सुजित हा एका मल्टीनॅशनल आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. कंपनीत कल्पक योजना राबण्यास तो नेहमी आघाडीवर असायचा. कंपनीला युरोपमध्ये एक मोठे काम मिळाले होते, त्यासाठी वीसजणांची टीम तयार करायची होती. हे काम सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये असल्यामुळे तिथे त्या विषयातील जाणकार, अभ्यास आणि अनुभव असणार्या कर्मचार्यांना पाठवण्याचे नियोजन करण्यात आले होते. या विषयात कामाचा अनुभव असला तरी त्यासाठी एक परीक्षा घेऊन त्यामध्ये चांगला स्कोअर येणार्यांची निवड यासाठी करण्याचे नियोजन कंपनीकडून करण्यात आले होते. सुजित या परीक्षेचा प्रमुख कार्यवाह म्हणून काम करत होता. चार ते पाच वर्षासाठी युरोपमध्ये काम करण्यास मिळणारी ही उत्तम संधी होती, त्यामुळे या परीक्षेला कंपनीतल्या ५०च्या वर उमेदवारांनी नावनोंदणी केली होती, त्यापैकी फक्त वीसजणांची निवड करून त्यांना १०-१०च्या बॅचने युरोपला पाठवण्याचे नियोजन कंपनीने केले होते.
आपल्याला काही करून ही परीक्षा पास करायची आणि युरोपला जायचे असे कंपनीत काम करणार्या अमन आणि अमित या मित्रांनी ठरवले होते. परीक्षेसाठी जो पेपर येईल, त्याची उत्तरे आपल्याला अचूक कोणी सांगू शकले तर आपण नक्की या परीक्षेत टॉपर म्हणून पुढे असू, असा या दोघांना विश्वास होता. त्यामुळे असे करणारी कोणती यंत्रणा, व्यक्ती आहे का, याचा शोध घेण्याचे काम अमनने सुरू केले होते. आपली मैत्रीण अश्विनी हिला तिने या सगळ्या प्रकाराची, कंपनीत होणार्या परीक्षेची कल्पना दिली, परीक्षेत कोणी तयार उत्तरे सांगू शकले, तर आपले काम होईल, असे त्याने अश्विनीला सांगितले, तिने देखील त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
मुंबईत राहणार्या एका मैत्रिणीकडे तिने या संदर्भात चोकशी केली, तेव्हा तिला एक लिंक सापडली. फोर्टला अमर नावाची एक व्यक्ती असून ती कोणत्याही परीक्षेच्या दरम्यान एकदम हायटेक पद्धतीने कॉपी पुरवून त्या मुलांना भरपूर मार्क मिळवून देतात, असं तिला कळलं. त्यानंतर अश्विनीने हिने अमनला अमर याचा नंबर मिळवून दिला. अमनने अमरशी फोनवरून या परीक्षेबाबत चर्चा केली. त्या दोघांनी दादरमधल्या एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले. अमनने सुटी टाकून मुंबई गाठली. दादरमधल्या हॉटेलमध्ये दोघांची गाठ पडली, अमरने हा सगळा कारभार कसा चालतो, ते अमन याला सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे तुला ८० हजार रूपये द्यावे लागतील, तू जर मुले वाढवली तर आपल्याला हा रेट थोडा कमी करता येईल, असं त्याने अमनला सांगितलं. त्यामुळे अमन कामाला लागला आणि त्याने हायटेक कॉपीमध्ये सहभागी होण्यासाठी वीसजणांना तयार केले. मुलांची संख्या वाढल्याने अमरने ८० हजारऐवजी ६० हजार रूपये प्रत्येकी घेण्याचे ठरवले होते. ही सगळी रक्कम १२ लाख रूपये इतकी होत होती. त्यापैकी अर्धी रक्कम अगोदर द्यावी लागेल, असे अमरने अमनला सांगितले. त्यानुसार अमनने पुढाकार घेऊन वीसजणांकडून पैसे जमा केले आणि ती रक्कम अमरला दिली. त्यानंतर अमरने त्याला पुढची तयारी कशी करायची याची कल्पना देण्यास सुरूवात केली.
या हायटेक कॉपीमध्ये हैदराबादवरून हरबर्यांच्या डाळीच्या आकाराएवढा एक ब्लुटूथ स्पीकर एका चिमट्याच्या सहाय्याने कानात टाकावा लागतो. त्यामध्ये फक्त ऐकण्याची सुविधा आहे. एकदा हा स्पीकर कानात टाकला की, तो अलगदपणे चिमट्याने बाहेर काढावा लागतो. त्यावर बोलण्याची सुविधा नाही, परीक्षा पास होण्यासाठी पैसे दिलेल्या प्रत्येकाला हा स्पीकर देण्यात आला होता. त्यासाठी काडेपेटीच्या आकाराची बॅटरी लपवण्यासाठी विशिष्ट बनियन तयार करून घेण्यात आले होते. प्रत्येकाच्या शर्टच्या बटनाला एक छोटा छुपा कॅमेरा बसवण्यात आला होता. तो हुबेहूब बटणासारखा दिसत होता. परीक्षार्थीने त्याच्यासमोर प्रश्न पत्रिका धरली की प्रत्येक सेकंदाला तो कॅमेरा स्वयंचलित पद्धतीने क्लिक होऊन त्याचे फोटो हे क्लाऊड सर्व्हरवर पाठवले जात असत. त्याचा अॅक्सेस मुंबईमध्ये असणार्या एक्स्पर्ट टीमला होता. त्या ठिकाणी प्रत्येक विषयातील पाच तज्ज्ञ मंडळी बसलेली होती. त्यांनी उत्तरे तयार केली की ती लगेच ईमेलद्वारे परीक्षा ज्या ठिकाणी सुरू आहे, तेथील बाहेरच्या रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीकडे जात होती, ती व्यक्ती योग्य माध्यमातून ती उत्तरे त्या मुलांपर्यंत पोहोचवत होता. मुलांच्या कानात असणार्या त्या स्पीकरवर हे उत्तर दोन वेळा सांगण्यात येत होते, कारण मुलांना बोलण्याची सुविधा उपलब्ध नव्हती, त्यामुळे असे करण्यात आले होते. असे कॉपीचे हायटेक कांड करून या परीक्षेत १८ मुले पहिल्या वीसमध्ये आली.
मात्र, यासाठी ठरलेला सगळा व्यवहार पूर्ण न केल्यामुळे या सगळ्या प्रकाराची माहिती एका अज्ञात व्यक्तीने सुजितला दिली. त्याला हा सगळा प्रकार समजला तेव्हा त्याचा सुरूवातीला विश्वास बसला नाही. कारण परीक्षा सुरू होती, तेव्हा त्या हॉलमध्ये सगळे सुरळीत सुरू होते, संशयास्पद असा कोणताही प्रकार तिथे होत नव्हता.
सुजितने याचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. ज्या व्यक्तीने ही ईमेल केली होती, त्याचा आयपी अॅड्रेस, फुल हेडर आणि अन्य तांत्रिक आधाराने शोध घेऊन सुजित त्याच्यापर्यंत पोहचला, त्याने यामध्ये कितीजण होते, त्यांची नावे त्याला दिली. या मुलांनी ठरलेला आर्थिक व्यवहार पूर्ण न केल्यामुळे आपण तुम्हाला मेल केली असल्याचे त्याने सुजितला सांगितले. हे सगळे समजल्यावर सुजितने ती परीक्षा रद्द करून नव्याने ती घेण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय त्या कंपनीतील कर्मचारीवर्गाला मान्य नव्हता. पण संस्था खासगी असल्यामुळे त्यांना तो मान्य करावा लागला. दरम्यान, या सगळ्या प्रकारची तक्रार सायबर पोलिसांकडेही करण्यात आली होती, त्यामुळे या हायटेक कॉपीच्या प्रकरणात सहभाग घेतलेल्या मुलांना बोलावून पोलिसांनी कॉपी पुरवणार्या टोळीला बेड्या घातल्या. सुजितने पुन्हा परीक्षा घेताना पाच वेगवेगळे पेपर सेट केले, परीक्षा सुरू झाल्यावर आपल्या हातात कोणता पेपर पडणार याची माहिती कुणाही उमेदवाराला नव्हती, त्यामुळे या परीक्षेत जे हुशार होते, तेच पहिल्या वीसात आले आणि त्यांना युरोपमधल्या प्रोजेक्टवर जाऊन काम करण्याची संधी मिळाली. ज्या मंडळींनी हायटेक कॉपीचा प्रकार केला होता, त्यांना कंपनीमधून कायमस्वरूपी नारळ देऊन बाहेर काढण्यात आले. सायबर पोलिसांनीही त्यांच्यावर कारवाई केली होती. या सगळ्या प्रकारामुळे त्यांचे करियर संपुष्टात आले.
हे लक्षात ठेवा
नव्या तंत्राचा वापर करून कॉपी करण्याचे प्रकार आपले करियर संपुष्टात आणू शकतात, त्यामुळे अशा प्रकारापासून कायम दूर राहा. जर कुणाकडून अशा प्रकारची प्रलोभने दाखवली जात असतील तर त्यापासून दूर राहणे हितकारक आहे.