एशियाडला जाणार्या फुटबॉल संघाची कामगिरी कशी होईल, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी चक्क ज्योतिषाकडे संघ पाठवला. त्यानंतर क्रीडा खात्यानं आदेश दिले की, सर्वच संघांनी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी ज्योतिषाकडे कुंडली पाहून मगच संघ पाठवावं. विश्वचषक क्रिकेटच्या उंबरठ्यावर प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहितनं ज्योतिर्भास्कर विजयानंदांकडे धाव घेतली आणि त्यांनी जगज्जेतेपदाचं भाकित केलं.
– – –
‘‘सारं काही मिळवलं, पण विश्वविजेतेपदाचं भाग्य लाभलं नाही. ना एक खेळाडू म्हणून, ना प्रशिक्षक म्हणून…’’ उदास आणि विमनस्क मन:स्थितीत राहुलकुमार द्रविड स्वगत म्हणत होते, ‘‘काय केलं तर वर्ल्ड कर्प जिंकेन? यंदाचा विश्वचषक भारतातच आहे, हे तसं अनुकूल. कारण मागील तीन विश्वचषक यजमान राष्ट्रांनी जिंकलेत होईल का माझं जगज्जेतेपदाचं स्वप्न पूर्ण’’ द्रविडसरांची चिंता त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत होती म्हणजे संख्याशास्त्र भारतासाठी १०० टक्के अनुकूल. पण तरीही शंका आहे?
…घरातल्या चषकांच्या असंख्य काचेच्या कपाटांत कुठेही विश्वचषक नाही, हे शल्य त्यांना अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे बोचत होतं.
तितक्यात त्यांना स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून सूचना आली, ‘‘देशाचा कोणताही संघ पाठवण्यापूर्वी ज्योतिर्भास्कर विजयानंद यांचा सल्ला घ्या. फुटबॉल संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांनी प्रथम ज्योतिषाला संघ दाखवून नंतरच तो एशियाडला पाठवला. लवकरच ‘ज्योतिर्क्रीडा शास्त्र’ हे नवं शास्त्र देशात विकसित केलं जाईल आणि सपोर्ट स्टाफमध्येही एक मार्गदर्शक समाविष्ट केला जाईल. प्लेइंग इलेव्हन वगैरे ग्रहमान पाहून निश्चित करावेत!’’
आदेशच म्हटल्यावर संघाची यादी घेऊन द्रविडजी कर्णधार रोहित शर्मासमवेत विजयानंद यांच्या भेटीला पोहोचले. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात रोहितचा समावेश होता. त्यामुळे विश्वविजेतेपदाची चव त्यानं चाखली होती. द्रविड यांच्यापेक्षा तो नशीबवान. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चक्क चार वेळा आयपीएल जेतेपद जिंकलेलं. त्याआधी २००९मध्ये डेक्कन चार्जर्सच्या आयपीएल विजेत्या संघातही तो खेळाडू म्हणून समाविष्ट होता. पण कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत असताना वनडे विश्वविजेतेपदसुद्धा जिंकावं, ही त्याचीही सुप्त इच्छा.
इतक्यात आत येण्याचं फर्मान घेऊन ज्योतिर्भास्करांचा सेवक आला. द्रविड आणि रोहित यांनी दबक्या पावलांनी आत प्रवेश केला. रोहितनं साष्टांग दंडवत केला, तर द्रविडसरांनी उभ्यानंच नमस्कार केला. ‘‘स्वागत राहुलजी, स्वागत रोहितजी. या स्थानापन्न व्हा,’’ आनंदी मुद्रेनं विजयानंदांनी फर्मावलं (दोघंही बसले.) आता पहिली स्ट्राइक कुणी घ्यायची, यासाठी दोघं एकमेकांकडे पाहात होते. तेव्हा विजयानंदांनीच पुढाकार घेत, ‘टीम दिखाओ’ अशी आज्ञा दिली. द्रविडजींनी खिशातून चिठ्ठी काढली आणि उघडून त्यांच्या पुढ्यात ठेवली. वातानुकूलित दालनातही द्रविडजींना घाम फुटला. रोहित मात्र शांत होता. दोघेही कसलेले फलंदाज. त्यामुळे मैदानावर क्षेत्ररक्षकांचा अंदाज घ्यावा, त्याच खुबीनं ते ज्योतिषींच्या दालनातील सर्व फ्रेम्स न्याहाळू लागले.
संघातील खेळाडूंची यादी वाचून काढल्यानंतर विजयानंदांनी पांढरा कागद आणि पेन घेतला. त्यावर रेषा मारून भारतीय क्रिकेट संघाची अख्खी कुंडली मांडली. त्यावर विविध ग्रहांची नावं आणि आकडे लिहिले. मग स्वत:शीच काहीतरी पुटपुटून आकडेमोड केली आणि काही निष्कर्षापर्यंत येत मान वर केली. स्लिपमध्ये झेल यावा, तितक्याच त्वरेनं द्रविड आणि रोहितनं लक्ष केंद्रित केलं.
‘‘गुरू चतुर्थस्थानी. म्हणजे राजयोग. भारत जग जिंकणार… निश्चितच!’’ आता महत्त्वाच्या फलंदाजाचा झेल मिळून सामना जिंकल्याचा आनंद दोघांच्याही चेहर्यावर झळकला. ते उभे राहून जल्लोष करण्याच्या तयारीतच होते. पण आपण मैदानावर नसल्याची जाणीव होऊन त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवले. काही दशकांपूर्वी चित्रपटांत प्रणयक्रीडा दाखवताना जशी प्रफुल्लित फुलं एकमेकांवर आदळवली जायची, तसेच हे चेहरे फुलले होते…
‘‘आणखी सांगा गुरूजी. हेच ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेयत,’’ रोहित उत्तरला. द्रविडचं औदासीन्य बुलेट ट्रेनपेक्षा वेगानं पळून गेलं होतं. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच सर्वांची स्थिती असताना सेवकानं विजयानंदांना मोतीचूर लाडू आणू का, असं हातवार्यांनीच विचारलं. पण गुरुजींनी त्याला थोडा धीर धरावा, असं इशार्यानंच सांगितलं.
‘‘काही समस्या गुरूजी?’’ द्रविडसरांनी थेट विषयाला हात घातला. गुरुजींनी मान डोलावली. ‘‘अक्षर पटेलची दुखापत बरी होईना?… तो न खेळल्यास रविचंद्रन अश्विनला खेळवण्याचा विचार करतोय. पण तोही अपेक्षेप्रमाणे चमकेल का? श्रेयस अय्यर फिट झालाय, पण फॉर्मच्या शोधात आहे. शार्दुल ठाकूर महागडा ठरतोय. एक ना धड अनेक समस्या आहेत. यावर काही उपाय आहेत का?’’ द्रविड यांनी क्षणार्धात आपल्या समस्यांची घागर उताणी केली. रोहितनं त्यांना दुजोरा दिला.
द्रविड सरांचं सारं ‘समस्यापुराण’ ऐकल्यावर गुरूजींनी कुंडलीकडे पाहात म्हटलं, ‘‘मी या समस्यांविषयी नव्हे, तर कुंडलीतल्या समस्यांबाबत बोलतोय. शनी वक्री आहे. त्याची शांती करावी लागेल… तरच विश्वविजेत्ोपदाच्या मार्गातील अडथळे दूर होतील!’’
‘‘या समस्यांचं काही निराकरण करता येईल का?’’ रोहितनं सवाल केला. आशावादी नजरेनं दोघंही विजयानंदांकडे पाहात होते. आता त्यांचे अविर्भाव
लाँगऑन आणि लाँगऑफच्या क्षेत्ररक्षकाप्रमाणे होते. गुरूजींनी पुन्हा कुंडलीत पेनानं काही काथ्याकूट केला. आता त्यांच्या चेहर्यावर प्रसन्नता दिसू लागलेली. पुन्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता त्या नजरेत आश्वासकता होती.
‘‘जग जिंकण्यासाठी अश्वमेध यज्ञ करावा लागेल. त्यासाठी विशेष अश्व लागेल. हा यज्ञ पूर्ण झाल्यावर सर्व असंतुष्ट ग्रहांची शांती होईल आणि तुमच्या जगज्जेतेपदाच्या मार्गातील अडथळे दूर होतील,’’ असा गुरूजींनी उपाय सांगितला. पुन्हा झेल मिळाल्याचा आनंद दोघांनीही शांतपणे साजरा केला आणि मैदानी टाळी एकमेकांना दिली.
‘‘पण… हा अश्वसुद्धा विशेष लागेल. अशा व्यक्तीचा ज्यानं जग जिंकलंय,’’ विजयानंदांनी पुढे आपलं वाक्य पूर्ण केलं. द्रविड डोकं खाजवू लागला. ‘‘आता आम्ही एकेकाचे घोडे लावू,’’ असं रोहित दबक्या आवाजात स्लेजिंग करावी, तसा उत्तरला. गुरूजींनी ‘काय?’ असा प्रश्न विचारताच क्षणाचाही विलंब न लावता रोहित उत्तरला, ‘‘आपल्या माहीकडे आहेच की घोडा. चेतक त्याचं नाव. एमएसडी तर डबल वर्ल्ड चॅम्पियन आहे. म्हणजे तर हा दिग्विजय मिळवण्यासाठी परफेक्ट घोडा. आय मीन अश्व!’’ (द्रविड यांनीही अनुकूलता दर्शवली.)
‘‘१९८३मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मर्व्ह ह्यूज नामक एकमेव क्रिकेटपटूनं ‘भारत डार्क हॉर्स ठरणार’ असं केलेलं विश्वविजेतेपदाचं भाकीत खरं ठरलं होतं. गुरूजी यावेळी तर त्याहून सामर्थ्यशाली संघ आहे. शिवाय सर्व अनुकूल ग्रहमान हे जगज्जेतेपदाचे द्योतकच जणू…’’ हे भाष्य करताना आता द्रविड यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
भीत भीत रोहितनं ठेवणीतला चेंडू काढला. ‘‘गुरूजी अक्षरचं काय करायचं? त्याला दुखापत झालीय. पण हा गुजरातेतला. त्याला वगळणं ‘पटेल’ का?’’ गुरुजींनी गंभीरपणे पुन्हा कुंडली पाहिली आणि म्हणाले, ‘‘पटो, अथवा न पटो. पण आवश्यक. अक्षरचा मंगळ कडक. म्हणजे कठीणच सर्व. त्याला संघात न घेतलेलंच बरं.’’
इतक्यात गुरुजींनी सेवकाला सूचना केली, तसा तो ताटात मोतीचूरचे लाडू घेऊन दालनात आला. ‘‘बाटों यार लड्डू. वर्ल्ड कप जितने का बाद गुरुजी हम आपको मिलने जरूर आयेंगे…’’ असं म्हणत रोहितनं पुन्हा साष्टांग दडवत घातला, तर द्रविडनं नमस्कार केला. ज्योतिर्भास्करांनी हात वर करीत ‘विजयी भव:’ असा आशीर्वाद दिला.
(लेखकाला फलज्योतिष शास्त्र किंवा ग्रहयोग याविषयी कोणतीही माहिती नसून, केवळ वाचकांचं निखळ मनोरंजन व्हावं, या हेतूनं हे काल्पनिक लेखन केलं आहे. जगज्जेतेपदाचे ग्रह अनुकूल ठरल्यास उत्तमच; परंतु प्रतिकूल ठरल्यास क्षमस्व!)