ब्रिटनच्या आरोग्यमंत्री व्हिक्टोरिया अॅटकिन्स पार्लमेंटात म्हणाल्या की ब्रिटीश माणसाचा लठ्ठपणा (ओबेसिटी) ही एक फार चिंताजनक समस्या झालीय आणि त्यावर तातडीनं काही तरी करायला हवं.
ब्रिटनमधल्या ४० टक्के लोकांचं वजन धोक्याची पातळी ओलांडून वर गेलंय आणि २४ टक्के माणसं गलेलठ्ठ (ओबेस) झालीत.
सरकारला चिंता वाटणं साहजिक आहे. वजन वाढलं की मधुमेह, रक्तदाब हे आजार जडतात, हृदयावर ताण पडतो. मधुमेह-रक्तदाब शरीरातल्या इतर व्यवस्थांवर आक्रमण करतात, त्या व्यवस्था बिघडवतात. आंधळेपणा आणि पक्षाघात हे हादरवणारे झटके त्यातून संभवतात.
जाड्या लोकांचं वजन आणि आजार हाताळणं यासाठी समाजाला उपाययोजना करावी लागते, त्याचा भार सरकारी तिजोरीवर पडतो. आधीच तिजोरीला भोकं पडलेली असतात, त्यात ही आणखी नवी भोकं. त्यामुळं आरोग्यमंत्र्याला चिंता वाटणं स्वाभाविक आहे.
माणसांची वजनं का वाढतात हे आता जनतेला चांगलंच माहीत आहे. त्यासाठी वैज्ञानिकाला घनघोर संशोधन करून गंभीर सिद्धांत मांडायची आवश्यकता नाही.
माणसाची जगण्याची शैली हे त्याचं मुख्य कारण आहे. सारं जग शहरी होतेय. सहजा सहजी अंगमेहनत करत जगण्याची शैली अस्ताला गेलीय.
एकेकाळी कारखान्यांत, गिरण्यांत, गोदीत, विमानतळावर, छापखान्यात, गोदामांत, कामगार मेहनत करत असत. आता उत्पादनतंत्रात सुधारणा झाल्याहेत, जागोजागी यंत्रांनी एक तर माणसांना हटवलंय किंवा माणसाची मेहनत संपवलीय. अनेक ठिकाणी तर यंत्रकामगार (रोबॉट) यंत्रासमोर असतात.
माणसं बैठी कामं करू लागलीत. शहरात वाहतूक व्यवस्था विकसित झाल्यात. पाच पंचवीस पावलं येवढंच चालणं. कार, ऑटो, रेल्वे, बस, मेट्रो यांनी जाळं विणलंय.
चालायला नको.
एकेकाळी तीन जिने तरी उतरावे लागत होते. आता जिने चढणं ना इमारतीत ना रेल्वेमधे. लिफ्ट असते, एस्केलेटर्स असतात.
काय करणार अॅटकिन्सबाई?
रेल्वे आणि मेट्रो बंद करणार? पायी पायी पाच किमी चालून वा सायकलनं येणार्या कर्मचार्यांना करातून सूट देणार? कार महाग करणार?
कार महाग करायला निघाले तर कार उद्योग चवताळणार. आज जगात १.४ अब्ज कार आहेत. २०२३ साली कंपन्यांनी सुमारे ७ कोटी कार विकल्या. त्यातून कार उद्योगानं ३ ट्रिलियन डॉलर्सचं उत्पन्न मिळवलं. भारताचं एकूण उत्पादन सुमारे ३.७ ट्रिलियन डॉलर्स आहे. कार उद्योग म्हणजे ८० टक्के भारत. कार म्हणजे करोडो लोकांचा रोजगार.
काय हिंमत आहे कार महाग करायची किंवा कारवर कर बसवायची.
पेट्रोल, डिझेल इत्यादींवर कर बसवून किंवा इतर वाटांनी त्यांचा वापर कमी करायला लावा, असंही लोक सुचवतात. नाही तरी पेट्रोल डिझेलमुळं बेसुमार प्रदूषण होतंच आहे, पृथ्वीची वाट लागलीय, सौर-वारा-हायड्रोजन इत्यादी गोष्टींचा वापर करा, तेलाचा वापर बंदच करा. म्हणजे आपोआप कार इत्यादींचा वापरही कमी होईल.
आता असं पहा की तेल उद्योगाचा जगभरचा महसूल आहे ६.६ ट्रिलियन डॉलरचा. एकटी सौदी अरामको ही कंपनी वर्षाला ६०० अब्ज डॉलर गोळा करते. सौदी पैशावर जगातल्या बँका चालतात. सौदी पैशावर फुटबॉल क्लब आणि क्रिकेटच्या
मॅचेस चालतात. सौदी पैशावर शस्त्रांचा उद्योग चालतो, अनेक देशांची सैन्यं चालतात. अनेक दहशतवादी उद्योगही सौदी पैशावर चालतात.
भारताच्या तिजोरीतले २० टक्के पैसे तेलावरच्या करातून येतात. तेल बंद झालं तर भारत देशच बंद होईल.
आहे कोणाची हिंमत तेल उद्योग बंद करायची?
माणसं केवळ बैठी झाल्यानं जाडी नाही झालीयेत. त्यांचं खाणपिणं हे त्यांच्या जाडेपणाचं मुख्य कारण आहे. जगातल्या सर्व देशांमधे झालेल्या पहाण्यांचा हा निष्कर्ष आहे.
गरीब आणि उपासमार झालेली माणसं जे खातात त्यात प्रोसेस केलेले निकस अन्नपदार्थ असतात. सुखवस्तू आणि श्रीमंत माणसांच्या आहारात तर निकस अन्न पदार्थच जास्त असतात. गोड आणि तळलेले पदार्थ. बहुतेक पदार्थात मिठाचं भरमसाठ प्रमाण.
कॅलर्या भरमसाठ खातात, जीवनसत्व कमी खातात, फायबर कमी खातात. प्रोसेस झालेल्या पदार्थात अनेक घातक रसायनं असतात, अनेक कॅन्सरला आमंत्रण देणारे पदार्थ असतात.
घरात शिजवलेलं अन्न खाणं कमी होत चाललंय. लोकांना वेळच नाहीये. वेळ वाचवायचा कशासाठी तर अधिक पैसे मिळवण्यासाठी.
चपाती-भाकरी; भाजी-पिठलं; आमटी-कालवण; चटणी-कोशिंबिर-शिकरण;
नको.
कारण या गोष्टी घरी हातानं कराव्या लागतात, त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात, त्यांची पूर्वतयारी करावी लागते.
पिझ्झा, वडापाव, नूडल्स, पास्ता, समोसे, वेफर्स, स्नॅक्स, बार, चिक्क्या, बिरयाणी, पफ्स, सँडविचेस.
पाहिजेत.
कारण ते पदार्थ आयते मिळतात. मॉल आणि दुकानात असतात. ते दारात आणून देणार्या कंपन्या आहेत. चालता चालता खाता येतं. टीव्ही-सिनेमा पहाता पहाता खाता येतं. ट्रेनमधे, कारमधे, कुठंही खाता येतं. शिवाय डिसकाऊंट असतात. एकावर एक फुकट.
दोन समोसे घ्या, त्या बरोबर एक फसफस पेयाची बाटली मोफत. फसफस पेयात भरमसाठ साखर, भरमसाठ मीठ किंवा घातक रसायनं. दोन्हींचं सेवन करा आणि पोटाची वाट लावा. पोटाभोवती चरबीचं एक वलय वाढवा.
वापरासाठी जय्यत अन्न तयार करणारा उद्योग. ते साठवणारा दुकानं आणि मॉलचा उद्योग. त्ो पदार्थ पोचवणारा उद्योग. मुख्य म्हणजे ते अन्न तुमच्या आमच्या डोळ्यात आणि डोक्यात उतरवणारा जाहिरात उद्योग. अशी मिळून एक टोळी असते. या टोळीची मिळून किती उलाढाल होते याचा तयार आकडा हाताशी नाही. पण तोही देशाच्या एकूण उत्पन्नाच्या दहा बारा टक्के असू शकेल.
पदार्थ आणि पेय उद्योगाची सांगड टीव्हीशी आहे. टीव्हीची सांगड आयपीएल सामन्यांशी आहे. लाखो करोड रुपयांची उलाढाल क्रिकेट मॅचेस करतात. त्या उलाढालीत सर्वात जास्त उलाढाल टीव्हीवरील जाहिरातींची असते. पदार्थांच्या जाहिराती. अमूक पेय प्या, तमूक पदार्थ खा. भारत पाकिस्तान मॅच असेल तर कित्येक सिनेघरात मॅच दाखवतात. दोन हजार रुपये मॅच.
मॅचच्या काळात पदार्थ आणि पेयं फुकट, हव्वी तेवढी. कितीही समोसे खा, कितीही बाटल्या फसफस पेयं प्या. लोकांना मॅचचं कौतुक असतं की भरमसाठ खायला-प्यायला मिळतं याचं कौतुक असतं? कळत नाही.
मॅचेस खेळवणारे लोक राजकीय पुढारी असतात, ते राजकीय पक्ष चालवतात, त्यांना स्वतःसाठी आणि पक्षासाठी पैसे हवे असतात. त्यांना निवडणुका लढवायच्या असतात, त्यासाठी पैसे लागतात. क्रिकेट मॅच हे एक नामी साधन असतं.
आहे हिंमत हे मॅचचं खूळ बंद करण्याची?
घाम येऊ नये म्हणून घरात एयर कंडिशनिंग करणारी यंत्रं.
कपडे धुण्यासाठी यंत्रं; कपडे वाळवण्यासाठी यंत्रं.
फरशी स्वच्छ करण्यासाठी यंत्रं.
घाम काढण्यासाठी तयार केलेली जिममधली यंत्रं.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी यंत्रं.
वजन कमी करण्यासाठी औषधं आणि पूरक जीवनसत्व-आहार देणारे पदार्थ आणि औषधं.
आहाराचं नियंत्रण कसं करावं ते सांगणारे तज्ञ; ते सांगणार्या कंपन्या.
यंत्रं, सल्ला इत्यादी विकण्यासाठी भरमसाठ जाहिराती.
सांधे काम करत नाहीत. सांधे थिजतात. हाडं आणि स्नायू कुरकूर करतात. योगा करा. योगाचे क्लासेस, योगाच्या संस्था. रामदेव बाबा हा अब्जावधी रुपयांचा उद्योग तर यावरच चालतो.
हे सारं जनतेच्या इच्छेनुसारच तर चालत असतं. जनतेवर कोणी जबरदस्ती केलेली नाही.
उकीडवं बसून कपडे धुता येतात. कपडे पिळणं हा एक मनगटाचा आणि पंजाचा व्यायाम. कणीक मळणं हाही एक व्यायाम. कपडे हात वर करून वाळत घालणं. येवढंसं तर घर असतं. खाली वाकून, उकीडवं बसून फरशी पुसता येते. किती साध्या गोष्टी.
मूल असतं. ते आपल्याला घोडा घोडा करायला लावतं, रांगायला लावतं. ते थोडं मोठं झालं की त्याचा सदरा धरून झुकझुक गाडी करायला लावतं, लंगडी घालायला लावतं, धावायला लावतं. या गोष्टी आपण करायच्या नाहीत, त्या करण्यासाठी शाळा काढायच्या, तिथं प्रशिक्षण दिलेली माणसं नेमायची.
आपण फक्त पैसे मिळवायचे. मिळवलेले पैसे ढिम्म बसून रद्दड खाण्यावर खर्च करायचे. नंतर कंबरेभोवती वाढलेली वळी कमी करण्यासाठी मिळवलेले पैसे जिमवर किंवा योगा क्लासवर किंवा हेल्दी फूड्स नावाच्या फालतूगिरीवर खर्च करायचे.
हे सारं आपण का करतो? आपण का थांबवू शकत नाही?
अनैसर्गिक जगण्याची सवय झालीय. आळस आणि रद्दड आहाराची चटक लागलीय. आपण असे जगतो म्हणूनच तर उद्योग चालतात आणि त्या उद्योगांच्या मेहेरबानीवर राजकीय पक्ष आणि सरकारं चालतात.
अॅटकिन्सनी चिंता व्यक्त केली पण उपाय सुचवले नाहीत.
आरोग्यमंत्री अॅटकिन्स यांचे पती एका साखर कंपनीचे कारभारी संचालक आहेत.
अवघड आहे राव.