आकाशातला प्रत्यक्ष चंद्राची भेट सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरची असू शकते, ते काम अंतराळवीरांचे आहे. शास्त्रज्ञांची प्रत्येक मोहीम यशस्वीच असते असे नाही; ती एक अत्यंत जटील प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी… आकाशातल्या चंद्रावर आजपर्यंत जितक्या मोहिमा विज्ञानाने केल्या आहेत, त्यांच्या कितीतरी पट अधिक आमच्या साहित्यिक-कलावंतानी केल्या आहेत. विशेष म्हणजे या मोहिमा यशस्वी होण्याचं प्रमाणही भरपूर आहे. शायर मंडळींचे तर विचारूच नका… त्यांच्या ‘चाँदसा मुखड्या’ला पहिल्यांदा धक्का दिला तो नील आर्मस्ट्रांग या अंतराळवीराने… तेव्हा आम्ही शाळेत होतो… `एक लाजरा न साजरा चंद्रावानी मुखडा’ असं म्हणताना त्याचे संदर्भही बदलू लागले… पण ते काहीही असो, चंद्राने आमच्या मनावर कायमच अधिराज्य केलेय, आजही करतोय अन् पुढेही करत राहील यात शंका नाही.
हा चंद्र मात्र आमच्या मनातला आहे… बालपणी नकळत्या वयात चंद्राची पहिली ओळख आपल्या मायमाऊलीने करून दिली ती ‘चांदोबा’ वा ‘चंदामामा’ म्हणून. नंतर चित्रपट नावाचे गारूड आले आणि चार चाँद लागले… चंद्रावरची अक्षरश: हजारो गाणी चित्रपटांनी दिली… जी आजही मनात रूंजी घालतात…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात चंद्राने १९४०पासूनच डोकावायला सुरूवात केली होती. १९४२चे वर्ष म्हटले की आम्हाला आठवतो तो ‘चले जाव’ हा नारा. इंग्रजांना पळवून लावण्यासाठी ज्या वर्षी हा नारा जोशात होता, त्या वर्षी ‘जवाब’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. अहिंद्रा चौधरी, पी. सी. बरूआ, देवबाला, काननदेवी ही आम्ही आजपर्यंत कधीच न ऐकलेली नावे म्हणजे यातील कलावंत. दादासाहेब फाळके पुरस्कारविजेत्या पद्मश्री काननदेवी म्हणजे बंगाली चित्रपटातील पहिल्या स्टार नायिका व गायिका. ब्रह्मो समाजाचे हेरंबचंद्र मैत्रा यांच्या मुलाशी, अशोक मैत्रा यांच्याशी त्यांचे पहिले लग्न झाले. ब्रह्मो समाज हा आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता मानला जातो. मात्र लग्नानंतर काननदेवी यांनी चित्रपटात काम करू नये अशी भूमिका अशोक मैत्रा यांनी घेतली; इतकेच नाही तर गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी पण टीका करतच आशीर्वाद दिले. नंतर हे लग्न मोडले. या चित्रपटात त्यांनी गायलेले ‘ऐ चाँद छुप ना जाना…’ या गाण्याने चंद्राला अधिकृतरित्या हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिर होण्याचा मान दिला असावा. माझ्या जन्माच्या १३ वर्षे आगोदरचे हे गाणे. आज नक्कीच ऐकावेसे वाटेल, कारण यात काननदेवीचे मधाळ सूर आहेत. मात्र ऐकताना आपल्याला ७७ वर्षापूर्वीच्या काळात स्थिरावता आले पाहिजे.
१९४८मध्ये राज कपूरने आपल्या आर. के. बॅनरखाली पहिला चित्रपट तयार केला ‘आग’; जो स्वत:च दिग्दर्शित केला. यात दीपक नावाच्या गीतकाराने गीत लिहिले होते ‘देख चाँद की ओर मुसाफिर…’ यातला चंद्र हा वाटाड्या दाखवलाय. तो प्रेमीजनांचा आधारही आहे आणि मार्गदर्शकही आहे. रामलाल यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचे गायक होते शैलेश आणि मीना कपूर. राज कपूर आणि कामिनी कौशल हे मुख्य भूमिकेत होते. या गाण्याचे चित्रीकरण आणि बासरीच्या सुरावटीसोबत म्हटलेले हे गाणे आजही मनाला मोहून टाकते.
त्याच वर्षीचे खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेले लताबाईंचे ‘चंदा रे… जा रे जा रे’ हे ‘जिद्दी’ चित्रपटातील गाणे पडद्यावर नायिका कामिनी कौशल यांनी गायले आहे… नायिका चंद्राला आपला संदेश घेऊन जाण्यासाठी गळ घालतेय. मनातल्या सर्व भावना ती चंद्राच्या साक्षीने व्यक्त करतेय… सहज आठवले… `पडोसन’ चित्रपटातील `एक चतुर नार…’ या गाण्यात किशोरदाने वरच्या ओळीच्या सुरावटीचा वापर केलाय, ‘काला रे जारे जारे… खारे नाले में जाके तू मुँह धोके आरे…’
ए. आर. कारदार हे ४० ते ६०च्या दशकातील मोठे प्रस्थ होते. १९४९मध्ये त्यांचा ‘दुलारी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यात नायक होता एन. ए. सुरेश (मूळ नाव नसीम अहमद) आणि नायिका होत्या मधुबाला व गीता बाली. सिल्व्हर ज्युबली हिट असलेल्या या चित्रपटात एकूण १२ गाणी होती. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांपैकी रफी साहेबांच्या ‘सुहानी रात ढल चुकी…’ या गाण्याने त्या काळच्या तरूणाईला वेडे केले होते. शकील बदायुनी यांनी लिहिलेल्या या विरहगीतात चांद हा शब्द कुठेच वापरला नाही, मात्र संपूर्ण चित्रिकरणात उद्ध्वस्त खिंडारामागे लपलेल्या चंद्राचे दर्शन घडते आणि सूर मनाला बैचेन करतात… विशेषत: रात्रीच्या दुसर्या प्रहरात ऐकताना हे गाणे आजही मनाला घायाळ करते… या सिनेमातील शमशाद बेगमच्या आवाजातील ‘चाँदनी आयी बनके प्यार…’ हे गाणेही चांदण्यांना समर्पित होते.
कारदार यांच्या याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘दिल्लगी’ या चित्रपटात शकील आणि नौशाद याच जोडगोळीचे ‘मैं तेरा चाँद तू मेरी चाँदनी…’ हे गाणेही तुफान गाजले. रोमँटिक गाण्यांत या गाण्याचा क्रमांक बरीच वर्षे पहिला होता. यात श्यामकुमार (सुंदर श्याम चढ्ढा) आणि सुरैय्या ही जोडी होती. सआदत हसन मंटोचा खास मित्र म्हणजे हा श्यामकुमार. रावळपिंडीच्या जॉर्डन कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेला हा देखणा तरूण ‘शबिस्तान’ नावाच्या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी घोड्यावरून पडून दगावला. २०१८च्या ‘मंटो’ चित्रपटात ताहीर राज भसीन या अभिनेत्याने श्यामची भूमिका केली आहे. श्यामकुमारने मुमताज कुरेशी या मुस्लिम युवतीशी लग्न केले होते. त्यांची मुलगी साहिरा अन्सारी ही पाकिस्तानच्या टीव्ही क्षेत्रातली प्रसिद्ध अँकर आहे.
१९५१मध्ये राज कपूरच्या बहुचर्चित ‘आवारा’मधील `दमभर जो उधर मुँह फेरे… ओ चंदा…’ हे शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेले गाणे म्हणजे वास्तवजीवनाचे भान असलेले प्रेमगीत. नायक गरीब व बदनाम आहे, त्यामुळे चंद्रालाच साक्षीला बोलवण्याचे आवाहन नायक करतोय. ‘थोडावेळ आता आम्हाला प्रेम करू दे बाबा, तू जरा ढगाआड जा…’ असं फक्त शैलेंद्रच लिहू शकतो.
निर्माते दिग्दर्शक शशधर मुखर्जी (अभिनेत्री काजोलचे आजोबा) यांनी १९४२मध्ये मुंबईतील गोरेगाव या उपनगरातील एस. व्ही. रोडवरील पाटकर कॉलेजजवळ ‘फिल्मिस्तान’ स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांचा आल्फ्रेड हिचकॉचच्या ‘स्ट्रेंजर ऑन अ ट्रेन’ या चित्रपटावर बेतलेला ‘शर्त’ नावाचा रहस्यपट १९५४मध्ये प्रदर्शित झाला. त्यातलं एक गाणं ऐकलं की कळतं की कवीच्या कल्पना या विश्वाच्या पसार्यासारख्याच असतात. आदिअंत नाही समजत. एस. एच. बिहारी यांनी या गाण्यात तर चंद्रालाच मोडीत काढले. खरं तर या अमर्याद विश्वात मानवाचे स्थान ते किती? पण ते लिहितात, `न ये चाँद होगा, न तारे रहेंगे… मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे…’ चांद्रगीतापैकी मला आवडणार्या सर्वोत्कृष्ट गाण्यांत या हेमंतदाच्या गाण्याचा समावेश नक्कीच आहे. गमंत म्हणजे गीता दत्तच्या आवाजातील या गाण्याचे फिमेल व्हर्जन नायिका श्यामा ही बहिणीच्या भावनेने आपल्या लहान भावासाठी गाते, तर हेमंतदाच्या आवाजातील हेच गाणे आणि `देखो ये चाँद करता है क्या इशारे…’ हे आणखी एक गाणे निव्वळ पोंगा पंडित वाटणारा बंगाली अभिनेता दीपक याच्या तोंडी आहेत. एकाच गाण्याला अशा दोन भावबंधनात चित्रित करण्याचा हा दुर्मिळ प्रकार असावा.
सुनील दत्त चित्रपटात येण्यापूर्वी आकाशवाणीवर निवेदक होते. १९५५मध्ये त्यांना नायक म्हणून पहिला ब्रेक मिळाला तो ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ या दिग्दर्शक रमेश सैगल यांच्या चित्रपटातून. यात साहिर लुधियानवीने लिहिलेले आणि संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले नितांतसुंदर गाणे म्हणजे व्याकुळ विरहिणीचे आर्त गाणंच होय… चंद्राला ढगांनी वेढले की तो धूसर दिसू लागतो. आशेचे रंग निराशेत बदलू लागतात आणि एक जीवघेणी कळ हृदयात उमटू लागते… ‘चाँद मद्धम है, आसमाँ चूप है’…
आतापर्यंत तरूणांचे भावविश्व असलेला चंद्र अजून मामा नव्हता झाला. त्याला चंदामामा बनवले ते संगीतकार रवी आणि गीतकार प्रेम धवन यांनी. ६०च्या दशकातला ज्युबली स्टार राजेंद्र कुमारचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता १९५५मध्ये प्रदर्शित झालेला ‘वचन’. यात एक गाणे आहे… ‘चंदा मामा दूर के, पुए पकाए बूर के, आप खाए थाली में, मुन्ने को दे प्याली में…’ सर्वसामान्य प्रेक्षकांच्या हृदयाला, विशेषत: स्त्रीवर्गाला या गाण्याने हात घातला. स्वत: रवी आणि प्रेम धवन यांनी मिळून हे गाणे लिहिले. फार पूर्वीपासून लहान बाळांना घास भरवण्यासाठी जमिनीवरची चिऊताई आणि आकाशातला चांदोबा यांनी खूपच मदत केलीय. आशाताईंनी गायलेले आणि गीताबालीने पडद्यावर साकारलेले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे, जेवढे ते ५०च्या दशकात होते. विशेष म्हणजे, या गाण्याच्या सुरूवातीला जी धून वाजते ती पुढे लक्ष्मी-प्यारेजींनी ‘तेजाब’मधील ‘एक दोन तीन’ या गाण्याच्या सिग्नेचर ट्यूनची आठवण करून देते…
आपले मराठमोळे रामचंद्र चितळकर अर्थात संगीतकार सी. रामचंद्र. बागेश्री रागावर नितांत प्रेम करणारा आणि या रागात सुंदर चाली बांधणारा वल्ली माणूस. खरे तर आजही चंद्र म्हटले की पहिले गाणे ओठावर येते ते, ‘आधा है चंद्रमा, रात आधी…’ थोडेसे विषयांतर… शांताराम बापू ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटात स्वत:च नायक होते. यातील एका प्रसंगात त्यांची एका मस्तवाल बैलाबरोबर झुंज दाखवली आहे. हा प्रसंग करताना त्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. डोळ्यांवर एक महिना पट्टी बांधून इस्पितळाच्या बेडवर पडावे लागले. ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा होती. मग याच काळात त्यांच्या डोक्यात एक कथानक आकार घेऊ लागले. डोळ्यावर पट्टी असल्यामुळे काही बघता येईना. सर्वत्र काळोख… आयुष्य बेरंगी झाले. मग त्यांना या रंगांवरच एक कल्पना सुचली आणि बेडवर पडल्या पडल्या महिनाभरात कथानक तयार झाले. चित्रपट होता ‘नवरंग’. या चित्रपटाचे संगीतकार होते सी. रामचंद्र. सर्वच गाणी बहारदार आणि मधुर… मात्र या सर्वात सर्वांगसुंदर गाणे म्हणजे मालकंस रागात बांधलेले, ‘आधा है चंद्रमा, रात आधी…’ महेंद्र कपूरला थेट वरच्या पायरीवर घेऊन जाणारे… भरत व्यास यांची साधी सोपी आणि प्रासादिक रचना… सर्व काही अर्धे अर्धे…या गाण्यातला अस्सल शृंगार रस आणि यात वाजणारा खास ठेका… सी. रामचंद्र यांच्या अनेक गाण्यांत यापूर्वीही हा ठेका अनेकदा आलाय, मात्र याची खुमारी काही औरच…
त्यांचे आणखी एक गाणे म्हणजे ‘शारदा’ चित्रपटातील लताबाईचे ‘ऐ चाँद जहाँ वो जाए… तुम साथ चले जाना…’ मीना कुमारी आणि श्यामा यांच्या अदाकारीने नटलेले, माझे प्रेम कुठेही जावो तूच त्याची निगराणी कर, अशी विनवणी करणारे राजेंद्रकृष्ण याचे हे गाणे आजही मन प्रसन्न करून जाते.
सोहराब मोदी हे निर्माते, अभिनेते आाfण दिग्दर्शक म्हणजे एक भारदस्त आवाजी व्यक्तिमत्व. ऐतिहासिक विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा १९५७मधील चित्रपट आहे ‘नौशेरवान-ए-आदील’. हे भरजरी पोषाखी नाट्य… होय, कॉश्च्यूम ड्रामा. फर्ज और मोहब्बत असं त्याला सोप्या ऊर्दूत म्हणता येईल. यात राजकुमार आणि माला सिन्हा या जोडगोळीवर चित्रित केलेले एक सुंदर गाणे म्हणजे ‘तारों की जुबाँ पर है मोहब्बत की कहानी…’ रफी आणि लता यांचे हे गाणे पुन्हा एकदा सी. रामचंद्र यांनी स्वरबद्ध केले होते. या गाण्यात या दोन प्रेमवीरांनी चंद्रालाच मुबारक बात दिली आहे. म्हणजे प्रेम हे दोघे करणार आणि ‘ए चांद मुबारक हो तुझे रात सुहानी’ त्याला म्हणणार… अजबच आहे. परवेझ शम्सी नावाच्या गीतकाराने मात्र फारच सुंदर लिहिलंय हे गाणं.
१९५८मध्ये परत एकदा चंदामामा लोरी बनून अवतरला. चित्रपट होता बलराज साहनी आणि नर्गिसचा ‘लाजवंती’. यात चंद्रावरची दोन गाणी आहेत. पैकी एक म्हणजे, ‘चंदामामा मेरे द्वार आ रे…’ बेबी नाझ व तिच्या मैत्रिणीने पडद्यावर सादर केले, तर दुसरे गाणे म्हणजे ‘चंदा रे चूप रहना…’ ही आशाताईंनी गायलेली अप्रतिम लोरी. खरे तर यातील सर्वच गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. सचिनदा आणि मजरूह सुलतानपुरी यांचा अनोखा संगम म्हणजे ही गाणी.
१९५०च्या दशकात अनेक गाणी अशी होती, ज्यांच्या चालीवर कविता देखील म्हटल्या जात. मला आठवते ती एक कविता- ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई…’ ही कविता आमच्या मॅडम ज्या चालीवर म्हणून दाखवत ती चाल १९५८मधील ‘मिस मेरी’ या चित्रपटातील एका गाण्याची चाल होती, हे खूप नंतर समजलं. पडद्यावर हे गाणे गायले आहे अभिनेत्री रेखाचे पिताश्री जेमिनी गणेशन आणि मीना कुमारी यांनी. रफी व लता यांनी गायलेले व हेमंतकुमार यांनी संगीत दिलेले राजेंद्रकृष्ण यांचे हे गाणे आहे ‘ओ रात के मुसाफिर चंदा मुझे बता दे, मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दे…’ (काही शाळकरी मुले या चालीवर ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या’ ही कविता शिकली आहेत). या गाण्यात खुद्द चंद्रालाच जजची भूमिका पार पाडण्यासाठी दोघांचेही ऐकून घ्यावे लागतेय… किती किती भूमिका चंद्राला कराव्या लागल्या?
प्रेमीजनांचा चंद्र तसा मायाळूच म्हणावा लागेल, कारण तो बहिणीच्या मदतीलाही धावून येतो. बहीण-भाऊ नात्यावर तर हजारोंनी चित्रपट आले, येत आहेत व पुढेही येतील. १९५९चा ‘दीदी’ हा असाच एक चित्रपट होता. सुनील दत्त, शुभा खोटे, जयश्री यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला एन. दत्ता यांनी संगीत दिले होते. यातील ‘मेरे भैया को संदेसा पहुँचाना… रे चाँद तेरी ज्योत चढे’ हे गाणे बहीणभावाच्या नात्यातील पदर उलगडणारे दुर्मिळ गाणे म्हणावे लागेल. पडद्यावर हे गाणे व्ही. शांताराम यांची दुसरी पत्नी अभिनेत्री जयश्री (अभिनेत्री राजश्रीची आई) यांनी साकारले आहे. याच वर्षातील ‘लाजवंती’ या चित्रपटात ‘चंदा रे चुप रहना, सोयी है मेरी मैना’ ही आशाताईनी गायलेली व नर्गिसने अभिनीत केलेली लोरी व्याकूळ करून जाते.
राज कपूर आणि नूतन ही जोडी तशी एकत्र कमीच आली. ज्या मोजक्या चित्रपटांत ते दोघे एकत्र आले, त्यातील द्वंद्वगीते मात्र सदाबहार प्रसन्न आहेत. १९५९मधील हृषिकेश मुखर्जींचा ‘अनाडी’ यापैकी एक. यातील ‘वो चाँद खिला, वो तारे हँसे, ये रात अजब मतवाली है…’ हे गाणे म्हणजे ऑल टाइम हिट… आकाशातील चंद्र आणि नूतनचं लाघवी सौंदर्य… आजही मनाला टवटवीत करतं.
अत्यंत समर्थ असूनही काहीसे डावलले गेलेले संगीतकार म्हणजे चित्रगुप्त. त्यांना कायम बी ग्रेड चित्रपट मिळत गेले, मात्र ते काम ए ग्रेडचे करत राहिले. म्हणूनच त्यांची गाणी ओठावर रूळतात, पण चित्रपट आठवत नाहीत… १९६०मध्ये `चांद मेरे आजा’ या नावाचा चित्रपट आला कधी गेला कधी, कळलंच नाही; मात्र यातील नंदा आणि भारत भूषण यांनी पडद्यावर साकारलेलं ‘चाँद को देखो जी…’ हे उडत्या चालीचं गाणं आजही ठेका धरायला लावेल, मी बेट लावतो… मात्र याच वर्षीच्या ‘काला बाजार’मधील ‘खोया खोया चाँद, खुला आसमाँ…’ने तरूणाईला डोलायला लावले. सचिनदेव बर्मननी गाण्याच्या सुरूवातीस बंगाली लोकसंगीताचा ठेका धरत गाणे अलगद डोंगरावरून सोडून दिले. मग डोंगरावरून तिरका तिरका चालत का पळत जाणारा देव आनंद गाण्याला कवेत घेतो अन् रफीच्या सुरात गात जातो… शैलेंद्रचा हा चाँदही वेगळाच आहे…
या सर्व चंद्रगाण्यांत एक गाणे मात्र आजही आतून हलवून जातं. या गाण्यातल्या चंद्रालाही कदाचित हे गाणे ऐकताना वेदना झाल्या असतील. माझ्या आवडीच्या टॉप टेन गाण्यांत हे गाणे आहे. शैलेंद्रचे अप्रतिम बोल, शंकर जयकिशनचे हृदयाला हात घालणारे संगीत, लताबाईंचा आवाज आणि मीना कुमारीचा संपन्न अभिनय. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव आहे ‘दिल एक मंदिर’ आणि गाणे आहे ‘रूक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला, आज चांदनी की नगरी में अरमानों का मेला…’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सी. व्ही. श्रीधर हे खरे तर हास्य फुलवणारे, हलके फुलके दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या जातकुळीचा हा चित्रपट नाही, पण या चित्रपटाचे अत्यंत सुंदर दिग्दर्शन केलेय…
…तर ही होती माझ्या आवडत्या चंद्रगीतांची यादी… खरं तर तीही पूर्ण नाही… कितीतरी गाणी आहेत अजून… तुमच्याही आवडीची अशी अनेक चंद्रगीतं असतील, जुन्या काळापासून आतापर्यंतची… करा त्यांची प्लेलिस्ट आणि घ्या ऐकायला…