`ते’ नक्की काय होते, त्याच्या जीवनाचे वर्णन कसे करावे सगळेच अगम्य आहे. ना त्याला विशिष्ट आकार ना अवयवांची जोड. शेकडो वर्षांपूर्वी अंतराळात एक स्फोट झाला आणि पुंजक्या पुंजक्यांनी राहणारा त्यांचा समूह विखुरला. कोणी एखाद्या अशनीला जाऊन चिकटले, कोणी एखाद्या ग्रहाच्या दिशेने फेकले गेले, तर कोणी उल्कांना चिकटून दिशाहीन भरकटू लागले. `ते’ त्यांच्यापैकीच एक होते. सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने शेकडो वर्षांपूर्वीपर्यंत एका उल्केला चिकटलेले `ते’ तिच्याबरोबरच पृथ्वीवरच्या नदीत येऊन आदळले आणि त्याला पृथ्वीच्या रूपाने नवा आसरा मिळाला. पुढील अनेक वर्षे `ते’ सुप्त स्वरूपात पडून होते. ना त्याला भुकेची जाण होती ना तहानेची. अनेक वर्षे पाण्याखाली काढल्यानंतर अचानक `ते’ एका कोळ्याच्या जाळ्यात अडकून जमिनीवर आले. जाळ्यात आलेला दगड पुन्हा नदीत न फेकता कोळ्याने नदीकिनारी भिरकावला आणि त्याच्या याच कृतीने पुढे अनेक वर्षांनी नदीकाठी फिरायला आलेल्या राघवच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार हे नक्की झाले.
समोरच्या दाराकडे राघव अस्वस्थ नजरेने बघत होता… `डॉ. केशव अवस्थी (मानसोपचारतज्ज्ञ)’… दारावर लावलेली पाटी त्याला अजून अस्वस्थ करीत होती. आपण इथे येण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य याचा पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात वाद सुरू झाला आणि त्याचवेळी आतला पेशंट बाहेर पडला. पुढचा नंबर राघवचा असणार होता हे नक्की. कारण त्या भव्य वेटिंग हॉलमध्ये तो आणि रिसेप्शनिस्ट सोडून कोणीच हजर नव्हते.
`मिस्टर राघव प्रजापती…’ रिसेप्शनिस्टने त्याच्या नावाचा सुमधुर आवाजात पुकारा केला आणि काहीशा संथपणे तो डॉक्टरांच्या केबिनकडे निघाला.
`मे आय..’
`या या मिस्टर राघव..’ सुहास्य वदनाने डॉ. अवस्थींनी त्याचे स्वागत केले. त्यांचे ते मनमोकळे हास्य आणि मुख्य म्हणजे अवस्थींचे व्यक्तिमत्त्व त्याला बराच धीर देऊन गेले. राघव काय करतो, त्याचे शिक्षण, नोकरी, अवस्थींची जुजबी माहिती अशा गप्पा रंगल्या. बोलता बोलता अवस्थींनी आपल्याविषयी सगळी माहिती लिलया काढून घेतली हे त्याच्या काही वेळात लक्षात आले आणि त्यांच्या हुशारीने तो भारावला. किती सहजपणे आपण आपले अवघे आयुष्य त्यांना अर्धा पाऊण तासाच्या गप्पांमध्ये उघडे करून दाखवले असे त्याला वाटून गेले. अर्थात त्याच्या आयुष्यात फारसे काय, खरेतर काहीच रोमांचक नव्हते. लहानपण अनाथाश्रमात गेले, पुढचे शिक्षण आश्रमशाळेत आणि मग नोकरी करता करता पदवी मिळवली आणि आता तो एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होता. पहिल्यापासून बुजरा स्वभाव असल्याने मित्र असे कोणी नव्हतेच.
ऑफिसात देखील `सहकारी’ यापलीकडे त्याचे कुठलेही नाते गेले नव्हते. तो नवीन असताना ऑफिसच्या लोकांनी त्याला आपल्यात ओढण्याचा खूप प्रयत्न केला, पण पुढे त्याचा नीरस प्रतिसाद पाहून त्यांनी तो नाद सोडून दिला.
सकाळी सातला उठायचे, दूध फ्रीजमधून बाहेर काढायचे, दात घासून गिझर चालू करायचा आणि मग चहा करायला घ्यायचा. पेपर वाचता वाचता चहा आणि मग अंघोळ उरकून साडेआठला घराबाहेर पडायचे. वाटेत अण्णाकडे इडली किंवा वडा खायचा आणि चालत चालत सव्वा नऊला ऑफिसात हजर. एकदा कामासाठी मान खाली घातली की थेट दुपारच्या जेवणाला वर यायची आणि जेवण करून पुन्हा खाली गेली की थेट संध्याकाळी सहाला वरती. ऑफिसमधून बाहेर पडायचे, थोडा वेळ नदीकाठी फिरायचे.. शिंपले किंवा एखादा विचित्र आकाराच दगड गोळा करायचा आणि मग ताजी भाजी घेऊन घर गाठायचे. थोडे फ्रेश होऊन स्वयंपाक करायचा आणि मग टीव्ही बघता बघता जेवण. रात्री दहा वाजता तो झोपलेला असायचा. अशा आयुष्यात रोमांच असणार तरी कुठे आणि अशा आयुष्यात समोरच्याला रस तरी किती वाटणार?
त्याचा आश्रमशाळेच्या सरांनी दोन चार वेळा त्याला लग्नासाठी सुचवून पाहिले, पण अनाथ आयुष्याने जणू राघवच्या आयुष्यातला सर्व रस शोषून घेतला होता. त्याला आहे त्या जीवनाबद्दल तक्रार नव्हती पण त्यात काही बदल देखील नको होता. प्रेम, माया, रोमांच अशा कशालाच जणू आयुष्यात स्थान द्यायचे नाही असे त्याचे ठरवले असावे. दोन वर्षांपूर्वी सर वारले आणि त्याच्या मागची भुणभूण देखील बंद झाली.
`तुमचे एकूण आयुष्य अगदी घड्याळाच्या काट्यासारखे किंवा असे म्हणून की अगदी नीट नेटके सरळ रेषेतले आहे. यात कधी कोणताही बदल नाही, रादर, तुम्ही तो बदल कधी होऊ दिला नाहीत. त्यामुळे मग अचानक काही वेगळे घडल्याने तुम्ही अस्वस्थ झाला आहात का?’ जवळपास चाळीस मिनिटांनी अवस्थींनी मुद्द्याला हात घातला आणि राघव सावरून बसला.
`डॉक्टर, मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल. माझ्या मनाचे खेळ देखील वाटतील. पण मी खात्री देतो की मी वेडा नाही किंवा जे काही घडते आहे, ते माझे भास देखील नाहीत.’
`मी मानसोपचारतज्ज्ञ आहे हे पहिल्यांदा विसरून जा. तुम्हाला कोणताही मानसिक आजार नाही याची देखील खात्री बाळगा आणि निःसंकोच पणे बोला,’ अवस्थींनी प्रेमाने त्याला प्रोत्साहन दिले.
`या सर्वाची सुरुवात नक्की कधी झाली, हे मला देखील नक्की सांगता येणार नाही. कदाचित खूप पूर्वी झाली असावी, पण मोठा बदल दिसेपर्यंत मला ती जाणवली नसावी असे वाटते.’
`मोठा बदल म्हणजे नक्की काय घडले?’
`नुसते घडले नाही, तर ते आजही घडत आहे.’
`नक्की काय होते आहे सांगणार का?’
`दुरुस्ती होत आहे…’ राघव तोंडातल्या तोंडात पुटपुटला.
`मी समजलो नाही. कसली दुरुस्ती?’ अवस्थींनी उत्सुकतेने विचारले.
`डॉक्टर साधारण दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून आलो आणि विसाव्यासाठी ईझीचेअरवर बसलो. पण आश्चर्य म्हणजे ती जरा देखील डुगडुगली नाही.’
`मी समजलो नाही…’ अवस्थी म्हणाले.
`तुम्हाला सविस्तर सांगतो. माझ्याकडे एक ईझीचेअर आहे. मला खरे तर असल्या वस्तूंचा फारसा शौक नाही, पण जुना भाडेकरू तिथेच ठेवून गेला होता म्हणून मी आपला वापरत असतो. काही दिवसांपूर्वी चादर टाकत असताना ती माझ्याच धक्क्याने पडली आणि बहुदा एका बाजूने थोडी वाकली. तशी ती खुर्ची तकलादूच झाली आहे म्हणा. त्या दिवसापासून ती बसताना थोडीशी डुगडुगते. मुख्य म्हणजे हे डुगडुगणे अगदी स्पष्ट जाणवते. माझा आळस आणि सुताराला घरी बोलावण्याचा देखील कंटाळा यामुळे ती तशीच राहिली होती. पण ती अचानक दुरुस्त झाली आणि अगदी चोख काम करायला लागली.’
`असे होते बरेचदा. त्यात वेगळे वाटण्यासारखे काय आहे?’
`हा एकच अनुभव नाही डॉक्टर. काही दिवसांनी अडगळ साफ करताना मला जुना रेडिओ मिळाला. मी पूर्वी रात्री झोपताना त्यावर दोन गाणी तरी नक्की ऐकत असे. पण पुढे अचानक तो काम करणे बंद झाला. मी खूप प्रयत्न केले, पण तो सिग्नल पकडेना. त्याला पर्याय म्हणून मी त्या दिवशी मोबाइलवर गाणी ऐकली आणि त्याचाच गुलाम झालो. बंद पडलेला रेडिओ अडगळीत गेला. तो असा अचानक समोर आला म्हणून त्याला चालू करून पाहिले, तर चक्क सर्व स्टेशनचे सिग्नल अगदी जोरात.’
`हे सुद्धा अगदी नॉर्मल आहे मिस्टर राघव. मला तुमचा मुद्दा लक्षात येत नाहीये.’
`डॉक्टर गेल्या आठवड्यात माझ्याकडून चुकून माझ्या टीव्हीची सिस्टिम पूर्ण फॉर्मेट झाली. एकही चॅनेल दिसेना. कोणताच पर्याय न उरल्याने मी अगदी अनिच्छेने त्यांच्या सेवाकेंद्राशी संपर्क साधला आणि दुरुस्तीसाठी माणूस बोलावला. दुसर्या दिवशी तो माणूस आला, तर सगळी सिस्टिम अगदी व्यवस्थित. एकही सेटिंग जागचे हलले नव्हते,’ राघवने वाक्य संपवले आणि आता अवस्थींची उत्सुकता वाढायला लागली. बरेच दिवसांनी काही इंटरेस्टिंग त्यांच्यासमोर आले होते.
`पण हे सगळे बदल, दुरुस्ती आपोआप घडत आहेत हे तुमच्या कधी लक्षात आले? `कोणीतरी’ हे सगळं तुमच्या नकळत करतंय असे तुम्हाला वाटते आहे का? हे सगळे योगायोग देखील असू शकतात की. अगदी सहजपणे कोणाच्याही आयुष्यात घडणारे. आता कित्येकदा आपली गाडी बंद पडते. आपण वैतागतो, तिला ढकलत
गॅरेजमध्ये नेतो. गॅरेजवाल्याला सगळी व्यथा सांगतो. तो फक्त स्टार्टर दाबून पहिल्या झटक्याला गाडी चालू करतो आणि छान लांबवर हिंडवून देखील आणतो. आता त्याला काय म्हणणार?’ अवस्थींच्या बोलण्यावर राघव फक्त मंद हसला.
`मला देखील पहिल्यांदा असेच वाटले होते. मनाची खात्री म्हणून, मी एक जुनी बशी फोडली आणि सिंकमध्ये ठेवून ऑफिसला गेलो. मी संध्याकाळी परत आलो, तेव्हा बशी एकसंध होती,’ थरथरत्या आवाजात राघव म्हणाला आणि अवस्थी स्वत: अस्वस्थ झाले.
`एकवेळ आपण असे समजू की हे सगळे चमत्कार खरंच घडत आहेत. पण मग त्याला हरकत काय आहे? यातून फायदाच होतो आहे ना?’
`हे बदल, या दुरुस्ती घडताना काहीतरी चुकते आहे डॉक्टर. जे कोणी हे सर्व करीत आहे, त्याचे नक्की काहीतरी चुकते आहे. माझ्या दुरुस्त झालेल्या खुर्चीला प्रचंड वाळवी लागली आहे; इतकी की ती दुरुस्तीच्या पलीकडे पोहोचली आहे. माझा दुरुस्त झालेला रेडिओ आणि टीव्ही अचानक आतून पूर्णपणे जळाले आणि ते देखील दुरुस्ती पलीकडे गेले.’
त्या दिवशीची राघवची भेट अजूनही डॉक्टरांना अस्वस्थ करीत होती. राघवच्या केसमध्ये नक्की काहीतरी विचित्र होते. त्याच्या सरळमार्गी आयुष्याला नकळत कुठेतरी धक्का लागला होता आणि त्याचे हे भास सुरू झाले होते. हे मनाचे खेळ त्याला आतून पोखरायला लागले होते. दुसर्या सेशनला राघव गैरहजर राहिला आणि अवस्थींची चिंता वाढली. त्यांनी रात्री स्वत: राघवला फोन लावला.
`अरे, राघव तुम्ही आला नाहीत आज?’
`आता मला तुमच्या मदतीची गरज लागेल असे वाटत नाही डॉक्टर. माझ्या आजूबाजूला जो विश्वाचा पसारा आहे, तो आता मला उलगडायला लागला आहे. माझ्यात बहुदा खूप कमतरता आहेत, पण आता मी दुरुस्त व्हायला लागलो आहे. तुमच्या मदतीसाठी आणि काळजीसाठी धन्यवाद,’ राघवने कॉल बंद केला आणि अवस्थी भानावर आले. त्यांनी शांतपणे राघव नक्की काय बोलला त्याची मनाशी उजळणी केली. राघवला त्वरित उपचारांची गरज आहे असे त्यांना तीव्रपणे जाणवले. मात्र राघवने त्यांची भेट तर टाळलीच; पण नंतर नंतर त्यांचा फोन देखील उचलणे बंद केले. काही दिवसांनी डॉक्टरांनी देखील त्याचा नाद सोडला आणि ते आपल्या व्यापात पूर्ण गुरफटले.
`शिरवळच्या श्री. राघव प्रजापती यांना अमेरिकन विद्यापीठातर्फे दिला जाणारा गणितातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर’… ठळक अक्षरांत समोरच्या पडद्यावर ती बातमी दिसली आणि डॉक्टर अवस्थी चमकले. राघव आणि त्याची विचित्र्ा केस पुन्हा उसळी मारून वर आली. त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला. टीव्हीवरची निवेदिका घशाच्या शिरा ताणून ओरडत होती, ’’आजवर जगातील कोणत्याही गणितज्ञाला सोडवायला न जमलेले गणितातील तीन अवघड प्रश्न राघव प्रजापती यांनी सोडवून दाखवले आहेत. त्यांना जाहीर झालेला हा पुरस्कार प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’
काही क्षण अवस्थी सुन्न बसून राहिले. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक चित्र विचित्र केस हाताळल्या होत्या. पण राघवने त्यांच्या सगळ्या समजुती, अभ्यास, ज्ञान यांना धक्का दिला होता. दुसर्याच क्षणी त्यांच्या चेहर्यावर चिंता दाटली. जर राघव खरे सांगत असेल, तर `ते’ जे काही आहे, ते राघवला दुरुस्त करत आहे, त्याच्यातील उणीवा दूर करत आहे. याचाच दुसरा अर्थ, राघव अत्यंत वेगाने आपल्या शेवटाकडे जातो आहे, असाही होतोच. त्यांनी घाईघाईने राघवचा फोन लावला, मात्र अपेक्षेप्रमाणे तो बंद दाखवत होता. पुढे पुरस्कारासाठी आणि विविध सत्कारांसाठी राघव कधी देशात तर कधी परदेशात गाजत होता. फोटो आणि बातम्यांमध्ये झळकत होता. त्याच्या आयुष्यातला तो सुवर्णकाळ होता.
हळूहळू दौरे संपले. सत्कार संपले आणि राघवचे नाव मागे पडले. क्वचित कुठल्या शाळेत, कॉलेजमध्ये आणि अकाउंट क्षेत्रात ओझरता उल्लेख तेवढा उरला. राघव लोकांच्या स्मृतीतून नाहीसा होत असताना ती हादरवणारी बातमी आली. `जागतिक ख्यातीचे प्रसिद्ध गणितज्ञ राघव प्रजापती यांचे गूढ आजाराने निधन.’ कोणतेही व्यसन नसलेल्या, नियमित व्यायाम, वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करणार्या राघवचा मृत्यू अचानक शरीरातील जवळपास सर्व अंतर्गत अवयव एकाच वेळी फेल झाल्याने कसा होऊ शकतो, हे एक न उलगडलेले कोडे ठरले.
सर्वांसाठी जरी हे कोडे असले, तरी त्याचे उत्तर डॉक्टर अवस्थींना व्यवस्थित माहिती होते. आणि आपण नक्की काय घडवले काय बिघडवले याची जाणीव देखील नसलेले `ते’ मात्र तसेच निराकारपणे राघवने नदीकाठून आणलेल्या दगडाला चिकटलेले होते.