मला चांगली बायको मिळावी यासाठी काही आराधना किंवा उपासना सुचवू शकाल का?
– विशाल निगुडकर, राजापूर
पण मुली चांगला नवरा मिळावा म्हणून आराधना किंवा उपासना करतात, त्याचं काय कराल? (पण एक मात्र खरं… आपल्या गुणांवर, रूपावर, कर्तृत्वावर भाळून आपल्याला चांगली बायको मिळणार नाही, हे खुलेआम कबूल करण्याचा गुण एखाद्या मुलीला आवडला तर मिळेल तुम्हाला चांगली बायको!)
आईवडील सतत माझ्यावर डाफरत असतात आणि त्याबद्दल विचारलं की म्हणतात, आम्हाला तुझी काळजी आहे म्हणून बोलतोय. काळजी अशीच व्यक्त करायला लागते का?
– समीर प्रारब्धे, पुणे
आई-वडिलांनी मुलावर डाफरणं चुकीचं आहे. मुलाला लाथाच घालायला हव्यात. (आमच्या लहानपणी आईबाबा अशीच काळजी व्यक्त करायचे. वाटल्यास तुमच्या आईबाबांना विचारा.)
लोक पत्रिकेत लग्नाचा मुहूर्त लिहितात आणि मुहूर्ताच्या वेळी नेहमी मुलीचे मामा मुलीला घेऊन या, हेच चालू असतं… मग मुहूर्त धरायचे तरी कशाला?
– श्रीकांत पासलकर, जुन्नर
एवढाही धीर धरवत नाही? मग लग्न करायचं कशाला, लिव इन मध्ये राहायचं. मामा-बीमा, मुहूर्त वगैरे कसली काही गरज नाही… मुलगी मिळाली की डायरेक्ट सुरू करायचं… लिव्ह इनमध्ये राहायला हो!)
संतोषराव, नव्या वर्षासाठी काही संकल्प केलात की नाही?
– बबन ढेपे, यवतमाळ
नवीन वर्षाचा संकल्प कोणाला सांगायचा नाही असा संकल्प केला आहे. (उगाच लोक नजर लावतात आणि संकल्प अर्धा राहतो. आता तरी संकल्प पुरा होतो का बघतो आणि पुढच्या वर्षी सांगतो.)
अॅरेंज्ड मॅरेज करणार्यांना नंतर असं वाटत नसेल का कधी की यापेक्षा तो दुसरा जोडीदार पत्करला असता तर बरं झालं असतं?
– सीमा भादवे, कोपरखैरणे
तुम्हाला तसं वाटतंय वाटतं. आपल्यासारखे किती जण आहेत हे चेक करताय का? (कबूल करणारे खूप असतात. त्या त्यापेक्षा पदरी पडलेलं पवित्र करून घेणारे जास्त असतात.)
मला सांगा संतोषराव, रस्त्यावरच्या एखाद्या कारसमोर उभे राहून फोटो काढून घेऊन तो फेसबुकवर टाकल्यावर लोकांना काय आनंद मिळतो?
– रोहिणी गोंधळेकर, माहीम
तुम्हाला पण तसा आनंद मिळवायचा आहे वाटतं. तुम्ही पण घ्या तो आनंद… काढा फोटो (फक्त फेसबुकवर टाकण्याआधी एकदा चेक करून बघा. आपण त्या गाडीचे मालक वाटतोय का ड्रायव्हर वाटतोय.)
‘मी तुझ्याकडे कायम मित्र म्हणून पाहिलं’ या वाक्यापेक्षा अधिक घायाळ करणारं वाक्य तुम्ही कधी ऐकलं आहे का?
– प्रेरणा पतंगे, सावरगाव
‘माझ्याशी लग्न करशील का?’ हेच ते वाक्य. हे वाक्य ऐकल्यावर घायाळ होऊन ज्यांनी लग्न केलंय त्यांना विचारा घायाळ होणं काय असतं ते!
सांगा संतोषराव, कोंबडी आधी की अंडे?
– संजय क्षीरसागर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव
आधी अंडं… (खोटं वाटत असेल तर कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊन ऑम्लेट आणि चिकन अशी ऑर्डर द्या. बघा आधी काय येतं…) संजयराव, सोडा असले प्रश्न. पुढ्यात काय वाढलय ते बघा ना… आयुष्यात!
घरात व हॉस्पिटलमध्ये प्राण सोडलेल्या माणसांचे आत्मे स्मशानातच का राहतात? घरात का राहात नाहीत?
– वासुदेव बाबर, शेंडुंग
स्मशानात राहिल्यावर आत्म्याला माणसात राहिल्यासारखं वाटत असेल (नाटकातलं टाळ्यांचं वाक्य बोललोय. अशा प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आध्यात्मिक बाबा नाही हो साहेब!)
शेअर बाजारात खूप पैसे कमावायचे आहेत मला. तुम्ही सांगा, कोणता शेअर घेऊ?
– प्रथमेश सोनार, सांगली
मला शेअरमधलं कळतं हे तुम्हाला कोणी सांगितले ते आधी सांगा (शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला मी क्रॉफर्ड मार्केटला गेलो होतो, हे कोणाला तरी कळलं असावं. हे प्लीज आपल्यात ठेवा). ज्याला शेअरमधलं कळतं अशा ‘अडाणी’ माणसाला विचारा. माझ्यासारख्या ‘हुशार’ माणसाला विचारून काही फायदा नाही.