□ राज्यसभेत ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’वर बंदी.
■ स्वातंत्र्यपूर्व काळात प्रेरणादायी आणि प्रोत्साहक ठरलेले हे मंत्र आता उच्छादाचे मूलमंत्र बनवून टाकल्याचा हा परिणाम!
□ पक्षविरोधी कृत्यावर कारवाईचे अधिकार केवळ पक्षप्रमुखांना – शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम.
■ शाळकरी मुलांनाही समजतील अशा गोष्टी अशा प्रकारे सांगायची वेळ यावी, हे महाराष्ट्राच्याच नव्हे, देशाच्या राजकारणाचं दुर्दैव!
□ वाहतूककोंडी फोडण्याची स्कीम हा मुख्यमंत्री पुत्राचा पॉकेटमनी स्कॅम – मनसे आमदार राजू पाटील.
■ एकदा खोकेबाजीची सवय लागली की मग कोणतीही स्कीम आल्यावर स्कॅम येणारच!
□ शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपकडून अजितदादांना सुपारी – अनिल देशमुखांचा गंभीर आरोप.
■ आता शरद पवारांच्या अडकित्त्यात सुपारी बारीक कातरली जाते की कतरी तेवढं पाहायचं!
□ निवडणुकीआधी केंद्राच्या योजनांची मुंबई महापालिकेच्या वॉर्डात जाहिरातबाजी.
■ मुंबई खिशात घालण्यासाठी इंच इंच लढवायचे आहे त्यांना… ही तर फक्त सुरुवात आहे.
□ शेकोटी केली म्हणून ८८जणांकडून १०० रुपयांचा दंड वसूल – प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेची कारवाई.
■ अतिप्रचंड मोठी कारवाई आहे ही. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्सला पण छापून यायला हवी होती…
□ आधी लोकसभा, नंतर तुमच्या मनातली निवडणूक – अजित पवार.
■ कार्यकर्त्यांच्या मनात काहीही असो, लोकांच्या मनात काय आहे, ते लोकसभेलाच कळून जाईल, पुढे जाण्याची वेळच यायची नाही.
□ हिंगोलीत मिंधे सरकारचा पोलिसी अत्याचार; कर्जमुक्तीसाठी निघालेल्या शेतकर्यांना रस्त्यातच उचलले.
■ वाचा, पाहा, स्वस्थ बसा!
□ मिंधे सरकार हायकोर्टात तोंडघशी; स्कॉलरशिप परताव्याची चुकीची माहिती दिली.
■ असं कसं झालं? स्कॉलर लोक बसलेत ना तिथे एवढे?
□ सरकार तुमचेच, यांचेच लागेबांधे गुंतलेत, सह्यांच्या मोहिमा काय घेताय? – मुलुंडमध्ये तरूणाने उपटले सोमय्यांचे कान.
■ किती कान उपटा, हे शेपूट काही सरळ व्हायचं नाही!
□ महिला अधिकार्याचे सक्तीच्या रजेचे आदेश स्थगित – कामगार मंत्री सुरेश खाडेंना हायकोर्टाचा दणका.
■ हायकोर्टाला आता विशेष राज्य सरकार पीठ स्थापन करावं लागतंय की काय! प्रत्येक गोष्टीला कोर्टात जायची वेळच का येते?
□ जनतेला फुकट काही देऊ नका – इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे विधान.
■ ‘फुकट’ कोणालाच काही मिळत नाही मूर्ती साहेब; निवडणुकीत मतांच्या रूपाने वसुली होतेच… शिवाय तुमच्यासारख्या विद्वानांच्या लक्षात यायला हवं की पैसा जनतेचाच आहे, मालकालाच फुकट काही देऊ नका असं सांगताय सेवकांना? तुम्हाला नेमकं काय मिळालंय?
□ वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवणार.
■ डागाळलेले कपडे एक ना एक दिवस वॉशिंग मशीनमध्ये जाणार, याचं काही आश्चर्य वाटतं का? मग याचं का वाटावं?
□ दिव्यातील दारुड्यांना हटवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार काय? – शिवसेना शहर संघटकांचा गृहमंत्र्यांना सवाल.
■ एकवेळ ते खरंच येतील, इथल्या यंत्रणा काही पोहोचायच्या नाहीत.
□ अवकाळीने मुरबाडमध्ये चिखल; तहसीलदार, तलाठी नॉट रिचेबल.
■ चिखलातून कमाईचे कमळ फुलणार असेल, तेव्हाच लोक रीचेबल होतात…
□ ठाण्यात रस्तेसफाईसाठी रोज मोजावे लागतात एक लाख रुपये.
■ कोणाला?
□ पीक विमा योजनेत मिंधे सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा घोटाळा – उद्धव ठाकरेंच्या आरोपामुळे खळबळ.
■ पिकाचं आणि शेतकर्याचं फक्त नाव, फायदा झाला तासे कंपन्यांचाच.
□ हे सरकार निर्लज्ज, यांना जनतेची काळजी नाही – हायकोर्टाने थोबडवले.
■ त्यांनी दुसरा गाल पुढे केला असेल…
□ वीस लाख खंडणीसह ईडी अधिकार्याला अटक; तपास थांबविण्यासाठी ब्लॅकमेकिंग.
■ एक सापडला, असे किती हात मारून घेत असतील…
□ पालिका आयुक्त चौकशीला सामोरे जाणार का? – आदित्य ठाकरे यांचा थेट सवाल.
■ चौकशी होणार नाही याची त्यांना खात्री आहे आदित्यजी!
□ कनिष्ठ न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यात मिंधे सरकार निष्क्रिय.
■ कशाला भरतील? तिकडूनही थोबडवून घ्यायला?
□ शरद पवारांनीच मला भाजपसोबत जायला सांगितले – अजित पवारांचा दावा.
■ …आणि तुम्ही लगेच गेलात? केवढा हा आज्ञाधारकपणा. यूजीसीला सांगून आपण ‘आज्ञाधारक अजित’ हा धडा देशातल्या सगळ्या शाळांमध्ये कम्पल्सरी करू या हां!
□ मिंधे सरकार जाहिरातबाजीत बिझी -राजू शेट्टी यांची टीका.
■ अनाठायी आहे ही टीका. त्यांना तेवढंच येतं, तेही त्यांनी करायचं नाही का?