नेटफ्लिक्स ओटीटी चॅनलवर ‘आर्चिज’ हा चित्रपट गत वर्षात ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर हे स्टार किड्स होते. अभिनय येत नसताना केवळ ‘मोठ्या’ आईवडिलांची मुलं, म्हणून यांना संधी मिळाली अशा स्वरूपाच्या तीव्र प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून समाज माध्यमावर उमटल्या. या चित्रपटाच्या दिग्दर्शक झोया अख्तर यांनादेखील ट्रोल्सचा सामना करावा लागला. या सिनेमाला काही समीक्षकांनी नेपो किड्स फेस्ट असं हिणवलं, ‘बॉयकॉट नेपॉटिझम’ हा हॅशटॅग पुन्हा एकदा ट्रेण्ड करू लागला. या सिनेमाच्या निमित्ताने नेपॉटिझम म्हणजे नक्की काय, या प्रकरणाचा उगम नक्की झाला कुठून आणि घराणेशाहीमुळे हिंदी/मराठी चित्रपटसृष्टीत कुणी कुणी प्रवेश केला, अभिनयाची बोंब असल्यामुळे त्यातील किती जण तोंडावर आपटले आणि किती तरले याचा घेतलेला हा आढावा.
रूढार्थाने ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटातील पहिले नेपो किड आहेत, असं म्हटलं जातं कारण राज कपूर यांनी आपल्या मुलाला सिनेसृष्टीत आणण्यासाठी ‘बॉबी’ या सिनेमाची निर्मिती केली. पण प्रत्यक्षात राज कपूर यांनादेखील सिनेसृष्टीत प्रवेश करताना त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या नावाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला होता. दिग्दर्शक किदार शर्मा याच्याकडे सहाय्यक म्हणून काम केल्यावर राज यांना १९४७ साली किदार शर्मा यांनीच ‘नील कमल’ या चित्रपटात नायक बनण्याची संधी दिली. हा सिनेमा तिकीटबारीवर फारसा चालला नाही. पुढील वर्षी वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी राज यांनी ‘आरके फिल्म्स’ हे बॅनर स्थापन करून ‘आग’ या सिनेमाची निर्मिती केली. राज कपूर हे अत्यंत प्रतिभावान अभिनेते, दिग्दर्शक होते, यात दुमत नाही; पण इतक्या कमी वयात चित्रपटनिर्मिती करून स्वत:ला निर्माता दिग्दर्शक अभिनेता म्हणून लाँच करण्यासाठी त्यांना वडील पृथ्वीराज कपूर यांचा किंवा त्यांच्या नावाचा फायदा झाला नसेल का? कारण, चित्रपट निर्मितीसाठी भरपूर पैसे लागतात. राज कपूरच्या पावलावर पाऊल टाकत शशी कपूर आणि शम्मी कपूर या धाकट्या भावंडांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. ज्याचे वडील किंवा भाऊ चित्रपट क्षेत्रात होते, त्यांना चित्रपटात काम मिळण्याची पहिली संधी त्याही काळी सहज उपलब्ध होती; त्या तुलनेत देशभरातून मुंबईत दररोज दाखल होणार्या शेकडो तरूणांना मात्र सिनेमात काम मागण्यासाठी वणवण भटकत राहावं लागायचं. त्यांना फिल्म स्टुडिओत प्रवेश मिळणंही कठीण होतं.
पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाचा वारसा सांगणार्या राज कपूर यांनी पन्नास आणि साठच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या दोन दशकांत अभिनयाचा वारसा नसलेल्या घरातून आलेल्या अनेक नवीन अभिनेत्यांनी देखील हिंदी सिनेमात उत्तुंग स्थान निर्माण केलं. यात प्रामुख्यानं देव आनंद आणि दिलीप कुमार यांची नावं घेता येतील. या शिवाय पन्नास-साठच्या दशकात गुरूदत्त, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र यांनी कोणत्याही शिफारशीशिवाय बस्तान बसवलं. सत्तरच्या दशकात राजेश खन्नाच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीला पहिला सुपरस्टार मिळाला. गिरगावात चाळीत राहणार्या राजेश खन्नाने एका टॅलेंट स्पर्धेतून सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं होतं. १९६९ ते १९७१ या अवघ्या तीन वर्षांत राजेश खन्नाने तब्बल १५ चित्रपट एकट्याच्या बळावर सुपरहिट करून दाखवले होते. राजेश खन्नाच्या जोडीला त्याचा गिरगावकर मित्र जितेंद्र, आधी व्हिलन आणि नंतर हिरो झालेले शत्रुघ्न सिन्हा आणि देखणा हिरो विनोद खन्ना यांनी सत्तरचं दशक गाजवलं.
सत्तरच्या दशकातील पहिल्याच वर्षात राज कपूरचा बहुचर्चित ‘मेरा नाम जोकर’ बॉक्स ऑफिसवर पडला. राजचं राहतं घर गहाण पडलं. पण कर्जबाजारी झाले असतानाही राजने कपूर घराण्याच्या तिसर्या पिढीतील चिराग, आपला मोठा मुलगा रणधीर याला ‘कल आज और कल’ या सिनेमातून लाँच केलं. दुर्दैवाने हा सिनेमा फारसा चालला नाही. आता आपादमस्तक कर्जात बुडालेल्या राज यांना कर्जातून बाहेर येण्यासाठी एका मोठ्या हिट सिनेमाची गरज होती. ‘बॉबी’ सिनेमाची कमी बजेटमध्ये निर्मिती करताना राजने कोणा मोठ्या हिरोला घेण्याऐवजी घरच्याच ऋषीला ब्रेक दिला. म्हणूनच राजने ऋषीला लाँच केलं हे टेक्निकली खरं असलं, तरी त्यावेळी ऋषीपेक्षा राजलाच तसं होण्याची जास्त गरज होती. ‘बॉबी’ सुपरहिट झाला आणि कपूर घराण्यातील तिसर्या पिढीत एक स्टार उदयास आला. राज कपूरचा समकालीन असलेल्या देव आनंदला मात्र ऋषी कपूरसारखं ब्लॉकब्लस्टर यश आपल्या मुलाला देता आलं नाही. सुनील आनंद अभिनित ‘आनंद और आनंद’ सिनेमा पाहून प्रेक्षकांना आनंद झाला नाही आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून देव आनंदलाही आनंद झाला नाही.
१९७५ सालापासून हिंदी बॉक्स ऑफिसवर ‘बच्चन’ युग सुरू झालं. ‘जंजीर’ सिनेमा हिट होईपर्यंत अमिताभला ११ सिनेमांत काम करण्याची संधी मिळाली होती. त्या काळात फिल्मी परिवाराबाहेरच्या अभिनेत्यांनाही सेकंड इनिंग्ज मिळायची, ही गोष्ट तेव्हाच्या इंडस्ट्रीबद्दल खूप काही सांगून जाते. अशा प्रकारची संधी आजच्या काळात स्टारकिड्स सोडून इतर अभिनेत्यांना मिळेल असं वाटतं नाही. साठ-सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात बस्तान बसविल्यानंतर धर्मेंद्रने स्वत:च्या मोठ्या मुलाला ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात ‘बेताब’मधून लाँच केलं (हीच परंपरा आज सनी देवल त्याच्या दोन्ही मुलांसाठी चालवतोय). राहुल रवैल या राज कपूरच्याच तालमीत तयार झालेल्या हुशार दिग्दर्शकाला सिनेमा दिग्दर्शित करायला दिला. ‘बेताब’ सुपरहिट झाला आणि आणखी एका स्टारकिडची एन्ट्री सिनेसृष्टीत झाली. दोन वर्षांनी राज कपूरने आपला तिसरा मुलगा राजीव याला ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून लाँच करत हॅट्रिक मारली. प्रेक्षकांना त्यात मंदाकिनी इतकी पारदर्शक दिसली की प्रेक्षक हिरोईनचे नितळ रूप पाहायला ते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जात होते. सिनेमा ब्लॉकबस्टर झाला हे वेगळं सांगायची गरज नाही. १९८१ साली सुनील दत्तने ‘रॉकी’ सिनेमा दिग्दर्शित करून त्यातून संजय दत्तला लाँच केलं. सुनीलचा दोस्त आणि व्याही राजेंद्र कुमार याने ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमाची निर्मिती करून आपला मुलगा कुमार गौरव याला लाँच केलं. ‘बेताब’मधून सनीचं पदार्पण यशस्वी करणारे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी कुमार गौरवलाही सुपरहिट एन्ट्री मिळवून दिली.
अभिनेत्रींच्या बाबतीत म्हणाल तर पूर्वी चांगल्या घरातील मुलींना सिनेमात काम करायला परवानगीच नसायची. खुद्द राज कपूरने बबिता, नीतू सिंग या सुनांना लग्नानंतर चित्रपटात काम करायला मनाई केली होती, असं म्हटलं जातं. पण काळाचा महिमा असा की याच राजची नात करिश्मा कपूर हिने १९९१ साली ‘प्रेम कैदी’ सिनेमातून प्रवेश केला आणि ‘राजा बाबू’ सिनेमात ‘सरकाई लो खटीया जाडा लगे’सारखं गाणं पडद्यावर साकारून बॅकलॉग भरून काढला. नव्वदीच्या दशकात तनुजाची मुलगी काजोल, सिनेपोलीस अभिनेते जगदीश राज यांची मुलगी अनिता राज, सुपरस्टार राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला. निर्माते दिग्दर्शक नासिर हुसेन यांचा पुतण्या आमीर खान (‘कयामत से कयामत तक’ १९८८) आणि पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा सलमान खान (‘मैंने प्यार किया’ १९८९) यांनीही हिंदी सिनेमात पदार्पण केलं. विनोद खन्नाने अक्षय खन्नासाठी ‘हिमालयपुत्र’ची निर्मिती केली. मात्र या हिमालयाचा बर्फ काही तासातच वितळला. सिनेमा फ्लॉप झाला तरी अक्षय नंतर टॅलेंटच्या बळावर सिनेसृष्टीत टिकला. सुपरस्टार अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन याने दोन हजार साली ‘रिफ्युजी’ या सिनेमातून पदार्पण केलं, पण पहिला सुपरहिट चित्रपट (‘धूम’ सिनेमा) नावावर लागण्यासाठी अभिषेकला तब्बल १७ सिनेमांची वाट पाहावी लागली. एका हिंदी सिनेमाचे बजेट आजच्या काळात साधारणपणे ५० कोटी ते १०० कोटी इतकं असतं. जेव्हा स्टार किड नसलेल्या नवोदित कलाकाराचा सिनेमा फ्लॉप होतो, तेव्हा त्याला बाहेरची वाट दाखवली जाते. अभिषेक बच्चनला मिळालेल्या भरघोस संधींची श्रीमंती ज्याच्या कुटुंबाचा सिनेमा इंडस्ट्रीशी संबंध नाही अशा नवोदित कलाकारांपैकी कुणाला मिळाली असती का?
अभिनेत्री कंगना राणावतने ‘नेपॉटिझम’मुळे हिंदी चित्रपटात टॅलेंटेड कलाकारांना डावललं जातं, हा मुद्दा ऐरणीवर आणला. फेब्रुवारी २०१७मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात दिग्दर्शक करण जोहरला तिने नेपॉटिझमचा ध्वजवाहक अशी उपमा दिली. हा कार्यक्रम प्रदर्शित झाल्यावर समाजमाध्यमांमधून करण जोहर आणि स्टारकिड्सवर चोहोबाजूंनी टीकाटिप्पणी सुरू झाली. नेपॉटिझम या शब्दाचा अर्थ माहित नसलेले लोकही यात सहभागी झाले. आज या विषयाचा आढावा घेताना नेपॉटिझम या शब्दाचा अर्थ आणि इतिहास समजून घ्यायला हवा. नेपॉटिझम हा मूळ शब्द इटालियन नेपोटिस्मोपासून आला आहे. लॅटिनमध्ये नेपोस म्हणजे पुतण्या. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात कॅथलिक पोप आणि बिशप यांनी लायक उमेदवारांना डावलून पुतण्यांना महत्त्वाच्या पदांवर नेमायला सुरूवात केल्यावर या शब्दाचा उगम झाला, असं म्हणतात. तसं पाहिलं तर मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि अगदी सेवाभावी संस्थांमध्येही नेपॉटिझम अर्थात घराणेशाहीचा बोलबाला आहे. एखादा सुपरस्टार आपल्या मुलाला, नातेवाईकांना स्वत:च्या पैशांनी हिरो/ हिरोईन बनविण्यासाठी चित्रपटनिर्मिती करतो किंवा पालकांच्या नावाला वलय आहे म्हणून एखादा निर्माता बिग बजेट चित्रपटात स्टारकिड्सना मुख्य भूमिका देतो, त्याला नेपॉटिझम म्हटलं जातं.
आपल्या मुलांना संधी मिळवून देण्यासाठी अनेक नामवंत कलाकारांनी आणि निर्मात्यांनी मोठ्या बजेटचे सिनेमे काढले, मोठा गाजावाजा सुद्धा केला; पण, अभिनयाची बोंब असल्यामुळे संधी मिळूनही अनेक स्टारकिड्स यशस्वी होऊ शकले नाहीत. करण शशी कपूर, मिमोह मिथुन चक्रवर्ती, रिंकी राजेश खन्ना, पुरू राजकुमार, फरदीन फिरोज खान, आर्य राज बब्बर, नील नितीन मुकेश, ईशा धर्मेंद्र देवोल यांना वडिलांचा वारसा जपता आला नाही. अनेक स्टारकिड्स वारंवार संधी मिळूनही अपयशी ठरताना दिसतात, तेव्हा खर्या टॅलेंटला डावलून फक्त कुणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून स्टारकिड्सना काम दिलं जाणं हे आमच्यावर अन्यायकारक आहे असं अनेक होतकरू कलाकारांचं म्हणणं आहे.
चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत, पण मुलाला सिनेमात प्रमुख भूमिका मिळवून देता येईल इतका पैसा किंवा प्रभाव नसलेल्या व्यक्तींची मुलं या क्षेत्रात येत असतील, तर त्याला नेपॉटिझम म्हणता येणार नाही. उदा. प्रसिद्ध खलनायक अमजद खान हे अभिनेता जयंत यांचे चिरंजीव. पण अमजद खानला ‘शोले’ चित्रपट वडिलांमुळे नाही मिळाला. पटकथाकार सलीम यांनी अमजदला रंगभूमीवर उत्तम काम करताना पाहिलं होतं. त्यांनीच गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी अमजदचं नाव ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पींना सुचवलं. अनिल कपूरला त्याचे वडील सुरिंदर कपूर हे निर्माते असूनही सिनेमात पदार्पण करण्यासाठी संघर्ष करावा लागला, कारण त्यांचे वडील कर्जात बुडाले होते. अभिनेता गोविंदाचे वडीलही (अरुण आहुजा) एकेकाळचे स्टार, निर्माते होते. तरी सिनेमात काम मिळविण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला.
सिनेमाक्षेत्रातील घराणेशाहीतून आलेले सगळेच वाईट कलाकार नाहीत. एखादा टॅलेंटेड मुलगा प्रसिद्ध अभिनेत्याच्या पोटी जन्माला आला तर त्यात त्याची चूक काय? नेपॉटिझमवर टीका होते तेव्हा हे स्टारकिड्स सांगतात की आम्ही लहानपणापासून आमच्या आईबाबांना आणि त्यांच्या मित्रमंडळींना या क्षेत्रात काम करताना पाहतो आहोत. सिनेसृष्टीचे ग्लॅमर, सिनेमात कमी वयात मिळणारं उत्पन्न यांचं आकर्षण वाटणं स्वाभाविकच आहे. सोनारचा मुलगा सोनार बनू शकतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनू शकतो तर अभिनेत्याचा मुलगा अभिनेता का बनू शकत नाही, असा स्टारकिड्सचा बिनतोड सवाल आहे.
काही अभिनेत्यांची मुलं खरोखरच टॅलेंटेड आहेत. शिवाय आधीच्या पिढीने केलेल्या चुका टाळून, नव्या पिढीचे स्टारकिड्स अभिनय प्रशिक्षण आणि चित्रपटनिर्मितीचा सर्वांगीण अभ्यास करून या क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. अभिनेता हृतिक रोशनने वडिलांच्या कोयला, करन अर्जुन या चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. यामुळेच ‘कहो ना प्यार है’ या पहिल्या सिनेमातील हृतिकच्या अभिनयात नवखेपणा कुठेही दिसला नाही. रणबीर कपूरनेही सिनेमात हिरो म्हणून काम करण्याआधी संजय लीला भन्साळीच्या ‘ब्लॅक’ सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. रणबीरने देखील ‘बर्फी’ ते ‘अॅनिमल’ हा दर्जेदार अभिनयप्रवास करून टॅलेंट सिद्ध केलं आहे.
२०१२ साली ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सिनेसृष्टीतील नेपॉटिझमबद्दल प्रसारमाध्यमांत चर्चा सुरू झाली. याला कारणीभूत होता करण जोहर. राज कपूर आणि सुभाष घई यांच्यानंतर निर्माता दिग्दर्शक करणला हिंदी सिनेमाचा ‘शो मॅन’ म्हटलं जातं. करणने तरूण प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या सिनेमाची भरपूर प्रसिद्धी केली. दिग्दर्शक महेश भटची मुलगी आलिया आणि दिग्दर्शक डेव्हिड धवनचा मुलगा वरूणची सिनेमातील निवड अनेकांच्या डोळ्यांत खुपली. यामुळेच फार गाजावाजा करूनही हा चित्रपट कमाईच्या बाबतीत सेमी हिट कॅटेगरीतच गणला गेला. याच वर्षात निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूरला यशराज स्टुडिओने ‘इश्कजादे’ सिनेमातून लाँच केलं गेलं.
एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी, २००० साली हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन या स्टारकिड्सनी पदार्पण केल्यावर गेल्या २३ वर्षांत नेपॉटिझमची लाटच आली. तुषार जितेंद्र कपूर (‘मुझे कुछ कहना है’ २००१) विवेक सुरेश ओबेरॉय (‘कंपनी’ २००२), इम्रान हाश्मी (महेश भटचा भाचा- ‘फुटपाथ’ २००३), शाहिद पंकज कपूर (‘इश्क विश्क’ २००३), इम्रान खान (आमीर खानचा भाचा- ‘जाने तू या जाने ना’ २००८), श्रद्धा शक्ती कपूर (‘तीन पत्ती’ २०१०) परिणीती चोप्रा (प्रियांका चोप्राची चुलत बहीण- ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ २०११), आदित्य रॉय कपूर (सिद्धार्थ रॉय कपूरचा भाऊ ‘आशिकी-२’ २०१३), टायगर जॅकी श्रॉफ (‘हिरोपंती’ २०१४), जान्हवी बोनी कपूर, सोनम अनिल कपूर, हर्षवर्धन अनिल कपूर, ईशान खट्टर (शाहिदचा सावत्र भाऊ), सारा सैफ अली खान ते अगदी सुहाना शाहरूख खानपर्यंत अनेक स्टारकिड्सना चित्रपटात संधी मिळाली आहे. या सर्वांत रणबीर कपूर, हृतिक रोशन, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, आलिया भट, सारा अली खान आणि जान्हवी कपूर हे यशस्वी झालेले स्टारकिड्स आहेत.
निर्माता करण जोहर सांगतो, स्टार्ससोबत माझे घरगुती संबंध आहेत. यांची मुलं माझ्यासमोर लहानाची मोठी झाली आहेत. मी यांना संधी नाही देणार तर कोण देणार? माझे पैसे मी रेसमधल्या कोणत्या घोड्यावर लावायचे हे मी ठरवणार. बहुतेक निर्माते हेच म्हणतात. काही लहान निर्माते मोठा स्टार काम करणार असेल तर एकावर एक फ्री स्कीम राबवून त्या स्टारसोबत त्यांच्या मुलाला देखील काम देतात. नवीन जोडी हवी अशी कथेची मागणी असते तेव्हा कुणा नवोदित अभिनेत्याला काम देण्यापेक्षा एखाद्या प्रसिद्ध अभिनेता/अभिनेत्रीच्या मुलांना काम दिलं की त्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी तो अभिनेता घरचं लग्न असल्यासारखा राबतो. गावोगावी फिरतो. त्या स्टारची, स्टार मित्रमंडळीही सिनेमाच्या प्रमोशनमधे (पैसे न घेता) सामील होतात. सध्याचं बॉक्स ऑफिस म्हणजे तीन दिवसांचा खेळ. नवोदित अभिनेत्याचं टॅलेंट दिसून माऊथ पब्लिसिटीने प्रेक्षक गर्दी करेपर्यंत सिनेमा सिनेमागृहातून उतरलेला असतो. या तुलनेत नामवंत स्टार्सच्या मुलांबद्दल स्टार्सच्या चाहत्यांना उत्सुकता असते. याचाच फायदा होऊन स्टारकिड्सच्या सिनेमांना चांगलं ओपनिंग मिळेल याची निर्मात्यांना खात्री असते.
या झाल्या जमेच्या बाजू, पण स्टारकिड्स असण्याचे अनेक तोटे देखील आहेत. उदा. पालकांशी तुलना होणं. अभिषेक बच्चनला सिनेसृष्टीत येऊन २३ वर्षे झाली तरी आजही त्याच्या कामाची तुलना अमिताभशी होते. सिनेकुटुंबांचा भाग नसलेल्या अनेक अभिनेत्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत टॅलेंटच्या जोरावर स्थान निर्माण केलं आहे. परंतु, आजही स्टारकिड्सना संधी देण्यासाठी या अभिनेत्यांना डावललं जातं, हेही खरं आहे. याची जाहीर चर्चा केली तर आपल्याला पुढे काम मिळणार नाही, या भीतीने ही मंडळी गप्प बसतात. सुशांतसिंह राजपूतसारखा संवेदनशील अभिनेता एका ठराविक गटाकडून डावललं जाणं सहन करू शकला नाही, असं म्हणतात.
हिंदी सिनेमा स्टार पॉवरवर चालतो. जितका मोठा स्टार तितकी मोठी अदृश्य शक्ती. मराठी सिनेसृष्टीत मात्र हिंदीसारखी स्टार सिस्टीम नाही. त्यामुळे मराठी कलाकारांनी मुलांना मराठी चित्रपटात लाँच करण्याचे प्रकार फार थोड्या प्रमाणात झाले. यात रमेश देव यांनी मुलगा अजिंक्य देव याला (‘सर्जा’ १९८७) ब्रेक दिला. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुलगा आदिनाथ कोठारेला आधी बालकलाकार (‘माझा छकुला’ १९९४) आणि नंतर हिरो म्हणून (‘वेड लावी जीवा’ २०१०), (‘झपाटलेला-२’ २०१३) या सिनेमांत संधी दिली.
एका चर्चेत चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ही सिनेमा मिळाल्यावर आम्हा स्टारकिड्सना काय स्ट्रगल करावा लागतो हे सांगत होती. त्यावर सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला, ‘जिथे आमचं स्वप्न पूर्ण होतं, तिथे या स्टारकिड्सचा स्ट्रगल सुरू होतो. सिनेपरिवाराबाहेरील कलाकारांना कामाच्या अपेक्षेने ऑडिशन देण्यासाठी रोज कास्टिंग डायरेक्टरचे उंबरे झिजवावे लागतात. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी जेव्हा महत्वाचा रोल मिळतो तेव्हा की आमचं स्वप्न पूर्ण होतं. तो सिनेमा चालेल, त्यातून आम्ही स्टार होऊ, या सर्व दूरच्या गोष्टी असतात. ‘आज सोशल मीडियाच्या जमान्यात स्टारकिड्सना जन्मापासून ग्लॅमर अनुभवायला मिळतं. सर्वसामान्य प्रेक्षकांनाही स्टार अभिनेता/ अभिनेत्रीचा मुलगा दिसतो कसा याची उत्सुकता असते. यामुळेच सैफचा मुलगा तैमूर याचे फोटो काढण्यासाठी एखाद्या सुपरस्टारच्या फोटोसाठी जमतील त्याहून जास्त संख्येने पापाराझी फोटोग्राफर गर्दी करतात. लहानपणापासूनची क्रेझ कॅश करण्यासाठी निर्माते मोठ्या कलाकारांच्या मुलांना काम देतात. गेल्या काही वर्षांत जान्हवी कपूर, ईशान खट्टर, सारा अली खान, अनन्या पांडे या स्टारकिड्सनी बस्तान बसवले आहे. तर येणार्या वर्षात, इब्राहिम सैफ अली खान, आर्यन शाहरुख खान, शनाया संजय कपूर यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरलेलं असेल.
इतर क्षेत्रांप्रमाणे नेपॉटिझम हा हिंदी सिनेसृष्टीचा भाग आहे, हे स्वीकारायला हवं. तुमच्यात टॅलेंट असेल तर फार काळ ही इंडस्ट्री तुम्हाला कामापासून वंचित ठेवू शकत नाही. प्रस्थापित कलाकार करायला घाबरतात अशा भूमिका जर नवोदित कलाकारांनी स्वीकारल्या तर सिनेसृष्टी तुम्हाला स्वीकारते, असा इतिहास आहे. अनेक मोठ्या अभिनेत्यांनी नाकारलेला ‘जंजीर’ अमिताभ बच्चन यांना स्टार करून गेला, काही वर्षांनी इतरांनी नाकारलेल्या ‘बाजीगर’ आणि ‘डर’मधल्या खलनायकी भूमिका स्वीकारून शाहरुख खान स्टार झाला. हीच गोष्ट ‘विकी डोनर’सारखा बोल्ड विषय घेऊन सिनेसृष्टीत पदार्पण करणार्या आयुष्मान खुरानाबाबतही बोलता येईल. तुम्ही स्टारकिड नसाल तर तुम्हाला कुणीही बिग बजेट चित्रपटात मुख्य भूमिका देणार नाही, हे खरं असलं तरी कमी बजेटच्या चित्रपटात, लहानसहान भूमिका करत इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, कार्तिक आर्यन, राजकुमार राव, आयुष्मान खुराना हे अभिनेते एक दिवस मोठे स्टार झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘ट्वेल्थ फेल’ या सिनेमाने खूप चांगलं यश मिळवलं. एरवी हीरोच्या मित्राच्या भूमिका वाट्याला येणार्या विक्रांत मॅसीने विधू विनोद चोप्रासारखा मोठा निर्माता दिग्दर्शक पाठिशी उभा राहिला तर आपण काय करू शकतो हे या सिनेमात दाखवून दिलं. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळतंय. या यशामुळे नवीन टॅलेंटेड कलाकारांना उभारी मिळाली आहे. नाकारल्या गेलेल्या संधी, डावललं जाणं या गोष्टी नवोदित कलाकारांनी लक्षात ठेवायला हव्यात. अभिनय करताना तुम्ही जे जगला आहात, जे अनुभवलं आहे ते उपयोगी पडतं. हे जगण्यातील वास्तव पडद्यावर दाखविण्यात स्टारकिड्स कमी पडतात. म्हणूनच अभिनयाचं नाणं खणखणीत वाजणार्यांनी नेपॉटिझमला कदापि घाबरण्याची गरज नाही.