राहुल नार्वेकर
लांबवत लांबवत आलोय
आत्ता कस्सा कुठे थांबू
सुप्रीमांनी मारलाय फटका
पाठीवरती बसलाय बांबू
काहीही झालं तरीही आपण
इमानाला जागलं पाहिजे
शेवटी ‘त्यांचे’ उपकार स्मरून
शहाण्यासारखं वागलं पाहिजे
त्यांनी दम भरलाय जोरात
मी पण त्यांच्या एवढाच मोठा
कसं कबूल करू आता
आहे आमचा दामच खोटा
—– —–
एकनाथ शिंदे
माझा मलाच वैताग आलाय
कोटीकोटीच्या मारून थापा
जे जे मागाल ते ते देतो
मीच आता झालोय बाप्पा
आश्वासने दिल्याशिवाय
आता आमची खैरच नाही
निवडणुका तोंडावरती
म्हणून मला सुटली घाई
उत्साहाला आणू उधाण
थाटात उत्सव, उधळू पैसा
आहेत शिते, जमतात भुते
पानी तेरा रंग कैसा?
—– —–
मनोज जरांगे-पाटील
मी आहे यांना ओळखून
बोलतात एक नि करतात एक
दिवसरात्र सुरू असते
आश्वासनांची फेकंफेक
उपोषण मी सोडलं जरीही
‘त्या’ पदाचा मान राखून
सूर्योदय तर नाही राहणार
ठेवलं जरी कोंबडं झाकून
ओठात एक नि पोटात एक
माईकने तर केले उघडे
जनतेने त्या क्षणात पाहिले
डोळ्यांसमोर सत्य नागडे
—– —–
नरेंद्र मोदी
नवी संसद, नवा विचार
विरोधकांना करू लाचार
फसवी विधेयके मांडून
इलेक्शनला राहू हुश्शार
जिंकण्याची तर वाटतेय भीती
पोटात येतोय मोठ्ठा गोळा
सर्वेक्षणाचा अंदाज म्हणतोय
‘भाजपचा तर चोळामोळा’
जगी इंप्रेशन मारले तरीही
इथली जनता म्हणते जा जा
नऊ वर्षे खूप पिडलेत
विदेशातच पोळी भाजा
—– —–
अजित पवार
इकडे आड तिकडे विहीर
इकडे टरबूज तिकडे मिंधे
सगळे मांडे मनातच खाल्ले
बंद पाडतात माझे धंदे
दोघे असं का करतात
माझं मलाच कळत नाही
माझा पत्ता काटण्याची ही
का त्यांना झालीय घाई
केवढी स्वप्नं बघून आलो
सरकारात सामील झालो
अशा काही खेळतायत चाली
स्वप्नी ओरडतोय मेलोऽ मेलोऽऽ