□ मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही – जरांगे यांनी स्पष्टच सांगितले.
■ कोणाचा आहे? आम्ही पण स्पष्टच विचारतो…
□ देशाला पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजपचा डाव – राहुल गांधी यांनी तोफ डागली.
■ देश गुलामगिरीत जायला अत्युत्सुक आहे, असंच न्यूज चॅनेल आणि गोदी मीडियावरचा उन्माद पाहिल्यावर वाटू लागतं पण राहुलजी!
□ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारभाराचे भाजपने काढले वाभाडे.
■ और लडो, खत्म कर दो एक दूसरे को!
□ ७० हजार आशा स्वयंसेविका बेमुदत संपावर.
■ त्यांचीही या सरकारने निराशाच केली तर…
□ मुख्यमंत्र्यांच्या मित्राशी वॉर; राधेश्याम मोपलवार यांनी वॉररूम सोडला…
■ उपयोग संपला की अडगळीत फेकले जातातच लोक.
□ दहिसरमधील मुरबाळीदेवी जलतरण तलावाची दुरवस्था – शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने.
■ त्याच तलावात पोहायला लावलं पाहिजे संबंधितांना!
□ गोरगरीबांचा रोजगार जाणार; कंत्राटी स्वच्छता उपक्रमाला शिवसेनेचा विरोध.
■ कंत्राटी सरकारकडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची?
□ जुहू, कुलाबा, बीकेसीत सर्वात खराब हवा.
■ पण श्वास घेणं तर बंद नाही करता येणार ना?
□ मुंबईत रस्ते धुण्यासाठी साडेतीनशे टँकर.
■ अजून किती पाहिजे विकास?
□ दुसर्याचे श्रेय लाटण्याची भाजपची जुनीच खोड – अंबादास दानवे यांनी सादर केली आकडेवारी.
■ निर्लज्जांना त्याने काही फरक पडेल का दानवे साहेब?
□ नोकर्या महाराष्ट्रात, भरती परप्रांतीयांची; आयकर विभागातील १२००पैकी केवळ तीन पदे मराठी तरुणांना.
■ आता पुन्हा मार्मिकमध्ये वाचा आणि थंड बसा म्हणून याद्या छापाव्या लागतील सगळ्या केंद्रीय विभागांमधल्या भरतीच्या!
□ ‘दामोदर’चे मिनी थिएटर करू नका- कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत.
■ जे ठरलं असेल, तेच होणार… शेठजींचं राज्य आहे, कलाकारांचं नाही!
□ एसटी बँकेचे संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालपट्टी.
■ अरेरे, या निर्णयामुळे काही (अव)गुणवंतांवर फार अन्याय झाला म्हणे!
□ मंत्रालयातील विजेची उधळपट्टी सोलर पॅनल रोखणार; एनर्जी ऑडिट सुरू.
■ बाकीची उधळपट्टी, दालनांची नव्याने मांडणी, सजावट वगैरेचं काय?… अस्वलाने मिशा भादरल्या तर त्याचं वजन कमी होतं का?
□ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न.
■ काय करतील बिचारे! ही वेळ आणणार्यांनाही कधीतरी भोगावंच लागेल!
□ रायगडच्या पाच तालुक्यांत कोरोना शिरला.
■ आता जनतेला कुटुंब मानणारं सरकार आणि मुख्यमंत्री नाहीत सत्तेत… काळजी घ्या!
□ वादग्रस्त सचिन बोरसेंच्या हाती कळव्याच्या चाव्या.
■ त्या नावालाच, करविते धनी कोण, ते महत्त्वाचं.
□ ईडीच्या आरोपपत्रात प्रथमच प्रियंका गांधी यांचे नाव.
■ जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसं क्रौर्य वाढत जाईल…
□ ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवून टाकली पाहिजे – उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
■ काही मेंदू आणि संवेदना गहाण ठेवलेल्या लोकांना भीतीच गोड वाटू लागली आहे उद्धवजी! आधी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.
□ दिल्ली दरबारात मराठी माणसाचा पदोपदी अपमान- सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना टोला.
■ ते सोयीने विदर्भाचे आहेत, सोयीने महाराष्ट्राचे आहेत, सोयीने दिल्लीचेही आहेत… त्यांचा काही अपमान होत नाही सुप्रियाजी… तो मानण्यावर असतो!
□ महाराष्ट्रात येणारा टेस्ला प्रकल्पही गुजरातला पळवला.
■ सुरू करून दाखवा म्हणजे झालं…
□ मोदी सरकारने चिन्यांपुढे गुडघे टेकले; १९६२च्या युद्धातील हीरो मेजर शैतान सिंह यांचे स्मारक तोडले.
■ मोदीजी लाल डोळे दाखवतात, तेव्हा चिनी मंडळी गाढ झोपलेली असतात बहुतेक… जागे असते तर जाम घाबरले असते… विश्वगुरूंचा वचकच केवढा आहे!
□ शिंदे गट शंभर टक्के भाजपमध्ये विलीन होणार – विजय वडेट्टीवार यांचा दावा.
■ आता दिल्लीश्वरांच्या चरणी विलीन आहेच की.
□ कोरोनाचा उच्छाद सुरू असतानाच मिंधेंचा ५ जानेवारीला माणगावमध्ये ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम; ७५ हजार नागरिकांची गर्दी होणार.
■ त्यांच्यासमोर लोकांना घरात बसायच्या सूचना देऊन स्वत: राजकारणासाठी इव्हेंट आणि रोड शो करत फिरणार्या महानेत्यांचे आदर्श आहेत.
□ गुजरातच्या एसटीतून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी.
■ बघा, सगळंच काही गुजरातला जात नाही… काही गोष्टी गुजरातहूनही येतात की महाराष्ट्रात!