या सापाची
आन त्याच्या पापाची
जरी जातीच्या तापाची
अन् संतापाची
बघा हंसा उडविते
पगडी कुणाच्या मापाची
केले तुका अन् झाले माका
कसं झालं ते `सांगत्ये ऐका’
`सांगत्ये ऐका’ या एकेकाळी अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेल्या, संपूर्ण चित्रपटाच्या सारांश सांगणारा हा दीर्घगीत प्रकार… हंसाबाई वाडकर यांची कला कारकीर्द आणि जीवनप्रवासही असाच थक्क करणारा आहे. माणसाच्या एका जीवनात किती वेडीवाकडं वळण येतात. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच कोणालाही माहिती नाही, अशा अंधाराच्या गर्तेत येऊन पडावं लागतं. पैशाच्या ढिगावर नाचत असतानाच घासभर अन्नासाठी तडफडावं लागतं. किती-किती वेडी-वाकडी जीवनाची वाटचाल!
पाळण्यातलं नाव `रतन’. जन्म २४ जानेवारी १९२३ रोजी मुंबईत झाला. गाव सावंतवाडी. तिथं शालेय शिक्षण इंग्रजी दोन इयत्तेपर्यंत. मोठा भाऊ मोहन मॅट्रिकला होता. वडील उत्तम तबलावादक, पण त्याबरोबरच दारूच्या व्यसनाच्या पार आहारी गेलेले. घरात कमावणारं कोणीही नाही. थोरली आत्या माई त्यावेळी मो. ग. रांगणेकरांच्या सिनेमात काम करीत होती. तिनं मार्ग सुचवला, `बेबीला सिनेमात का घालत नाही?’
अवघ्या दहा वर्षाच्या वयात चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. केवळ घर चालविण्यासाठी. मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण व्हावे याच केवळ उद्देशाने!
`ललित कलादर्श’च्या बाबुराव पेंढारकर यांनी सिनेमा काढण्याचं ठरवलं. दिग्दर्शक होते मामा वरेरकर आणि सिनेमाचे नाव होते `विजयाची लग्ने’. रतन दहा वर्षाचीच असली तरी पोरगी उफाड्याची होती. त्यामुळे तिची निवड झाली. भाऊ म्हणाला, तू आता सिनेमात काम करणार आहेस, तू आपलं साळगावकर हे नाव वापरू नकोस. `रतन’ कोणत्याही गोष्टीवर खुद्कन हसायची. मामांना ते हसणं खूप आवडायचं आणि म्हणून त्यांनी `रतन’चं नवं नामकरण केलं ‘हंसा’. अशा रीतीने रतन साळसकर आता `हंसा वाडकर’ या नावाने रूपेरी पडद्यावर अवतरली. ‘विजयाची लग्ने’ चित्रपट यशस्वी झाला. त्यावेळी हंसाबाईंचा महिना पगार होता २५० महिना. आणखी दोन चित्रपट केले पण ते अपुरेच राहिले. हंसाबाईंना त्याची अजिबात फिकीर नव्हती, पैसा मिळाले ना? प्रपंच भागतोय ना? भावाचे शिक्षण होतंय ना? मग आणखी काय हवं? वयाच्या तेराव्या, चौदाव्या वर्षापर्यंत `मीना’, `प्रेमपत्र’, `जमाना’, `राजकुमार’ असे जवळजवळ आठ दहा सिनेमे पूर्ण झाले होते. त्यावेळी त्या प्रसिद्धीच्या झोतात होत्या.
सावंतवाडीचेच जगन्नाथ बंदरकर मुंबईत आले होते. त्यांची आणि हौसाबाईंची चांगलीच ओळख होती. अनंत काणेकर, मो. ग. रांगणेकर यांनी चालविलेल्या `चित्रा’ मासिकाचे व्यवस्थापक म्हणून ते काम पाहात. त्यांनी मुंबईत चांगलेच बस्तान बसविले होते. सावंतवाडीत समोरासमोर राहत असताना या बंदरकरांनी रतनकडून ‘मी तुझ्याशी लग्न करीन’ असे वचन घेतले होते. प्रेम, लग्न या काहीच गोष्टींचे अज्ञान असलेल्या बेबीने, काय ही रोजच्या रोज कटकट लावली आहे, हे टाळण्यासाठी एके दिवशी म्हणून टाकलं, करीन लग्न!
गोल्डन ईगल मुव्हीटोनच्या `एअरमेल’चे शूटिंग कराचीला होते. त्यांच्यासमवेत `नवीन’ नावाचा देखणा कलाकार काम करत होता. त्यांची ओळख वाढली काही दिवसांसाठी. नवीन मुंबईला आला. तो हंसाबाईंच्या घरच्या लोकांना भेटला. त्याने सहज विचारले मी कराचीला परत जातो आहे. हंसाबाईंना काही द्यायचे असेल तर माझ्याकडे द्या. त्यावेळी जगन्नाथ बंदरकर तेथेच होते. त्यांनी एक पार्सल त्यांच्याबरोबर दिले आणि सांगितले `माझ्या होणार्या बायकोला या वस्तू नेऊन दे!’
काही दिवसानंतर स्वत: बंदरकर कराचीला आले. त्यांनी हंसाबाईंना एका खोलीत गाठले आणि विचारले, `आपल्या शपथेची आठवण आहे की नाही? लग्न करणार आहेस की नाही माझ्याशी?’ हंसाबाई काहीच बोलल्या नाहीत ते पाहून बंदरकर म्हणाले, `तू नाही म्हण की तुला बरोबर आणलेली इंजेक्शनं देतो. या इंजेक्शनमुळे तू अगदी विद्रुप होऊन जाशील. सर्वांसमोर ‘मी त्यांच्याशी लग्न करणार आहे’ हे ऐकल्यावरच बंदरकर कराचीहून मुंबईला आले. त्यानंतर बंदरकरांनी `ड्रामॅटिक युनियन’ या नावाची नाट्यसंस्था सुरू केली. हंसाबाई त्यात काम करू लागल्या, सहवास वाढला. अखेर विरोध-संमती अशी भवती न भवती होऊन हंसाबाई आणि बंदरकर यांचं ६ सप्टेंबर १९३७ या दिवशी लग्न झालं. त्यावेळी हंसाबाईंचं वय होतं पंधरा वर्षे आणि पोटात गर्भ वाढत होता तीन महिन्याचा!
हंसाबाईंना आता सिनेमाची लाईन कायमची सुटली याचा अतिशय आनंद झाला. आता सुखी संसार. मुलं-बाळं. घर गोकुळसारखं नांदलं पाहिजे. पण ‘भाळी लिहिले कुणा न कळले!’
बंदरकरांची नाट्यसंस्था तोट्यात आली. त्यांना पैशाची चणचण भासू लागली आणि बंदरकरच हंसाबाईंना म्हणाले- `तू एखाद्या सिनेमात का नाही काम करत? तेवढीच आपल्या संसाराला मदत होईल.’
`ये रे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या’ या म्हणीप्रमाणे हंसाबाई पुन्हा रूपेरी पडद्याकडे वळल्या केवळ पैसे मिळविण्यासाठी. भगवान दादांच्या `बहादूर’, `किसान’, `क्रिमिनल’ अशा तुफान हाणामारी असलेल्या दोन-तीन चित्रपटांत काम केल्यानंतर त्याच सुमारास स्थापन झालेल्या `बॉम्बे टॉकिज’च्या `नवजीवन’ या चित्रपटाचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, पण तिथल्या गोष्टींबद्दल, त्यांच्या वागण्याबद्दल वावड्या उठायच्या. बंदरकर हंसाबाईंच्या चारित्र्याबद्दलच संशय घेऊ लागले. चामडी पट्ट्याने मारहाणही केली. आपल्यावर विनाकारण संशय घेतला जात आहे, याचा हंसाबाईंना विलक्षण संताप आला. बाई सुडानं पेटल्या आणि त्या आवेशात त्यांनी दत्ताच्या तसबिरीसमोर शपथ घेतली, ‘आयुष्यात आतापर्यंत मी काहीही अपवित्र केलेलं नाही. पण दत्ताची शपथ यापुढे मी कुणाचीही कसलीही पर्वा करणार नाही.’ हंसाबाई त्या क्षणापासून पूर्ण बदलल्या. त्यांनी दारू जवळ केली. सूड, सूड आणि सूड या एकाच भावनेने हंसाबाई नखशिखांत पेटल्या.
ही झाली हंसाबाईची व्यक्तिगत जीवनाची करूण कहाणी. पण मी जेव्हा त्यांना रूपेरी पडद्यावर पाहात होतो तेव्हा मी होतो शाळकरी पोरवयाचा. ‘संत सखू’ हे नाव कानावर पडले होते. पण ‘संत सखू’ बघितला नव्हता. मी हंसाबाईचा पहिला चित्रपट बघितला तो `प्रभात’चा `रामशास्त्री’! मा. विठ्ठल आणि हंसाबाई अशी जोडी होती. शनिवारवाड्यावर भरणार्या `बटकी’च्या बाजारातून मराठी शिपाईगडी बटकीला पळवून आणतो आणि आश्रयासाठी रामशास्त्रीच्या घरात येतो. `रामशास्त्री’मधील इतर सर्व प्रसंग, त्याचे चित्रीकरण त्याचे दिग्दर्शन अभिनय आणि सर्वच गोष्टी इतक्या उत्तम होत्या की या हंसाबाईंच्या भूमिकेकडे फारसं लक्षच नाही गेलं.
`सुंदरा मनामध्ये भरली’ असं म्हणत `राम जोशी’चा डफ जेव्हा कडकडला तेव्हा शालेय वयातसुद्धा कान टवकारले आणि डोळे विस्कारले. हे काहीतरी विलक्षण वेगळे आहे याची जाणीव उमलत्या मनाला झाली. सांगलीच्या प्रताप टॉकीजवरील ‘राम जोशी’चं मोठं पोस्टर आजही माझ्या डोळ्यासमोर तरळू लागते. त्यातले सवाल-जबाब मला आपोआपच तोंडपाठ झाले.
पाण्यामधील एक अप्सरा
सहज भाळळी नरावर
कधी कोण ते सांगून द्यावे
सवालास उत्तर!
किंवा
तुझ्याचपाशी जन्मभरी ते
रम्य दोन पेले गं!
अमृत, हलाहल आणि मदिरा
यांनी भरलेले गं!
या सवालाला बयाबाईंजवळ उत्तर नसते. तिच्या बाजूचा छंदी बाबा मागच्या मागं गायब होतो आणि बया नाईलाजाने उत्तर देते, न्हाई जमत, त्यावर राम जोशी उत्तर देतो, तुझे डोळे!
शुभ्र पांढरे असते अमृत
हलाहलाचा रंगची काळा
सांग गुलाबी नेत्रकटाहून
मद्याचा का रंग निराळा
जगवी अमृत, मारी हलाहल
मद्य गुंगवी कैफात
आणि हे सारे एकवटले आहे
तुझिया डोळ्यात
त्यानंतर राम जोशी आणि बयेचं अतूट नातं जुळतं ते अखेरच्या
नरजन्मामधी नरा करूनी घे
नरनारायण हरी
तरीच ही सार्थक मानव कुडी!
गाण्यापर्यंत.
राम जोशी (जयराम शिलेदार) आणि हंसा वाडकर (बया) ही जोडी माझ्या कायमच्या लक्षात आहे. व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरची ही निर्मिती होती.
`प्रभात’चा शेवटचा चित्रपट `संत जनाबाई’. ‘राम जोशी’च्या बयेनंतर संत जनाबाई रूपेरी पडद्यावर साकारणं खरोखर आव्हान होतं. पण हंसाबाई `अस्सल’ कलाकार, त्यांनी ते आव्हान पेललं.
त्यानंतर `माणिक चित्र’च्या `पुढचं पाऊल’ने आम्हाला पुन्हा एकवार झपाटून टाकलं. त्यातली `मोगरी’ ही गावाकडच्या पापभिरू भावांना गंडवणारी आणि भावाभावात कलागती लावून मज्जा बघणारी तमासगिरीण हंसाबाईंनी काय ताकदीनं उभी केली. टपोर्या डोळ्यांची, उफाड्या अंगाची मोगरा म्हणजे हंसा वाडकर हे समीकरण आमच्या डोक्यात फिट्ट बसलं आहे. `पुढचं पाऊल’मधला सगळा संचच लई भारी होता. कथा व्यंकटेश माडगूळकर, संगीत सुधीर फडके, दिग्दर्शक राजा परांजपे, पार्श्वगायन माणिक वर्मा, आणि कलाकार हंसा वाडकर, पु.ल. देशपांडे, गदिमा, विवेक, कुसुम देशपांडे आणि राजा परांजपे. या चित्रपटांतील गाणी काय भन्नाट आहेत हो! `जाळीमंदी पिकली करवंदं, झाला महार पंढरीनाथ’, `आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का?’, `माज्या जाळ्यात गावलाय मासा’, ‘हीच मळ्याची वाट’ अशी एकसे बढकर एक गाणी!
‘पुढचं पाऊल’नंतर माणिक चित्रचाच ‘परिजात’ हा पौराणिक चित्रपट. दिग्दर्शक राजा परांजपे आणि रूसव्या सत्यभामेच्या भूमिकेत सोज्वळ सुलोचनाबाई आणि सात्विक रूक्मिणीच्या भूमिकेत हंसा वाडकर! खर्या कलावंतांची खरी कसोटी असते मिळेल ती भूमिका अंगभूत अभिनयसामर्थ्यावर निभवायची.
`वंशाचा दिवा’ हा हंसाबाईचा चित्रपटही असाच लक्षवेधी होता. चंद्रकांत आणि हंसा वाडकर ही जोडी त्यात होती. पुण्याच्या एस.पी. कॉलेजसमोर एक दुकान होते. त्या ठिकाणी हंसा वाडकर आणि चंद्रकांत यांचा काय मस्त फोटो होता. जीवन रेस्टॉरंटमध्ये (आताची ग्राहक पेठ) जाता-येताना कितीतरी वेळ त्या दुकानाशी उभं राहून मी तो फोटो न्याहाळत असे.
`नवरा बायको’, `पंढरीचा पाटील’, `पाटलाचा पोर’, हे सिनेमेही त्याच काळात पडद्यावर आले. ‘नवरा-बायको’ लक्षात राहण्याची कारणे म्हणजे मोठ्या बंधूंचे खास मित्र दिलीप जामदार हे दिग्दर्शक बाळ गजबर यांचे सहाय्यक होते. आणि संगीत होते पु. ल. देशपांडे यांचे. `माझ्या कोंबड्याची शान, छाती काढून चाले, तुरा डोईवर छान’ हे गीत मला चांगलेच आठवते. आणि `पाटलाचा पोर बाई, झालाया शिरजोर, माझी भलतीच मस्करी करी, मस्करी करी मस्करी करी’ हे आजही चालीसकट आठवणारे गाणे! ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ हा राजा ठाकूर दिग्दर्शित आणि हंसा वाडकर यांची भूमिका असलेला चित्रपटही माझ्या विशेष लक्षात आहे. त्यातील संगीतिकाही फार अप्रतिम होती.
मध्येच एक अकल्पित घटना घडली. कोल्हापूरला ‘सोन्याची लंका’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. बाई त्यावेळी पूर्णपणे दारूच्या आधीन झाल्या होत्या. त्यांना दारू तर हवी होती. पण रात्री कुठेही मिळण्याची शक्यता नव्हती. अशावेळी शेजारीच खोलीत उतरलेल्या कोणी एकाने त्यांना अख्खी ब्रँडीची बाटलीच पाठवून दिली. हळुहळू ओळख वाढत गेली. जाताना त्यांनी आपला मुंबईचा पत्ता बाईंना दिला. त्या `सभ्य’ गृहस्थांचे नाव जोशी होते.
घरी बंदरकरांबरोबरचे संबंध तुटण्याइतपत ताणले गेले होते. एका खडाजंगी भांडणात बाई तिरिमिरीने घराबाहेर पडल्या. त्या थेट पोहचल्या कोल्हापुरात ब्रँडीची बाटली देणार्या जोशीबुवांच्या घरी. तिथे चिक्कार प्यायल्या. आता घरी कसं परत जायचं म्हणून पीतच राहिल्या. घरातून घाबरून पळाल्या होत्या आणि आता घाबरूनच घराकडे परत जाऊ शकत नव्हत्या आणि अखेर जोशांचा हात धरून बाई मराठवाड्यातील एका खेड्यात पोहचल्या. त्या ठिकाणी त्या तीन वर्षे राहिल्या. तिथून बंदरकरांना बोलावून त्यांनी कशीबशी सुटका करून घेतली. मोठ्या गावी मॅजिस्ट्रेटसमोर जबाब द्यायचा होता. बंदरकरांना
मॅजिस्ट्रेटने कुणाची तरी सही आणायला बाहेर पाठविले. ते बाहेर जाताच त्या म्हातार्या मॅजिस्ट्रेटने जबाबाचा कागद उचलला म्हणाला, `आत चल, नाहीतर कागद फाडतो’ बाई घाबरल्या. त्याने बाईंना आत नेले आतून कडी लावली. पलिकडच्या खोलीत त्याची बायको मुलं होती. बलात्कार होतो तरी कसा हे त्या दिवशी मला कळलं. (सांगते ऐका – हंसा वाडकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती सोळावी, ऑगस्ट २०२२ पृष्ठ क्रमांक ५२) सात जन्माच्या वैर्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ नये.
यानंतर `लग्नाची बेडी’ या नाटकात त्यांनी `रश्मी’ची भूमिका करायला सुरूवात केली. हंसा वाडकर, राजन जावळे, विवेक, नागेश जोशी, अनंत धुमाळ, कुसुम देशपांडे असा छान संच जमला होता. या संचाने `लग्नाची बेडी’चे जवळजवळ ३५० प्रयोग केले. त्यातील एका प्रयोगाची माझी व्यक्तिगत आठवण. पन्नास पंचावनच्या काळात सर्कसचा धंदा डबघाईला आला असावा. मिरजेला अझर टॉकीजजवळच्या ग्राऊंडवर ग्रेट रॉयल सर्कसचा तंबू होता. पण खेळाला उत्पन्न होईना, मालकांनी आणि कलाकारांनी गाशा गुंडाळला आणि पोबारा केला. पण शिकारखाना तसाच पडलेला. वाघ, सिंह, चित्ता ही जनावरं पिंजर्यांत कोंडलेली. त्यांना खायला कोण घालणार? आधी त्या जनावरांनी खूप आरडाओरडा केला, पण हळूहळू त्यांचा आवाज क्षीण होऊ लागला. अन्न पाण्यावाचून ती मरणार अशी लक्षणे दिसायला लागली. त्याचवेळी हंसा वाडकर आणि त्यांचे साथीदार राजन जावळे, विवेक धुमाळ, नागेश जोशी, `लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी सांगली-मिरज भागात आले होते. वाघ, सिंह उपाशी मरताहेत, ही वार्ता त्यांच्या कानी गेली. त्यांनी `लग्नाची बेडी’ या एक खास शो मिरजेत केला आणि झालेलं सर्व उत्पन्न उपाशी जंगली जनावरांच्या खाणं आणण्यासाठी दिले. कलावंत हे केवळ स्टेजपुरते वा चित्रपटापुरते कलावंत नसतात. आधी ते माणूस असतात आणि मग ते कलावंत असतात हे त्यांनी कृतीतून पटवून दिलं. (‘रंगलो मी’ – लेखक श्रीराम रानडे, राजहंस प्रकाशन भारद्वाज प्रकाशन, पान क्र. ५६, आवृत्ती दुसरी, जानेवारी २०२४) त्यानंतरच्या काळातला हंसाबाईंच्या नावावरचा चित्रपट म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. या चित्रपटाने गर्दीचे उच्चांक मोडले. पुण्यात १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले. या दिवशीसुद्धा विजयानंद थिएटरमध्ये ‘सांगत्ये ऐका’चा दुपारचा शो सुरू होता.
अखेर हंसाबाईंनी बंदरकरांचे घर सोडले. त्यांनी लिहिलंय, कांदा, लसूण, फिश, मटण, आता काही खात नाही. मग पिणं तर दूरच. प्रथम खूप जड गेलं. पण आता सवय झाली. इतकी की आता मलासुद्धा या वस्तूंची घाण येते. नाहीतर चोवीस तास विषारी बाई मी! मला हे जमलं तरी असतं का? पण त्यावेळी सूड घ्यायचा होता ना सगळ्या जगाचा? त्याचसाठी मी पीत होते आणि पाजीत होते. पण तो मार्ग चुकीचा होता हे आता पटतंय. दारू आल्यावर कसला आला आहे जगाचा सूड? उलट मीच अधिक खोलात गेले. जगाला काहीही झालेलं नाही. (सांगत्ये ऐका – हंसा वाडकर, राजहंस प्रकाशन, आवृत्ती सोळावी, ऑगस्ट २०२२ पृष्ठ क्र. ६२) जेमतेम ६८ पानांचं इतकं संयमित आत्मकथन आजवर तरी माझ्या वाचनात नाही. रसिकांचं भाग्य असं की श्याम बेनेगलसारख्या दृश्य दिग्दर्शकाने यावर ‘भूमिका’ हा चित्रपट तयार केला आणि त्यातील प्रमुख भूमिका केली होती स्मिता पाटीलने. त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार स्मितालाच मिळाला होता.
हंसाबाई कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर आल्या. आता पुन्हा नव्याने जीवन? पण नाही. नियतीला ते मान्य नव्हतं. पोटात शूळ उठू लागला. बावीस दिवस अन्नपाण्याविना काढले. मुलीला एकदा कळवळून म्हणाल्या, `मला वरण-भात, लिंबू आणि वाटाण्याची उसळ दे गं!’ अखेर २३ ऑगस्ट १९७१ रोजी गुंगीच्या प्रदीर्घ अवस्थेत त्यांना महानिद्रा आली. त्यांनी आपली अखेरची इच्छा व्यक्त केली होती. मी पूर्ण समाधानात आहे. माझ्या मरणानंतर माझ्या अस्थी श्रीक्षेत्र महाबळेश्वरातल्या कृष्णामाईच्या कुंडात टाका!
मला अजूनही पडलेला प्रश्न आहे? रतन साळगावकर उर्फ हंसा वाडकर यांच्या जिंदगीची पटकथा कोणी लिहिली आहे?