पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपा आणि मित्रपक्ष नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या एका पायावर तयारच नव्हता, तर मी आदेश देण्यापूर्वी तो त्या प्रतिक्रिया घेऊनही आला होता. पाहा त्या प्रतिक्रिया.
– नमस्कार मुख्यमंत्री साहेब. कमाल केलीत तुम्ही. कधी नव्हे ते भाजपच्या प्रचाराला राज्याबाहेर गेलात आणि तीन राज्यांत विजयश्री खेचून आणलीत. अभिनंदन. एका राज्यात तर हिंदुहृदयसम्राट म्हणून तुमचा गौरव करण्यात आला आणि त्याचेच पडसाद इतरत्रही उमटले, असं म्हणतात ते खरं आहे का?
– त्यांनी मला काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न होता. पण मी भाजपच्या मिठाला जागलो आणि तिथे जी माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं गुणगान करणारी भाषणं केली, त्यामुळे भाजपच्या प्रत्येक उमेदवाराच्या खात्यात किमान कमीत कमी ४२० मतांची तरी भर पडली, असं मला वाटतं.
– राजस्थानात तर तुमच्या शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला तुम्ही जाऊनही तो उमेदवार पडला. तो तर माजी राज्यमंत्री होता. मग भाजपवाल्यांनी तुम्हाला रोखलं आणि भाजपचा प्रचार करायला भाग पाडलं, हे खरं ना?
– हो. पण मला माझा पक्ष संपूर्ण भारतात न्यायचाय ना. म्हणून लटपट केली.
– तेलंगणात काय केलं?
– गेलो होतो ना मी तेलंगणात. पण त्यांनी फक्त प्रचारफेरीत फिरवलं आणि सोडलं.
– पण तुम्हाला त्या राज्याची भाषा कुठे येते? तेलुगू तर खूप हार्ड आहे.
– आम्हाला काहीच हार्ड नाही. जिथे ज्या हार्टमध्ये मोदीजी आहेत त्याला काहीच कठीण नाही. पुढच्या वेळी मुंबईच्या तेलुगू भाषिकाकडून भाषण लिहून घेईन आणि ते पाठ करीन. मग लोकसभेला बघाच माझा ‘तेलुगू’ अवतार.
– मिझोराममध्ये अवघ्या दोन जागा मिळण्याइतपत दारूण पराभव का झाला भाजपचा?
– मिझोराम या नावात राम आहे. त्याचा उपयोग एकाही भाजप नेत्याने भाषणात केला नाही. कोण काय म्हणतंय याला अर्थ नाही. या तुम्ही.
– नमस्कार फडणवीस साहेब, नमो नम:
– नमो नम:
– आपली प्रतिक्रिया…
– हा आमचे लाडके नेते मोदीजींच्या विचारांचा विजय आहे.
– शेवटी तेलंगणा आणि मिझोराम निसटलंच ना तुमच्या तावडीतून.
– तरीही मिझोराममध्ये दोन जागा मिळवून आम्ही घवघवीत यश प्राप्त केलंय. उद्या दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे सोळा अशा पटीत आम्ही वाढत जाऊ आणि एक दिवस असा येईल की भारतातील सर्व राज्ये भाजपमय होतील. जय भाजप, जय मोदी.
– मला अजितदादांकडे जायचंय.
– त्यांचा काय संबंध या विजयाशी?
– तरीही प्रतिक्रिया घ्यायचीय.
– पण एक लक्षात ठेवा, आम्ही तिघे एकत्र असल्याचं दिसत असलो तरी अजितदादा माझ्या मार्गातला मोठा काटा आहेत. शिंदे साहेबांना मोदी-शहा गप्प बसवू शकतील, पण हा काटा वळवळतच राहील. या तुम्ही…
– नमस्कार अजितदादा. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला त्याबद्दल…
– अहो, विजय कसला म्हणता, दोन राज्यांत तर दाणकन आपटलेत ते.
– तुमचा मित्रपक्ष आहे ना तो. पण तुम्ही त्यांच्या प्रचाराला फारसे कुठे गेला नाहीत.
– भाजप म्हणजे मी स्वयंभूपणे स्थापन केलेला न्यू राष्ट्रवादी नाही. उलट भाजप माझ्या मार्गातील धोंडा आहे. ते वरचढ झाले तर माझ्या न्यू राष्ट्रवादीचं मी काय लोणचं घालत बसू? मला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत एकदा बसवा. मग मी करीन त्यांच्या पक्षाला हवी ती मदत. मी उपमुख्यमंत्री झालो तो माझ्या अंगात मोदींना डोळ्यात भरण्याजोगे गुण दिसले म्हणूनच ना. उद्या बघा भाजपाच्या नाकावर टिच्चून सीएम कसा बनतो ते. त्यासाठी काय वाट्टेल ते करीन. न्यू राष्ट्रवादी बरखास्त करून भाजपवासीसुद्धा होईन. शेवटी सत्ता महत्त्वाची.
– मी तुम्हाला निकालाबद्दल विचारायला आलो आणि तुम्ही गावगप्पा करीत बसलात. निघतो मी. शेलारमामांकडे जायचंय.
– नमस्कार शेलारमामा. विजय मिळाल्यापासून किती पेढे, लाडू, मिठाई खाऊन झाली?
– मायंदाळ खाल्ली. पण ही सारी मोदीजी आणि रामलल्लाची कृपा. त्यांनी घरादाराचा त्याग करून वनवास भोगून, चहा विकून जितके कष्ट घेतले तितके कोणीही घेतले नसतील. आज मोदीजी आहेत म्हणून पक्ष आहे. त्यांची ‘मन की बात’ आहे म्हणून विजयाची साथ आहे. आपल्या भाषणाने श्रोत्यांना हिप्नोटाईज कसं करावं ही कला त्यांना अवगत आहे.
– मग हे परिवर्तन तेलंगणात आणि मिझोराममध्ये का नाही झालं? लोक म्हणतात की, भाजप हा थापा मारणारा, महागाई करणारा, कष्टकर्यांना न्याय नाकारणारा पक्ष आहे. भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेऊन शुद्ध करणारा आणि विरोधकांना ईडीचा धाक दाखवून, खोटेनाटे आरोप करून, त्यांना तुरुंगात टाकून एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करणारा पक्ष आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणारा भ्रष्टाचार्य आहे, असंही लोक म्हणतात.
– वेडे आहेत ते. वेड लागलंय त्यांना.
– लोक म्हणतात की भाजप तर वेड्यांचा बाजार आहे. पक्षातले एकेक नेते म्हणजे एकेक नमुना आहे हे तर पटतंय लोकांना.
– त्याच्याशी पक्षाला कर्तव्य नाही. आमची स्वप्नं आभाळाएवढी मोठी आहेत. लोक त्यामानाने छोटे आहेत. समजलं? या तुम्ही.