तुमची जात कोणती? हा प्रश्न दारावर आलेल्या सर्वेक्षणवाल्याने विचारताच माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याच्या तोंडातून सणसणीत आणि अस्सल मराठमोळी शिवी बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच पोक्याने ती आतल्या आत गिळली. मारून मुटकून सर्वेक्षणवाले बनवलेल्या या अजाण सेवेकर्यांना शिव्या देण्यापेक्षा ज्यांनी त्यांना हे कृत्य करायला भाग पाडलंय त्या सत्तेच्या बेहोशीने आंधळ्या झालेल्या आणि जातीपातीचे राजकारण खेळून मदांध झालेल्या उन्मत्त सत्ताधार्यांचा उद्धार करणार्या शिव्यांची अक्षरश: लाखोली वाहिली. पोक्याची ही संतापी अवस्था पाहून ते बिचारे भांबावले व पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोक्या त्यांना म्हणाला, तुमचा काहीच दोष नाही. जरांगेंनी दट्ट्या दिल्यावर मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्याच्या विचाराने झपाटलेल्या या मागास विचाराच्या सत्तातुरांनी युद्धपातळीवर हे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेच्या नावावर मुंबईत कर्मचार्यांसकट जो हाती मिळेल त्याला या ‘महान’ कार्याला जुंपलंय.
– मी तर सफाई कामगार आहे साहेब.
– हे बघ, तू कोणीही असलास तरी पहिल्यांदा तू माणूस आहेस, हेच मानायला हे सरकार तयार नाही. जाती-जातीत तेढ निर्माण करून जातीच्या राजकारणावर निवडणुका जिंकायच्या एवढंच त्यांना समजतं.
– साहेब, ते फॉरेनमध्ये, पण…
– तिथे दक्षिण आफ्रिकेसारख्या काही देशांमध्ये काळे-गोरे असा भेदाभेद करतात. त्याला वर्णद्वेष असं म्हणतात. मात्र बहुसंख्य देशांमध्ये आपल्या देशासारखा उच्च-नीच असा भेदभाव करत नाहीत. तिथे आपल्या घरातील हलकी वाटणारी कामं करायला त्या लोकांना लाज वाटत नाही. अनेक देशांमध्ये आपले मराठी सण तिथे स्थायिक झालेली मराठी कुटुंबं एकत्र येऊन मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतात. आपल्या इथे मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत, तर तिथे आपल्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी त्यांच्या इंग्रजी शिक्षणाबरोबरच मराठी शाळा उघडल्या जात आहेत.
– पण साहेब, आपल्या इथे आताचे चित्र कधी बदलणार? या जाती-पाती, उच्च-नीच या भेदभावातून आपण कधी बाहेर पडणार?
– त्यासाठीच शिवसेना सत्तेवर यायला हवी. शिवसेना हाच देशातील एकमेव पक्ष आहे की त्याने जात-पात कधीच मानली नाही. आणि यापुढेही मानणार नाही. माननीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट असले तरी त्यांचं हिंदुत्व हे जानवं आणि शेंडीपुरतं मर्यादित नव्हतं. ही त्यांच्या वडिलांची प्रबोधनकारांची शिकवण होती. वंदनीय बाळासाहेबांनी ती त्यांच्या हयातीतच अंमलात आणली आणि तिची अंमलबजावणी त्यांच्यानंतरही तशीच चोखपणे चालू राहिली.
– आमच्या लक्षात हे कधीच कसं आलं नाही साहेब! समाज मला अस्पृश्य मानतो. आमच्या जातीला जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळते गावात, आजसुद्धा. साहेब, आम्ही पण माणसंच आहोत ना!
– खरं आहे तुझं. ही जातीय व्यवस्था राज्यकर्त्यांनी पोसली आणि आज तिचं एवढं अवडंबर म्हणजे माजोरीपण माजलंय. शिवसेनेने कधीच जाती-पातीचं राजकारण केलं नाही.
– साहेब, आम्हाला ते बाळासाहेबांचे विचार आणखी स्पष्ट करून सांगा ना!
– सांगतो. लक्ष देऊन ऐक. इतर पक्षांपेक्षा शिवसेनेचं वैशिष्ट्य हे होतं की शिवसेनेने जात-पात, धर्म, पंथ असा भेद कधीच केला नाही. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, अशिक्षित-सुशिक्षित असा भेदभावही शिवसेनेने कोणत्याही प्रसंगी केला नाही. सर्व जाती-धर्माचे शिवसैनिक शिवसेनेत होते आणि आजही आहेत. संघटनेवरील निष्ठा आणि समाजासाठी सर्वस्व पणाला लावून काम करण्याची वृत्ती या एकाच कसोटीवर शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर या पदांसाठी निष्ठावंत शिवसैनिकांची निवड होऊ लागली. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला एखादं पद देताना कधीच त्याची जात विचारली नाही. म्हणूनच सर्वसामान्य जीवन जगणार्या शिवसैनिकांना नगरसेवकपदापासून महापौर, आमदार, खासदार यासारखी पदं मिळाली. मनोहर जोशी यांना तर लोकसभेचे अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला. संकटाच्या प्रसंगी रात्री-अपरात्रीही धावून जाणारा शिवसैनिक मुंबईकरांचा आणि महाराष्ट्राचा आधार ठरला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्य करणार्या शिवसेनेला समाजकारण करताना राजकारण आडवं येत आहे हे लक्षात येताच समाजाच्या भल्यासाठी राजकारणात उडी घ्यावी लागली. आणि त्यामुळेच राजकारण ही फक्त आपली मक्तेदारी आहे, असा समज झालेल्या राजकीय पक्षांची पाचावर धारण बसली. बाळासाहेबांनी मुंबईसह महाराष्ट्रात सुरूवातीपासूनच शिवसेना शाखांची मांडणी पद्धतशीरपणे केली होती. शिवसेना शाखा म्हणजे स्थानिक जनतेच्या समस्या निवारण करणारी मदत केंद्रे होती आणि आजही आहेत. शिवसेनेच्या स्थापनेबरोबर ‘मार्मिक’ प्रकटला आणि मराठी माणसावर होणार्या अन्यायाला वाचा फुटली. ‘सामना’ हे शिवसेनेचं मुखपत्र २३ जानेवारी १९८९ रोजी सुरू झाल्यावर शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर झंझावातासारखा झाला. शिवसेनेच्या शिवतीर्थावर होणार्या विराट सभा म्हणजे तरूणांचं आकर्षण होतं. तिथे फटाक्यांच्या गजरात ‘इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी भगिनी, बांधवांनो आणि मातांनो…’ हे शब्द बाळासाहेबांच्या तोंडून बाहेर पडले की त्यांचे ज्वलंत आणि परखड विचार कानात साठवून ठेवण्यासाठी सार्यांचे कान टवकारले जात. बाळासाहेबांचं भाषण इतर पक्षांच्या नेत्यांसारखं कधीच नव्हतं. आपल्या राजकीय व्यंगचित्रांचे फटकारे ते जसे सफाईदारपणे मारून ढोंगी पुढार्यांच्या पाठीवर त्याचे वळ उठवत, तीच शैली त्यांच्या वक्तृत्त्वात होती. एखाद्या राजकारण्याची खिल्ली उडवताना ते कसलाही मुलाहिजा ठेवत नसत. त्यांच्या भाषणांनी मराठी तरूणाला समाजकार्याची प्रचंड ऊर्जा दिली. नियतीने समाजाच्या उद्धारासाठीच बाळासाहेबांना पृथ्वीतलावर पाठवलं होतं. आरक्षण जातीवर नको तर आर्थिक कसोटीवर द्या, ही त्यांची मागणी जगजाहीर होती… पण शिवसेनेने जात-पात न बघता मोठं केलेल्या काही दगडांनी आता आमचीच शिवसेना खरी असा भाजपाचा शेंदूर फासलाय. जनता त्याचं उत्तर द्यायची वाट पाहतेय.