संतोषराव, आता श्रावण संपणार, आता तुमची मज्जा होणार… हो ना?
– चेतन पाटील, थळ वायशेत
तुम्हाला मज्जा नेमकी कशात वाटते? श्रावण संपला म्हणून की भाद्रपद सुरू होणार म्हणून..? (भाद्रपदात रात्री अपरात्री बाहेर फिरू नका. लवकर घरी जात जा. सगळे महिने सारखेच वाटतील.)
‘रामराम’, ‘जय सियाराम’ आणि ‘जय श्रीराम’ या अभिवादनांमध्ये नेमका काय फरक आहे?
– अनंत दवे, पुणे
जो फरक रामाच्या भक्तांमध्ये आणि xxरामाच्या भक्तांमध्ये आहे. (गाळलेल्या जागा तुम्हीच भरा आणि ओळखा तुम्ही कुठल्या रामाचे भक्त आहात ते… सगळ्या रामांमधला फरक तुमचा तुम्हाला कळेल.)
जगातला आज हयात असलेला सर्वश्रेष्ठ माणूस कोण आहे, असं तुम्हाला प्रामाणिकपणे वाटतं?
– रामानंद शेलार, भूम
मीच तो.. मीच तो….
आपण फार महत्त्वाचा माणूस आहोत, आपल्यावाचून जग चालणारच नाही, असं एखाद्याला वाटू लागलं, तर काय करायचं?
– डॉमनिक डाबरे, विरार
कोणा एखाद्याला तसं वाटत असेल तर वाटू दे, त्यात आपल्या बापाचं काय जातं? (त्याच्यामुळे आपल्याला एखादं पद मिळणार असेल, कसला कॉन्ट्रॅक्ट मिळणार असेल, तुमची कुठली फाईल बंद करायची असेल, तर अशा माणसाला आपला बाप म्हणावं लागतं. अशा वेळेला त्या माणसाला तू जगातला फार महत्त्वाचा माणूस आहेस अस आपणच म्हटलं तरीही आपल्या बापाचं काय जातं?)
शहाणा आणि दीडशहाणा यांच्यात अतिशहाणा कोण?
– श्रीकांत पेंढारकर, सांगली
मीच एक शहाणा.
तुम्ही नाटकाच्या सुरुवातीला किंवा नाटक संपल्यावर माईक सुरू आहे हे विसरून चुकून काही बोलून गेले आहात का?
– विलास शेणई, गिरगाव
तालीम न करता ऐन वेळी ‘नाटक’ करायला गेलो तर आपल ‘नाटक’ लोकांना कळतं. म्हणून आम्ही तालीम करूनच नाटक करतो. (शिवाय आपल्या बोलण्यावर हो.. हो.. म्हणायला आणि माईक चालू आहे की नाही ते ओळखायला, असे दोन दोन कलाकार बरोबर ठेवण्याची ऐपत ‘प्रमुख’ अभि‘नेत्या’ची नसते.)
यंदाही मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी टोलमुक्तीचे गाजर दाखवले, मात्र चंद्रावर जास्त खड्डे आहेत की कोकणातील रस्त्यांवर, हे गौडबंगाल काय!
– उत्कर्ष बोरले, मुंबई
चंद्रावर पोहोचलो म्हणून तिथल्या खड्ड्यांचा विचार न करता जल्लोष केलात ना? तसाच जल्लोष कोकणात पोहोचलो म्हणून करा ना! खड्ड्यांचा विचार कशाला करता? ज्यांच्याकडून अपेक्षा करता त्यांच्या वाटेत काय कमी खड्डे आहेत? आणि गाजराचं म्हणाल, तर त्यांना जे मिळालंय तेच ते आपल्याला देणार ना? (असं विरोधक म्हणतात आणि मी विरोधक नाही.)
घरात गणपती बसलेला असताना लोक अथर्वशीर्ष म्हणायला, नवसाचे नारळ चढवायला, रांगेत उभं राहायला आणि कार्यकर्त्यांच्या लाथा खायला बाहेरच्या गणपतींकडे का जात असतील?
– सुनीता जोशी, विलेपार्ले
पिकतं तिथे विकत नाही… घर की मुर्गी दाल बराबर, असं काहीसं कारण असावं असं वाटत होतं. पण आता ‘घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा’ अशी गत झालीय लोकांची. (संतमहात्म्यांनी सांगून ठेवलंय तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळे लोकांचा विचार न करता आपण आपली धुणी धुवावीत.)
इतके लोक दरवर्षी बुद्धीच्या देवाचा उत्सव साजरा करतात… त्या उत्सवाचं स्वरूप पाहून त्यांची भक्ती कुठेतरी कमी पडते आहे, असं नाही वाटत?
– शैला इंगळे, मंडई, पुणे
चुकीचं बोलताय शैलाताई, भक्ती कमी पडत नाहीये तर आपली बुद्धी वाढलीये असं लोकांना वाटतं. म्हणूनच कोणीही बुद्धीदात्याकडे बुद्धी तेवढी मागत नाही.
पूर्वी लोक गणेशोत्सवातले देखावे पाहायला जायचे, लायटिंग पाहायला जायचे; आता काय पाहायला जातात?
– श्रीधर परब, लालबाग
काही पाहायला जात नाहीत तर सेल्फी काढायला जातात. खोटं वाटतं तर मंडपात जाऊन गपचूप बघा. काही तास रांगेत उभे राहिल्यानंतर, दर्शनासाठी माणूस देवासमोर पोहोचतो, तेव्हा देवाला हात जोडण्याआधी तो सेल्फी काढतो.