हे व्यंगचित्र १९७८ सालातलं आहे. बाळासाहेबांनी रेषांच्या फटकार्यांमधून इथे अक्षरश: जिवंत केलेल्या रेड्यांच्या टकरी महाराष्ट्राला नव्या नाहीत. सत्तापिपासा हा अनेक पक्षांचा स्थायीभाव राहिला आहे. पण, शिवसेना नेहमीच सत्ताकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत आली. मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाची हेळसांड तिने रोखली. मराठी वचक कायम ठेवला. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेचा वेगळा दबदबा निर्माण झाला. अर्थात खोबरं तिकडे चांगभलं म्हणत फिरणारे काही नगही शिवसेनेत आले आणि आईचं दूध विकण्याची हरामखोरी करून बाहेर पडले… आज मुंबईमध्ये मराठी माणसाला वाली उरलेला नाही. मुंबई परिसरात बिल्डर, कंत्राटदारांचं माफिया राज सुरू आहे. त्यांचे म्होरके सत्तेत बसले आहेत. एका आमदाराने पोलिस ठाण्यात खुलेआम गोळीबार करावा, अशी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची अवस्था झाली आहे आणि मिरा रोडमध्ये तत्परतेने बुलडोझर धाडणारे बॉस अळीमिळी गुपचिळी करून गप्प बसलेले आहेत… जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे महाशक्ती आणि गद्दार खोकेबाज रेडे यांच्यातल्या टकरी वाढत जातील… या काळात मराठी जनांना नेहमीप्रमाणे एकच आधार असेल… तो बाळासाहेबांच्या, निष्ठावंतांच्या सच्च्या शिवसेनेचा.