महानगरपालिकेच्या २००७ सालच्या सुरुवातीस झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले. शिवसेनाप्रमुखांची तब्येत फारशी बरी नव्हती. त्यामुळे उद्धवजींवर पक्षाची सारी जबाबदारी आली. त्यातच काही मराठी वृत्तपत्रांनी आणि विरोधकांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आता काही खरे नाही अशी आवई उठवली. पण त्याला मुंबईकर भुलले नाहीत. निवडणुकांचा निकाल लागला. शिवसेनेला घवघवीत यश मिळाले. शिवकाळात मराठे युद्ध जिंकत पण तहात हरत. उद्धव ठाकरे मात्र युद्धातही जिंकले आणि तहातही जिंकले. म्हणूनच मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त चार महानगरपालिकांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
मुंबईसह इतर महानगरपालिकेचे बिगुल वाजले. निवडणुकीचा निकालही लागला. पण शिवसेनेतील फुटीनंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला हादरा मिळेल हा भ्रम खोटा ठरवीत मुंबईकरांनी सेना-भाजप युतीच्या पदरात १११ जागा टाकून मुंबईवरचा भगवा कायम ठेवला. शिवसेनेला ८३ तर भाजपला २८ जागा मिळाल्या. सेनेचे दोन बंडखोर उमेदवार निवडून आले. महापौर निवडणुकीसाठी ११४ मते मिळणे आवश्यक होते. युतीकडे ११३ नगरसेवक असल्याने शिवसेनेची सत्ता कायम राहणार हे स्पष्ट झाले. ‘काँग्रेस’ला ७१ जागा मिळाल्या तर ‘राष्ट्रवादी’ला १४ जागा मिळाल्या आणि ‘मनसे’ला फक्त सात जागा मिळू शकल्या. इतर छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून २३ जण निवडून आले.
ठाण्यातही विजयाची घोडदौड सुरूच राहिली. ठाण्यामध्ये ४८ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीला फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. बहुमतासाठी एकूण ५९ जागांची आवश्यकता असताना शिवसेना-भाजपचे एकत्रित संख्याबळ ५३ झाले. अपक्षांच्या मदतीने ठाण्यातसुद्धा भगवा झेंडा फडकू लागेल हे स्पष्ट झाले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, ‘ही उद्धवची करामत. हा भगव्याचा विजय आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र,’ असे विनयाने सांगताच, ‘ही सगळी उद्धवजीची करामत आहे आणि शिवसैनिकांनी त्याला केलेल्या सहकार्याची!’ असे कौतुकही त्यांनी केले. ‘निकाल ऐकला आणि मी स्तब्ध झालो. खूप विरोध होत होता, नारू जंत वळवळत होता, पण आता सगळे थंड पडले,’ असे शिवसेनाप्रमुखांनी ‘मातोश्री’वर निवडक पत्रकार व शिवसैनिकांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना श्रेय देताना, ‘विरोधकांनी शिवसेना संपल्याचं चित्र रंगवलं पण त्यांची गाठ होती एका व्यंगचित्रकाराशी!’ असा टोला लगावला. ‘वाघाला डिवचलंत आता त्याने पंजा मारला आहे’ अशी आक्रमक भाषाही त्यांनी वापरली.
अपेक्षेप्रमाणे मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या डॉ. शुभा राऊळ सहज निवडून आल्या. त्यांच्या विजयानंतर उद्धवजींनी प्रतिक्रिया दिली की, ‘शिवसेना मुंबईकरांचा विश्वासघात करणार नाही.’ ठाण्यात स्मिता इंदुलकर यांचा दणदणीत विजय झाला. त्यांना ६४ मते मिळाली तर त्यांच्याविरोधातल्या उमेदवाराला ४७ मते पडली. मुंबईप्रमाणे ठाण्यातही विजयोत्सव साजरा झाला.
त्यावेळी ‘सामना’ने १२ मार्च रोजी ‘मुंबई-ठाण्यातील विजय’ असा अग्रलेख लिहिला. ‘मुंबई आणि ठाण्यात शिवसेना-भाजप युतीचा भगवा डौलाने आणि मानाने फडकला आहे. दोन्ही शहरांवर शिवसेनेचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा उपमहापौर विराजमान झाला. मुंबईत डॉ. शुभा राऊळ आणि ठाण्यात स्मिता इंदुलकरांनी दणदणीत बाजी मारून विरोधकांना चारी मुंड्या चीत केले. मुंबई आणि ठाण्याच्या जनतेने मतपेटीद्वारे शिवसेना-भाजप युतीलाच कौल दिला. गेल्या चाळीस वर्षात अशी अनेक काळी मांजरं शिवसेनेला आडवी गेली. मात्र शिवसेनेचा ढाण्या वाघ मराठी अस्मिता व हिंदुत्वासाठी सतत डरकाळी फोडत राहिला. मराठी अस्मितेवर कोणी डोळे वटारून पाहिले रे पाहिले की त्यांना शिवसेनेच्या वाघाने पंजा मारलाच म्हणून समजा. त्यामुळे आजही हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना देशाचे राजकारण करीत असली तरी मुंबई-ठाण्यात मराठी माणसांची भक्कम एकजूट हीच शिवसेनेची खरी ताकद आहे.’
मुंबई आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेला सरळ विजय प्राप्त झाला. दोन्ही ठिकाणचे महापौर निवडून येणे स्वाभाविक होते. परंतु इतरत्र मात्र शिवसेनेचे महापौर किंवा उपमहापौर निवडून येणे या दोन्ही गोष्टी कठीण होत्या. परंतु बुद्धिचातुर्याने आणि युक्तीप्रयुक्तीने उद्धवजींनी तेही घडवून आणले. असे म्हणतात की, शिवकाळात मराठे युद्ध जिंकत पण तहात हरत. उद्धव ठाकरे मात्र युद्धातही जिंकले आणि तहातही जिंकले. म्हणूनच मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त चार महानगरपालिकांत शिवसेना सत्तेत सहभागी झाली. नागपूरमध्ये भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी प्रचंड जिद्द दाखविली. अहोरात्र मेहनत घेऊन त्यांनी नागपूर महानगरपालिका ताब्यात घेतली. भाजपचे देवराव उमरेडकर महापौर झाले तर शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले. नागपूरच्या विजयाने महाराष्ट्राच्या राजधानीबरोबरच उपराजधानीसुद्धा युतीच्या ताब्यात आली.
पुण्याचा पॅटर्न वेगळाच होता. येथे राष्ट्रवादी काँग्रेस ४१, काँग्रेस ३६, भाजप २५, शिवसेना २०, अपक्ष १४ आणि मनसे ८ असे नगरसेवक निवडून आले होते. येथे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती झाली. काँग्रेसची १५ वर्षांची मक्तेदारी संपली. राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी भोसले महापौर झाल्या तर शिवसेनेचे चंद्राकांत मोकाटे उपमहापौर झाले. ‘लोकसत्ता’ने शीर्षक दिले, ‘वाघाच्या कानात घड्याळाची टिक टिक.’ उद्धवजींच्या गुप्त डावपेचांमुळे हे शक्य झाले.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची १९ जुलै २००७ ही तारीख जाहीर झाली. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांसमोर प्रश्न उभा राहिला की, यावेळी आपण मराठी बाणा सांभाळायचा की हिंदुत्वाच्या बाजूने उभे राहायचे. कारण काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रतिभा पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. प्रतिभा पाटील मराठी होत्या, महिला होत्या, परंतु त्या काँग्रेसच्या होत्या. तर भैरोसिंह शेखावत हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केवळ सोयीसाठी म्हणून जरी ते अपक्ष म्हणून उभे राहिले तरी सर्वांनाच माहीत होते की भाजपचे आहेत. शिवसेनेच्या भूमिकेकडे सार्या देशाचे लक्ष लागले. प्रतिभा पाटील निवडून याव्यात म्हणून मोर्चेबांधणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या पहिल्या व पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याची संधी प्रतिभाताईंना प्राप्त झाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शिवसेनेचा अर्जुन’ म्हणून अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखात त्यांनी म्हटले, ‘श्रीमती पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक अस्वस्थता शिवसेनेत निर्माण झाली आहे. राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने कायम भाजपला साथ दिली. नंतर हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष सत्तेचा भागीदार बनला आणि आता विरोधी पक्षात बसला. रालोआने काँग्रेस उमेदवाराला विरोध करण्याचा निर्णय घेऊन उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांना पाठिंबा दिला, त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे असे दिसते.’
राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत शिवसेनेने भाजपप्रणित आघाडीला बाजूला ठेवल्यामुळे भाजपमध्ये फार मोठी नाराजी पसरली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, ‘भाजप स्वबळावर विधानसभा निवडणुकीत यश मिळवू शकतो आणि गोपीनाथ मुंडे भावी मुख्यमंत्री असतील.’ शिवसेनेतही या विषयावर वातावरण तापू लागले. शिवसेनेने उघड-उघड प्रतिभाताई पाटील यांना मराठी माणूस म्हणून आणि महिला म्हणून पाठिंबा जाहीर केला. बाळासाहेबांचे मन वळवण्याचे प्रयत्न झाले. स्वत: जॉर्ज फर्नांडिस बाळासाहेबांना भेटून गेले. पण बाळासाहेबांनी भूमिका बदलण्यास नकार दिला. प्रतिभाताईंनी शेखावत यांचा पराभव केला, त्यावेळी महाराष्ट्र टाइम्सने ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असा अग्रलेख लिहून बाळासाहेबांचे आणि प्रतिभाताईंचे अभिनंदन केले.