विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल ऐकून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या सणकला आणि मला न विचारताच काही सत्ताधारी मंत्री आणि नेते यांच्या त्यावरील प्रतिक्रिया घेऊन परतला. त्याच या मुलाखती.
– नमस्कार मुख्यमंत्रीसाहेब.
– मला वाटलंच तू येणार. पंचपक्वान्नांचं भोजन देतो तुला आज.
– नको, मला जेवणात इंटरेस्ट नाही. फक्त तुमची प्रतिक्रिया सांगा.
– हा ‘लोकशाही’चा विजय आहे.
– म्हणजे ‘लोकशाही चॅनल’चा का?
– त्यांचं नाव घेऊ नकोस. त्यांच्यावर बंदी टाकलीय ना आम्ही.
– म्हणजे तुमच्या सरकारांवर, भाजपवर त्यांच्या चुका दाखवून टीका केली की त्यांचा गळा दाबणार का तुमचं सरकार? ते जाऊं द्या… नार्वेकरांचा निकाल तुम्हाला अगोदरच माहीत होता का?
– आता तुम्हाला म्हणून सांगतो. ते कुठल्या तोंडाने आमच्याविरुद्ध निकाल देणार? निकाल मलाच काय, आमच्या त्रिकुटाला, म्हणजे प्रमुख मंत्र्यांना आधीपासूनच माहीत होता. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सेटिंग होतं ना. फक्त निकालाचं शेपूट जितकं लांबवता येईल तेवढं लांबवलं त्यांनी.
– म्हणूनच निकालाच्या अगोदर तुमच्या भाषणांना जोर चढला होता ना. केवढं अघळपघळ बोलत होता तुम्ही. आवाजही चढला होता.
– तसंच काही नाही. मला कॉन्फिडन्स होता.
– सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील प्रमुख मार्गदर्शक सूचनाही तुमच्या नार्वेकरांनी पायदळी तुडवल्या. फक्त एका बाजूची वकिली करण्यात त्यांनी धन्यता मानली असं वाटत नाही तुम्हाला?
– मुळीच नाही. ते किती मोठे आहेत.
– सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठे?
– मला अडचणीत आणू नकोस तू. हा सट्ट्याचा, सॉरी सत्याचा विजय आहे. निघ तू. जा, भेटून ये आमच्या जुळ्या मंत्र्यांना.
– नमस्कार फडणवीस जी. काय वाटतं निकालाबद्दल?
– आम्हाला काय वाटणार? आम्हाला माहीत होता निकाल. मी तर निकाल आमच्या बाजूने लागणार हे आधीच उघड सांगितलं होतं.
– पण सुप्रीम कोर्टाने या निकालाचा बँडबाजा वाजवला तर…
– तर माझा मार्ग मोकळा झाला सीएम होण्यासाठी.
– मग अजितदादांचं काय?
– ते आहेत तिथेच राहतील. दिल्लीचं ऐकावंच लागेल त्यांना.
– त्यांच्याकडेच जातो आहे मी. येतो.
– नमस्कार अजितदादा. आपली काय प्रतिक्रिया?
– मी बचावलो. आता सरकार काही पडत नाही.
– सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या अपीलावर शिंदे गटाच्या विरुद्ध निकाल दिला तर?
– तर शिंदे आणि त्यांचे आमदार जातील. पण त्यामुळे सरकार पडणार नाही. तशी सेटिंगच लावलीय दिल्लीवरून. पाहशीलच तू. आता आणखी काही विचारू नकोस. तू ये आता…
– नमस्कार केसरकर साहेब.
– या या… या गडे नाचूया, या गडे गाऊया राहुलगानऽऽऽ
– त्या नार्वेकरांच्या निकालाचा एवढा आनंद झालाय तुम्हाला?
– काय कमाल केलीय त्यांनी. आज सगळ्या विश्वात त्यांचा आवाज घुमतोय. कौतुकाचा वर्षाव होतोय त्यांच्यावर.
– कसला वर्षाव, राज्यभर निदर्शनं झाली त्यांच्याविरुद्ध.
– त्यापेक्षा बीबीसीने घेतलेली त्यांची दीर्घ मुलाखत ऐकली असतीस तर अशा लघु स्वरूपाच्या शंका उपस्थित केल्या नसत्यास. केवढा मोठा माणूस. सहाशे पानांचं निकालपत्र वाचायचं आणि तेही इंग्रजीतून हे खायचं काम नाही.
– हो ना. केवढा घाम फुटला होता त्यांना. वीसवेळा पाणी प्यायले.
– वीस नाही बारावेळा. पण केवढी परिपक्वता होती निकालात. न्यायमूर्तीसुद्धा एवढा पारदर्शक निकाल देऊ शकत नाहीत.
– खरं आहे. मला पण त्यातलं आरपार नग्न सत्य दिसत होतं.
– अरे पोक्या, तुला काय कळणार आहे त्यांची बुद्धिमत्ता. तुझ्यासारखे सहावेळा मॅट्रिकला बसले नाहीत ते.
– पण अनेकजण शंका व्यक्त करतात की निकालपत्र रेडिमेड होतं. एकतर्फी होतं.
– या आरोपात काही तथ्य नाही पोक्या. नाहीतर त्यांनी दोन्ही बाजूच्या शिवसेना आमदारांना पात्र ठरवलं नसतं.
– अहो, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आता सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल तो ऐकल्यानंतर पायाखालची वाळू सरकेल आता उड्या मारणार्या नेत्यांची.
– पोक्या, मला तुझं हे ब्रह्मज्ञान ऐकायचं नाही. माझ्यापुढे अक्कल पाजळू नकोस. आता मला शून्यात जायचंय. त्यामुळे तू निघ आता…
– नमस्कार ५२कुळे साहेब. तुम्हाला काय वाटतं निकालाबद्दल?
– मी जर नार्वेकरांच्या जागी असतो, तर उद्धव गटाच्या सर्व आमदारांना अपात्र ठरवलं असतं. माझ्यावर मियामीत जुगार खेळल्याचा आरोप करत होते ना. त्याचा सूड घेतला असता मी.
– हे तुम्ही त्या नार्वेकरांसारखंच बोलता. निकालाबद्दल बोला ना.
– बोललो ना. शिवसेनेचे खरे वारसदार नार्वेकरांनी सिद्ध करून दाखवले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. गुडबॉय.
– नमस्कार नार्वेकरजी.
– मी वस्तुस्थितीला धरून निकाल दिलाय. मीच न्यायमूर्तीची भूमिका वठवलीय ना. मग मला कुणाच्या सूचनांची जरूरी नाही.
– असं कसं म्हणता तुम्ही? सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन कुठे केलंय तुम्ही!
– काय करायचं ते मी ठरवीन.
– तरीही निकालाचं मॅनेजमेंट वेगळं होतं म्हणतात, ते खोटं आहे?
– अगदी खोटं. किती पेपरांनी माझी बाजू खरी असल्याचे छापले.
– म्हणूनच लोकांचा विश्वास उडत चाललाय माध्यमांवरचा. कोण खरे कोण खोटे हे कोण ठरवणार?
– मी ठरवतो ना. आमच्या बाजूने लिहिणारे ते खरे आणि विरुद्ध लिहिणारे ते खोटे. झालं समाधान. जा आता.