□ ईडी आणि तपासयंत्रणांची लुडबूड थांबवा; महापालिका अभियंत्यांची उच्च न्यायालयात धाव.
■ देशाचा कारभार चालवणार्या मुख्य यंत्रणांबद्दल असं कसं म्हणू शकतात अभियंते?
□ भ्रष्टाचार करा, भाजपात या… कुछ नहीं होगा, मोदी की गॅरंटी – उद्धव ठाकरे यांचा घणाघात.
■ यापलीकडे कोणतीही गॅरंटी देण्यासाठी इव्हेंटबाजी, चमकदार घोषणा, भोंगळ अस्मिताबाजी, भाषणबाजी आणि निवडणुकांचे प्रचार यापलीकडे काही काम करावं लागतं… दिवसाचे १८ तास हीच फोलकटं वेचण्यात जातात त्यांची!
□ केंद्राच्या अर्थसंकल्पात आकड्यांची फेकाफेक आणि घोषणांचे हवेत बार.
■ एरवी काय वेगळं असतं? कुछ नयी बात करो…
□ अर्थसंकल्पात अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का? आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल.
■ कारण गुजरातच्या पंतप्रधानांना त्यांचं राज्य सगळ्यात पुढे आणून दाखवायचं आहे… काळजी करू नका… फक्त दाखवायचंच आहे… प्रत्यक्षात तसं होऊ शकत नाही, याची त्यांनाही कल्पना आहेच.
□ आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यात सरकार सपशेल अपयशी.
■ कंत्राटदारांचं, मध्यस्थ दलालांचं, व्यापार्यांचं, सत्ताधार्यांचं सुपोषण झाल्याशी मतलब; आदिवासी काय जगतात कंदमुळं खाऊन असेही.
□ रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरूच.
■ आता निवडणुकीपर्यंत हा भंपकपणा सुरू राहील…
□ भाजप खासदार म्हणतो, ईडीकडून पुढचा नंबर केजरीवालांचा…
■ त्याला म्हणावं, तात्या, जनता म्हणतेय की आता पुढचा नंबर तुमच्या भ्रष्ट जन पक्षाचा!
□ मिंधेंच्या ३१ नगरसेवकांना पाच कोटींचा ‘आकस्मिक’ लाभ; विरोधकांना एक रुपयाही नाही.
■ आता निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी जिवाचा आकांत चाललाय लाजलज्जा, शरम गुंडाळून!
□ मुंबई शहर खड्ड्यातच!
■ हे बेकायदा सरकार सत्तेत असेपर्यंत ते पाताळात पोहोचलं नसेल तरच आश्चर्य म्हणायचं!
□ ठाण्यात २२ हजार मालमत्तांचे हस्तांतर धूळ खात.
■ त्यात लाभार्थी कोण आहेत, ते पाहिलं पाहिजे… किंवा कोण लाभार्थी नाहीत, हे पाहिलं पाहिजे खरंतर.
□ कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांची महिला, मुलांना बेदम मारहाण.
■ मस्तवाल झालेले आहेत सत्तेच्या मदाने! कधीतरी जनतेच्या हाती सापडतीलच.
□ ठाण्यात चार वेळा मुदत वाढवूनही ३४ रस्त्यांची कामे अपूर्ण.
■ कामं पूर्ण झाली तर कंत्राटदारांनी काय करायचं, कंत्राटं देणार्यांनी काय करायचं, अर्थव्यवस्थेचं काय होणार?
□ कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे हटवण्याचे हायकोर्टाचे पालिकेला आदेश.
■ हायकोर्टाने नुसते आदेश काढून काय होतं?
□ मत जनतेचं आणि किंमत मित्रांना हे चालणार नाही – उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.
■ मित्रांनी, मित्रांचं मित्रांसाठी चालवलेलं सरकार आहे उद्धवजी, त्यात वेगळं काय होणार?
□ भर पोलीस ठाण्यात भाजप आमदाराकडून मिंधे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार.
■ आणि या पक्षाच्या परिवाराचे प्रमुख, नेते आणि समर्थक निर्लज्जपणे चारित्र्य, संस्कार, सचोटी आणि शुचितेच्या गप्पा मारतात येता जाता.
□ अॅम्ब्युलन्स खरेदी महाघोटाळ्यामागे सत्ताधीशाचा पुत्र – विजय वडेट्टीवार यांचा आरोप.
■ पुत्र व्हावा ऐसा गुंडा… मराठी कच्चं आहे काय सत्ताधीशांचं?
□ सरकाकडून पालिकेची शिक्षण कोंडी; शिक्षण विभागाचे ५ हजार ९४६ कोटी थकवले.
■ शिकून कोणी काय तीर मारले आहेत? बंद करा तो विभाग.
□ मुंबईचे लुटारू शिवसेनेच्या प्रकल्पाचे श्रेय लुबाडताहेत – कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरे यांनी फटकारले.
■ पण जनतेला माहिती आहे खरी कामगिरी कोणी केली आहे ते.
□ तरूण खवळले तर प्रलय येईल – साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सरकारवर प्रहार
■ ही भाषणं ऐकायला हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही तरूण हजर नसतात… ज्यांनी खवळायची अपेक्षा आहे ते पानगुटख्याच्या पिंका टाकत, मोबाइलवर इन्स्टा रील्स बनवण्यात, बघण्यात आणि व्हॉट्सअपवरच्या कचर्याचा गर्व वाटून घेण्यात मग्न आहेत… इनका कुछ नहीं होगा…