यंदाच्या गणेशोत्सवात दोन तरुणांचा डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. याआधीही अशा प्रकारच्या घटना गणेशोत्सवात घडल्या आहेत. सातार्यात एका वर्षी एका घराची भिंत कोसळली होती. आवाजाचा एवढा परिणाम होतो का, केवळ ‘काही’ माणसांना त्रास झाला तर त्यासाठी इतरांच्या ‘आनंदा’वर विरजण घालायचे का, अशा प्रकारच्या शंका अनेकांच्या मनात येतात. त्या शंकांचे निरसन करण्याचा हा प्रयत्न आहे. आवाजाचे प्रदूषण हे इतर कोणत्याही प्रदूषणाइतकेच घातक आहे, याबद्दल मनात कोणतीही शंका ठेवता कामा नये.
सर्वात आधी दोन महत्त्वाच्या गोष्टी.
१) आवाजाने फक्त श्रवणक्षमता कमी होते असे नाही तर विविध शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात. आवाज म्हणजे प्रेशर वेव्ह्ज (लहरी) असल्याने त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम कानांसह इतर शरीरावरही होतो. शरीरातील कॉर्टिसोल हे स्ट्रेस हॉर्मोन वाढते, ब्लडप्रेशर वाढते, हृदयगती वाढते, तणाव वाढतो, ज्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतो. विशेषत: ज्यांचे हृदय कमजोर आहे, त्यांना मृत्यूचा सर्वाधिक धोका असतो.
२) आरोग्यावर दुष्परिणाम होण्यासाठी आवाज अत्याधिक असायला हवा असे नाही. सोबतच्या चित्रात दाखवल्यानुसार आवाजाची तीव्रता किती आहे, त्या आवाजाच्या उगमापासून अंतर किती आहे आणि किती काळासाठी त्या आवाजाशी संपर्क येतोय, यावर होणारे आरोग्याचे नुकसान ठरते. उत्सवी वातावरणातील १०० डीबीहून अधिक आवाज काही मिनिटांसाठी असेल, तरीही त्याचा परिणाम अधिक असतो. स्पीकरच्या जेवढ्या जवळ असाल तेवढा जास्त परिणाम होईल आणि जेवढा जास्त वेळ असाल तेवढा परिणामही वाढेल (सुरक्षा वाढवायची असेल तर काय करावे लागेल लक्षात येतंय ना?)
४० डीबीच्या वरील प्रत्येक आवाजाचा काही न काही परिणाम शरीरावर होत असतो. ८५ डीबीच्या वरील आवाज आपल्याला त्रासदायक वाटतो. त्यामुळे आपण सतत नेमक्या किती ध्वनिप्रदूषणामध्ये जगतोय हे आपल्याला माहीत असायला हवे.
काही दशकांपूर्वी ध्वनिप्रदूषण सहसा कामाच्या ठिकाणी, कारखान्यांमध्ये असायचे, त्यामुळे त्यावर खूप संशोधन झाले आहे. मात्र आता आपल्या जीवनशैलीमुळे व शहरीकरणामुळे ध्वनिप्रदूषण रोजच्या जगण्याशी संबंधित झाले आहे. त्यामुळे आवाज व आवाजाचे अदृश्य परिणाम शरीरावर होतच असतात.
अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला असतात की घरी कोणालाच बीपीचा त्रास नाही आणि ती व्यक्ती पण आहार व व्यायामाची सर्व काळजी घेते तरीही हाय बीपीचा त्रास सुरू झाला, पण कारण समजतच नाहीये. अशावेळी या आवाजाचे अदृश्य कारण कोणाच्या लक्षातच येत नाही.
‘नॉईज’ म्हणजे अप्रस्तुत व अवाजवी आवाज. गोंगाट. हा गोंगाट औद्योगिक असू शकतो, सामाजिक असू शकतो आणि पर्यावरणीय असू शकतो (इंडस्ट्रीयल नॉईज, सोशल नॉईज आणि एनव्हायर्नमेंटल नॉईज). औद्योगिक गोंगाट कामाच्या ठिकाणी मशिन्समुळे निर्माण होतो. यापासून सुरक्षेसाठी उपाय उपलब्ध आहेत. सामाजिक गोंगाट वैयक्तिक कृतींनी निर्माण होतो. उदा. मोबाईलवर हेडफोन न लावता किंवा हेडफोन वापरून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे. पर्यावरणीय गोंगाट समूहाच्या कृतींनी व रोजच्या जगण्यात निर्माण होतो. उदा. रस्त्यांवरील आवाज.
सततच्या आवाजाची आपल्याला सवय होते. म्हणजे मेंदू त्याची नोंद घेणे बंद करतो, मात्र त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होणे बंद होत नाही. आत्ता जागृतपणे कोणकोणते आवाज तुमच्या आजुबाजूला आहेत व त्यांची तीव्रता किती आहे याचा थोडा अंदाज घ्या, खूप वेगवेगळे आवाज ऐकू येतील! आपल्या दिवसभराच्या जाण्यायेण्याच्या ठिकाणी आवाजाचे प्रमाण किती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर निऑश साऊंड लेव्हल मीटर हे अॅप वापरता येईल. हे निऑश (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ) या संस्थेचे अॅप आहे जी औद्योगिक सुरक्षेसाठी काम करते.
या आवाजांचे परिणाम लहान मुले (शाळेतील गुणवत्ता कमी होऊ शकते), गरोदर स्त्रिया व वृद्ध यांच्यावर अधिक जाणवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कानातील पेशींचे (हेअरी सेल्स) नुकसान झाल्याने ऐकण्याची क्षमता कमी होते, ती एकदा गेली की पुन्हा मिळवू शकत नाही. तसेच आत्ता त्रास जाणवत नसला तरी नुकसान झाले नसेल असे नाही, हळूहळू नुकसान वाढत राहते. २० टक्के लोकांना काही त्रास जाणवत नसला तरीही श्रवणशक्ती काही प्रमाणात कमी झालेली असू शकते. यावर उपाय करायचे असतील तर सर्वप्रथम या धोक्याविषयी जनतेला जाणीव हवी, तरच काही कृती होऊ शकतील. बाहेरच्या देशांमध्ये निकड असल्याशिवाय गाडीचा हॉर्नदेखील वाजवला जात नाही (आणि आपण हॉर्नमध्ये गाणी लावून वाजवत जातो). अशी काळजी घेतात तरीही ३४ कोटी लोकसंख्या असलेल्या पश्चिम युरोपीय देशांमध्ये केवळ आवाजामुळे १० लाख पर्सन इयर आयुष्य दरवर्षी कमी होते, एवढा परिणाम आवाज करू शकतो. जिथे गोंगाट हाच स्थायीभाव आहे, अशा आपल्यासारख्या देशांमध्ये आपण कल्पना करू शकता की किती आयुष्ये कमी होत असतील.
आत्ताची पिढी व मोठ्यांची पिढी कितपत बदलेल माहीत नाही, पण पालक आणि शिक्षक पुढील पिढीला या बाबी शिकवू शकतात. आपणही सुरक्षा वाढवण्यासाठी पुढील बाबी करू शकतो.
१) आवाजनिर्मिती कमी करण्याचे प्रयत्न
कायदा व नियमांचे पालन जेवढे जास्त लोक करतील तेवढे उत्तम. मिरवणुकीमध्ये प्रत्येक मिरवणुकीत वेगळे गाणे वाजल्याने गोंगाट वाढतो, तसेच आमचे गाणे ऐकू यायला हवे म्हणून स्पर्धा व आवाज वाढतो. त्याऐवजी सर्वांना सामायिक गाणे लावणे किंवा प्रत्येक मिरवणुकीच्या मध्ये ठराविक अंतर रिकामे ठेवणे किंवा गाणी मिरवणुकीत न वाजता मिरवणुकीच्या मार्गांवर वाजतील अशी व्यवस्था करणे, अशा काही उपायांनी आवाजाची तीव्रता कमी करता येईल. मिरवणूक एका जागी स्थिर असताना आवाजाची पातळी कमी ठेवणे. यासाठी वर उल्लेख केलेल्या अॅपचा वापर करून आवाजाचे प्रमाण कोणालाही तपासता येईल. वैयक्तिक स्तरावर हेडफोन लावून गाणी ऐकताना आवाज जाणीवपूर्वक कमी ठेवणे अत्यावश्यक आहे. खासगीत ऐकताना मोठा आवाज हवा असेल तर हेडफोन वापरू नये.
२) स्वत:च्या सुरक्षेचे उपाय
कामाच्या ठिकाणी, रस्त्यांवर प्रवास करताना, मिरवणुकीमध्ये असताना कानांच्या सुरक्षेसाठी इयर प्लग्स वापरणे. (प्रवासात वापरणे थोडे कठीण आहे, कारण हॉर्न ऐकू येणेही आवश्यक असते.) नोकरीच्या ठिकाणी आवाजाबाबत सुरक्षा वाढवणे. टाळणे शक्य नसल्यास ड्युटी पोस्टिंग ठराविक काळानंतर बदलणे. नियमित तपासणी करून ऐकण्याच्या क्षमतेवर लक्ष ठेवणे. घर निवडताना परिसरातील आवाजाची पातळी देखील विचारात घ्यायला हवी. कारण सततच्या आवाजामुळे अँक्झायटी किंवा डिप्रेशन देखील येऊ शकते. मिरवणुकीमध्ये कामाचा भाग म्हणून खूप काळ थांबावे लागत असेल (उदा. पोलीस) तर कानांच्या सुरक्षेसाठी इयर प्लग वापरणे, जेणेकरून तीव्रता थोडी तरी कमी होईल!
३) अधिक आवाजाच्या काळामध्ये त्या भागापासून शक्य असल्यास दूर जाणे (अंतर वाढवणे).
अर्थात हे सर्वांना शक्य नाही, मात्र रुग्ण किंवा कमकुवत हृदय असल्यास अशा व्यक्तींची सोय तात्पुरत्या स्वरूपात इतर कोठे करता येऊ शकेल, विशेषत: मिरवणूकमार्गाजवळ घर असल्यास याचा विचार करता येईल.
४) आवाज ऐकण्याचा वेळ कमी करणे.
जेव्हा शक्य असेल तेव्हा अधिक आवाजी वेळा टाळून प्रवास करणे. मिरवणुकीमध्ये थांबण्याची वेळ कमी करणे. मिरवणुकीची गती वाढवून वेळ कमी करणे. तुमच्या लक्षात आले असेल की यातील बरेच उपाय आपल्या स्वत:च्या बळावर करता येणार नाहीत. यासाठी सामाजिक जाणीव व शहाणीव वाढायला हवी. यासाठी आरोग्यशिक्षण व चर्चा आवश्यक आहेत.
जे जनता समजू शकत नाही ते परिणाम जाणणारे राज्यकर्ते हवेत, जे जनतेच्या भल्यासाठी काम करतील. विशेषतः शाळांमध्ये व कॉलेजेसमध्ये याबद्दल जाणीव, चर्चा, नव्या आरोग्यपूर्ण प्रथा सुरू करता येतील. कारण मुलांमध्ये चांगले बदल करणे सोपे असते. गोंगाटाची जाणीव व परिणामांची कल्पना असल्यास तरुणाई देखील स्वतःहून आरोग्याचा मार्ग निवडेल, याविषयी ज्ञानप्रसार व्हायला हवा आणि सर्वांना पटतील असे उपाय टप्प्याटप्प्याने केले गेले पाहिजेत. शेवटी स्वत:चे व प्रियजनांचे आरोग्याचे नुकसान व्हावे असे कोणत्या शहाण्या माणसाला वाटेल बरे!
ध्वनिसुरक्षेचा मार्ग अवघड असेल तरी चालावा लागणार आहेच अन्यथा आवाजाचा हा अदृश्य मृत्यूदाता आपल्या आयुष्याची प्रतवारी (क्वालिटी) आणि लांबी (लाँगॅव्हिटी) नक्कीच कमी करत राहील! आपण आरोग्यपूर्ण जगून देखील आपली काहीही चूक नसताना केवळ पर्यावरणीय गोंगाटामुळे आपण विविध आजारांना तोंड देत राहू. हे टाळण्यासाठी या गोंगाटरूपी राक्षसाच्या विसर्जनाची बुद्धी श्रीगणेश सर्वांना देवो!