प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीवरून गेल्या काही वर्षांपासून भारतातील वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येची मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी, असा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठाने एकमताने हा निर्णय दिला. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झालीही असेल (हा मजकूर लिहीत असताना तो सोहळा दोन दिवसांवर आहे). देशात जानेवारी महिन्यात, पौष मासात दिवाळी साजरी होईल. भारतीय जनता पार्टीने हा सोहळा आपल्याच पक्षाचा केला असल्याचे आणि त्याचा पुरेपूर राजकीय फायदा तो पक्ष उठवीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत.
वास्तविक चैत्र शुद्ध नवमी रोजी रामनवमी या दिवशी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशा भावना हिंदू बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हा मुहूर्त मुक्रर करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे बांधकाम असंख्य करसेवकांनी उद्ध्वस्त करून रामजन्मभूमी मंदिराचा पाया रचला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरसिंह भंडारी यांना त्या दिवशी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की बाबरी मशीद उद्ध्वस्त कुणी केली. तेव्हा त्यांनी भाजपचे नेते म्हणून सरळ सरळ हात वर केले आणि ‘नहीं, वह बीजेपी के नहीं थे, आरएसएस के नहीं थे, बजरंग दल के नहीं थे, व्हीएचपी के नहीं थे,’ असे उद्गार काढले. फिर वह कौन थे? असा पुढचा प्रश्न येताच त्यांनी, ‘शायद शिवसेना के होंगे’ असे सांगितले. तेव्हा एकाच वाघाने डरकाळी फोडली ते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. ‘जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा गर्व आहे, अभिमान आहे,’ असे बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले. धर्मवीर आनंद दिघे यांनी यावर आधारित एक दिनदर्शिका प्रकाशित केली, परंतु त्यावर बंदी घालण्यात आली.
राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत रामलल्लाच्या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. नरसिंह राव यांच्या कारकीर्दीत बाबरी धराशायी झाली. तेव्हाचे औरंगाबादचे माजी महापौर, शिवसेनेचे माजी खासदार मोरेश्वर सावे यांच्यासह हजारो शिवसैनिक स्वयंसेवक संघाच्या करसेवकांनी अयोध्या गाठून कामगिरी फत्ते केली होती. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीसुद्धा पोहोचले होते. राम रथयात्रेचे मुख्य सूत्रधार लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, विनय कटियार आदी असंख्य महानुभाव तिथे होते.
बाबरीवर पोहोचणारे कुणाच्या नियंत्रणात नव्हते. नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की यांना रोखा तेव्हा ‘ये सुननेवाले नहीं, रूकनेवाले नहीं, वे मराठी में बोल रहे हैं’ असे ऐकू येत होते. प्रमोद महाजन यांना गळ घालण्यात आली. यावेळी अयोध्येत ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक, छायाचित्रकार मोहन बने घटनास्थळी होते. त्यांनी याचि देही याचि डोळा संपूर्ण घटनाक्रम टिपला. तानपाठक यांनी चक्षुर्वैसत्यम वृत्तान्त दिला. मोहन बने यांनी संपूर्ण घटना कॅमेर्यात टिपली.
अयोध्येचा खटला २०१९पर्यंत चालला. शिवसेनाप्रमुखांच्या संपादकत्वाखालील दैनिक ‘सामना’मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून सुमारे २५ वर्षे सेवा बजावणारे संजय डहाळे (मार्मिकचे विद्यमान नाट्य समीक्षक)यांना लखनौ येथे न्यायालयात सीबीआयने पाचारण केले. सीबीआयचे अधिकारी डहाळे कार्यवाह असलेल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या चोगले हायस्कूलमध्ये समन्स बजावण्यासाठी येऊन पोहोचले. एका दिवसात लखनौ येथे पोहोचणे शक्य नाही हे स्पष्ट करून डहाळे यांनी सीबीआयला सहकार्य केले.
अंबरनाथ येथील ज्येष्ठ पत्रकार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजित म्हात्रे हेसुद्धा सहा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत करसेवेसाठी पोहोचले होते. मी त्यांना निष्ठावंत करसेवक काँग्रेसवाला म्हणून बोलत असे. दुर्दैवाने त्यांचे काही वर्षांपूर्वी देहावसान झाले. ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांचा बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर जाहीर सत्कार केला होता. आज देशात संपूर्ण श्रीराममय वातावरण निर्माण झाले असताना उदय तानपाठक, संजय डहाळे, मोहन बने, कै. अजित म्हात्रे अशा अनेकांची कुणीही दखल घेतलेली नाही, याची खंत वाटते.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९९०च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ठणकावून सांगितलेली हिंदुत्वाची व्याख्या, ‘महाराष्ट्रात राहतो तो मराठी, गुजरातमध्ये राहतो तो गुजराती, बंगालमध्ये राहतो तो बंगाली या न्यायाने हिंदुस्थानात राहतो तो हिंदू आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे,’ ही मनोहर जोशी यांच्या निवडणूक खटल्यात मुंबई उच्च न्यायालयात मी सादर केली होती, त्यावेळी त्यांची निवड रद्द ठरवण्यात आली. पण ११ डिसेंबर १९९५ रोजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी मनोहर जोशी यांना हिंदुत्वाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्यासह अजय वैद्य, विलास मुकादम, प्रभाकर राणे, संजय डहाळे अशा अनेक पत्रकारांनी आपापल्या परीने यथायोग्य भूमिका निभावल्या आहेत.
अपेक्षाभंगाचे दु:ख नको म्हणून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कारण शरीराला झालेली जखम बरी होऊ शकते पण मनाला झालेली जखम भरून निघत नाही. अपेक्षाभंगाचे दु:ख हेच असते. याचा अर्थ राष्ट्रीय कर्तव्य बजावणार्यांची दखल कुणी घ्यायचीच नाही असा आहे का? स्वत:भोवती आरत्या ओवाळून घेणारे बरेच असतात आणि ते अशावेळी आपले उखळ पांढरे करून घेतात. जे पुढे पुढे करीत नाहीत ते दुर्लक्षित राहतात, उपेक्षित राहतात. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे!
– – –
प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सोमवारी २२ जानेवारी रोजी शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या हस्ते दै. ‘सामना’चे तत्कालीन मुख्य उपसंपादक आणि ‘मार्मिक’चे सध्याचे नाट्य समीक्षक संजय डहाळे, विश्वनाथ नेरुरकर आणि नंदकुमार मोरे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखाप्रमुख अशोक परब यांच्या संकल्पनेतून शिवसेना शाखा क्रमांक १४ आणि ग्राहक संरक्षण कक्ष, उत्तर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पूर्व) येथील वैश्य समाज सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. यातील संजय डहाळे यांना अयोध्येच्या खटल्यात सीबीआयने पाचारण केले होते, तर नंदकुमार मोरे आणि विश्वनाथ नेरूरकर यांनी कर्फ्युच्या वातावरणात दोन करसेवकांना अयोध्येतून परत आणण्याचे दिव्य केले होते.