दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शाही दौर्यांच्या अनुषंगाने ४० वर्षांपूर्वी काढलेलं हे मुखपृष्ठचित्र. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही निवडणूक घोषणा दिल्याने देशातल्या सगळ्या गोरगरिबांना त्यांच्या राज्यात आपलं कल्याण होईल, अशी आशा निर्माण झाली आणि सगळे त्यांची एकगठ्ठा मतं काँग्रेसला मिळू लागली. मात्र, एकीकडे ही घोषणा करत असताना इंदिराजींच्या शाही निवडणूक दौर्यांवर मात्र प्रचंड उधळपट्टी सुरू होती. त्यातला विरोधाभास बाळासाहेबांमधील व्यंगचित्रकाराने अचूक टिपला आहे. इंदिराजी गरिबी हटावची घोषणा देत आहेत, त्या सजवलेल्या राजेशाही हत्तीच्या पाठीवर बसून… हाच कित्ता आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही गिरवताना दिसतात. प्रत्येक सभेत ते मी गरिबीतून वर आलो, मी ओबीसी आहे, मी तुमच्यातलाच आहे, असं सांगून हृदयाला हात घालतात, पण त्यांचं राहणीमान कधी गरीब होतं, हा एक प्रश्नच आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर तर त्यांच्यावर कोट्यवधींमध्ये खर्च होतो आणि त्या पंचतारांकित राहणीमानाची किंमत जनता मोजते… अच्छे दिन आलेच आहेत, पण ते मोदींना आणि त्यांच्या टोळीत दाखल होणार्यांना.