अरे? चपापलात ना शीर्षक वाचून? पण हे अगदी खरे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्यामुळे. मग तो लढा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच’ या जाज्वल्य मंत्रामुळे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद सेनेच्या सशस्त्र क्रांतीमुळे किंवा महात्मा गांधी यांच्या अहिंसक लढ्यामुळे. हे सारे लढे झाले ते निव्वळ काँग्रेसच्या आधिपत्याखाली. मग अशा काँग्रेसचे उपकार कोण बरे विसरेल! काँग्रेसचा विसर पडणे म्हणजे कृतघ्नपणाच नाही का?
२०१४ साली भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाने गुजरातचे विकासपुरुष मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळविला आणि २६ मे २०१४ रोजी अभूतपूर्व वातावरणात मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तत्कालीन संसदभवनाच्या पायरीवर माथा टेकवून मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावरील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून मी या देशाचा प्रधानमंत्री नव्हे, तर प्रधान सेवक असल्याची घोषणा केली. महात्मा गांधी या कट्टर काँग्रेसी राष्ट्रपित्याला वंदन करुन मोदी यांनी राज्यशकट हाकण्यास प्रारंभ केला.
निवडणुकीच्या भाषणांतून त्यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली होती. परंतु खरे पाहता त्यांची पावले पं. जवाहरलाल नेहरू यांच्या खानदानापासून भारताला मुक्ती मिळविण्याच्या दिशेने पडत होती. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या काँग्रेसच्या अन्य दिग्गजांचा त्यांनी २०१४पासून सन्मानच केला असल्याचे दिसून येते. बारामतीला जाऊन नरेंद्र मोदी यांनी ‘मी शरदराव पवार यांचे बोट धरून राजकारणात आलो’ हे सांगून पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शरद पवार कोण? तर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र. कट्टर काँग्रेसनिष्ठ. इच्छा असली तर काम होऊ शकते हे मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारुन दाखवून दिले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे हे जागतिक पातळीवरील भव्य दिव्य स्मारक. केवडिया हे गुजरातमधील डभोई जवळचे गाव २०१३पर्यंत गुजरातबाहेर फारसे कुणाला माहीत नाहीत. परंतु २०१४मध्ये घोषणा करून अवघ्या चार वर्षांत हे स्मारक उभे राहिले आणि ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी ऐतिहासिक सोहळ्यात या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. कोण सरदार पटेल? काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणारे पोलादी पुरुष.
त्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना राष्ट्रपतीपदासाठी सक्रीय पाठिंबा दिला ते कट्टर काँग्रेसी नेते प्रणवकुमार मुखर्जी यांना मोदींनी भारतरत्न किताब दिला. गतवर्षी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखण्यात येणार्या पुण्यात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व समारंभात डोक्यावर पुणेरी पगडी आणि शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असा राष्ट्रीय स्तरावरील लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर कट्टर काँग्रेसी नेते शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे आवर्जून उपस्थित होते. किंबहुना मोदी यांना हा पुरस्कार देण्यात पवार व शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात येते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष लोकमान्य टिळक यांच्या नांवाचा अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मोदी यांनी स्वीकारला. काँग्रेसप्रति असलेली ही एकप्रकारे निष्ठाच म्हणावी लागेल!
राजकीय आखाड्यात भले कितीही आरोप केले तरी मोदी यांचे काँग्रेसी नेत्यांप्रति असलेले प्रेमसुद्धा दिसून येते. अन्यथा सत्तर हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असा आरोप करणार्या मोदी यांनी अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाचे मानाचे पान दिले नसते. त्यांना मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द देण्यात आला असल्याचे सांगण्यात येते ते काय मोदी यांच्या परवानगीशिवाय? बरं, २०१४पासून आजवर जे जे काँग्रेसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आले ते मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच ना! आजही मोदी यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री काँग्रेसमधून आलेले आहेत. मग ते ज्योतिरादित्य सिंधिया असोत की नारायण राणे. आसामचे हेमंत बिस्व सरमा हे मुख्यमंत्रीसुद्धा मूळ काँग्रेसीच ना. मग मोदी हे काँग्रेसनिष्ठ आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
भारतीय जनसंघ स्थापन करणारे पं. दीनदयाळ उपाध्याय असोत की कश्मीरसाठी प्राणांची आहुती देणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुतळे, रस्त्यांना नाव यापलीकडे काय मिळाले? सकाळ संध्याकाळ उठता बसता ज्यांच्या नावाची जपमाळ ओढण्यात येते त्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना गेल्या नऊ वर्षांत भारतरत्न किताब मिळू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. चार वर्षांत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भव्य दिव्य स्मारक उभे राहू शकते. मग छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांची प्रगती आजमितीला कोठवर आली? हा प्रश्न मोदी यांनी महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारला विचारायला हवा. बाकी मोदी यांच्या आजवरच्या काँग्रेसनिष्ठ वाटचालीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करणारे सर अॅलन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि मादाम कामा यांच्या आत्म्याला निश्चितच अभिमान वाटेल!