ट्युनिशीअन-फ्रेंच दिग्दर्शक अब्देलतीफ केशीश यांचा ‘ब्लॅक व्हीनस’ हा फ्रेंच चित्रपट सन २०१०मध्ये प्रदर्शित झाला. गोल्डन लायन या पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामांकन झाले होते. हा चित्रपट एका आफ्रिकन तरुणीच्या जीवनावर आधारित होता. पुरुषी वर्चस्वाने एखाद्या महिलेची शारिरीक व्यंगावरून इतकी क्रूर विटंबना करावी? पाश्चात्य देश प्रगत आहेत असे म्हणत असताना अशी घटना इतिहासातील काळे पान आहे असेच म्हणावे वाटते. कोण होती ही सारा बार्टमन? २९ डिसेंबर २०२३ रोजी या तरुणीला मरून २०८ वर्षे होताहेत. मात्र आजही तिने भोगलेले भोग आणि तिच्या शरीराची अख्ख्या मानवजातीला लाजवेल अशी क्रूर विटबंना इतिहासात नक्कीच नोंदली जाईन.
दक्षिण आफ्रिकेतील कोअुगा आणि ग्रूट नद्या मिळून गॅमटूस नदी तयार होते. ६४५ किमीचा प्रवास करून ही नदी पुढे हिंदी महासागराला मिळते. या गॅमटूस नदीच्या खोर्यात साराचा जन्म झाला. तिचा जीवनप्रवासही नदीसारखाच वळणावळणाचा, दगडधोंड्यांचा, काटेरी असाच झाला. जन्मवर्ष होते १७८९. दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) आफ्रिकेत खोईखोई ही भटकी जमात आहे. एका ठिकाणी वस्ती न करता बैलगाडीत संसार लादून भटकत राहणारी. साराचा जन्म याच टोळीतला. ती दोन वर्षाची असताना डोक्यावरून आईचं छप्पर हरपलं तर तीन वर्षांची असताना बुशमन जमातीच्या टोळीनं तिच्या वडिलांचा खून केला. म्हणजे वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षापासूनच तिच्या परवडीची कथा सुरू झाली. सारा बार्टमन हे तिचे नाव.
१८१० मध्ये सारा काही नातेवाईक आणि हेन्ड्रिक सिझर्स नावाच्या मुक्त काळ्या गुलामासह इंग्लंडला पोहोचली. तिला पाहून केप स्लेव्ह लॉज या संस्थेत काम करणार्या अलेक्झान्डर डनलॉप याला एक कल्पना सुचली… पैसे कमावण्याची. ही कल्पना मानवी जगण्याच्या विरुद्ध अत्याचारी आणि अनैसर्गिक होती. अनेकदा मानवी शरीर जन्मत: एखादे व्यंग घेऊन जन्मते. यात ना जन्मदात्रीचा अपराध असतो, ना जन्माला आलेल्या बाळाचा… पण माणसाची बुद्धी उफराटी असू नये असा काही नियम नाही. साराच्या बाबतीत हेच झाले.
साराचे शरीर जन्मत:च बेडौल होते. तिच्या नितंबाचा आकार नको तितका मोठा होता. वय वाढू लागले तसतसा नितंबाचाही आकार वाढू लागला. बहुतांशी पुरूषांच्या डोळ्यांची क्षमता स्त्रियांचे वक्ष आणि नितंब यादरम्यानच घोटाळते अन मेंदूतला ट्रिगर वारंवार दाबला जातो. तर डॉ. अलेक्झांडर डनलॉपला साराहच्या नितंबांना मंचावर सादर करण्याची कल्पना सुचली. त्या काळात असे चित्रविचित्र शो बघणार्या प्रेक्षकांची अजिबात वाणवा नव्हती. लंडनमधील पिकॅडली सर्कस येथील हॉलमध्ये २६ नोव्हेंबर १८१० रोजी साराला प्रदर्शित करण्याचा पहिला शो आयोजित केला गेला. सारा ही कृष्णवर्णीय गुलाम स्त्री… त्यात ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली असणार्या आफ्रिकेतील आणि त्यात तिचे हे असे व्यंग… सोकॉल्ड सुशिक्षित व उजळवर्णीय बुभुक्षित प्रेक्षकांची चंगळच झाली.
या शोमुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक श्रीमंत लोक तिला स्वत:च्या घरी नेऊन तिकीट लावून सादर करत व पैसे कमावत. इतकेच नाही तर नितंबाला स्पर्श करण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत. सारा काहीच करू शकत नव्हती. तिच्या मर्जीचा यात प्रश्नच येत नव्हता. चटावलेल्या पुरूषी चंगळवादी जाळ्यात असहाय्यपणे तडफडण्याशिवाय ती काहीच करू शकत नव्हती. रंगभेद आणि वंशभेदाच्या चिखलात रूतलेल्या युरोपियन समाजाने साराहच्या बैडोल शरीराची कार्टून रेखाटून यथेच्छ टवाळीही केली. नैतिकतेच्या कोणत्या मापदंडात असे प्रकार बसतात? ‘एखाद्या स्त्रीच्या शरीराचा नैसर्गिक भाग असाही असतो’ अशी मखालशी करायला पण सादरकर्ते विसरत नसत.
खरे तर ‘गुलामी कायदा १८०७’नुसार गुलामीची प्रथा कायद्याने नष्ट करण्यात आली होती. त्यानंतरही तिचे असे प्रदर्शन सुरू होते. मग याविरुद्ध निदर्शने सुरू झाली. आप्रिâकन असोशिएशन या संघटनने वर्तमानपत्रातून याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. न्यायालयात केस दाखल करण्यात आली. २४ नोव्हेंबर १८१० रोजी न्यायालयाने निकाल दिला की तिच्या मर्जीने हे होत नसेल तर तिला मुक्त करण्यात यावे. मात्र इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार साराने ‘तिच्यावर कोणतीही बळजबरी झाली नाही व ती परत कुटुंबात आपल्या मायदेशी जाऊ इच्छित नाही’ असा जबाब नोंदविल्यामुळे ही केस डिसमिस झाली.
कोर्टाच्या दखलीमुळे साराला आणखीनच प्रसिद्धी मिळाली. सन १८१४मध्ये साराला हेन्री टेलर नावाच्या व्यक्तीने पॅरिसला नेले व तेथे एस. रियॉक्स नावाच्या प्राणी ट्रेन्ड करण्याचा व्यवसाय असणार्या इसमाला विकले. त्यानेही पुढे काही अटीनियमासह
पॅरिसमधील पले रोयाल या ठिकाणी १५ महिने शो केले. तिचे पॅरिसमध्ये पुढे जे शो केले त्यात छद्म विज्ञानाचाही वापर केला गेला. फ्रेंच वैज्ञानिकांनी तिच्या अधिक वाढलेल्या नितंबाचा ‘अभ्यास’ करण्याचाही प्रयत्न केला. अनेक चित्रकारांनी तिचे न्यूड पेंटिंगही केले.
या सगळ्या प्रकारात साराची प्रचंड दमछाक होत गेली. ती जणू काही एखादा पाळीव प्राणी होती आणि प्रत्येकाने तिला बघणे ही त्यांची नैतिक जबाबदारीच होती. या एकूण प्रकारामुळे ती आजारी पडली व शोच्या दरम्यान २९ डिसेंबर १८१५ रोजी तिचा मृत्यू झाला. सारा त्यावेळी अवघी २६ वर्षांची होती. ती नेमकी कशामुळे मेली? कुणी म्हणाले देवीचा आजार झाला… कुणी म्हणाले न्यूमोनिया तर कुणी म्हणाले सिफलिस… मात्र तिच्या अवहलेनचा प्रवास अजूनही संपला नव्हता.
माणसाच्या मृत्यूनंतर सर्व काही संपायला काहीच हरकत नसावी. आपल्याकडे तर शत्रूच्या मृत्यूनंतर वैरही संपते असे म्हटले जाते. पण साराच्या बाबतीत तसे घडले नाही. तिच्या मृत्यूनंतर तिचे शरीरातील नितंब, जननअंग, वक्षस्थळे वेगवेगळ्या जारमध्ये भरून नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, पॅरिस येथे ठेवण्यात आले. तिच्या शरीराचा प्लॅस्टर मोल्डही तयार करण्यात आला. इतकेच नाही तर शरीरातील हाडांचा सापळा महानगरपालिकेच्या संग्रहालयात ठेवण्यात आला. हे सर्व अवयव बघण्यासाठी पुन्हा लोक गर्दी करू लागले. १८२७मध्ये कवटी आणि सापळा चोरीला गेला व काही महिन्यांनंतर तो परत मिळवण्यात आला. खरे तर ही सर्व विटंबनाच होती. प्रबोधनकाळाची शेखी मिरवणार्या युरोपात हे सर्व घडत होते. तिच्या जागी एखादी घरंदाज सरंजामदार श्वेतवर्णीय स्त्री असती तर हे असेच घडले असते का?
१९७८ मध्ये साराच्याच वंशाच्या डायना फेरस या कवियत्रीने तिच्यावर `आय हॅव कम टू टेक यू होम’ नावाची एक कविता लिहिली. साराचा मृतदेह तिच्या मायदेशी आणण्यासाठी चळवळ जोमात सुरू झाली. याच काळात विज्ञानावर लिखाण करणार्या स्टीफन जे. गाऊल्ड या अमेरिकन संशोधकाचे ‘द मिसमेझर ऑफ मॅन’ हे पुस्तक १९८०मध्ये प्रकाशित झाले आणि डायनाच्या चळवळीस गती मिळाली. १९९४मध्ये नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान झाले. त्यांनी साराच्या शरीराचे सर्व अवशेष आणि प्लॅस्टरकास्ट परत मिळण्यासाठी फ्रान्स सरकारला पत्र लिहिले. ६ मार्च २००२ रोजी फ्रेंच सरकारने परवानगी दिली. ६ मे २००२ रोजी साराच्या शरीराचे सर्व भाग तिचा जन्म झाला त्या मूळ गावी परत नेण्यात आले आणि त्यांचे सरकारी इतमामात दफन करण्यात आले. १८१५ ते २००२ म्हणजे मृत्यूनंतर १८७ वर्षे तिच्या देहाची परवड होत राहिली. जगातील हे एकमेव असे उदाहरण असावे ज्यात स्त्रीच्या शरीराची जिवंतपणी आणि मेल्यानंतरही इतकी दीर्घकाळ अवहेलना झाली.