ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे… अशोक सराफ यांच्या दमदार अभिनयाने अजरामर केलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. यातलीच एक व्यक्तिरेखा होती ‘अशीही बनवाबनवी’ या चित्रपटातील धनंजय माने यांची… त्या मानेंच्या शैलीतच अशोक सराफांना दिलेली ही मानवंदना!
– – –
(सौंदर्यप्रसाधनांचं दुकान, वेळ टळटळीत दुपारची! एक सफेद शर्ट नि ब्लॅक शॉर्ट घातलेली तरूणी आत येते. काउंटरवर धनंजय माने उभा.)
तरूणी : हाय!
धनंजय : (तिला न्याहाळत) हाय, हाय, हाय!!! (स्वतःच दचकून भानावर येत) बोला, बाई काय घेता?
तरूणी : श्शी! बाई काय? मी बाई दिसते का?
धनंजय : (पुन्हा तिला न्याहाळत) तुम्ही पुरूष असाल असं वाटत नाही एकूण…
तरूणी : (शंकेने स्वतःच स्वतःकडे एकवार बघून किंचाळल्यागत) व्हॉट?
धनंजय : (पटकन सावरून घेत) म्हणजे तुम्ही हॉट, ब्युटीफुल तरूणी दिसता!!!
तरूणी : (गालावर धावलेली लाली, गोड हसूने बदलत) मला फेअरक्रीम हवीय, देता का?
धनंजय : चेहर्यावर इतका फेअरनेस असताना आणखी काय गरज तुम्हाला?
तरूणी : माझ्याकडे आहे, पण माझीच चॉईस मैत्रिणीला हवीय, तिचं लग्न ठरलंय ना?
धनंजय : ओह्ह अच्छा! (एक क्रीम काउंटरवर ठेवत) घ्या!
तरूणी : (आश्चर्याने) तुम्हाला कसं माहीत, मला हीच क्रीम हवीय म्हणून?
धनंजय : (वाहवत जात) सुंदर मुलींचा चॉइस कळतो मला! (ती वर बघते, तसा सावरून घेत) बाजारात कुठल्या क्रीम सध्या चालतायत, ते रोजच्या वळणानं ठाऊक असतंच की! बोला आणखी काय देऊ?
तरूणी : (शोधक नजरेने) मला अत्तरही हवं होतं, मिळेल?
धनंजय : कमाल आहे! कस्तुरीमृगाप्रमाणे कस्तुरी नाभीत घेऊन फिरता तुम्ही! नुसत्या रस्त्याने याल तर शंभरेक मुलं फक्त त्या दरवळाने बेहोष होतील, आणि तुम्हाला अत्तर हवंय? (स्वतःच कोड्यात पडल्याप्रमाणे) सध्या परफ्युम, बॉडीस्प्रे वगैरेची हजारो प्रोडक्ट असताना तुम्हाला खरंच अत्तर हवंय?
तरूणी : हो, आज्जीला देवघरात हवं असतं. त्यातही ते तुमच्या शॉपमध्येअसतं ना? काश्मिरी पद्धतीने गुलाबांपासून बनवलेलं? तेच नेतो आम्ही दरवेळी!
धनंजय : हो, ते होय? आमच्या दुकानात वेगवेगळी अत्तरं खास मागवतो आम्ही, पूर्ण जिल्ह्यात इतकी व्हरायटी फक्त आमच्याकडेच असते. (एक अत्तराची बाटली काढतो, अलगद तिचा हात धरत तिच्या मनगटावर थोडं अत्तर लावत) बघा, हेच हवंय का?
तरूणी : (हात नाकाजवळ नेत सुगंध घेत) काही कळेना! दुसरं बघू!
धनंजय : (दुसरी बाटली काढतो. पुन्हा तिचा दुसरा हात धरत मनगटावर अत्तर लावतो.) मग हे बघा.
तरूणी : (त्याही हाताचा वास घेत) तुम्ही कन्फ्युज करताय. मला कळेना! आज्जी कुठलं अत्तर नेते ते!
धनंजय : (तिचे दोन्ही हात हातात घेत आलटून पालटून दोन्हीवरलं अत्तर हुंगत) कन्फ्युज तर मी आहे, अत्तर कुठलं नि तुमचा सुवास कुठला ते ठरवताना. (कसल्यातरी आवाजाने भानावर येत) म्हणजे बघा, ही दोन्ही अत्तरं काश्मिरीच पण…
शिपाई : (मोठ्याने) माने तुम्हाला बोलावलंय मॅडमने!
धनंजय : (स्वतःशी) जरा सुंदर हात हातात आला की मॅडम हातघाईवर आल्याच म्हणून समजा! ही बाई जरासुद्धा रोमँटिक होत नसेल का?
शिपाई : (नीरसपणे) त्यांच्या हातातल्या फाईलला विचारा!
धनंजय : (तरूणीचा हात सोडत पुटपुटतो) ही बाई संन्यास घ्यायला लावेल एक दिवस मला! (तरूणीला उद्देशून) सॉरी हं! तुम्हाला हवी ती व्हरायटी इंगळे दाखवेल. (काउंटरवरच्या दुसर्या सेल्समनकडे बघत) इंगळे यांना आणखी काही बॉटल्स दाखव.
इंगळे : (स्वतःच्या तंद्रीत) कसल्या लोशनच्या?
धनंजय : (वळलेल्या पावलांनी उलट बघत) हां, दे! लोशनच्या? (नेमकं द्यायचं काय होतं, हे घाईत विसरल्याने हात झटकत स्वतःशीच बोलल्यागत थोडं मोठ्याने) हां, हां, दे!! बॉडी लोशन…!!!
शिपाई : काही बोललात?
धनंजय : (खेकसत) इष्टदेवतेचा धावा करतोय, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही चला पुढं! मी आलोच!
(केबिनमध्ये डोकावत)
धनंजय : (दार उघडत विनम्रतेने) मे आय कम इन मॅडम?
मॅडम : (फाईलमध्ये असलेली नजर वर न करताच) या, माने!
धनंजय : मॅडम, मला तुम्ही बोलावलंत? का बोलावलंत? (सावरत) म्हणजे बोलावलंत का? (पुढे येताना स्वतःच्याच पायात पाय अडकून धडपडतो नि झोक मॅडमपुढल्या टेबलवर जातो.)
मॅडम : (जवळपास फाईलला टेकत आलेलं धनंजयचं नाक बघून) सावरा माने स्वतःला! पडाल!
धनंजय : (लेमन कलरचा स्लिव्हलेस टॉप आणि जीन्स घातलेल्या, नाकावर नाजूक काडीचा चष्मा लावलेल्या पंचविशीतील
मॅडमला न्याहाळत) पडलो तर खालीही होतोच, पण तोच तुम्ही बोलावणं धाडलं, आणि इथेही…
मॅडम : आणि इथेही काय?
धनंजय : (पटकन बाजू सावरत) इथे…? हेच पडता पडता तुमच्या टेबलने आधार दिला. (उगाच हसतो.) कुणीतरी म्हटलेलंच आहे, पडत्याला बुडाचा आधार!
मॅडम : माने ती म्हण बुड त्याला…
धनंजय : (मध्येच बोलणं तोडत) पकडीचा आधार! अशीच असली पाहिजे! इंटर्नला शिकलोय मी!
मॅडम : नाही, नाही माने! चुकवताय तुम्ही! असू दे! ह्यात मी तुम्हाला का बोलावलं तेच विसरले मी! (डोक्याला हात लावते.)
धनंजय : विसरला? मग जाऊ मी? ती बिचारी ग्राहक तरूणी वाट बघत असेल माझी!
मॅडम : (एकदम आठवल्यागत) माने मी त्याच संदर्भात बोलायला बोलावलंय तुम्हाला!
धनंजय : काय सांगता? त्या मुलीबद्दल बोलायचंय? तिच्या सौंदर्यावर तर मी दिवसभर बोलू शकतो. फक्त सुरूवात कुठून करायची ते…!
मॅडम : माने! मला हेच बोलायचं होतं! खरेदीला आलेल्या मुलींशी तुम्ही फार सलगी करता. सेल्समनने फक्त मालाच्या विक्रीवर लक्ष ठेवायला हवं…
धनंजय : त्याचं होय! आता मुली खरेदीला आल्यावर साधं नेलपॉलिश द्यायचं म्हणजे कुठल्या शेड्स शोभून दिसतील सांगण्यासाठी किमान हात बघितल्याखेरीज सांगता थोडंच येतं? त्यातही मेंदीसाठी हात, गंगावनासाठी केस, बॉडी लोशनसाठी स्किन, आयलाईनरसाठी डोळे बघून शेड्स सुचवल्या तर ग्राहक मुलींनाही समाधान मिळतं…
मॅडम : पुरे! उद्या ओठांसाठी…!
धनंजय : (नजर रोखून बघत) ओठांसाठी काय मॅडम? आं?
मॅडम : (वाक्य गिळत) काही नाही! पण वस्तूविक्रीसाठी केलेली अधिकची सलगी सेल्समन म्हणून बरी नाही! (थोडी आवाजाची पट्टी उतरवत) आणि ते मलाही आवडत नाही.
धनंजय : असं होय? मग इथून पुढे मीअशा सुंदर मुलींना तीन फूट अंतर ठेवूनच बोलीन. त्याला काय कोरोनाचा नवीन व्हेरियंट आला असं सांगेन! मग तर झालं?
मॅडम : (बोलावण्याचं कारण आठवत) माने, तुम्ही काल अचानक सुट्टी घेतली ?
धनंजय : अचानक कुठे मॅडम? तुम्हाला रीतसर रजेसाठी विचारलं होतं की!
मॅडम : हो! घाईत विसरले असेल…
धनंजय : चला म्हणजे तुम्हीसुद्धा विसरता तर…?
मॅडम : नेहमीची दिसणारी ‘आपली’ माणसं दिसली नाही की…
धनंजय : नाही की काय?
मॅडम : (भानावर येत) काही नाही. कामं खोळंबतात.
धनंजय : की तगमग होते?
मॅडम : अँ?
धनंजय : (पुन्हा सावरून घेत) कामं न झाल्याने म्हणायचं होतं मला!
मॅडम : सुट्टी घेण्याचं विशेष कारण?
धनंजय : ते होय? रजिस्टर लग्नं होतं म्हणून घेतलेली सुट्टी!
मॅडम : तुमचं लग्नं…?
धनंजय : हां आता आमचंच म्हणायचं!
मॅडम : (काहीश्या खिन्न चेहर्याने) हॅपी मॅरीड लाईफ!
धनंजय : थँक्स! पण मला देऊन काय फायदा!
मॅडम : तुम्ही ना काय बोलता, खरंच काही कळत नाही! आता लग्न तुमचं झालं म्हटल्यावर शुभेच्छा तुम्हालाच देणार ना?
धनंजय : तेच म्हणतोय मी! त्या मित्राला द्या!
मॅडम : का?
धनंजय : लग्न त्याचं झालंय ना? मग त्यालाच द्यायला हव्यात ना?
मॅडम : म्हणजे तुमच्या मित्राचं लग्न होतं तर… मला वाटलं…!
धनंजय : माझंच लग्न झालंय! असंच ना? तेवढं कुठं नशीब! इथं गावच्या बागायतदारांपासून मोठं मोठे पॅकेज घेणारे मित्र लायनीत उभे आहेत, मुंडावळ्या बांधून! त्यांना वधू मिळेना! मी तर असा कफल्लक. उलटा करून मला झटकला तर आठ आणे पडायचे नाहीत. (स्वतःच मोठ्याने हसतो.)
मॅडम : पण तुमचाही विचार असेल की?
धनंजय : विचाराला काय लागतं! मी लाख विचार करीन. तुमच्यासारखी एखादी कर्तबगार मुलगी आयुष्याची जोडीदार बनावी. गाडी-बंगला नसला तरी चालेल, पण माझ्याही आयुष्यात कुणासाठी मोठ्याने कोकलत `अश्विनी ये ना!’ सारखी गाणी म्हणावी. शेवटी स्वप्नंच असतात ती! त्यात काय रमायचं? आता येऊ मी? ग्राहक वाट बघत असतील!
मॅडम : थांबा! मला एक जुनी फाईल काढून द्या!
धनंजय : कुठली हवीय?
मॅडम : ती… लिंबू कलरचं कव्हर आहे ना?
धनंजय : ओहोहो, लिंबू कलर… मला लिंबू फार म्हणजे फार आवडतं मॅडम. म्हणजे सरबत म्हणू नका, लोणचं म्हणू नका की शिकरण…
मॅडम : लिंबाचं शिकरण कसं करतात?
धनंजय : शिकरण म्हणालो का मी! ते फ्लोमध्ये चुकून चुकलो असेल! काय आहे लिंबू माझा वीकपॉईंट आहे. नुसतं लिंबाचं नाव जरी काढलं तरी… (तिच्या लेमन कलरच्या स्लिव्हलेस टॉपकडे बघत) आता हेच बघा. हा टॉप त्या दिवशी मीच घ्या म्हणालेलो. तुम्ही नाही म्हणालात. पण यात तुम्ही काय खुलून दिसता हो?
मॅडम : नशीब पंधराएक मिनिटांनी का होईना, तुमचं लक्ष गेलं म्हणायचं…!
धनंजय : हां, नजर जायला वेळ लागला असेल. पण नजर हटणंसुध्दा वेळ घेईल असं दिसतंय! काय कमाल दिसता हो तुम्ही? एक सांगू?
मॅडम : (अंगभर मोहरत) हेच ना? एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक ओठांना लावली तर आणखी…
धनंजय : ती तर तुम्ही आधीच लावलीय की! फक्त बारीक तिळाइतका काजळाचा ठिपका, नजर न लागो, म्हणून द्यायला हवा! इतकंच! (कपाटावरून काढलेली फाईल अलगद टेबलवर सरकवत मॅडमच्या कानाजवळ जात बोलतो. तशी ती दोन पावलं मागे सरकत घाईने फाईल उचलते.)
मॅडम : (फाईल उघडताच पाल उडी मारते, तिला बघून किंचाळत) पाल…!!! (आणि जाऊन धनंजयला मिठी घालते.)
धनंजय : (तिच्या पाठीवरून हात फिरवत) थांबा, थांबा!
मॅडम : (भीती गेल्यावर घाईने दूर होत) सॉरी हं!
धनंजय : (हसत) सॉरी काय त्यात? आयेम ग्लॅड! कुणीतरी म्हटलेलंच आहे, ओढलं तर पळतं नि सोडलं की किंचाळतं. त्यात काय? पण काही म्हणा चारदोन पाली आणखी पाळाव्या म्हणतो!
मॅडम : माने काही काय चावटपणा? हे ऑफिस आहे!
धनंजय : आणि आत आपण दोघेच!
मॅडम : माने, पुरे! कुणी आत येईल!
धनंजय : ह्या निमित्ताने एक विचारावं म्हणतो. विचारू?
मॅडम : फाजीलपणा करणार नसाल तर विचारा!
धनंजय : तुम्ही माझ्यावर अजूनही तेवढंच प्रेम करतात?
मॅडम : (नजरेला नजर मिळवत) प्रेम हे कायम अजरामर असतं माने! कुठल्याही रत्नं-आ`भूषणां’पेक्षा!
धनंजय : मग सांगायला फार उशीर केलात?
मॅडम : (हात हातात घेत) काही गोष्टी कधीही सांगण्याची ग्ारज भासू नये माने!!! त्या समजून घ्याव्यात!