पतिहान इमीन या ७० वर्षाच्या बाई कुराण पठण करत असत, त्यांच्याकडं कुराणाची इलेक्ट्रॉनिक कॉपी होती. त्यांचे कपडे मुस्लीम वळणाचे होते. पोलिसांनी त्यांना पकडलं. फटाफट खटला पूर्ण झाला, त्यांना ६ वर्षं तुरूंगवासाची शिक्षा झाली.
इझिगुल मेमेट ही ५ वर्षाची मुलगी तिच्या आईपाशी बसून कुराण वाचत होती. पोलिसांनी तिला पकडलं. तिला १० वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा झाली.
ऐतिला रोझी या ३५ वर्षांच्या स्त्रीला `बेकायदेशीर’ कपडे वापरण्याबद्दल २० वर्षं तुरूंगवास घडला. कारण बुरखा, पायघोळ झगा वापरणं या गोष्टी तिथं बेकायदेशीर आहेत.
एक ८० वर्षाची स्त्री. या वयात वेळ कसा काढणार? कुराण वाचत होती. तुरूंगात गेलीय.
या घटना चीनमधल्या. चीनच्या ईशान्य भागातल्या सिनजियांग या प्रांतातल्या. हा प्रांत फ्रान्सच्या आकाराचा आहे. सिनजियांगमधे उईगूर विभाग आहे. उईगूरमधे उईगूर संस्कृतीच्या लोकांची वस्ती आहे. तुरूंगात गेलेली ही मंडळी उईगूर आहेत.
चीनमधे सुमारे एक कोटी उईगूर आहेत. त्यातले बहुसंख्य उईगूर या विभागात रहातात. चीनमधे अनेक संस्कृतींचे लोक राहतात. बौद्ध, ख्रिस्ती, हॅन, उईगूर इत्यादी. संस्कृती म्हणजे भाषा, चालीरीती, धर्म, उपासना पद्धती यांचं मिश्रण. प्रत्येक संस्कृतीला सहज दोन तीन हजार वर्षांचा इतिहास आहे.
उईगुरांना तुरूंगात टाकतात, कारण ते बहुसंख्य हॅन चिनी लोकांपेक्षा वेगळे आहेत. त्यांचं वेगळेपण चीनमधल्या सरकारला मान्य नाहीये. उईगुरांनी चीनमधे मिसळावं म्हणजे हॅन व्हावं अशी चीन सरकारची, चीनमधलं सरकार चालवणार्या कम्युनिष्ट पक्षाची इच्छा आहे. सरकार त्या दिशेनं नाना प्रयत्न करतंय. या प्रयत्नांत साथ न देणारे उईगूर तुरूंगात पोचतात.
वरील घटना बाहेर कशा आल्या? चीनच्या हद्दीवर, चीनच्या सत्ताधार्यांभोवती, चीनमधल्या सरकारभोवती बांबूच्या भिंती आहेत. त्या भिंतीपलीकडं जे घडतं ते भिंतीपार जगाकडं जात नाही. तशी कडेकोट व्यवस्था आहे. तिथले पेपर सरकारच्या हातात असतात, तिथले न्यूज चॅनेल सरकारचेच असतात, तिथलं इंटरनेटही सरकारच्या निरीक्षणाखाली असतं. उईगूरांचं सोडा, पण इतर कुठल्याही बाबतीत जर एकादा माणूस सरकारचं ऐकेनासा झाला तर तो एकाएकी गायब होऊ शकतो. अब्जावधी डॉलरचं साम्राज्य चालवणारे उद्योगपतीही सत्ताधारी पक्षाच्या खप्पामर्जीचे शिकार झाले की अचानक नाहीसे होतात. त्यांचं काय झालं हे जगाला कळत नाही. जगाला कशाला खुद्द चिनी लोकांनाही कळत नाही.
तुरूंगात गेलेल्या महिलेचा तिच्या मुलीशी संपर्क होता. मुलगी अमेरिकेत नोकरी करत होती. शिकायला गेली आणि तिथंच स्थायिक झाली. ती दररोज आईशी फोनवरून बोलत असे. एके दिवशी तिचा फोन लागेना. तिनं आपल्या मैत्रिणीना फोन करायचा प्रयत्न केला. कित्येक मैत्रिणींचे फोन लागेनात. कारण चिनी सरकारनं त्या फोन्सचा चिनी संबंध नष्ट केला होता. त्या मुलींच्या चीनमधल्या नातेवाईकांच्या घरची वायफाय कनेक्शन्स काढून टाकली होती. बांबूच्या भिंतीलाही भोकं आहेत. चीनमधले अनेक उपद्व्यापी तरूण तांत्रिक कौशल्य वापरून समांतर संवाद व्यवस्था उभी करतात, त्या व्यवस्थेवरून ते जगभर ब्रॉडकास्ट करतात, मेसेजेस पाठवतात. सरकार या व्यवस्था शोधत असतं, बंद करत असतं. मग ती `पोरं’ पर्यायी व्यवस्था शोधतात. कॉम्प्युटरच्या जगात हॅकर ही एक बंडखोर जमात तयार झालीय. सार्या जगात हे हॅकर आहेत. ते देशातली इंटरनेटची दादागिरी झुगारून माहिती पसरवत असतात.
वरील बातमीतल्या स्त्रिया तुरुंगात गेल्या म्हणजे काय?
चीनचं सरकार म्हणतं की ते कोणालाही तुरुंगात घालत नाहीत, ते उईगुराना रीएज्युकेशन केंद्रात पाठवतात. रीएज्युकेशन म्हणजे शिक्षण. चीन सरकारचं धोरण काय आहे, चीनमधे रहाणार्यांनी चिनी प्रवाहाशी कसं एकरूप व्हावं त्याचं शिक्षण दिलं जातं.
एका इमारतीत माणसांना कोंबलं जातं. अनेक इमारतींची वसाहत. बाहेर कुंपण. बाहेर जाता येत नाही. शिक्षण कित्येक महिने, कित्येक वर्ष चालतं. पुढारी भाषणं करतात. खायचं प्यायचं. पुन्हा भाषण. झोपायचं. पुन्हा भाषण. उईगुरांची भाषा तुर्की आहे. त्यांना चिनी भाषा शिकवली जाते. काही काळानं परीक्षा. मग पुढली परीक्षा. मग पुढली परिक्षा. परीक्षेत नापास झालात तर पुन्हा भाषणं, पुन्हा परीक्षा. असं कित्येक वर्षं चालतं. तुम्ही आम्ही याला तुरुंग म्हणतो, चीन याला शिक्षणसंस्था म्हणतात, ही चीनमधली विशिष्ट प्रकारची युनिव्हर्सिटी असते.
उईगूर `चिनी’ झालाय याची खात्री पटली की त्याला शिक्षणकेंद्राच्या बाहेर काढलं जातं.
बाहेर निघाल्यावर हा उईगूर कुठल्या तरी गावात पाठवला जातो. हे गाव एका अॅल्युमिनियम स्मेल्टिंग उद्योगाभोवती उभारलेलं गाव असू शकतं. त्या माणसानं त्याला आखून दिलेल्या अॅल्युमिनियम कारखान्यात काम करायचं. हा कारखाना चीनच्या मालकीचा असतो किंवा एखाद्या परदेशी कंपनीबरोबरच्या पार्टनरशिपमधे तयार झालेला असतो. कार उद्योगात असलेल्या जर्मनी, जपान, अमरिका इत्यादी ठिकाणच्या कंपन्यानी चिनी लोकांशी पार्टनरगिरी करून हे कारखाने उभारलेले असतात. समजा तुम्ही एक फोक्सवॅगन किंवा टोयोटा कार विकत घेतलीयत. तर त्या कारची बॉडी ज्या अॅल्युमिनियमपासून तयार केलेली असते ते अॅल्युमिनियन या उद्योगात निर्माण होत असतं. वरील शिक्षित माणसाला एक घर दिलं जातं. भिंती आणि छप्पर. त्याला काही एक वेतन दिलं जातं. ती वस्ती, गाव सोडून तो माणूस कुठंही जाऊ शकत नाही. घराबाहेर सीसीटीव्ही असतो. रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही असतात. दुकानात, मॉलमधे सीसीटीव्ही असतात. त्या शिक्षित माणसाची सर्व हालचाल सरकारकडं नोंदलेली असते. तो जर दिसला नाही तर पळालाय असा अर्थ होतो. पळाला असेल तर शोधाशोध. सापडला की पुन्हा शिक्षण केंद्रात.
उईगूर कामगाराला दिलं जाणारं वेतन खूप कमी असतं. पण तो काही करू शकत नाही. उईगूर हा एक वेठबिगारच असतो. कमी पगारावर माणसं ठेवली की उत्पादनखर्च कमी होतो. जर्मनी, अमेरिका, फ्रान्स इत्यादी कोणालाही अॅल्युमिनियन विकताना चिनी लोक किंमत कमी करत नाहीत. या खटाटोपात कंपनीचा फायदा वाढतो. बांगला देशात अशाच पद्धतीनं नायकीचे शूज तयार होतात किंवा गॅपचे कपडे तयार होतात. आपण कार वापरतो, कपडे वापरतो तेव्हा बांगला देशातल्या, चीनमधल्या वेठबिगारांचे पैसे चोरत असतो.
बाय द वे, कार उद्योगाला लागणारं नऊ टक्के अॅल्युमिनियन आणि चीनमधल्या अॅल्युमिनियन उत्पादनातलं १५ टक्के अॅल्युमिनियम उईगूरमधे निघतं.
अगदी तुरळक एखादा माणूस, एखादी स्त्री, जिवाच्या आकांतानं, डोकं वापरून पळते, शेजारच्या कझाकस्तानात जाते, तिथून मग युरोपात, अमेरिकेत.
उईगूर तुर्की वंशाचे आहेत. हे लोक मध्य आशियातले. मध्य आशियातल्या रखरखीत प्रदेशात या जमाती जन्मल्या वाढल्या. पाण्याच्या भोवती वस्ती. एकमेकापासून अंतरावर वसलेल्या वस्त्यांचे प्रदेश. कझाकस्तान, उझबेकिस्तान इत्यादी. सिल्क रूटवरचे प्रदेश. आशियातून युरोपमधे जाणारे प्रवासी-व्यापारी-सैनिक मध्य आशियातून जात असत. सामान्यपणे वाटसरूंना आश्रय देणं आणि वस्तूंची देवाण घेवाण-व्यापार ही यांची जीवनशैली.
युरोप, बाल्टिक प्रदेश, रशिया, चीन इथल्या राजांनी वेळोवेळी मध्य आशियाई प्रदेशांवर ताबा मिळवला. एका परीनं जबरदस्तीनं. रशियन, चिनी, पूर्व युरोपीय राजांना आपल्या संस्कृतीत त्यांना शोषून घ्यायचा प्रयत्न केला. गेली पंधराशे वर्षं चीनमधली विविध घराण्यांची साम्राज्य यांना आपल्या साम्राज्यात घुसवायच्या प्रयत्नात आहेत. पण मुळातले भटके, नंतर सुनी मुस्लीम अशी ही माणसं आपापली संस्कृती धरून राहिली. व्यापार, घोडेस्वारी, शस्त्रकौशल्य या त्यांच्या कौशल्यांचा वापर चिनी राजांनी करून घेतला. पण उईगूर उईगूरच राहिले.
चीनमधलं अर्वाचीन साम्राज्य म्हणजे कम्युनिष्ट साम्राज्य. कम्युनिष्टांनी चीन एकसाची करायचं ठरवलं. कम्युनिष्ट त्याला एकजीव असं म्हणतात. भारतातले हिंदुत्ववादी त्याला समरसता म्हणतात. सर्व वंशांनी एकाच चिनी समाजवादी संस्कृतीत एकजीव व्हायचं. जे एकजीव होणार नाहीत ते समाजवादविरोधी, समाजविरोधी. त्यांचं कांडात निघणार. गेल्या तीन चार वर्षात सुमारे एक दशलक्ष उईगूर तुरुंगात आहेत.
गंमत अशी की समाजवादी संस्कृतीचा व्यावहारिक अर्थ होतो हॅन संस्कृती. राजा गेला, समाजवाद आला. राजाची जागा समाजवादी नेता घेतो.राजाची सी जिनपिंग घेतो.
एकसाची चीनमधे मुसलमानांना, तिबेटी बौद्धांना जागा नाही. त्यांनी आपापले धर्म, भाषा इत्यादी सोडून द्यावेत. न दिल्यास?… बांगला देशात हिंदूंना, ख्रिस्त्यांना स्पेस नाही. सौदी अरेबिया, बहारीन इत्यादी ठिकाणी सौदी अरब मुस्लीम सोडता बाकीचे सारे गेस्ट असतात, नागरिक नसतात, त्याना नागरिकत्व-मानवी अधिकार नसतात. ट्रंपशाही चालली तर उद्या अमेरिकेत काळे, हिस्पॅनिक, आशियाई, मुसलमान यांना जागा नसेल.
चीन जगाला देश-समाज एकसंध कसा करावा याचा धडा देतोय!