थॉमसला ना नफा वाढवण्याची आस ना तोट्याची चिंता. थॉमस एक संतपुरुष होता. आपल्या मालकाला मरेपर्यंत साथ देणारे बाप्तिस्त आणि विष्णू त्याचे कुणी सगेसोयरे नव्हते. परिस्थितीने एकत्र आणलेले व नियतीच्या हातात दोर्या असलेले कठपुतळीची पात्रे जणू. आपल्या जीवनाच्या रंगभूमीवरची आपली भूमिका निभावून वेळ येताच एक्जिट घेतलेले निष्पाप जीव.
– – –
स्थळ : थॉमसचे बार आणि रेस्टॉरंट.
वेळ : सकाळी साडेआठची.
काळ : साध्या भंगारवाल्याचा ‘मेटल अँड ओल्ड पेपर मार्ट’ होण्यापूर्वीची…
गोव्यातल्या त्या गावात माझ्या ब्रांचसमोरच रस्ता ओलांडला की थॉमसचे बार आणि रेस्टॉरंट होते. थॉमसच्या हॉटेलमध्ये नेहमीची चार दोन गिर्हाईके चकाट्या पिटत बसली होती. रात्री जास्त झाल्यावर सकाळी उतारा म्हणून घ्यायला आलेली!
कॅश काऊंटरच्या बाजूलाच एक खूप जुना पोर्तुगीजांच्या काळातला फ्रीज होता. वरच्या डीप फ्रीझरच्या भागात रात्रभरात भरपूर बर्फ साठायचा. बर्फाच्छादित डोंगरासारखा तो फ्रीज दिसायचा. त्यामुळे फ्रीजचा दरवाजा उघडता यायचा नाही. तिथला बाप्टिस्ट नावाचा वेटर मग गरम पाणी आणून त्या बर्फावर फेकायचा. नवख्या माणसाला फ्रीजला आंघोळ घालणं चालू आहे असे वाटायचे. दर दिवशी सकाळी हे नयनरम्य दृश्य दिसायचे!
शेवटी एकदाचं हे फ्रीज स्नान आटोपले की गिर्हाईकांना भिडायला बाप्टिस्ट मोकळा व्हायचा! अस्तन्या सरसावत टेबलकडे जात गिर्हाईकावर एक तुच्छ कटाक्ष टाकत बाप्टिस्ट विचारत असे…
`काय आणू?’
‘गरम काय आहे?’ असे विचारल्यावर…
‘माझे डोके!’ म्हणत सरळ दुसर्या टेबलकडे जात असे!
‘तसे नाही, नाश्त्याला काय मिळेल?’ गिर्हाईक पुढचा प्रश्न भीत भीतच विचारत असे.
‘पाव-भाजी, वडा, समोसा…’ बाप्तिस्त ‘अब आया उंट पहाड के नीचे’ अशा आविर्भावात सांगत असे. चहाव्यतिरिक्त येवढे तीनच जिन्नस त्या हॉटेलात बनत असत.
गिर्हाईक राजा असतो वगैरे आजकालच्या धंद्याचे ब्रीद समजले जाते. बाप्तिस्त ही गिर्हाईकाला राजाच समजत असे… फक्त हा राजा सर्व राज्य गमावलेला व परिस्थितीपुढे शरण आलेला लाचार असा राजा असे!
एकदा तर बापिस्तने कहर केला.
अशाच एका सकाळी एक नवखा तरूण गिर्हाईकाच्या भूमिकेत हॉटेलात प्रवेश करता झाला. बसल्या बसल्या त्याने एका चहाची ऑर्डर केली.
‘चहा नाही रे,’ बाप्तिस्तने तडक सांगून टाकले.
गिर्हाईक ह्या अनपेक्षित उत्तराने गांगरले. त्याने अविश्वासाने इकडे तिकडे पाहिले. माझ्या हातात चहाचा कप पाहून आपण काहीतरी वेगळेच ऐकले असावे असे समजून परत त्याने बाप्तिस्तला ‘चहा पाहिजे’ म्हणून सांगितले. बाप्तिस्त तरातरा त्याचाकडे आला. भांडी घासत असताना साबणाने भरलेले आपले हात त्याच्यासमोर पसरून ‘हे बघ माझे हात… तुला कसा चहा आणू सांग?’ असा खडा सवाल बाप्तिस्तने त्याला केला!
`अरे मग थोड्या वेळाने आण. तू लगेच नाही का म्हणतोस? मी थांबतो ना…’ गिर्हाईक नरमून बोलले. बाप्तिस्त विजयी मुद्रेने लढाईवर एखाद्या सरदाराने कूच करावे तशा आविर्भावात भांडी घासायला गेला.
थॉमसचा दुसरा वेटर म्हणजे मास्टर शेफ होता विष्णू. तोही एक अवतारी पुरुषच होता. विंस्टन चर्चिल जसा त्याच्या चिरूटाशिवाय दिसायचा नाही, तसा हा विष्णूही त्याच्या बिडीशिवाय कधीच दिसला नाही. नेहमी बिडीच्या धूम्रवलयात त्याचा धीरगंभीर चेहरा दिसायचा. बटाटावड्यामध्ये बर्याचदा ह्याच्या बिडीची थोटके आढळून येत. त्याव्यतिरिक्त झुरळांची पिल्ले, मिरचीची देठं, लसणाची साले इत्यादी पदार्थ त्याने बनवलेल्या वड्यांची चव एका वेगळ्याच उंचीवर नेत असत. मिरची भजी मात्र बनवावीत तर त्यानेच. एका बाजूने ‘फुटलेली’ व खरपूस तळलेली गरमागरम मिरची भजी ही तेथील गुप्त डिश होती. ह्या मिरची भजीच्या सकाळीच काही मोजक्या एडिशन काढल्या जायच्या. मी सकाळी नाश्ता करायला जवळजवळ रोजच तेथे हजेरी लावायचो. पावभाजी (ही गोव्याची पावभाजी मुंबईच्या पावभाजीपेक्षा वेगळी असते बरे) व मिरची भजी ही माझी रोजची ऑर्डर असायची. कधी मी उशिरा आलो तर मिरची भजीची प्लेट थॉमस माझ्यासाठी राखून ठेवायचा. मी आलो नाही तर स्वत: खाऊन टाकायचा!
थॉमस अगदी सेम अल्फ्रेड हीचकॉकसारखा दिसायचा. आपल्या दोन्ही ‘रत्नां’ना कधी ओरडायचा नाही. अगदी शांतपणे गल्ल्यावर बसून असायचा. रोजची पावभाजी व मिरची भजी ही माझी ऑर्डर असली तरी रोज बाप्तिस्त मला ‘काय आणू?’ म्हणून विचारायचा. मग मी त्याला खाजगी स्वरात ‘ऐक, आज पाव भाजी नको, कालच खाल्ली… आज भाजी पाव आण’ असे सांगत असे! तो ही गालातल्या गालात हसत ‘बरे, आज भाजी पाव आणतो’ म्हणत विष्णूला इशारा करत असे.
थॉमस, बाप्तिस्त आणि विष्णू तिघेही ते हॉटेल चालू असेपर्यंत बरीच वर्षे जणू फर्निचरचा भाग बनून राहिले होते. नऊ वर्षे तर मी त्यांना जवळून पाहिले होते. बाप्तिस्त व विष्णू दोघेही बिनलग्नाचे राहिले. हॉटेल हेच त्यांचे जग होते. त्या छोट्याशा खेड्यात थॉमसचे हॉटेल सुखदु:ख एकमेकांना वाटायचे एक ठिकाण होते. आयुष्याची उमेदीची वर्षे ‘बाहेर’ म्हणजे आखाती देशात काढलेली. आता चार पैसे गाठीला असलेले… निवृत्त जीवन मजेत घालवू हा विचार असलेले लोक थॉमसचे गिर्हाईक होते. गावात सर्वच एकमेकांना ओळखत असत. अगदी नको तेवढे ओळखत असत.
थॉमसला ना नफा वाढवण्याची आस ना तोट्याची चिंता. थॉमस एक संतपुरुष होता. आपल्या मालकाला मरेपर्यंत साथ देणारे बाप्तिस्त आणि विष्णू त्याचे कुणी सगेसोयरे नव्हते. परिस्थितीने एकत्र आणलेले व नियतीच्या हातात दोर्या असलेले कठपुतळीची पात्रे जणू. आपल्या जीवनाच्या रंगभूमीवरची आपली भूमिका निभावून वेळ येताच एक्जिट घेतलेले निष्पाप जीव.
थॉमसला चार मुलीच होत्या. त्या पण ‘नन’ झाल्या असे ऐकिवात होते. थॉमस वारल्यानंतर त्याच्या वारसाने ते हॉटेल विकून टाकले. एक सुंदर चित्र मनावर उमटवून काळाच्या ओघात विरून गेले…