ओटीटीच्या प्रेक्षकांना २०२३मध्ये विविध विषय पाहायला मिळाले आणि त्यातल्या काहींना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खास ‘मार्मिक’च्या वाचकांसाठी यातल्याच काही निवडक हिंदी वेबसिरीजचा आढावा.
– – –
नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन यांसारखी ओटीटी माध्यमे भारतात येऊन आता पाच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. भारतीय प्रेक्षकही या माध्यमांवर येणार्या निरनिराळ्या कथानकांना सरावला आहे. ओटीटीच्या प्रेक्षकांना २०२३मध्ये विविध विषय पाहायला मिळाले आणि त्यातल्या काहींना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खास ‘मार्मिक’च्या वाचकांसाठी यातल्याच काही निवडक हिंदी वेबसिरीजचा आढावा.
ट्रायल बाय फायर (नेटफ्लिक्स)
या वर्षाच्या अगदी सुरुवातीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सिरीजवर प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही कौतुकाचा वर्षाव केला. १९९७मध्ये दिल्लीतील उपहार चित्रपटगृहात मॅटिनी शोला ‘बॉर्डर’ हा लोकप्रिय चित्रपट पाहण्यासाठी जमलेले ५९ प्रेक्षक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर कित्येक जण जखमी झाले. या दुर्घटनेत आपली दोन्ही मुलं गमावणार्या नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती या जोडप्याने न्यायासाठी जो लढा उभारला, त्या संघर्षावर ही सिरीज आधारित आहे. राजश्री देशपांडे या मराठी अभिनेत्रीने दक्षिण भारतीय नीलम कृष्णमूर्ती यांच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे. या सिरिजमधील अभिनयासाठी तिला नुकताच सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. अभय देओल, आशीष विद्यार्थी, अनुपम खेर अशा इतरही अभिनेत्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक बाबीतही ही सिरीज उजवी ठरली आहे. त्यामुळे केवळ याच वर्षी नव्हे तर एकूणच भारतीय ओटीटीच्या इतिहासातील ही एक महत्वाची सिरीज म्हणता येईल.
कोहरा (नेटफ्लिक्स)
‘पाताल लोक’ आणि ‘उडता पंजाब’ सारख्या वास्तववादी कथा लिहिणार्या सुदीप शर्मा आणि गुंजित चोप्रा यांची ‘कोहरा’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत राहिली. रणदीप झा यांच्या प्रभावी दिग्दर्शनाने त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. पंजाबच्या पार्श्वभूमीवर एका परदेशी युवकाच्या खुनाच्या तपासादरम्यान उलगडणारे जटील मानवी नातेसंबंध या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहेत. सुविंदर विकी या अभिनेत्याने बलबिर सिंग ही पोलिसाची व्यक्तिरेखा दमदारपणे साकारली आहे. त्याला बरून सोबती या गुणी अभिनेत्याने तोलामोलाची साथ दिली आहे. पंजाबमधील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी प्रभावीपणे दाखवण्यात सिरीजला यश आलं आहे. याशिवाय छायाचित्रण, संकलन अशा तांत्रिक बाबतीतही सिरीजने लक्षवेधी कामगिरी केली आहे. कथा आणि पटकथा यासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावण्यातही सिरीजला यश आलं आहे.
स्कूप (नेटफ्लिक्स)
एका महिला पत्रकाराच्या आयुष्यातील संघर्ष दाखवणारी ‘स्कूप’ ही वेबसिरीज यावर्षी चांगलीच गाजली. लोकांना सपाट बातमी नकोय तर सनसनाटी बातमी हवीय आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची पत्रकारांची तयारी असायला हवी हा अलिखित नियम झाला आहे. अशाच बदलत्या पत्रकारितेची कथा ‘स्कूप’मध्ये दाखवण्यात आली आहे. ‘स्कॅम’ या लोकप्रिय सिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली आहे. करिश्मा तन्ना या हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्रीने आत्मविश्वासाने भारलेली आणि नंतर तितकीच खचलेली महिला पत्रकार ताकदीने उभी केली आहे. गुन्हेगारी जगत आणि पोलिसांमधले लागेबांधे, पत्रकारांना बातम्या मिळवण्यासाठी कराव्या लागणार्या खटपटी, जेलमधील कच्च्या कैद्यांची होणारी दुरवस्था अशा अनेक गोष्टी सिरीजमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आल्यात. प्रेक्षकांना पत्रकारितेचे जग जवळून दाखवण्यात आणि सवंग पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात ‘स्कूप’ यशस्वी ठरली आहे.
जुबली (अॅमॅझॉन प्राईम)
हिंदी चित्रपटसृष्टीतील १९४०च्या दशकातील एका स्टुडिओची कथा सांगणारी ‘जुबली’ ही वेबसिरीज यावर्षी तांत्रिकदृष्ट्या अव्वल मानली गेली. दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, ध्वनिमुद्रण असे अनेक तांत्रिक पुरस्कार या सिरीजने पटकावले. उडान, लुटेरा आणि सेक्रेड गेम्सचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी पुन्हा एकदा दिग्दर्शनात ठसा उमटवला. ४०च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीचा, तिथल्या लोकांचे हेवेदावे, अहंकार, ईर्ष्या यांचा परिणामकारक वेध या सिरीजमध्ये घेण्यात आला आहे. १९४७ मधील फाळणीच्या जखमा, त्यामुळे समाजामध्ये झालेले राजकीय, आर्थिक बदल, आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडलेला प्रभाव, अमेरिका-रशिया अशा बलाढ्य राष्ट्रांचा हस्तक्षेप असे बरेच बारकावे दाखवण्यात सिरीज यशस्वी झाली आहे. सिद्धांत गुप्ता आणि वामिका गब्बी या तरुण अभिनेत्यांनी दमदार अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दहाड (अॅमॅझॉन प्राईम)
राजस्थानमधील बेपत्ता झालेल्या अनेक तरुणींच्या खुनाचा मागोवा घेणारी ‘दहाड’ ही सिरीज तेथील सामाजिक व्यवस्थेवर बोट ठेवते. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचं गायब होणं आणि त्यांचा शोध घेण्यात त्यांच्या नातेवाइकांनी आणि पोलिसांनी दाखवलेली अनास्था याचं वास्तववादी चित्र रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी उभं केलं आहे. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा यांचा प्रभावी अभिनय आणि परिणामकारक संवाद यांचा सिरीजच्या यशात मोठा वाटा आहे. याशिवाय सामाजिक विषमता आणि स्त्री-पुरुष वर्चस्ववाद यावरही सिरीजमध्ये परखड भाष्य केलं गेलं आहे.
काला पानी (नेटफ्लिक्स)
नावीन्यपूर्ण विषय आणि अंदमान-निकोबारसारख्या अपरिचित ठिकाणी घडणार्या विलक्षण घटनांमुळे ‘काला पानी’ ही वेबसिरीज प्रेक्षकांना एक असाधारण अनुभव देण्यात यशस्वी ठरली. भारतीय वेबसिरीजमध्ये अशा प्रकारचे कथानक अपवादानेच पाहायला मिळते. एका जीवघेण्या विषाणूमुळे एका बेटावर अडकून पडलेल्या पर्यटकांची ससेहोलपट पाहताना प्रेक्षक भयचकित होतात. टीव्हीएफसारख्या हलक्याफुलक्या विनोदी बाजाच्या कथा लिहिणारे विश्वपती सरकार, समीर सक्सेना आणि अमित गोलानी यांनी असा धाडसी विषय हाताळणे आव्हानात्मक होते. परंतु लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर त्यांना यश मिळाल्याचे दिसून येते.
द रेल्वे मेन (नेटफ्लिक्स)
भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांची आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी प्राण पणाला लावणार्या रेल्वे कामगारांची कथा सांगणारी ‘द रेल्वे मेन’ ही सिरीज प्रेक्षकांना एक थरारक अनुभव देण्यात यशस्वी ठरली. केके मेनन आणि आर. माधवन या अनुभवी अभिनेत्यांना बाबिल खान आणि दिव्येन्दू शर्मा या तरूण अभिनेत्यांनी उत्तम साथ दिली. यशराज या नामांकित निर्मितीसंस्थेचं ओटीटीवरील हे पहिलंच काम आहे. तरीही जगातील सर्वात विध्वंसक औद्योगिक दुर्घटना मानली गेलेली ‘युनियन कार्बाईड’ या बहुराष्ट्रीय कंपनीतून झालेली वायुदुर्घटना दाखवतांना त्यांनी विषयाचा सखोल अभ्यास केल्याचं दिसून येतं. महाकाय कंपन्यांचा निष्काळजीपणा सामान्य जनतेच्या जिवावर कसा बेतू शकतो हे या सिरीजमध्ये प्रभावीपणे दाखवलं गेलं आहे. दुर्घटनेच्या काळरात्री कसलीही साधनसामग्री हाताशी नसतांना हजारो भोपाळवासीयांचा जीव वाचवणार्या ‘रेल्वेमेन’चं अविश्वसनीय साहस या सिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आलं आहे.
फर्जी (अॅमॅझॉन प्राईम)
‘फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेबसिरीजचे लेखक दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही सिरीज बनावट चलनाच्या विषयावर आधारित आहे. शाहिद कपूरने साकारलेल्या ‘सनी’ या पात्राची सुर्रुवातीला नाईलाज म्हणून आणि नंतर पैशाचा हव्यास म्हणून बनावट चलनाच्या चक्रव्यूहात अडकण्याची कथा या सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. केके मेनन, विजय सेतुपती, झाकीर हुसैन, भुवन अरोरा, अमोल पालेकर, राशी खन्ना अशा अनेक अभिनेत्यांच्या उत्तम कामगिरीने सिरीज प्रेक्षणीय झाली आहे. प्रेम, मैत्री, पैशाची हाव, विश्वासघात आणि वेधक अॅक्शनदृश्ये अशा विविध भावभावनांची सरमिसळ या सिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते.
गन्स अँड गुलाब्स (नेटफ्लिक्स)
राज आणि डीके यांचीच गुलाबगंज या काल्पनिक ठिकाणी घडणारी ही सिरीज त्यातील अतरंगी व्यक्तिरेखा आणि कथानकाच्या विनोदी रचनेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. राजकुमार राव, दुलकर सलमान, आदर्श गौरव आणि गुलशन देवय्या यांच्या मनोरंजक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ९० च्या दशकात घेऊन गेल्या होत्या. खासकरून गुलशनची ‘चार कट आत्माराम’ ही व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय झाली. या सिरीजमध्ये दिवंगत सतीश कौशिक यांचीही एक धमाल भूमिका पाहायला मिळाली. अफूच्या तस्करीवर आधारित कथानक विनोदी बाजाने मांडणे राज आणि डीके यांच्यासाठी आव्हानात्मक होतं आणि यात ते यशस्वी झाले. नेटफ्लिक्सने नुकतीच केलेली दुसर्या सीझनची घोषणा या सिरीजच्या यशाची पावती म्हणता येईल.
सास, बहू और फ्लेमिंगो (डिस्नी हॉटस्टार)
टीव्हीवरील मालिका आणि ओटीटीवरील वेबसिरीज यांच्यातील फरक ठळक करणारी ‘सास-बहू’ विषयावरील कथा या सिरीजने प्रेक्षकांसमोर आणली. एकमेकींवर कुरघोडी न करता एकत्र मिळून स्वतःचं साम्राज्य निर्माण करणार्या जगावेगळ्या सासू-सुना या सिरीजमध्ये दाखवल्या गेल्या आहेत. राजस्थानमधील एका छोट्याशा खेड्यातून स्वत:चा एक खास अमली पदार्थ जगभरात वितरित करणारी सासू-सुनांची टोळी कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच या सिरीजचं वेगळेपण आहे. डिंपल कपाडिया, ईशा तलवार, अंगिरा धर, राधिका मदन या अभिनेत्रींनी त्यांच्या धीट व्यक्तिरेखा आत्मविश्वासाने साकारल्या आहेत. याशिवाय सिरीजमधील आव्हानात्मक असणार्या अॅक्शनदृश्यांतही त्यांनी प्रभाव पाडला आहे. राजस्थानच्या उजाड वाळवंटात साम्राज्य उभं करणार्या आणि ते समर्थपणे चालवणार्या सक्षम स्त्री व्यक्तिरेखा पाहणे हा एक नावीन्यपूर्ण अनुभव आहे. त्यामुळेच काहीतरी वेगळं पाहण्यासाठी उत्सुक असणार्या प्रेक्षकांसाठी ही वेबसिरीज एक पर्वणी ठरली आहे.