आज जग झपाट्याने बदलत आहे. या बदलाच्या वेगाचा अंदाज सामान्य माणसाला घेणे अवघड झाले आहे. एखाद्या विषयात पारंगत होणे, त्याबाबत अधिकाधिक माहिती मिळवणे सोपे आहे, मात्र अनेक विषयांबाबत माहिती मिळवणे एका व्यक्तीच्या आवाक्यापलीकडले झाले आहे.
आज करियर क्षेत्रही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक ह्या व्यवसायांच्या पलीकडे गेले आहे. जगाच्या मार्केटमध्ये हजारो संधी उपलब्ध आहेत, मात्र माहितीच्या अभावी अनेकांना त्या संधींना मुकावे लागते. या संधींची माहिती मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचली तर अशा असंख्य संधींचा लाभ त्यांना घेता येईल, त्यांना उत्तम आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात योग्य ते करियर करता येईल, ही समाजाची निकड ओळखून रूपाली ठाकूर आणि वैशाली भिडे बर्वे यांनी २०१६ साली बोरिवली, मुंबई येथे ‘मॅक्सनॅन अॅडव्हायजरी प्रा. लि.’ ह्या कंपनीची स्थापना केली.
रूपाली आणि वैशाली ह्या दोघी नात्याने मावसबहिणी असून दोघींनी आपापल्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम केले आहे. वैशाली यांनी शाळेत असतानाच वयाच्या तेराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. त्यात उत्तम प्रावीण्य मिळवत विविध स्पर्धांमध्ये भाग घेत त्यांनी क्रिकेट क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांनी अवघ्या पंधराव्या वर्षीच मुंबई क्रिकेट टीमचे नेतृत्त्व केले आणि पुढे भारतभर राष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.
त्यांनी गायनातही अनेक बक्षिसे मिळवली आहेत. गायनकलाही आत्मसात केली आहे. वैशाली यांनी एमबीए केले, अन् नंतर एकोणीस वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या पदावर नोकरी केली. वैशाली भिडे बर्वे यांनी शेवटची नोकरी एचएसबीसी बँकेत केली, तिथे त्या ग्लोबल प्रोक्युरमेंट विभागासाठी व्हाइस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत होत्या.
या दोन्ही बहिणींचा ओढा आधीपासूनच क्रीडाक्षेत्राकडे अधिक राहिला आहे. रूपाली यांनी शालेय वयात लंगडी, खोखो, आरएसपी आणि महाविद्यालयात एनसीसी, एनएसएसमध्ये सहभाग नोंदवला. त्यातून संघ कसा चालवायचा, शिस्त कशी पाळायची हे आणि यांसारखे अनेक गुण अंगवळणी पडले. त्यांनीही वयाच्या सतराव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. पुढे सिलेक्टर, व्यवस्थापक, खजिनदार ही जबाबदारीची पदे भूषवली. सोबत वकिलीचे शिक्षण घेऊन चौदा वर्षे मुंबई उच्च न्यायालयात यशस्वीपणे प्रॅक्टिस केली. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी पहिली महिला क्रिकेट स्कोअरर म्हणून काम केले आहे, स्थानिक, राज्य, राष्ट्रीय पातळीवरच्या क्रिकेटमध्ये स्कोअरर म्हणून काम केले आहे.
मात्र या दोघी बहिणींच्या जडणघडणीत, आजवर करत आलेल्या कामांच्या वेगवेगळ्या स्वरूपांमुळे वैविध्य आले आहे, शिवाय दोघीही आपल्या अनुभवांचे सारे डॉट्स जोडण्यात (बिंदूजोडणी) अतिशय सजग असून आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करत त्यांनी ‘मॅक्सनॅन अॅडव्हायजरी प्रा. लि.’ या कंपनीमार्फत विद्यार्थी, पालक यांना करियर काऊन्सेलिंगची सुविधा देण्यास सुरूवात केली. यामध्ये अकॅडमिक, सांस्कृतिक, क्रीडा या क्षेत्रात देशात, विदेशात कोणकोणत्या संधी आहेत, त्यासाठी काय शिक्षण घेतले पाहिजे, कुठे शिक्षण घेतले पाहिजे, लागणारा कालावधी, आवश्यक खर्च, याबाबत मॅक्सनॅनकडे असलेली संपूर्ण अद्ययावत माहिती त्या देऊ करतात. समुपदेशनादरम्यानच विद्यार्थ्याचा कल नक्की कोणत्या करियर संधीकडे आहे, यासाठी सायंटिफिक असेसमेंट चाचणी केली जाते. त्याचबरोबर पालकांच्या आर्थिक क्षमतेचाही विचार करून त्यांना सल्ला दिला जातो.
या प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालक अशा दोघांनाही मार्गदर्शनाची नितांत गरज असते. शिवाय त्यांना भेटणारा प्रत्येकजण करियर कोणते निवडावे याबाबत सांगत असतो, ज्यामुळे त्यांच्या डोक्यात गोंधळच उडत असतो. त्या अनेक शिक्षणाच्या संधींतून योग्य निवड करणे हे पालक आणि विद्यार्थी यांचेसाठी मोठे आव्हान असते. ह्या आव्हानाला पेलवण्याचे सामर्थ्य वैशाली आणि रूपाली यांच्या मॅक्सनॅनमुळे त्यांना मिळते. योग्य वेळी, योग्य सल्ला एखाद्या व्यक्तीचे, मुलाचे, मुलीचे आयुष्य बदलवून टाकू शकतो, जे या दोघी भगिनी करतात.
अलीकडे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. अनेकांकडे तशी आर्थिक क्षमता असते, त्यांचा मुलगा, मुलगीही परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी सक्षम असतात, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला, हातभार मिळत नाही, आणि ते त्या संधींपासून वंचित राहतात. अशा शेकडो पालकांना सल्ला देत, समुपदेशन करत, हॅण्डहोल्डींग करत त्यांच्या मुलांना मॅक्सनॅन या कंपनीने परदेशी शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याकरिता सहकार्य केले आहे.
उदा. असाच एक विद्यार्थी, ज्याला फुटबॉल खेळाची प्रचंड आवड होती, त्याने शाळा आणि जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व केले होते, डेटा अॅनालिटिक्समध्ये पदवीधर होता, मात्र त्याला क्रीडा क्षेत्रातच करियर करायचे होते. त्याच्या सायंटिफिक असेसमेंट चाचणीनंतर त्याला मॅक्सनॅनने पुढच्या वाटचालीसाठी मास्टर्स पदवी घेण्यासाठी युनायटेड किंगडमच्या लोघबॉरो युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स डेटा अॅनालिटिक्समध्ये स्पेशलायजेशन करण्याकरिता संपूर्ण मार्गदर्शन केले. परदेशी शिक्षणासाठी जायचे तर मॅक्सनॅन आणि टीमला खूप बारकाईने मुलांची शैक्षणिक पात्रता, जीएपीज, एसओपी, त्यांचा सीव्ही, व्हिसा कागदपत्रे, त्यांच्या पालकांकडे शिक्षणासाठी पैसे खर्च करण्याची असलेली क्षमता, एकूण खर्चाचे व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये लक्ष द्यावे लागते.
हे सारे टप्पे पार पाडून विद्यार्थी त्यांना आवश्यक कोर्ससाठी प्रवेश घेतात, तेव्हा मॅक्सनॅन आणि टीमला विशेष आनंद होतो. सध्याच्या पिढीला योग्य मार्गदर्शन केले तर ते त्यांच्या क्षेत्रात उत्तम प्रगती करू शकतात, असे संचालिका वैशाली भिडे बर्वे सांगतात. ज्याचा अनुभव या क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यापासून या दोघी बहिणी घेत आहेत.
यासोबत त्यांनी स्पोर्ट्स नर्सरीसुद्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये ३ ते १० वयोगटातील लहान मुलांना, मुलींना प्रवेश दिला जातो आणि सुरूवातीपासून त्यांच्या कलानुसार, आवडीनुसार संबंधित खेळासाठी तयार केले जाते, त्यांना कोचिंग दिली जाते, योग्य मार्गदर्शन करत त्या खेळाच्या होणार्या स्पर्धांमध्ये उतरवले जाते. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले ज्ञान, माहिती, प्रशिक्षण सारे पुरवले जाते. त्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी सुरूवातीपासूनच तयार केले जाते, जेणेकरून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न केले जातात.
संचालिका रूपाली ठाकूर सांगतात की यामुळे मुलांचा, संभाव्य खेळाडूंचा शारीरिक विकास होतो, मुलं मैदानात येऊन खेळू लागतात, जे अलीकडच्या डिजिटल युगात फार कमी झाले आहे, खेळल्यामुळे त्यांची प्रकृती धडधाकट राहते, प्रतिकारशक्ती वाढते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या ऋतूमध्ये त्यांना सर्दी, पडसे, ताप होण्याच्या शक्यता कमी होतात. खेळामुळे, सरावामुळे त्यांना आनंदही मिळतो. तसेच टीममध्ये काम करण्याचे शिक्षण मिळते, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, लहान मोठ्या अपयशांना तोंड देण्यासाठी मुले तयार होतात, या स्पोर्ट्स नर्सरीमुळे असे अनेक फायदे मुलांना होऊ लागले आहेत. मॅक्सनॅनचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सक्षम युवक युवती घडवणे हे ध्येय आहे, ज्यासाठी ते आणि त्यांची टीम लहान मुलांवर मेहनत घेत आहेत.
समुपदेशन करण्यात, ह्या कौशल्यात मॅक्सनॅन आणि टीमचा हातखंडा आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण वैशाली आणि रूपाली या दोघींना वेगळ्या अर्थाने लागू पडते. स्पोर्ट्स नर्सरीमध्ये दाखल झालेली मुले कोणत्या क्रीडाप्रकारात नाव कमावू शकतात, क्रीडा क्षेत्रातील कुठल्या करियरमध्ये पुढे जाऊ शकतात, हे त्यांना कळते आणि त्यानुसार या दोघी आणि त्यांची टीम त्या मुलांना प्रशिक्षित करतात.
आजवर मॅक्सनॅनने त्यांच्याकडे समुपदेशन आणि सल्ला घेण्यासाठी आलेल्या अनेक पालकांच्या मुलांना युरोप, अमेरिका, रशिया आणि जगभरातील विविध देशांमध्ये शिक्षणासाठी पाठवले आहे. पहिल्या मीटिंगपासून ते थेट विद्यापीठात राहण्याच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचण्यापर्यंत ते जबाबदारी घेतात आणि या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर त्यांना मार्गदर्शन करतात. पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या अडल्या नडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देतात. एक उत्तम मेंटॉर, पालक आणि पाल्याच्या सोबत असल्यामुळे कुठेही अडचण येत नाही, अडचण आली तरी अनुभवामुळे त्या सोडवण्याची क्षमता रूपाली आणि वैशाली ह्यांनी कमावलेली आहे. त्यांची सर्वात महत्त्वाची आणि सांगण्यासारखी बाब म्हणजे मॅक्सनॅन कंपनीची सुरूवात त्यांनी त्यांच्या वयाची चाळीशी सरल्यावर केली आहे.
परदेशी शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी मॅक्सनॅन मुंबई आणि उपनगरातील विविध महाविद्यालयांना भेटी देऊन सेमिनार्स आयोजित करतात. त्यातून अनेक मुले परदेशी शिक्षण घेण्याची तयारी दाखवू लागले आहेत. माहितीचा अभाव दूर झाला की अनेकांना संधी मिळू शकतात आणि ह्या क्षेत्रातील हाच अभाव दूर करण्याचा प्रयत्न मॅक्सनॅन आणि त्यांची टीम करत आहे.