शाहरुख खानच्या ‘जवान’ने अनपेक्षितपणे एक कामगिरी केली आहे. राष्ट्रवादावर मक्तेदारी सांगणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भक्तांची दातखीळ बसवण्याची कामगिरी. ‘काश्मीर फाइल्स’, ‘केरळ स्टोरी’ यांच्यासारखे विद्वेष माजवणारे चित्रपट बनवल्यापासून मंडळी चांगलीच चेकाळली होती. भारताचा राष्ट्रवाद आपल्याच तालावर नाचतो, अशी त्यांची समजूत झाली होती. भारताचा राष्ट्रवाद भारतीय जनतेतच भेदाभेद करणारा फूटपाड्या असल्याचा गैरसमज त्यांनी मुद्दाम पसरवून दिला होता. शाहरुख खान मुसलमान असल्याने त्याला देशद्रोही ठरवण्याचा कितीतरी आटापिटा मंडळी करत होती. त्यासाठी त्याच्या मुलाला भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाने देशाच्या दमनकारी यंत्रणांचा वापर करत कसे छळले, या इतिहासाचे भारतीय नागरिक साक्षी आहेत. ‘जवान’ने त्या छळवादाला ‘मुलाला हात लावण्याअगोदर बापाशी बोल’ म्हणत जणू आव्हानच दिले आहे. अर्थात हे बॉलिवुडी प्रकरण असल्याने ते मनोरंजनाच्या चौकटीतच राहील, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.
हिंदी चित्रपट एकाच वेळी वास्तववाद, पलायनवाद, प्रस्थापित विचारसरणी आणि समतावादी सामाजिक परिवर्तनाची गरज यांची मसालेदार पाककृती असते, हे सर्वश्रुत आहे. परंतु ‘कॉर्पोरट मनुवादा’च्या कालखंडात त्यातील समतावादी आशय गायब झाला होता. हिंदी चित्रपट एकाच वेळी राष्ट्रवादाची महती गात दुसर्या बाजूला त्याची कमीजास्त समीक्षाही करत आला आहे. स्वातंत्र्यानंतर समाजवादी जाणिवेची चौकट मोडणार नाही, इतपतच उजवेपण चित्रपटात दिसत असे. तुमचा राष्ट्रवाद सामाजिक न्यायाची पुरेशी बूज राखत नाही, असेही तो बिनदिक्कत सांगत असे. ‘पथेर पांचाली’ सिनेमा भारताची बदनामी करतो म्हणणारे महाभाग त्याही वेळी असले, तरी ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ असा सवालही केला जात असे.
पन्नाशी-साठीच्या दशकानंतर भारतभरच्या नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेले आहे. सिनेजगतावर कॉर्पोरेट मनुवादाने मांड ठोकताच, विशेषत: उत्तरेच्या वर्चस्वाखाली समतावादी संस्कृती चिरडून टाकली जाऊ लागली. रास्व संघवाले जितं मयाच्या आरोळ्या ठोकत सामाजिक समता आणि न्याय कायमचा गाडण्याची भाषा करू लागले. अशा वातावरणात ‘जवान’ चित्रपट आल्याने त्यांची नाही म्हटले तरी पंचाईत झाली आहे.
डोकं गरगरायला लावणारी अॅक्शन आणि रक्ताचे सडे याशिवाय आधुनिक चित्रपट बनणे जणू दुरापास्तच झाले आहे. त्यात डिजिटल जमान्यात हिंसाचाराला सामान्य रूप देणारे व्हिडिओ गेम्स पोरासोरांच्या बोटांना आणि नजरांना सवयीचे झालेले. चित्रपटांनी त्यांचा उपयोग केला नसता तरच ते नवलाचे झाले असते. तशा नकली हिंसाचाराने ‘जवान’ ओतप्रोत भरलेला आहे. पण त्यातील अतिशयोक्तीने त्या हिंसाचारातील नकलीपणा जास्तच ठाशीव होतो. त्यामुळे त्याबाबतीत हे असतंच, म्हणत प्रेक्षकाला त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करता येतं.
‘जवान’ हा नेहमीचा देमार चित्रपट असला तरी त्याला मिळालेली चौकट त्याचे वेगळेपण अधोरेखित करते. चित्रपटाच्या आशयाचा पाया काय आहे? कर्जात बुडाल्याने आत्महत्या करणारा शेतकरी, कॉर्पोरेट कंपन्यांना कमी व्याज आणि शेतकर्यांना जास्त व्याजाने दिल्या जाणार्या कर्जातील अन्याय, केव्हाही मोडून पडेल असे वाटणारी आरोग्यव्यवस्था, इतकेच नव्हे तर हवेचे प्रदूषण यांना ‘जवान’ने चित्रपटाचा विषय बनवले आहे! ‘जवान’मध्ये आणखी एक वेगळेपण आहे. यातील खलनायक हा भांडवलशाहीच्या परिघावरचा गुन्हेगार नसून तिच्या गाभ्यातला गुन्हेगार आहे. सर्व लोकशाही प्रक्रिया तुडवत सर्व प्रकारच्या नैसर्गिक संसाधनांतून पैसा कमावणे एवढा एकमेव उद्योग असलेला खलनायक मोदींच्या नव्या भारताचा नायक आहे.
राष्ट्रवाद ही चित्रपटातील सामाजिक संघर्षाची भूमी बनू शकत असल्याचा निर्देश अलीकडे होऊ लागला आहे. भाजपच्या राष्ट्रवादाचा प्रचार काही चित्रपटांनी केला. परतफेड म्हणून त्या चित्रपटांचा प्रचार भाजपने केला. अशावेळी भारतीय जनतेने इंग्रजांशी लढा देत निर्माण केलेल्या आणि भाजपच्या कॉर्पोरेट-मनुवादाच्या नजरेला नजर देणार्या राष्ट्रवादाचा प्रचार हाही देशभक्तीचाच अवतार असतो. अनुभव सिन्हांचा ‘मुल्क’ नावाचा भारतीय मुस्लिमांचाही भारतावर हक्क आहे, असे सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. अनुभव सिन्हाने स्पष्ट सांगून टाकले होते, होय, हा माझ्या राष्ट्रवादाचा प्रचार आहे!
खरे तर, भारतीय राष्ट्रवाद भारतीय सिनेमाच्या नसानसात भरलेला आहे. राष्ट्रउभारणीच्या प्रत्येक टप्प्याची अभिव्यक्ती तो करत आला आहे. त्याची सामर्थ्यस्थळे आणि त्यातील कमजोर्या तो दाखवत आला आहे. त्याच्या अंगभूत अंतर्विरोधाचे त्याला स्पष्ट भान असो वा नसो, मात्र एका बाबतीत या राष्ट्रवादाला बिलकुल संदेह नव्हता. हा राष्ट्रवाद सर्वसमावेशक असल्याशिवाय टिकूच शकत नाही याची जाण. ‘अमर अकबर अँथनी’ यांना एका समान सूत्रात गोवणारा राष्ट्रवाद हा अस्सल भारतीय राष्ट्रवाद आहे, हे तो ठासून सांगत आला आहे.
बॉलिवुडमध्ये मुसलमान शाहरुख खानने जितके राष्ट्राविषयी चित्रपट केले तितके क्वचितच दुसर्या सुपरस्टारने केले असतील. शाहरुख खान हा स्टार जमान्यातला सुपर हिरो आहे. त्याचे पडद्यावरील रूप आणि वास्तवातील रूप याची सरमिसळ होणे क्रमप्राप्त आहे. तो बड्या भांडवलावर उभारलेल्या चित्रपटव्यवस्थेचा अंगभूत भाग आहे. तरीही शाहरुख आपल्या चित्रपटांतून भारतीयत्वावर मोहर उठवत आला आहे.
‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ घ्या, ‘स्वदेस’ घ्या, अथवा ‘चक दे इंडिया’ घ्या. त्यात भारतीय राष्ट्रवादाला असलेली रचनात्मकतेची गरज तो अधोरेखित करतो. खोट्या राष्ट्रप्रेमाचा उमाळा येणारे मनुवादी अमेरिकेत जाऊन सत्यनारायण करत भारतीयत्वाचे प्रदर्शन करत राहतात, तर ‘स्वदेस’मधला नायक अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतीयांचा विकास करण्यासाठी परततो. हा स्वदेस त्याला परत येण्यासाठी पुकारतो आणि ती पुकार ऐकून तो आपल्या मातीत येऊन रुजू पाहतो. त्याचा भारतीय ‘हा’ तारा आहे, ‘तो’ तारा आहे, ‘हर’ तारा आहे. विश्वगुरू विश्वगुरू म्हणत मंत्रपठण करणार्या मेंदूत न मावणारी ही वैश्विकता आहे. तो भारतीय खर्या विश्वात्मक जाणिवेचा आहे. ‘जो जो जगी जगतो तया, माझे म्हणा करुणाकरा’ असे गाणारा माणूस हाच खरा भारतीय आहे, हे तो पुन्हापुन्हा सांगत राहतो.
मनूचा पुरूषी अहंगड हे खरे भारतीयत्व नाही. तिरंगा फडकवण्याचा स्त्रीलाही अधिकार आहे, असे ‘चक दे इंडिया’तील कबीर खान सांगत असतो. आणि भारतीयत्व केवळ गंगेच्या किनार्यापुरतेच आक्रसून राहिलेले नाही. ‘चक दे इंडिया’चा संघ सर्व प्रदेशांच्या मिलाफातून बनलेला आहे. भारतीय संघ त्याशिवाय बनूच शकत नाही. म्हणून तर भारत हे एक संघराज्य आहे.
मोदीराज्यात ‘पठाण’ नावाचा सिनेमा काढणे हीही एक राष्ट्रवादी कृती असते. कुठलाही चित्रपट सामाजिक-राजकीय पोकळीत निघू शकत नाही. सर्वसमावेशक राष्ट्रवादाला जागा ठेवली नाही की मुस्लिम भारतीयाला आपण देशभक्त असल्याचे पुन्हा पुन्हा सांगावे लागते. ठीक आहे, मीही तुमचे नियम वापरतच हा खेळ खेळतो, म्हणत हिंदू राष्ट्रवाद्याच्या तोडीस तोड ठरणारा राष्ट्रवादी ‘पठाण’ अवतरतो.
‘जवान’मधला राष्ट्रवाद जास्त प्रगल्भ आहे, म्हणून जास्त अस्सल आहे. तो कशासाठी आहे? तो कुणा परक्याविरुद्ध लढत नाही. तो शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध लढतो; तो सामान्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी लढतो; इतकेच काय पण जनतेला विषारी श्वास घ्यायला लावणार्या प्रदूषणाविरुद्धही लढतो! एका सामाजिक वास्तवाच्या भूमीत रुजू पाहणारा हा राष्ट्रवाद आहे. तो प्रामाणिक आत्मपरीक्षण करायला लावणारा राष्ट्रवाद आहे. एका बाजूला लोकशाहीतील व्यंगावर बोट ठेवत ती उत्तरदायित्वावर आधारित असली पाहिजे, असा आग्रह धरणारा राष्ट्रवाद आहे. शेतकरी आत्महत्या हा या कथानकाचा प्रस्थानबिंदू आहे. ऑक्सिजनविना घुसमटणारी माणसे हा दुसरा प्रस्थानबिंदू आहे. लष्कराला ऐनवेळी न उडणार्या रायफली पुरवणारा खासगी भारतीय भांडवलदार हा आणखी तिसरा प्रस्थानबिंदू आहे. अशा अनेक बिंदूंनी हे ‘राष्ट्रवादी’ चित्र तयार झाले आहे.
अर्थात, या चित्रपटाची तुलना ना सत्यजित राय यांच्याशी करता येते, ना मृणाल सेन, ऋत्विक घटक, श्याम बेनेगल आदींशी करता येते. हाही एक गल्लाभरू चित्रपटच आहे हे त्यासंबधीच्या आकड्यांवरून लक्षात येते. याचे तीनशे कोटीचे बजेटही तो पूर्ण करायला अपुरे पडले, म्हणे. पण त्याने काही बिघडले नाही, म्हणजे निर्मात्यांचे काही बिघडले नाही! पहिल्या आठवड्यातच त्याने सातशे कोटी कमावले आहेत! खरे तर, भारतीय भांडवलाने नफ्याचे निशाण जोरदारपणे फडकवत ठेवल्याबद्दल मोदींनी जनतेला टाळ्या आणि थाळ्या पिटायचे आवेशयुक्त आवाहन करायला पाहिजे होते. पण अस्सल राष्ट्रभक्तीचे कौतुक करायलाही दानत असावी लागते. कौतुक करायला ही अदानीची नादानी थोडीच आहे?
मात्र, गल्ला भरून घेता घेता ‘जवान’ने जाणतेपणाने एक गोष्ट केली आहे. प्रश्न विचारणार्यांना देशद्रोही ठरवणार्या व्यवस्थेला त्याने प्रश्न विचारले आहेत. हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना ऑक्सिजन पुरवणार्या ‘डॉक्टर’ला देशद्रोही ठरवणार्यांना प्रश्न विचारले आहेत. डॉ. काफिल खानला तुरुंगात का खितपत ठेवले, याची कुणाला आठवण झाल्यास तो काही दिग्दर्शक
अॅटलीचा दोष नाही की नायक झालेल्या शाहरुख खानचा. गुजरातमध्ये कोरोना काळात नकली व्हेंटिलेटर्स पुरवणारे आणि राफेल व्यवहार करणारे कोण असावेत, भारतातील तुरूंगात आणखी किती निरपराध भरलेले आहेत, असा विचार करायला लावणारे प्रश्न इथे विचारले आहेत. चित्रपटाच्या शेवटी हा नायक एक विधान करतो, ‘हम जान लगा देते हैं देश के लिये, तुम्हारे जैसे देश बेचनेवाले के लिए नहीं.’ हे वाक्य ऐकून पंतप्रधान मोदींना उद्देशून लिहिलेले ‘आया देशविक्रेता देखो, आया देशविक्रेता’ हे गाणे कुणाला आठवल्यास तो प्रेक्षकांचा दोष नाही.
‘पठाण’चा जसा राजकीय हेतू होता, तसाच ‘जवान’चाही आहे. त्याचे संदर्भ चित्रपटात आहेत, तसे ते बाहेरही आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात शाहरुखने प्रामाणिकपणे सांगितले की या चित्रपटाचा शुभारंभ २६ जानेवारीला करण्यात आला आणि तो कृष्ण जन्माष्टमीला प्रदर्शित झाला (जाता जाता : यातील नायकाचा जन्म तुरुंगातच होतो आणि तो दुष्ट शक्तींचे निर्दालन करतो!). या कार्यक्रमात त्याने आणखी एक बातमी जाहीर केली. त्याचा खोट्या मार्गांनी परदेशात पलायन करणार्यांवरचा ‘डंकी’ नावाचा चित्रपट ‘ख्रिसमस’ला प्रदर्शित होणार आहे. भारताला राष्ट्रवाद अनिवार्य असेल तर तो ‘सर्वसमावेशक’ असणेही तितकेच अनिवार्य आहे.
‘जवान’ने खरी पंचाईत केली आहे ती भाजपची. या चित्रपटाने वâमालीचे यश संपादन केल्यानंतर, भक्तांच्या बहिष्काराच्या धमक्यांना प्रेक्षकांनी कचर्याची पेटी दाखवल्यानंतर आपले नाक वरच असल्याचे दावे तो पक्ष करू लागला आहे. त्याचे दलबदलू प्रवक्ते गौरव भाटिया यांनी हा चित्रपट यूपीए सरकारच्या भ्रष्टाचारावर आहे, असे म्हणत वडाची साल पिंपळाला लावायचा हास्यास्पद प्रयत्न केला आहे. संपुआ सरकार भ्रष्ट होते का नाही हा मुद्दा नाही. २०१४पासून सत्तेवर असलेला भाजप भ्रष्ट आहे का नाही, हा सवाल आहे. भाजप हा पक्ष अजिबात भ्रष्ट नाही हे सिद्ध करण्यासाठीच तर त्या पक्षाने एकनाथ शिंदे, अजित पवार या शुद्धोदनांना सामावून घेतले आहे.
सर्वसमावेशकता हाच या चित्रपटाचा आशय आहे. यातील स्त्रिया मनुवादी गुलामी पत्करणार्या नाहीत; त्या कृती करणार्या कर्त्या आहेत. याची कथा सार्या देशभर घडवत खरी राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करते. याचा नायक असलेल्या विक्रम राठोडचा ईशान्य भारतातील एक जमात जीव वाचवते. अगदी हिंसाग्रस्त मणिपुरातही जणू विद्वेषावर मात करणार्या मानवतेचे दर्शन होते. चित्रपटाच्या शेवटच्या भागात ‘रमय्या वस्तावय्या’ गात तो तेलुगू राष्ट्रवादालाही आपल्यात जागा करून देतो. भारतीय राष्ट्रवादात एका प्रांतीय भाषेला जागा करून देत तो स्वत:ला समाजवादी गीतकार शैलेंद्र यांनाही जोडून घेतो! तसेच आजादीच्या घोषणांचीही आठवण करून देत आजादी ही भारतीय राष्ट्रवादाला अपरिचित नसल्याचेही सांगतो.
या सार्याचा अर्थ हा चित्रपट पुरोगामी असल्याचा अजिबात दावा नाही. गुहेला तोंड आहे का नाही, ही शंका दूर करण्याची अंधुक का होईना, पण एक शक्यता तो दाखवतो. घाटाच्या स्तरावर नसेल तर पार्श्वभूमीवरील आशयाच्या बाबतीत तरी दाखवतो. त्याने सर्व साचे मोडलेले नाहीत, उलट काही वापरलेलेही आहेत. नायकाचे नाव विक्रम राठोड असे उच्चजातीयच का? असाही प्रश्न विचारला गेला आहे. तो रास्तही आहे. कांबळे किंवा पासी नावाचा नायक होईल तेव्हा परिवर्तनाचे एक नवे आवर्तन सुरू होईल. पण आजच्या वास्तवात चित्रपटांनी काही मर्यादित प्रश्न विचारायला प्रेक्षकांना उद्युक्त केले तरी ते एक सकारात्मक पाऊल ठरेल.
बाकी काही असो, भाजपवाले म्हणतात, तसा ‘जवान’ हा चित्रपट संपुआ सरकारच्या भ्रष्टाचारावर असेल तर महाराष्ट्र सरकारने एक गोष्ट करावी. ‘काश्मीर फाइल्स’, ‘केरळ स्टोरी’ केले तसे ‘जवान’ही करमुक्त करून दाखवावा. तेवढेच राष्ट्रकार्याचे पुण्य फडणवीसांच्या पदरी पडेल.