नाटकांचा धंदा इतका बेभरवशाचा, शिवाय बदनाम आहे की, नाटकवाल्यांना आपला मुलगा किंवा मुलगी देताना लोक शंभरदा नाही तरी दहादा विचार करतात. मग नाटकवाल्यांची लग्नं कशी होतात?
– गुरुदास पेंढारी, चिखलदरा
आज कुठला धंदा भरवशाचा आहे? निदान नाटकधंदा तरी कोणी परप्रांतात पळवून नेऊ शकत नाही एवढा भरोसा आहे. आणि लग्नाचे म्हणाल तर नाटकवाल्यांची लग्न कुणी जमवत नाही. ती स्वतः जमतात. नाटकवाले कोणाला विचारून लग्न करत नाहीत. आणि आपल्याला न विचारता लग्न करतात म्हणून लोक नाटकवाल्यांना बदनाम करतात. (मुळात तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला नाटकधंद्यात यायचं आहे का? मग ते नाटक करण्यासाठी यायचंय का लग्न करण्यासाठी?)
माझी बायको माझं अजिबात ऐकत नाही. मी काय करू?
– प्रणीत भोसले, रेवदांडा
हे मला विचारताय? अहो, आपण सारे एकाच नावेतले प्रवासी. संसाराच्या भवसागरात तरून जायचं असेल, तर नाव चालली आहे तशी चालू द्या. स्वतः काही करू नका. नाव मध्येच बुडाली तर लक्षात ठेवा, हल्ली लोक वाचवायला येत नाहीत. सेल्फी घेतात आणि सोशल मीडियावर टाकतात. घरातली गोष्ट अशाने उगाच जगजाहीर होईल.
घरात गणपती बसलेला असताना लोक अथर्वशीर्ष म्हणायला, नवसाचे नारळ चढवायला, रांगेत उभं राहायला आणि कार्यकर्त्यांच्या लाथा खायला बाहेरच्या गणपतींकडे का जात असतील?
– सुनीता जोशी, विलेपार्ले
पिकतं तिथे विकत नाही… घर की मुर्गी दाल बराबर, असं काहीसं कारण असावं असं वाटत होतं. पण आता ‘घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा’ अशी गत झालीय लोकांची. (संतमहात्म्यांनी सांगून ठेवलंय तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळे लोकांचा विचार न करता आपण आपली धुणी धुवावीत.)
इतके लोक दर वर्षी बुद्धीच्या देवाचा उत्सव साजरा करतात… त्या उत्सवाचं स्वरूप पाहून त्यांची भक्ती कुठेतरी कमी पडते आहे, असं नाही वाटत?
– शैला इंगळे, मंडई, पुणे
चुकीचं बोलताय शैलाताई, भक्ती कमी पडत नाहीये तर आपली बुद्धी वाढलीये असं लोकांना वाटतं. म्हणूनच कोणीही बुद्धीदात्याकडे बुद्धी तेवढी मागत नाही.
पूर्वी लोक गणेशोत्सवातले देखावे पाहायला जायचे, लायटिंग पाहायला जायचे; आता काय पाहायला जातात?
– श्रीधर परब, लालबाग
काही पाहायला जात नाहीत तर सेल्फी काढायला जातात. खोटं वाटतं तर मंडपात जाऊन गपचूप बघा. काही तास रांगेत उभे राहिल्यानंतर, दर्शनासाठी माणूस देवासमोर पोहोचतो, तेव्हा देवाला हात जोडण्याआधी तो सेल्फी काढतो.
मी ज्याच्या प्रेमात आहे, तो मुलगा गरीब आहे, माझ्या आईवडिलांनी जो माझ्यासाठी निवडलाय, तो मुलगा श्रीमंत आहे… मी कोणाशी लग्न करू?
– सुवर्णा देशमाने, लातूर (नाव खोटे आहे, तुम्ही समजू शकता…)
छापा काटा करा. ओली का सुकी करा. चिठ्ठ्या टाका. आदा मादा करा.. दहा वीस तीस चाळीस करा… (प्रेम करताना माझा विचार केलेला का? आता मला का विचारताय? माझ्या लग्नाच्या वेळी मीही असे प्रश्न विचारत होतो. कोणी उत्तर दिलं नाही तेव्हा. मी तरी का देऊ?)
देशातील राजकारणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. या राजकारणातून भ्रष्टाचार, ब्लॅकमनी कधीतरी जाईल का?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे.
हे मला का विचारताय? हे मी करतो असं तुम्हाला वाटतं का? की, जे करतात त्यांच्या पोटावर तुम्हाला पाय आणायचा आहे? असं करू नका. काहीतरी माणुसकी बाळगा. भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनीशिवाय राजकारणात येऊन बिचारे राजकारणी दुसरं करणार काय? भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी म्हणजेच राजकारण आणि राजकारण म्हणजेच भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी हे समीकरण समजून घ्या.
पुण्य कमावण्यासाठी आणि स्वर्ग मिळवण्यासाठी गरीबांना आपल्या सोयीने दानधर्म करणारे लोक त्यापेक्षा गरीबांना सक्षम का करत नाहीत?
– नयना पेठकर, जांभळी नाका, ठाणे
गरिबांना सक्षम केल्यावर पुण्य मिळतं, स्वर्ग मिळतो, असं कुठल्या ग्रंथात, पोथी-पुस्तकात लिहून ठेवलंय का? नाही ना? मग कसं कोण पुण्य मिळवण्यासाठी, स्वर्ग मिळवण्यासाठी गरिबांना सक्षम करेल? (ग्रंथात, पोथी-पुस्तकात जे लिहून ठेवलंय त्याप्रमाणेच माणसं वागतात. त्याविरुद्ध कोणी वागला तर तुम्हीच त्याला धर्मद्रोही म्हणणार.)