शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या झंझावाती दौर्यात भारतीय जनता पक्षाचं ‘भेकड आणि भाकडांची फौज’ अशा अगदी शेलक्या शब्दांत परखड, स्पष्ट आणि चपखल वर्णन केलं आहे… शिवाय ही भोंदू जमाव पार्टीही आहे, भ्रष्ट जन पार्टीही आहे आणि भयभीत जनता पार्टीही आहे… लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यावर या भयभीतांची संतापजनक आणि हास्यास्पद पळापळ सुरू झालेली आहे.
एकीकडे या टोळीचा असा दावा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता त्यांना आखिल विश्वाचे नेते मानलं जातंय, इतकी प्रचंड आहे आणि त्यांच्या विराट प्रतिमेमुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये चारशेहून अधिक जागांवर आमचाच विजय होणार हे निश्चित आहे. हे खरं असतं तर तर ही सगळी मंडळी याच्यावर ते ठेवून म्हणजे हातावर हात ठेवून स्वस्थ बसली असती. जनतेच्या अलोट प्रेमामुळे ‘मोदी पक्षा’ची (आता हेच नाव घ्यायला हवं यांनी, भारतीय जनतेशी संबंध असलाच तर तो आहे तिच्यात फाटाफूट करण्यापुरता) निवडणूक ही निव्वळ औपचारिकताच राहिली असती. पण, तसं काही चित्र दिसत नाही. सदैव प्रचारमग्नच असलेल्या पंतप्रधानांनी बांधकामही पूर्ण न झालेल्या मंदिरात प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना करून साक्षात प्रभू रामचंद्राला आपण हक्काचं घर मिळवून दिलं असा आव आणला… राम मंदिरासाठी झालेल्या प्रदीर्घ लढाईत कसलाही सहभाग नसताना नियतीने एका वळणावर यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला, एवढ्या एका भांडवलावर केवढी ही आढ्यता! संघपरिवाराने सगळी ताकद लावून घरोघरी अक्षता पोहोचवून साजर्या केलेल्या राममंदिराच्या इव्हेंटमुळे काही दिवस सगळा देश (खरे तर प्रामुख्याने उत्तर भारत, मध्य भारत आणि पश्चिम भारत- पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे फारसा ज्वर असणं शक्यच नव्हतं) रामरंगी रंगला होता. पण, रोजच्या जगण्याचे प्रश्न पुढे उभे ठाकणार आणि रामलल्ला काही निवडणुकीत पावणार नाही, याची कल्पना बाकीच्या पक्षधुरीणांना नसली तरी मोदी-शहा यांना आहेच.
एकीकडे इंडिया आघाडीला घमंडिया आघाडी म्हणायचे (मोदींनी इतर कोणाला घमेंडी म्हणणे म्हणजे कोकिळेने अन्य कोणाला सुरमणी म्हणून गौरवण्यासारखं आहे), त्यांना कोण घाबरतो, अशा दर्पोक्तीच्या बेटकुळ्या काढून दाखवायच्या आणि ती आघाडी बळकट होऊ नये म्हणून ईडीचे घरगडी धाडायचे, असला शेमणेपणा हा पक्ष करताना दिसतो आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यात झाली होती. पण नीतीश हे भारतीय राजकारणातले सगळ्यात मोठे आणि सगळ्यात बदनाम पलटूराम आहेत, हे लक्षात घेऊन इंडिया आघाडीच्या धुरीणांनी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली नव्हती. आघाडीतर्पेâ पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपलं नाव जाहीर होईल, अशीही नीतीशबाबूंना अपेक्षा असावी. ही मुळातच मऊ असलेली माती भेकड जनता पार्टीने ईडीच्या कोपराने खणून काढली आणि ही गारगोटी परत एनडीएच्या काळवंडत चाललेल्या मुकुटात नेऊन बसवली. याने बिहारमध्ये लोकसभेत जागा वाढतील, अशी अजिबात शक्यता नाही. आता इंडिया आघाडीच्या तेजस्वी वाटचालीमुळे पलटूराम कायमचे घरी बसतील, हेच संकेत आहेत.
झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरूंगात डांबण्यापर्यंत भयभीत जनता पार्टीची मजल गेली आहे. त्यांचा पक्ष फुटतो का, याचा प्रयत्न करून झाल्यावर नाईलाजाने तिथे त्यांच्या पक्षाचं सरकार स्थापन करू दिलं गेलं. ऑपरेशन लोटस करायला गेलो तर चिखलात गटांगळ्या खायला लागतील, हे लक्षात आलं असावं. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी घरगड्यांचा वापर सुरू आहेच.
केजरीवाल हे महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांच्या पट्ट्यात काँग्रेस हा त्यांचा बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे. काँग्रेसने वेळोवेळी केजरीवालांना दुखावलंही आहे. केजरीवालांनीही काँग्रेसकडून पंजाब हिसकावून घेतला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस यांच्यात बिघाडी होईल, तिरंगी लढती होतील आणि आपण सत्तेचं लोणी चाखू, अशा कल्पनांमध्ये मग्न असलेल्या भाकड जनता पार्टीला या दोन पक्षांच्या नेत्यांनी दाखवलेल्या प्रगल्भतेमुळे झटका बसला आहे. हे दोन्ही पक्ष अतिशय समजूतदारपणे गणित आखून लढत आहेत, बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा एकला चलो रे हा नाराही इंडिया आघाडीच्या डावपेचांचाच भाग आहे, हे स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीही भक्कम आहे आणि उद्धव ठाकरे यांना मराठी जनतेचा एकमुखी पाठिंबाही स्पष्टपणे दिसतो आहे. इंडिया आघाडीची धास्ती घेतल्यामुळेच चंदीगडमध्ये पीठासीन अधिकार्याकरवी आप आणि काँग्रेसची मतं बाद करून अल्पमतातला महापौर बसवण्यापर्यंत भ्याड जनता पार्टीची मजल गेली आहे.
यांच्यात दहा वर्षांत केलेल्या कामगिरीच्या जोरावर मत मागण्याची हिंमत असती, तर देशाचे पंतप्रधान देश चालवण्याचं काम सोडून पूजापाठ करतायत, सतत दक्षिण भारतात जाऊन तीर्थयात्रा करतायत, महाराष्ट्रात येऊन सरपंचाने उद्घाटन करण्यायोग्य विकास प्रकल्पांची उद्घाटनं करतायत, असं चित्र दिसलंच नसतं. भाकड जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीत उडणार्या दाणादाणीचीच ही सुचिन्हे आहेत.